दुष्काळाची पेरणीला झळ

0
file photo

अवघ्या एक लाख 37 हजार हेक्टरवर पेरणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदा पावसाने हात दाखविल्याने आतापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापासून जनतेवर पाण्याचे संकट ओढवले आहे. परिणामी अवघ्या एक लाख 37 हजार हेक्टरवर रब्बी हंगामासाठी पेरण्या झालेल्या आहेत. यात 39 हजार 459 हेक्टरवर नव्याने झालेल्या ऊस लागवडीचा समावेश आहे.

रब्बी हंगामाचा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. परतीच्या पावसावर जिल्ह्यातील शेतीचे चित्र अवलंबून असले तरी सुरुवातीच्या पावसात जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा आणि भंडारदरा धरण भरले की जिल्ह्यातील उत्तर भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागतो. यंदा मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले नसले तरी समाधानकारक पाणी साठा होता. पण जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने धरणातील शेतीच्या आवर्तनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सरासरी 6 लाख 67 हजार क्षेत्र आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्यास हे क्षेत्र साडे सात ते आठ लाख हेक्टरपर्यंत यापूर्वी वाढत असे. पण यंदा परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत अवघ्या 1 लाख 37 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात साधारणपणे सव्वा लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली असून पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे या ज्वारीची वैरण तयार होणार आहे.

पावसामुळे यंदा लाल कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून आतापर्यंत अवघ्या 12 हजार 589 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. अनेक ठिकाणी विहीरी आटल्याने कांदा पिक अडचणी आले आहे. अनेक शेतकर्‍यांनी जादा दराने कांदा रोप विकत घेवून कांदा पिकाची लागवड केली होती. त्यांच्यावर आता हात चोळण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामातील दुसरे पिक असणार्‍या गव्हाची स्थिती यंदा बिकट राहणार आहे. यंदा जिल्ह्यात गव्हाची पेरणी जेमतेम राहणार आहे. आतापर्यंत अवघ्या 1 हजार 253 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. कमी पाणी लागणार्‍या हरभरा पिकाची स्थिती वाईट असून आतापर्यंत 8 हजार 304 हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. ऊस बागायतदारांचा जिल्हा असणार्‍या नगर जिल्ह्यात यंदा ऊस लागवडअडचणीत आहे. ऊसाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 21 हजार हेक्टर असतांना जिल्ह्यात अवघा 39 हजार 459 हेक्टरवर नव्याने ऊसाची लागवड झालेली आहे. याचा परिणाम पुढील गाळपावर होणार आहे.

अशी आहे पेरणी (हेक्टरमध्ये)
ज्वारी 1 लाख 25 हजार (27 टक्के), गहू 1 हजार 253 (3 टक्के), मका 1 हजार 519 (6 टक्के), हरभर 8 हजार 305 (7 टक्के), करडई 10 (1 टक्के), तीळ शुन्य, जवस शून्य, सूर्यफूल 6 (7 टक्के), ऊस 39 हजार 459 (33 टक्के) यांचा समावेश आहे.

 

 

पैसे नसल्याचा केवळ कांगावा : मनपाच्या तिजोरीत दीडशे कोटी!

0
जळगाव । हुडकोच्या कर्जापोटी कर्जबाजारी झालेली महानगरपालिका पैसे नसल्याचा कांगावा करीत आहे. मात्र विविध योजनांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतुन प्रशासनाच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल दिडशे कोटी रक्कम जमा असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पैसे असतांनाही जळगाव शहरातील विकासकामे का थांबविली गेलीत? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. कर्जापोटी दरमहा चार कोटी दरमहा अदा केले जात आहे. तसेच गाळ्यांमधुन मिळणारे उत्पन्नदेखील गेल्या सहा महिन्यांपासुन थकीत आहे. त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक कोंडी झाल्याची ओरड केली जात आहे. दरम्यान उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी महापालिकेच्या विविध बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. तसेच कुठल्या-कुठल्या योजनांची रक्कम आहे, याबाबत आयुक्तांना पत्र देवून माहिती मागविली.

