साडेपाच लाखांची चोरी करणार्‍यास अटक

0

सातपूर |प्रतिनिधी तपारिया कंपनीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इनोव्हा कारची काच फोडून गाडीत ठेवलेली सुमारे साडेपाच लाखांची बॅग चोरल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात ठाणे येथील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, याप्रकरणी आणखी ३ गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

सातपूर औद्योगिक परिसरातील जय एन्टरप्रायजेसचे कपिल मेहता हे कंपनीच्या कामासाठी इनोव्हा कारने तपारिया टूल्स या कंपनीत आले होते. गाडीत येताना कामगारांचे पगार करण्यासाठी बँकेतून सुमारे पाच लाख ६० हजार रुपये काढून एका बॅगेत ठेवले हाते.गाडी तपारिया कंपनीच्या पार्किंगमध्ये लावून ते व्यवस्थापनाबरोबर बैठकीसाठी कंपनीत गेले असता चोरांनी कारची काच फोडून साडेपाच लाखांची बॅग लांबवली.

घटनेचा तपास करताना सातपूरचे वपोनि राजेंद्र कुटे यांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास यंत्रणा राबवित तसेच गुन्हे शाखा युनिट १ च्या मदतीने ठाणे येथून या गुन्हातील संशयित मंगेश गुंजेला अटक केली. त्याच्याकडून ४० हजारांचा मालही जप्त केला, त्याचे तीन साथीदार श्यामल परेरा, विनय राणा, राकेश जाधव फरार असून या तिघा आरोपींचा शोध पोलीस घेत असल्याचे वपोनि राजेंद्र कुटे यांनी सांगितले.

 

जिल्हा अॅथलेटीक असो.तर्फे निवड चाचणी स्पर्धा

0

सातपूर |प्रतिनिधी नाशिक जिल्हा अॅथलेटीक असोसिएशनतर्फे येत्या रविवारी मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे कनिष्ठ गटातील (वय १८ ते २० वर्षे) खेळाडू मुले व मुलींकरिता जिल्हा कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेतून निवड झालेले १८ वर्षे वयाखालील खेळाडू हे विभागीय स्पर्धासाठी पात्र ठरतील. तसेच २० वर्षे वयाखालील खेळाडू हे राज्य कनिष्ठ गट मैदानी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
विभागीय स्पर्धेतून १८ वर्षे वयाखालील निवड झालेले खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील व २० वर्षे वयाखालील निवड झालेले खेळाडू कनिष्ठ गट राज्य मैदानी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी नाशिक जिल्हयाचे  प्रतिनिधित्व करतील.

या चाचणी स्पर्धेसाठी १८ वर्षांखालील खेळाडू हे ७ ऑक्टोबर २००० ते ६ऑक्टोबर २००२ या कालावधीत जन्मलेले असावे, तसेच २० वर्षांखालील खेळाडू हे ७ ऑक्टोबर १९९८ ते ६ऑक्टोबर २००० या कालावधीत जन्मलेले असावेत.

या संधीचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी मोठ्या संख्यने सहभाग नोंदवावा. खेळाडूंनी स्पर्धेसाठी येताना सोबत जन्म दाखल्याच्या पुराव्यासाठी इयत्ता १० वी पासचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

स्पर्धेत भाग घेण्यास इच्छूक खेळाडूंनी राजीव जोशी, दत्ता जाधव, वैजनाथ काळे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन नाशिक जिल्हा अॅथलेटीक असोसिएशनतर्फे करण्यात आले.

 

‘समृध्दी’ मार्गावर वन्यजीवांचा मुक्त संचार

0

नाशिक । महाराष्ट्र समृद्धी महामार्गादरम्यान येणार्‍या वन्यजीव स्थळांचा अभ्यास करुन तेथील वन्यजीवांचे संरक्षण कसे करता येईल, महामार्ग उभारणीनंतर त्यांचा विनाअडथळा संचार कसा होईल. अशी सर्वच काळजी एमएसआरडीसीकडून घेण्यात आली आहे. त्यासाठी महामार्गालगत अभायरण्य विकसित करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याकरीता डेहराडून येथील वन्यजीव संस्थेसोबत करारही झाला आहे.

