तराळवाडी कचरा डेपो रद्द करणासाठी साखळी उपोषण

0
पारनेर नगरपंचायत समोर तराळवाडी येथील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना.
पारनेर (तालुका प्रतिनिधी) – नगरपंचायतीच्या हद्दीतील तराळवाडी येथे गट नंबर 660 मधील दोन हेक्टर जागेत नगरपंचायतकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपो करण्यात येणार आहे. त्या कचरा डेपोला तराळवाडी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून त्यासाठी सोमवार 19 नोव्हेंबर रोजी 10 वाजल्यापासून साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, तराळवाडीतील सर्व नागरिकांनी 2 एप्रिल 2016 रोजी पत्राद्वारे कचरा डेपोसाठी विरोध दर्शविला होता. तसेच 2 मे 2016 रोजी नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगरपंचायत हद्दीतील तराळवाडी दोन हेक्टर क्षेत्रात घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ठराव घेण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमध्ये नगरसेविका नंदा देशमाने यांनी तराळवाडी येथील कचरा डेपोस विरोध केला होता. परंतु त्यानंतर जिल्हाधिकर्‍यांकडे नगरपंचायतीने या हद्दीत कचरा डेपो प्रकल्पास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. त्याला जनार्दन औटी व इतर ग्रामस्थांनी हरकती घेऊन विरोध केला. त्यानंतर पारनेरचे मंडलाधिकार्‍यांनी पंचनामा केला. त्या पंचनाम्यात पंचानी म्हटले आहे, कचरा डेपोची जागा व लोकवस्ती या दरम्यानचे अंतर 300 ते 400 मीटर आहे. त्यापासून पाण्याचा तलाव 200 ते 300 मीटरवर आहे. डेपोची जागा डोंगर माथ्यावर आहे. येथे वन्यप्राण्याचे वास्तव्य आहे. या प्राण्यांसाठी चार पाणवठे आहेत. या जागेत वृक्ष लागवड केलेली असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. तसेच प्रांताधिकारी व तलाठी यांनी 21 जुलै 2016 रोजी प्रत्यक्ष पाहणी अहवालात अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा कचरा डेपो झाल्यास जलप्रदूषण व वायुप्रदूषण होणार आहे. यामुळे पशुपक्षी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या जागेतील कचरा डेपोचा निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरपंचायतने ही जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी अधिग्रहण प्रक्रिया नियमाप्रमाणे केली आहे. त्यास येथील नागरिकांचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी वसंत गणपत ठुबे, जनार्दन औटी, सुभाष मारुती औटी, यशवंत भगवंत औटी, नामदेव बाबुराव औटी, साहेबराव किसन देशमाने, रावसाहेब बबन शेरकर, दत्तात्रय नारायण औटी, देवीलाल राधाकिसन बनगे, विलास कोंडीभाऊ तराळ, कोंडीभाऊ महादू वीर, विजय भाऊसाहेब शेटे, अतुल शेटे, अर्जुन बढे, नंदू तराळ, अशोक गायकवाड, पोपट तराळ, मनोहर बढे, बाबा शेरकर, विनोद बढे, निवृती शेरकर, रवींद्र शेटे, सुधाकर तराळ, शिवाजी तराळ, दयानंद बढे, राजेंद्र तराळ, नंदू तराळ, शंकर औटी, त्रिंबक औटी, रोहित तराळ, अशोक विनायक गायकवाड तसेच महिला व पुरुष उपस्थित होते.

 

मुळाकाठ परिसरात अवकाळी पाऊस

0
नेवासा तालुक्यातील शिरेगाव-पानेगाव परिसरात दुपारी अचानक आलेल्या पावसाने कापूस व्यापार्‍यांचे असे हाल झाले.