अर्थ विभागातर्फे उपमहापौरांना माहिती दिल्यानंतर मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात तब्बल दिडशे कोटी रक्कम जमा असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार, खासदार निधी पडुन महानगरपालिकेच्या मिळणार्‍या वित्त आयोगातील निधीसह आमदार, खासदारांच्या निधींचादेखील विनियोग केला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार, खासदारांच्या निधीतुनदेखील विकासकामे केली गेली नसल्याचे उघडकीस आले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मनपाला आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, विद्युत, घरपट्टी विभागासाठी मिळालेल्या निधी पैकी, 38 कोटी 85 लाख 61 हजार 269 रुपयांचा निधी मनपाकडे शिल्लक आहे.

निधी असतांनाही शहराचा विकास खुंटला
मुलभुत सोई सुविधांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधुन मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झालेला आहे. परंतू निद्रीस्त असलेल्या प्रशासनाने विकासकामांवर खर्च केलेला नाही. मनपाच्या तिजोरीत जवळपास दिडशे कोटी रुपये असतांनाही विकासकामे काम थांबविली गेलीत? असा प्रश्न निर्माण होत आहे.

ऑनलाईन मागविलेले पार्सल रिकामे असल्याच्या कारणावरुन पोस्टमनला मारहाण

0

जळगाव । ऑनलाईन खरेदी करुन मागविलेले पार्सलमध्ये कोणतीच वस्तू आढळून आली नाही. याचा राग आल्यामुळे पोस्टमनला मारहाण केल्याची घटना मोहाडी रोडवरील बालाजी हाईट्स येथे दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. पोस्टमनला मारहाण होत असल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी मध्यस्ती करीत वाद मिटविला.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बालाजी हाईट्स येथील रहिवासी पियुष धनश्याम मंधवानी या युवकाने दिल्ली येथील कंपनीकडून ऑनलाईन मोबाईल बुकींग केला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास पोस्टमन हे मंधवानी याने मागविलेले पार्सल घेवून पियुष मंधवानी यांच्या घरी आले.

दरम्यान पोस्टमनने ते पार्सल पियुष याच्याकडे देवून त्याच्याकडून 4 हजार 100 रुपये घेत त्यांनी पार्सल मिळाल्याबाबत त्यांनी त्याची स्वाक्षरी देखील घेतली. त्यानंतर पोस्टमन हे पार्सल वाटण्यासाठी बालाजी हाईट्स येवून खाली येवून पार्सल वाटप करण्यासाठी जायला निघाले. यावेळी पियुष मंधवानी हा युवक पोस्टमनच्या मागे धावत येवून त्याने पोस्टमनला दिलेले पैसे परत मागितले परंतु पार्सल मिळालेल्याबाबत पियुष याने स्वाक्षरी केलेली असल्याने त्यांनी पैसे देवून शकत नसल्याचे सांगितले. पैसे परत देत नसल्याचा राग आल्याने पियुष मंधवानी व त्याच्या सोबत असलेल्या एका युवकाने पोस्टमनचा हात वाकवून त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडे असलेले पैसे हिसकविण्याचा प्रयत्न केला.

पैसे परत देत नसल्यामुळे पोस्टमनसोबत घाली हुज्जत
मंधवानी यांनी मागविलेल्या पार्सलमध्ये काहीच वस्तू निघाली नसल्यामुळे त्यांनी पोस्टमनला पैसे परत मागितली. परंतु पोस्टमनने वस्तू मिळाल्याची त्यांच्याकडून स्वाक्षरी घेतल्यामुळे त्यांनी पैसे परत देवून शकत नसल्याचे सांगितले. पैसे परत देत नसल्याने पियुष व त्याच्या सोबत असलेल्या युवकाने पोस्टमनला धमकी देत मारहाण केली.

परिसरातील नागरिकांनी केली मध्यस्थी
पियुष मंधवानी हे पोस्टमनसोबत वाद घालीत त्यांना मारहाण करीत असल्याचे दिसताच परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी गर्दी केली होती. त्यानंतर पोस्टमन यांनी देखील त्यांच्या सहकार्‍यांना घडलेल्या प्रकराबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोस्टमन व परिसरातील काही नागरिकांनी मध्यस्ती करीत वाद मिटविला. त्यानंतर पियुष याचे वडील त्याठिकाणी आल्यानंतर त्यांनी मारहाण केल्या बद्दल माफि मागत त्यांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर वादावर पडदा पडला.