महामार्गाची आखणी करताना वन्यजीवांना अभय मिळावे, त्यांचा स्वच्छंदपणा जपला जावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठोस पावले उचलली आहेत. एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत भारतीय वन्यजीव संस्थेशी यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार महामार्गादरम्यान येणा-या वन्यजीव स्थळांचा अभ्यास करून तेथील वन्यजीवांचे संरक्षण कसे करता येईल, महामार्गाच्या उभारणीनंतर त्यांचा विनाअडथळा संचार कसा होईल, वन्यजीवांचे संगोपन कसे करता येऊ शकेल याचा सखोल अभ्यास करून त्यानुसार संबंधित संस्था एमएसआरडीसीकडे शिफारस अहवाल सादर करणार आहे.

यासंदर्भात काय उपाययोजना आखता येतील, याचेही मार्गदर्शन भारतीय वन्यजीव संस्था करणार आहे. त्यामुळे महामार्गाचे बांधकाम सुरू असताना आणि तो पूर्ण झाल्यानंतरही वन्यजीवांच्या जिवाला काही धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांबरोबरच 26 तालुके आणि 390 गावांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गादरम्यान दोन ठिकाणी अभयारण्ये येतात.

या अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात असताना आणि उभारणीनंतरही या अभयारण्यांतील वन्यजीवांना महामार्गावरील वाहनांचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने महामार्गाच्या रचनेमध्ये तरतूद करण्यात येईल. त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेची (वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मदत घेतली जाणार आहे.

वन्यजीव संस्था प्रथमच भागीदार
केंद्रीय वने व पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येणारी वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पूर्ततेपर्यंत एमएसआरडीसीची भागीदार व्हावयास तयार झाली आहे. कोणत्याही पायाभूत विकास प्रकल्पात अशा प्रकारे वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थेचा सहभाग होणे देशात प्रथमच घडत आहे.

पथदर्शी प्रकल्प ठरेल
समृद्धी महामार्गामुळे वन्यजीवांच्या दैनंदिन जीवनात तसेच त्यांच्या विहारात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे वन्यजीवांच्या रक्षणाबाबत हा महामार्ग भविष्यात पथदर्शी प्रकल्प ठरेल. डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेशी महामंडळाने सामंजस्य करार केला आहे.
राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

परतीच्या पावसाला जोरदार सुरूवात

0

नाशिक । गेल्या महिनाभरापासून दडी मारल्यानंतर मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सायंकाळी शहरात जोरदार पाऊस झाला. जिल्हयाच्या पश्चिम पटटयात अनेक ठिकाणी पावसाने मध्यम ते जोरदार हजेरी लावली. शहरात सुमारे तासभर झालेल्या पावसाने रस्त्यांवरून पाणी वाहत होते. यामुळे गणेश मंडळांची देखावे झाकण्यासाठी धावपळ उडाली.

गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. त्यामुळे परतीच्या पावसाकडे शेतकर्‍यांच्या नजरा लागून होत्या. परंतु सप्टेंबर महिन्यातील काही दिवस कोरडे गेल्याने चिंता वाढली होती. मात्र आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाल्याने पावसाची आस लागून होती. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाटयाच्या वारयासह जोरदार पावसाने हजेरी लावली.जिल्हयातही अनेक भागांत चांगला पाउस झाल्याने शेतांमधून पाणी वाहू लागले होते.

मालेगाव,येवला, नांदगाव, सिन्नरच्या पूर्व भागाकडे मात्र वरूणराजाने पाठच फिरवल्याचे दिसून आले. सोमवारी सांयकाळनंतर नाशिक शहरात एक तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी साचून पाणी वाहत होते. यंदा जून, जुलै, ऑॅगस्ट या तीन महिन्यात जिल्ह्यात सरासरी 86 टक्केच पाऊस झालेला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्हयातील मालेगाव, येवला, नांदगाव, सिन्नर, निफाड, नांदगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवरच भिस्त आहे.येत्या महिन्याभरात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. यंदा जिल्हयातील धरणांत सुमारे 79 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

पुढील चार दिवस पावसाचे
बेपत्ता झालेल्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने 21 सप्टेंबरपर्यंत परतीचा पाउस जोरदार हजेरी लावेल अशी सुखवार्ता हवामान विभागाने दिली आहे. जूनपासून सप्टेंबरच्या पंधरवडयापर्यंत पावसाने सातत्याने लहरीपणाचे दर्शन घडवले. प्रत्येक महीन्याच्या अखेरीस त्या त्या महीन्याच्या सरासरीपर्यंत पाउस पोहचल्याचे यंदा पहावयास मिळाले. मात्र आता गेल्या तीन चार दिवसांपासून किमान तापमान कमी होत असल्याने पावसाचे आगमन होणार की नाही अशी शंका उपस्थित करण्यात येत होती परंतू आता आजच्या पावसाने पुन्हा एकदा सुखद धक्का दिला आहे.