कापूस व्यापार्‍यांची झाली धावपळ

करजगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पश्‍चिम भागातील मुळाकाठ परिसरातील शिरेगाव, पानेगाव परिसरात काल अर्धा तास चांगला पाऊस झाला. तर करजगाव, अंमळनेर, निंभारी परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झाला. दुपारी अचानक आलेल्या पावसाने कापूस वेचणार्‍यांची व कापूस व्यापारी तसेच उसतोड कामगारांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यापासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. उकाडा वाढल्याने पाऊस होण्याची शक्यता होती.सोमवारी दुपारी दीड-दोनच्या सुमारास वार्‍यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कापसाची अंतीम टप्प्यावर वेचणी सुरू असून बहुतेक शेतकर्‍यांचा कापूस भिजला आहे. तर गहू, हरभरा, पेरणीसाठी थांबावे लागणार आहे. सध्या परिसरात कांदा लागवड जोरात चालू असून कांदा लागवड करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

परिसरामध्ये कापूस खरेदी व्यापार्‍यांची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ झाली. बाहेर असलेला कापूस ओला झाला. तो गोळा करताना कामगारांची त्रेधा उडाली होती.
विटभट्टीवर वीट तयार करण्याचे काम चालू असल्यामुळे कच्या विटा भिजल्या.

 

शहीद जवान कपिल गुंड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
अजनुज येथे भीमा नदी तीरी शहीद कपिल गुंड यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदाय.
श्रीगोंदा, अजनुज (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील कपिल नामदेव गुंड (वय-24 वर्षे) जम्मू काश्मीरमधील उडी सेक्टर, कालापहाड याठिकाणी लष्करी सेवेत कर्तव्यावर असताना, गुरूवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर काल सोमवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी अजनूज येथे भीमा नदीतिरी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कपिलचा मृतदेह विमानाने पुण्यात आणण्यात आला. त्यानंतर पुण्यातून लष्करी वाहनातून अजनूज येथे त्यांच्या घरी आणण्यात आला. फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी‘भारत माता की जय’ ,‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावातील प्रत्येक चौकात व प्रत्येक घरासमोर ‘अमर रहे’, ‘वीर जवान तुझे सलाम’ चे बॅनर व रांगोळी काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून, अंतिम संस्कारासाठी भीमा नदीतिरी कपिलचे पार्थिव नेण्यात आले. भारतीय सेनेच्या जवानांच्या सलामी आणि ध्वज प्रदान विधिनंतर शहीद कपिल गुंड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपिलच्या मृतदेहावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.ज्या पेटीत कपिलचा मृतदेह आणण्यात आला , त्यावरील भारताचा राष्ट्रध्वज वडील नामदेव गुंड यांना मुलाच्या विरत्वाचे आणि सर्वोच्च बलिदानाचे प्रतीक म्हणून उपस्थित जवानाच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी राजेंद्र म्ह्स्के, रमेश गिरमकर, केशव मगर, बाळासाहेब गिरमकर, सुवर्णाताई पाचपुते, तहसीलदार महेंद्र माळी, प्रभारी पोलीस निरीक्षक करनोर, हरिदास शिर्के यांनी श्रद्धांजली वाहिली. सरपंच माळी, विजय गायकवाड यांच्यासह नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कपिल गुंडचे वडील नामदेव गुंड यांनी पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला सलामी दिली. शहीद जवान कपिल गुंड यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलं, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

खा. दिलीप गांधी : देशाच्या संरक्षणासाठी शहीद जवान कपिल शहीद झाले. त्यांचे वीरमरण स्मरणात राहील.
आ. राहुल जगताप : कपील यांचे वडील देश सेवा करत होते.त्यांच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आहे. देशासाठी बालिदान देणार्‍या वीर जवानाला देश विसरणार नाही.
माजी मंत्री बबनराव पाचपुते : कपिल गुंड हा उमेद असलेला तरुण होता. याच गावात यापूर्वीचा वीर जवान मिनीनाथ गिरमकर आणि कपिल हे दोन्ही जवान शहीद झाले .वीर जवानांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली.
राजेंद्र नागवडे : दु:खाचा आघात कुटुंबावर झाला.देशासाठी मुलगा शहीद झाला .देशासाठी शहीद होणे दुर्मीळ घटना आहे. या जवानांमुळे देश सुरक्षित आहे.