पार्सल बनावट असल्याचे अनेक प्रकार उघडकीस
दिल्ली येथील कंपनीकडून मागविण्यात आलेले अनेक पार्सल ग्राहक मागवित असतात. परंतु यामध्ये मागविलेल्या वस्तूच नसल्याने अनेक ग्राहकांची फसवणुक होत आहे. मात्र तरी देखील यावर संबंधित कंपनीविरुद्ध कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोनईतून राजरोस वाळू वाहतूक

0
प्रतिनात्मक छायाचित्र
सोनई (वार्ताहर) – दीड महिन्यापूर्वी सोनईत बेकायदा वाळू डंपरने एका बडधे नामक तरुण मजुराचा बळी घेतला. त्यानंतर आठवडाभर वातावरण तणावाचे राहून देखील पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ या म्हणीप्रमाणे सोनई व परिसरात राजरोस बेकायदा वाळू वाहतूक व विक्री सुरू झालेली असताना प्रशासनातील महसूल, पोलीस व आरटीओ या विभागांकडून हेतूपुरस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे वातावरण आहे. सोनई जवळील मुळा नदीपात्रातून गेल्या पंधरवाड्यात जायकवाडीला जवळपास दोन टीएमसी पाणी गेल्यामुळे मुळा नदीपात्रात खेडलेपरमानंद, शिरेगाव, पानेगाव, करजगाव, अंमळनेर, निंभारी आदी नेवासा तालुक्यातील गावांचे नदीपात्रात नवीन वाळू वाहून आली आहे. त्यामुळे वाळू सम्राटांनी यापूर्वी मुळाथडीतील नदीपात्रातून वाळू उपसा करुन मोठमोठे खड्डे पाडून खडक उघडा केलेला होता. आता ते जुने खड्डे वाळूने भरलेले असून वाळूवाल्यांना ‘जायकवाडी पावली अन् अच्छे दिन आले, असे म्हटले जात आहे.

सोनई व परिसरात मोठ्या प्रमाणात घर, दुकान बांधकामे सुरू आहेत. त्यांना आता थेट लागेल तेवढी वाळू उपलब्ध केली जाते. मात्र त्यासाठी ‘मुँह मांगे दाम’ द्यावे लागते. पण कसेही असो वाळू तर मिळते ना! यावर बांधकामवाले समाधानी आहेत. ती वाळू कायदेशीर की बेकायदा याबाबत कुणालाच काही काळजी नाही. सोनई बरोबर अहमदनगरकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळू डंपर भरुन राजरोसपणे सोनईच्या मुख्य रस्त्यांवरुन नेत आहेत. या वाळू डंपरमुळे विवेकानंद चौक ते सोनई बसस्थानक या व्यावसायिक पेठेत मोठी वाहतूक कोंडी होते. तरी त्याकडे दुर्लक्ष करीत हे डम्पर शासनमान्य पद्धतीने भरधाव वेगाने बेकायदा वाळू वाहतूक व विक्री करतात. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तणावपूर्ण बनले तर त्याला केवळ प्रशासनच जबाबदार असेल, असे बोलले जाते.

रॉयल्टी मातीमिश्रित वाळूची…
वाळू सम्राटांच्या सुपिक डोक्यातून ‘मातीमिश्रित वाळू’ हे गोंडस नाव शासकीय दरबारी वापरुन अत्यल्प रॉयल्टीवर नदीपात्रा शेजारच्या शेतातून वाळू उपसली जाते. आणि ‘माती’ नावाने उपसा केलेली ही वाळू सोन्याच्या भावाप्रमाणे बिनधास्त विकण्याचा नवा फंडा वाळू क्षेत्रात चालू झालेला असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

नंबरप्लेटवर पिवळे पट्टे!
वाळू वाहतूक करणारे डम्पर ट्रॅक्टर्स, टिपर अगर इतर वाहनांच्या नंबर प्लेटवर पिवळा रंग दिलेला असतो. त्यामुळे या वाहनांचा नंबरच लक्षात येत नाही. कित्येक दिवसांनी एखादी शासकीय कारवाई होऊन वाळूचोरी वाहन पकडले तरी महसूल, पोलीस दप्तरी विनानंबर डम्पर असा उल्लेख होतो. मग संबंधित आरटीओ ही वाहने पकडून सस्पेन्ड का करत नाहीत? असा सवाल विचारला जात आहे.