मंडळांची धावपळ
शहरात सध्या गणेशोत्सवाची धुम आहे. रविवारपासून सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे पूर्ण करत नागरीकांसाठी खुले केले आहे. पुढील चार दिवसांत गणेशभक्तीला उधाण येणार आहे. त्यामुळे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र पावसाने हजेरी लावल्याने भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या पाण्यामुळे देखाव्यांचे नुकसान होउ नये म्हणून गणेश मंडळ पदाधिकारयांची धांदल उडाली.

विजेचा लंपडाव
सोसाटयाच्या वारयासह झालेल्या पावसाने शहर परिसरातील वीजपुरवठा काही वेळ खंडीत झाला होता. तर काही भागात वीजेचा लपंडाव सुरू होता. गेल्या महीनाभरापासून प्रचंड कडाका होता त्यातच आज झालेल्या पावसाने इन्स्युलेटर पंक्चर होण्याच्या प्रकारांमुळे वीज येत जात असल्याचे वीज मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. तर काही भागात झाडांच्या फांद्या वीज वाहीन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र वीज कर्मचारयांनी तातडीने काम हाती घेत वीज पुरवठा सुरळित केला.

पाउस लांबणार
कमी दाबाचा पटटा जस जसा विस्तारत जाईल तस तसा पावसाचा कालावधीही वाढत जाईल. मान्सूनचा पॅटर्न बदलल्याने ऑक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी राहणार आहे. त्यामुळे थंडीचे दिवस कमी होतील. सध्याचा पाउस हा परतीचा पाउस आहे. पुढील आठवडाभर मध्यम ते तुरळक स्वरूपात पाउस सुरू राहणार आहे.
किरणकुमार जोहरे, हवामान अभ्यासक

19 September 2018

0

नियम तोडणार्‍यांकडून गणेशाची आरती

0

नाशिक । शहर वाहतूक पोलीस शाखेतर्फे आज शहरात ठिकठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती रस्ता सुरक्षा आरतीचा उपक्रम राबविण्यात आला.

जुना गंगापूरनाका येथील चौकात हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. रोडने जाणारे परंतु हेल्मेट व घातलेले दुचाकी चालक आणि सीटबेल्ट न लावलेले चारचाकी चालक, नियम तोडणार्‍या चालकांना रोखण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांमधील काहींना गणपतीची वेशभूषा करून त्यांच्या हाती वाहतूक सुरक्षिततेचे संदेश देणारे फलक देण्यात आले होते. या गणेशाची आरती हेल्मेट न घातलेल्या वाहनचालकांकडून करण्यात आली. या अभिनव उपक्रमामुळे वाहनचालकही हेल्मेट न घातल्याने लज्जीत झाले होते.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले की, हेल्मेट न घातल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपले प्राण सुरक्षित तर आपले घर-परिवार सुरक्षित. आपल्या कुटुुंबियांसाठी आपण फार महत्त्वाचे आहात. तुमच्याच सुरक्षिततेसाठी पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे. हेल्मेट वापरावे म्हणून दंड घेतला जातो. पण तरीही आपण हेल्मेट वापरावे अशीच सुबुद्धी गणपती बाप्पा आपणास देवो; अशीच प्रार्थना करतो असे सांगत हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले.

यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त डॉ. अजय देवरे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलचंद भोई, सदानंद इनामदार, तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

परिवहन समितीला हिरवा कंदिल मुख्यमंत्र्याच्या भेटीचे फलीत

0

नाशिक । स्मार्ट सिटी आणि शहराच्या विकासासाठी हिताचे निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. राज्य शासनाकडून सर्व साह्य केले जाईल असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी परिवहन समितीला हिरवा कंदिल दिला तर हरितक्षेत्रास शेतकर्‍यांचा विरोध असेल तर हा निर्णय नंतर घेण्यास संमती दर्शविल्याचे सुत्रांनी सांगीतले.