घनशाम शेलार : अजनूज गावात 17 वषार्र्ंपूर्वी मिनीनाथ गिरमकर आणि आज कपील गुंड या दोघांना विरमरण आले.देशासाठी बलिदान दिले.

देशाच्यासाठी बलिदानाचा आभिमान : नामदेव गुंड
मी देशाच्या सेवेसाठी लष्करात होतो. कपील हा देखील देशसेवेसाठी लष्करात भरती झाला. आता कपीलच्या वीरमरणाचे दःुख असले तरी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान आहे, असे शहीद जवान कपील यांचे वडील नामदेव गुंड यानी सांगितले.

निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही प्रशासनाने हाती घेतली असून, अनेक शिक्षक व शासकीय कर्मचार्‍यांना यासाठी नियुक्त केले जाणार आहे. निवडणुकीचे काम म्हटले की, त्यापासून दूर पळणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही मोठी असते. निवडणुकीच्या कामासाठी किमान दोन हजार कर्मचारी आणि अधिकारी आवश्यक आहेत. शहरातील विविध शाळा आणि शासकीय कार्यालयांकडून कर्मचार्‍यांची यादी मागविण्यात आलेली आहे. त्यातून कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी हे कर्मचारी लागणार आहेत.

कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी यांच्याकडे आहे. आपली नियुक्ती होऊ नये म्हणून अनेकांनी हस्ते-परहस्ते निरोप पाठवून आपले नाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास अधिकार्‍यांनी जुमानले नाही. अनेक कर्मचार्‍यांनी आपण आजारी असल्याचे कारण पुढे केले. तसे वैद्यकीय तज्ज्ञांची प्रमाणपत्र देण्याचीही तयारी दर्शविली. या प्रकाराची जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनीच गंभीर दखल घेतली. निवडणूक होईपर्यंत कोणीही आजारी पडू नये, असा सल्लावजा इशारा त्यांना द्यावा लागला. शहरात 337 मतदान केंद्र असून, प्रत्येक ठिकाणी लागणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे.

नियुक्त कर्मचार्‍यांना तीन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. शेवटचे प्रशिक्षण 8 डिसेंबरला देण्यात येणार असून, त्याच दिवशी मतदानाचे साहित्य देखील त्यांना वाटप करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला मतदान होणार असून, 10 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.

 

नगरसेविका काळे यांची उमेदवारी कापली

0

भाजपच्या दुसर्‍या यादीत नव्याने पक्षात घेतलेल्यांनाही डावलले

अहमदनगर (प्रतिनिधी) – मागील महापालिकेत भाजपचे इनमीन नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि दत्ता कावरे पक्षाबाहेर आहेत. उरलेल्या सातपैकी मनीषा बारस्कर-काळे यांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली. शिवाय नव्याने पक्षात घेतलेल्यांपैकी काहींना डावलले आहे. भाजपने आज 33 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही सावधपणा दाखवत कमीत कमी असंतोष होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आतापर्यंत 48 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभाग एक, पाच, सहा, 13 आणि 15 मध्ये सर्व जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. प्रभाग सहामध्ये नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे यांची उमेदवारी कापण्यात आली. बारस्कर-काळे यांच्याऐवजी त्यांचे पती राजेंद्र काळे यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