 

साई मंदिरात गुरुवारी कोणताही अनुचित प्रकार घडलाच नाही

0

साईपालखीचे मानकरी संकलेचा व शिंदे यांचा निर्वाळा

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईमंदिरात गुरुवारी सायंकाळी पालखी दरम्यान मंदिर प्रमुखाने एका महिलेस धक्काबुक्की करत विनयभंग केल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसात दाखल करण्यात आला असून घडलेल्या प्रकाराचे पूर्णतः खंडन करीत साईबाबांची पालखी मंदिरातून चावडीपर्यंत जाताना तसेच चावडीपासून पुन्हा मंदिरात येताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आपल्यासोबत असल्याचे सांगत असा कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा निर्वाळा प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेले साईपालखीचे मानकरी दिलीप संकलेचा व सचिन शिंदे यांनी केला आहे. साईबाबांच्या हयातीपासून सुरू असलेल्या पालखीची परंपरा आजतागायत साई मंदिरात सुरू आहे. गुरुवारी दि. 15 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी पालखी दरम्यान एका महिला भाविकाला मंदिर प्रमुखावर धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून फिर्यादी महिलेने शिर्डी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

या दरम्यान प्रत्यक्षदर्शी उपस्थित असलेल्या साईबाबांच्या पालखीचे मानकरी दिलीप संकलेचा आणि सचिन शिंदे यांनी या घटनेचे खंडन करीत असा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. दिलीप संकलेचा यांनी बोलताना सांगितले, दर गुरुवारी पालखी निघत असून मी अनेक वर्षांपासून पालखीला हजर राहत आहे. माझे आजोबा नंदराम संकलेचा बाबांच्या काळातील साईभक्त होते. बाबा आमच्या घरी भिक्षा मागायला येत असत. दरम्यान गुरुवारी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास समाधी मंदिरातून बाबांचा फोटो बाहेर पडतो आणि पावणे दहाच्या सुमारास पालखी मंदिरात येते. यादरम्यान मी आणि पालखीचे आणखी काही मानकरी माझ्या समवेत होते. यावेळी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप आणि माझ्यात फक्त एका फुटाचे अंतर होते. त्यामुळे गुरुवारी पालखी दरम्यान असा कोणताही प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडला नसल्याचे संकलेचा यांनी सांगितले.

सचिन शिंदे यांनी सांगितले, साईबाबांच्या पालखीवर मानकरी म्हणून आमचा मान असून साईबाबांचे भक्त स्वर्गीय भागुजी शिंदे यांचे आम्ही वंशज आहोत. दर गुरुवारी मी पालखीला उपस्थित राहतो. या गुरुवारी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी पालखीजवळ गर्दी झाली म्हणून भाविकांना बाजूला होण्याची विनंती केली होती. त्या ठिकाणी सदर महिला भाविक उपस्थित होत्या. त्यांना गर्दीमध्ये अनवधनाने जगताप यांचा हात लागला असेल मात्र त्यांना धक्काबुक्की किंवा शिवीगाळ करण्याचा कोणताही प्रकार निदर्शनास आला नसल्याचे सांगत पालखीत साईबाबांच्या अमूल्य अशा पादुका आणि सटका असल्याने या वस्तूंचे संरक्षण करणे प्रशासनाचे काम आहे. मुळात मंदिर प्रमुख पदावर काम करणे तारेवरची कसरत असून मंदिरात वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा जोपासाव्या लागतात. सदर प्रकार गैरसमजातून घडलेला असावा, असे मत सचिन शिंदे यांनी व्यक्त केले.

 

जळगाव जिल्ह्यातील 40 ग्रामसेवक दप्तर घेऊन फरार

0
जळगाव । जिल्ह्यातील तब्बल 40 ग्रामसेवक दप्तर घेऊन फरार असल्याची धक्कादायक माहिती आ. संजय सावकारे, आ. उन्मेष पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिशा समितीच्या सभेत निदर्शनास आणून दिली. दरम्यान हा प्रकार अत्यंत गंभीर असुन संपुर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची सभा आज खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा ना. उज्वला पाटील, आ. स्मिता वाघ, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. चंदूलाल पटेल, आ. हरीभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर आदी उपस्थित होते.