परिवहन समितीवरून महापौरांच्या रामायण बंगल्यावर झालेल्या महाभारतानंतर आमदार बाळासाहेब सानप व महापालिकेचे पदाधिकारी पालकमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटिसाठी मुंबई येथे गेले होते. पालकमंत्र्यांनी सर्वांचे गर्‍हाणे ऐकुण घेतल्यानंतर सर्व पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली. यावेळी सुमारे एक तास मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी संवाद साधला. सर्व महापालिकांचा अभ्यास करून नियमानुसार परिवहन सेवेसाठी समितीची तरतुद असल्यास समिती स्थापन करावी. त्याविषयी सदस्यांनी एकत्रीत चर्चा करुन निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सुचवले. तसेच हरितक्षेत्रास शेतकर्‍यांचा विरोधत असल्यास तुर्तास हा निर्णय बाजूला ठेवून जे शेतकरी यास अनकुल असतील अशा भागात तो राबवावा अशा सुचना केल्या.

परिवहन समिती,हरितक्षेत्र विकास आणि करवाढीच्या विषयावरून महापौरांच्या रामायण बंगल्यावर बोलविण्यात आलेल्या भाजप पदाधिकार्‍यांच्या बैठकीत आ. फरांदे तसेच इतर पदाधिकार्‍यांमध्ये खडाजंगी झाली होती. त्यांनी एकमेकांना भिडून एकमेकांची उणीदूनी काढत असभ्य शब्दांमध्ये एकमेकांवर शाब्दीक भडीमार केला होता. वाद इतके विकोपाला गेले की, त्याचा आवाज रामायण बंगल्यातून रस्त्यावर एकू येत होता. हा वाद पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र होते. यामुळे अखेर ही बैठक कोणत्याही निर्णयाविना गुंडाळावी लागल्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढवली होती.

यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी थेट पालकमंत्री व मुख्यंमत्र्यांना भेटण्याचा निर्णय भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घेतला होता. त्यानुसार आज दुपारी आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा यामध्ये सामावेश होता.

भाजप नगरसेवकांची बैठक
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अश्वासनानंतर बुधवारी (ता.19) होणार्‍या महासभेपुर्वी सकाळी दहाला महापौरांच्या रामायण या निवासस्थानी भाजप सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत महासभेत सादर होणार्‍या बससेवा व हरितक्षेत्र यांवरील डॉकेटबाबत काय निर्णय घ्यायचा यावर खल होणार आहे.

अंगणवाडी सेविकांचे बेमुदत उपोषण

0

नाशिक । महापालिकेने 136 अंगणवाड्या बंद करून गेली चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन न दिल्याने पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी आजपासून पालिका प्रवेशद्वारावर अमरण उपोषण सुरू केले. सायंकाळी आलेल्या भर पावासातही हे आंदोलन सुरू होते.

भारतीय हितरक्षक सभा व अंगणवाडी सेविकांनी आजपासून अमरण उपोषणास सुरूवात केली. याबाबतचे निवेदन देण्यासाठी आज आयुक्त उपलब्ध नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेने 1993 पासून आंगणवाडी प्रकल्प सुरू केला. 25 वर्षापासून हा प्रकल्प अविरतपणे सुरू होता. या प्रकल्पात ज्या त्रुटी आहेत त्यास महापालिका व त्यांचे अधिकारी जबाबदार आहेत. परंतु महापालिकेतचा खर्च कमी करण्यासाठी पटसंख्येचे कारण देत व त्रुटींसाठी फक्त अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरून आयुक्तांनी महापालिका क्षेत्रातील 136 अंगणवाड्या बंद करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे.

1993 च्या महासभेचा संदर्भ देऊन अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. परंतु तुटपुंजा मानधनावर शहरातील गरीब, विधवा, परितक्ता अंगणवाडी सेविका उपजीवीका करत होत्या. या सर्वांचा रोजगार आयुक्तांच्यानिर्णयाने हिरावला गेला आहे. गेली तीन वेळा मोठी आंदोलने, थाळीनाद करूनही महापालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे आता थेट अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय हितरक्षण सभेचे किरण मोहिते, श्रृती जाधव, कोमल जाधव, सायली जाधव तसेच विविध अंगणवाडी सेविकाउपस्थित होत्या.

Social Media

26,070FansLike
5,154FollowersFollow
1,125SubscribersSubscribe
error: Content is protected !!