भाजप तेथे स्टँडिंग असल्याने महिला आरक्षित जागेतून उमेदवारी देण्यास भाजप तयार होता. मात्र राजेंद्र काळे यांनी स्वतःसाठी अखेरपर्यंत आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. यातून मार्ग न निघाल्याने पक्षाने तेथे दुसरा उमेदवार देऊऩ काळे यांची उमेदवारी कापली. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले छिंदम यांनी अपक्ष, कावरे शिवसेनेतर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उरलेले महेश तवले, उषा नलवडे (प्रभाग दोन), बाबासाहेब वाकळे (प्रभाग सहा), मालन ढोणे (प्रभाग नऊ), नंदिनी साठे, सुवेंद्र गांधी (प्रभाग 11) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे आणखी 20 उमेदवार जाहीर होणे शिल्लक आहेत. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या ज्योती गाडे उमेदवार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. भाजपने या प्रभागात दोन उमेदवार जाहीर केले असले, तरी गाडे यांच्या विरोधात कोण हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. प्रभाग दोनमध्ये एक उमेदवार जाहीर केलेला नाही. प्रभाग तीनमध्ये दोन, सातमध्ये तीन, आठमध्ये दोन, 10 मध्ये तीन, 11 मध्ये तीन, 12 मध्ये तीन, 14 मध्ये तीन उमेदवार जाहीर केले आहेत. केडगाव परिसराचा समावेश असलेला प्रभाग 16 आणि 17 मध्ये अद्याप एकही उमेदवार भाजपने जाहीर केलेला नाही.

काळे बंडखोरीच्या तयारीत
नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे यांना डावलण्यात आल्यामुळे त्या आता बंडखोरीच्या तयारीत आहेत. प्रभाग सहामधून अपक्ष किंवा शिवसेनेतर्फे त्या लढण्याची शक्यता आहे. भाजपने उमेदवारी कापताच शिवसेनेने त्यांच्याशी संपर्क वाढविला असल्याचे बोलले जाते. काळे यांचे पती राजेंद्र काळे यांनी त्यास दुजोरा दिला. निवडणूक लढविणार हे नक्की, असे त्यांनी सांगितले.

पक्षात घेतले अन डावलले
भाजपने उमेदवारीचा शब्द देऊन अनेकांना पक्षात घेतले होते. त्यात प्रामुख्याने प्रभाग 12 मधून दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांना उमेदवारी देण्यात आली. मत्र प्रभाग सहामधून राहुल वाकळे आणि प्रभाग 13 मध्ये तारा शिंदे यांना डावलले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे नव्याने पक्षात आलेल्यांनी धसका घेतला आहे.

337 मतदान केंद्रांची यादी जाहीर

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी मतदानासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी 337 मतदान केंद्रांची यादी जाहीर केली आहे. त्या त्या प्रभागातील शाळांमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. या मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉन बॉस्को विद्यालय, ज्ञानसंपदा इंग्लिश मीडियम स्कूल आणि जिल्हा मराठा नूतन मराठी विद्यालयात मतदान होणार आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये डॉ. ना. ज. पाऊलबुद्धे माध्यमिक विद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा, तवलेनगर आणि लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयात मतदान होईल. प्रभाग 3 मध्ये जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा, पी. ए. इनामदार शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, दर्गादायरा, मौलाना आझाद उर्दू शाळा ही मतदान केंद्र असणार आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आनंद विद्यालय, सेंट सेवियर्स हायस्कूल, तारकपूर, यशवंतराव गाडे पाटील अध्यापक विद्यालय, फकीरवाडा, प्रभाग क्रमांक 5 मध्ये समर्थ विद्या मंदिर, सावेडी, बजरंग विद्यालय, अश्वमेध विद्यालय, मार्कंडेय विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वैदुवाडी, सेंट मोनिका विद्यालय, झोपडी कॅण्टीन.

प्रभाग क्रमांक 6 मध्ये रेणावीकर विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, केशवराव गाडिलकर विद्यालय, जिल्हा परिषदच्या जागेतील महापालिकेची छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक शाळा, भुतकरवाडी चौक, प्रभाग सातमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव व नागापूर, प्रभाग क्रमांक 8-माणिकताई करंदीकर शाळा, नीलक्रांती चौक, गोकुळ पाळणाघर, बागरोजा हडको, जिल्हा परिषद शाळा, शिवाजीनगर, कल्याण रोड, उद्धव अकॅडमी इंग्लिश मीडियम शाळा, जाधवनगर, बाळासाहेब केशव ठाकरे शाळा, गांधीनगर.