ग्रामसेवक नसल्याचे योजना रखडल्या
जिल्ह्यात 50 टक्के ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ज्यांना नियुक्ती दिली जाते ते नियुक्त होत नाही. जवळपास 40 ग्रामसेवक दप्तर घेऊनच फरार असल्याने शासकीय योजना रखडल्या आहेत. अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे सरकार बदनाम होत असल्याची खंत आमदारांनी सभेत बोलुन दाखविली.

समांतर रस्त्याच्या विषयावरून काथ्थ्याकुट
जळगावकरांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या समांतर रस्त्याच्या प्रश्नावर दिशा समितीच्या सभेत चांगलाच काथ्थ्याकुट झाला. 144 कोटी रूपयांचा डिपीआर मंजूर असुन यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही आदेश नसल्याची माहिती नहिच्या अधिकार्‍यांनी दिली. या सभेत देखिल समांतर रस्त्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.

शिवाजीनगर पुलाचे काम जानेवारीत सुरू होणार
दिशा समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना शिवाजी नगर उड्डाण पुल, पिंप्राळा आणि आसोदा उड्डाण पुलाविषयी जाब विचारला. शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यापुर्वी पर्यायी रस्त्यासाठी लेंडी नाल्याची उंची वाढविण्याचे काम सुरू असुन जानेवारीपर्यंत शिवाजीनगर उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच पिंप्राळा आणि आसोदा हे दोन्ही उड्डाणपुल आता एमआरआयडीसीकडे वर्ग झाल्याने रेल्वे प्रशासनाला आता यात काम करता येणार नसल्याचे सांगुन वेळ मारून नेली.

24 तास विमानसेवेसाठी प्रयत्न
जळगाव, कोल्हापुर, मुंबई, येथुन एकाचवेळी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात ही सेवा कोलमडली. एयर डेक्कन या कंपनीची आर्थिक परीस्थीती खराब झाल्यानेच ही सेवा कोलमडल्याचे खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी सभेत सांगितले. त्यामुळे नव्याने ही सेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांशी चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारच्या आदेशानुसार जळगाव येथुन 24 तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असुन त्यासाठी नशिराबाद येथील जुना रस्ता बंद करून झाडांची उंची कमी करण्याचे काम महिनाभरात सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

31 मार्चपर्यंत काम पुर्ण होणार
विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी विकास चंद्रा यांनी दि. 31 मार्चपर्यंत 24 तास विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती सभेत दिली.

दिवेकरांची झाडाझडती
जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी सदस्यांसह आ. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. हरीभाऊ जावळे यांनी खा. ए.टी.पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यावर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आमदारांसह खासदारांनी तीव्र संताप व्यक्त करीत संपुर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिवेकरांना दिले.

अधिकार्‍यांच्या दांड्या
खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यापुर्वी दोन वेळा दिशा समितीची सभा झाली. नेहमीप्रमाणे आज झालेल्या सभेला देखिल बहुतांश अधिकार्‍यांनी दांडी मारली. लोकप्रतिनीधींना किंमत नसल्याचे चित्र दांडी बहाद्दर अधिकार्‍यांच्या माध्यमातुन दिसून आले. अधिकार्‍यांच्या या दांड्यावरून खा.ए.टी.पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनीधींनी तीव्र संताप व्यक्त केला.

साईडपट्ट्यांचा 15 कोटीचा प्रस्ताव रवाना
शिवसेनेचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सभेत महामार्गाला लागून असलेल्या साईडपट्ट्यांच्या कामाबाबत विचारणा केली. त्यावर सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार साईडपट्ट्यांच्या कामासाठी 15 कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कार्यादेश दिले जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

अखेर पोलीस बंदोबस्तात नाऊर बंधार्‍यातून पाणी सोडले!