प्रभाग क्रमांक 9- पेमराज सारडा कॉलेज, रेसिडेन्शिअल हायस्कूल, लालटाकी, महापालिका तेलगू शाळा, तोफखाना, सीताराम सारडा विद्यालय, बागडपट्टी, प्रभाग क्रमांक 10- महापालिकेची उर्दू आणि मराठी शाळा, बेलदार गल्ली, नागोरी मिसगर उर्दू शाळा, राधाबाई काळे महाविद्यालय, तारकपूर मागे, सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल, तारकपूर, सेंट सेविअर्स स्कूल, तारकपूर, प्रभाग क्रमांक 11- महापालिका शाळा नंबर 22 व 25 झेंडीगेट, युनियन ज्युनिअर कॉलेज, हातमपूरा, क्लेरा ब्रूस हायस्कूल, कोठी रोड, प्रभाग क्रमांक 12-श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल, महापालिका शाळा, माळीवाडा, राष्ट्रीय पाठशाळा, स्टेशन रोड, चाँद सुलताना हायस्कूल, माणिक चौक. प्रगत विद्यालय, गांधी मैदान, मार्कंडेय विद्यालय, गांधी मैदान, बाई इचरजबाई फिरोदिया हायस्कूल, नवीपेठ. प्रभाग क्रमांक 13- जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, टिळक रोड,भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, माळीवाडा, दादा चौधरी विद्यालय, पटवर्धन चौक, समर्थ शाळा, सांगळे गल्ली, चितांबर कन्या विद्यालय, पार्वतीबाई डहाणूकर विद्यालय, प्रभाग क्रमांक 14- दामोदर विधाते विद्यालय, सारसनगर, रामकृष्ण इंग्लिश स्कूल, वाकोडी रोड, आयटीआय, बुरुडगाव रोड.

प्रभाग 15- शायनी इंग्लिश मीडियम स्कूल, विद्या कॉलनी, कारमेल कॉन्व्हेंट शाळा, लिंक रोड, डॉ. आंबेडकर आदर्श शाळा, स्टेशन रोड, प्रभाग 16- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भूषणनगर व शिवाजीनगर, शाहूनगर-केडगाव, अंबिका विद्यालय, ताराबाई कन्या विद्यालय, प्रभाग क्रमांक 17-जिल्हा परिषद शाळा, इंदिरानगर, अंबिकानगर, सोनेवाडी रोड, मोहिनीनगर, विद्या प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय, केडगाव देवी रोड.

 

अकोलेत सहा ठिकाणी घरफोड्या

0
अकोले शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालून चोर्‍या केल्या. एका ठिकाणी पाहणी करताना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ.
अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील चास येथील मंदिरातील दान पेटी व तीन घरांतील चोरीच्या घटनांचा तपास लागत नाही तोच काल रविवारी मध्यरात्री अकोले शहरातील उपनगरांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. सहा ठिकाणी नियोजनबद्ध घरफोड्या करून एकूण चार लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. अकोले शहरातील उपनगर आलेल्या रायगड नगर, राजमाता जिजाऊ नगर, नवरंग कॉलनी, स्वामी विवेकानंद कॉलनी या ठिकाणी काल मध्यरात्रीच्या सुमारास या चोर्‍या झाल्या.

चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी एक लाख 32 हजार रुपये रोख आणि तीन लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल सफाईदारपणे चोरून चोरटे पसार झाले. उपनगरातील शिवाजी बाबूराव चासकर, बंडू बाळासाहेब वाकचौरे, भास्कर भाऊराव गावंडे, नामदेव चिंधू सुकटे, सुनील वसंतराव लकारे आणि प्रदीप विश्‍वासराव शेळके अशा सहा जणांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लांबविली. हे सहा जण कुटुंबासह गावी गेले होते. याची चोरट्यांनी अभ्यासपूर्ण पाहणी करून एकाच रात्री या चोर्‍या केल्या. विशेष म्हणजे शेजारी लागून घरे असताना सुद्धा कोणालाही याची चाहूल सुद्धा लागली नाही. चोरीचे वृत्त समजताच सकाळीच अकोले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे घटनास्थळी दाखल झाले.

या परिसरात या अगोदर दीड दोन वर्षापूर्वीची मोठ्या प्रमाणावर चोर्‍या झाल्या आहेत. मात्र पोलिसांना एकाही चोरीचा तपास लावता आला नाही. पोलिसांकडून चोरीचा, चोरट्यांचा गांभीर्याने तपासच होत नसेल तर पोलिसात तक्रार तरी का दाखल करायची अशी मानसिकता संबंधित नागरिकांची झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यापुढे आता या चोर्‍यांच्या घटनामुळे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे तरी आता या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळतील अशी अशा अकोलेकरांना आहे. दरम्यान नगर येथून श्‍वान पथक पाचारण करण्यात आले असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.

अकोले पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे अकोले शहरात घबराट पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधितांचे रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीला गेल्याने ते पुरते हतबल झाले आहेत. या सराईत आणि निर्ढावलेल्या चोरांच्या टोळीचा पोलिसांनी कसून तपास करावा अशी जोरदार मागणी होत आहे. अकोले पोलिसांनी चोरीचा आणि चोरट्यांचा तपास लावल्यास अकोले पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येईल अशीही चर्चा अकोले शहरात सुरू होती. या प्रकरणी अकोले पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर निपसे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

राहुरी महसूलला 11 कोटी 63 लाख वसुलीचे उद्दिष्ट

0

राहुरी (प्रतिनिधी) – मागील वर्षी वसुलीत पिछाडीवर पडलेल्या राहुरी महसूल विभागाला जिल्हा प्रशासनाने यावर्षी 11 कोटी 63 लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. मागीलवर्षी महसूल विभागाला तांत्रिक बाबींच्या त्रुटीमुळे 65-70 टक्के वसुली झाली होती. त्यामुळे राहुरीची वसुलीच्या बाबतीत शतकपूर्ती झाली नव्हती. यावर्षी ऑक्टोबर अखेरीस मागील वर्षीची पूर्तता करत 67 टक्के महसूल वसुली पूर्ण झाली आहे. यावर्षी प्रवरा नदीपात्रातील करजगाव, जातप येथील वाळू लिलावाच्या माध्यमातून 1 कोटी 33 लाख रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय दंंडात्मक कारवाई, मातीमिश्रीत वाळू असा सुमारे 7 कोटी 20 लाख रुपयांचा महसूल मिळाला.

जमीन महसूलद्वारे 54 लाख 21 हजार रुपये असा एकूण 7 कोटी 75 लाख रुपये शासकीय तिजोरीत जमा झालेले आहेत. यंदा 67 टक्के वसुली झाली असून जिल्हा प्रशासनाकडे वाळू साठ्यांचे लिलाव प्रस्तावित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांकडून ना हरकत, मंजुरी, खाणकर्म आराखडा, भूजल सर्वेक्षण, पर्यावरण विभाग, ग्रामसभांची मंजुरी तसेच राष्ट्रिय लवादाच्या निर्देशानुसार अनेक बाबींच्या पूर्तता अपेक्षित आहे.

मुळा व प्रवरा नद्यातील पाणी ओसरू लागल्याने विनापरवाना, बेकायदा वाळू तस्करी सुरू झाली असून स्थानिक वाळूतस्कर, गावपुढारी यांना हाताशी धरून महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून खुलेआम वाळूतस्करी सुरू आहे. त्यातच राहुरीच्या महसूल विभागाचे काही अधिकारी वाळू तस्करीला खतपाणी घालत असल्याने राहुरी महसूल विभागाच्या नाकर्तेपणावर नदीकाठच्या ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच वाळू साठ्यांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रस्तावित केल्याने नाराजीत भर पडली असून काही गावांतील ग्रामस्थांकडून विरोध झाल्यामुळे महसूल विभाग आता काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.