0

आ. कांबळे व सभापती पटारे यांच्या मध्यस्थीने अखेर आंदोलन मागे

नाऊर/मातुलठाण (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील कोल्हारपूर पध्दतीच्या बंधार्‍यावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या संयमी समन्वयी भूमिका तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवर चर्चा करून आ. भाऊसाहेब कांबळे व सभापती दीपक पटारे यांनी शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात घडवून आणलेल्या मध्यस्थीनंतर काल दुपारी 4 वाजता बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले. येथील बंधार्‍यातील पाणी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती.

त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार असा शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत बंधार्‍यावर ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशी भूमिका घेतल्याने पाटबंधारे अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याचा शासनाचा आदेश असल्यामुळे पाणी सोडावे लागणार, असे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. अखेर आ. भाऊसाहेब कांबळे व सभापती दीपक पटारे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी शेतकरी व पाटबंधारे अधिकारी यांच्याशी समन्वय करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

आ. भाऊसाहेब कांबळे म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहे. याची कल्पना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व पाटबंधारेचे अधिकारी एस. टी. गायधने यांना आहे. अधिकारी व शेतकर्‍यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने या विषयावर चर्चा करून मार्ग निघाला आहे. या विषयावर आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. याप्रश्नी काल आम्ही मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी काळात या बंधार्‍यांना राखीव पाणी मिळावे म्हणून प्रयत्नात रहावे लागेल, असेही आ. कांबळे म्हणाले.

सभापती दीपक पटारे म्हणाले, आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार? जसे जायकवाडीला पाणी सोडले जाते तसेच या बंधार्‍यांना हक्काचे पाणी मिळायला पाहिजे. बंधार्‍यात थोडेफार पाणी आहे हे पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणार आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकार्‍यांनी वरिष्ठांना कळविले पाहिजे. तर पाणी प्रश्‍नावर भविष्यकाळात शेतकर्‍यांनी संघटित राहण्याची गरज आहे. पाण्याच्या विषयावर आमदार कांबळे व मी सातत्याने ना. विखे पाटील यांच्याशी तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केल्यामुळे आज तोडगा काढण्यात यश आले आहे. यापुढील काळात देखील शेतकर्‍यांबरोबर खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पटारे यांनी दिले.

बंधार्‍याला पोलीस छावणीचे स्वरूप
याप्रसंगी बंधारा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे रजेवर असताना देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः दिवसभर ठाण मांडून होते. त्यांच्या समवेत तहसीलदार सुभाष दळवी होते. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, तालुकाचे प्रभारी पी.आय. गोविंद ओमासे यांच्यासह 6 पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाची 1 तुकडी, लेडीज आर.सी.बी. (दंगल नियत्रंण) दलाची 1 तुकडी, सुमारे 6 पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा बंधारा परिसरात होता. तसेच वैजापूरकडील भागातून देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

2005 च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आमच्या भागातील बंधार्‍यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी नगर जिल्हातील शिर्डी मतदारसंघातील सात आमदार व एक खासदार तसेच नदीकाठच्या वीस ते पंचवीस राजकारण विरहित समिती करून सुप्रिम कोर्टात जावे लागणार आहे. जसे शहरांसाठी पिण्याचे पाणी राखीव केले जाते तसेच नदीवरील बंधार्‍यांनाही हे रिजर्वेशन दिले पाहिजे. यासाठी आपण सर्व मिळून लढा उभा करू. कारण या वर्षानंतर पाऊस कमी झाला तर प्रत्येक वर्षी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मी स्वःत खासदार म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून येथे आलो आहे आगामी काळात मी तुमच्या पाठीशी आहे.
खासदार सदाशिव लोखंडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
जळगाव । शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना शिवसेना महानगरच्या वतीने महानगरपालिकेसमोर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच गरजूंना कांबळ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जळगाव विधानसभा संपर्कप्रमुख समाधान पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, गटनेता अनंत जोशी, यांसह शिवसेनेचे नगरसेवक माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत नाईक,

विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे तसेच शिवसैनिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 51 गरजू नागरिकांना कांबळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना उपशहर प्रमुख पियुष गांधी, महेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Social Media

26,893FansLike
5,154FollowersFollow
1,354SubscribersSubscribe
error: Content is protected !!