राहुरीच्या महसूल विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे राहुरी तालुक्यातील मुळा-प्रवरा नदी पात्रातील 21 गावांतील 45 वाळू साठ्यांच्या लिलावासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी 221 उमेदवारी अर्ज दाखल

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीसाठी काल 127 उमेदवारी अर्ज दाखल झाले. ऑनलाईन का ऑफलाईन या गोंधळातही आतापर्यंत 221 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज अखेरचा दिवस शिल्लक आहे. ऑऩलाईन उमेदवारी असल्याने अनेक घोळ होत असून, उमेदवार त्यात वैतागले आहेत. तरीही रात्ररात्र ताटकळत बसून ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कसरत उमेदवारांनी पूर्णत्त्वास नेली. काल दाखल झालेल्या 127 उमेदवारी अर्जामध्ये सावेडी निवडणूक कार्यालयात 47, मध्य शहरातील कार्यालयात 49, बुरूडगाव कार्याढलयात 12 आणि केडगाव कार्यालयात 19 उमेदवारी अर्जांचा समावेश आहे.

500 आदिवासी कुटुंबांची पोटाच्या खळगीसाठी पायपीट

0

मुसळवाडी जलाशयात दहा वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाहीत; आदिवासी कुटुंबांची उपासमार

मुसळवाडी (वार्ताहर) – राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील आदिवासी बांधवांना संजीवनी देणार्‍या मुसळवाडी जलाशयात गेल्या दहा वर्षांपासून मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील श्रीम्हसोबा महाराज मच्छिमार सोसायटीमार्फत मासेमारी करून उदरनिर्वाह करणार्‍या आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या या जलाशयात समाधानकारक पाणीसाठा असूनही मासेच नसल्याने या जलाशयावर अवलंबून असलेले आदिवासी कुटुंब आता पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत होऊ लागली आहेत. मुसळवाडी तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे 199 दलघफू आहे. जलाशयावर लाख, दरडगाव, त्रिंबकपूर, माहेगाव, महाडूक सेंटर, मालुंजे खुर्द, वळण, पिंपरी, आरडगाव, टाकळीमिया, मानोरी, या गावांतील सुमारे 500 ते 600 आदिवासी कुटुंब मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.

तर काही कुटुंब तलावालगतच पूर्वीपासूनच लोकवस्ती करून रहात आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत आदिवासी बांधवांनी शासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही मत्स्यबीजच सोडण्यात आलेले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आपला पारंपरिक व्यवसाय सोडून भाकरीच्या चंद्रकोरीसाठी आदिवासी कुटुंब वीटभट्टीवर किंवा ऊसतोडणी कामासाठी शेतमजूर म्हणून काम करू लागले आहेत. तर काहींनी मासेमारीला रामराम ठोकून रोजगाराच्या शोधासाठी वणवण भटकंती सुरू केली आहे.

यापूर्वी जलाशयात राहू, वाम, कथला, सपरनीस, मरभळ, गुगळे, मिशाळू, शेंगळ, चोपडे, चांभारी, विरगळ, चिलापी, आदी जातीचे मासे मोठ्या प्रमाणात सापडत होते. त्याला भावही चांगला मिळत असल्याने मुसळवाडी परिसरातील 10 ते 11 गावांतील भिल्ल समाजातील सुमारे 500 ते 600 कुटुंब चांगला रोजगार मिळवित होते. पहाटेच्या सुमारास आदिवासी तरुण जलाशयात उतरून मासेमारी करून आणलेल्या ताज्या माशांना बाजारपेठेत चांगली मागणी होती. राहू, वाम, चोपडा 200 ते 250 रुपये किलो, कथला, सपरनीस, मरभळ, गुगळे, मिशाळू, शेंगळ, चांभारी, शिंगे, यांना 150 ते 200 रुपये असा भाव मिळत होता. या माशांची पूर्वी बाहेरगावी मोठ्या प्रमाणात विक्री होत असे. आता मात्र, स्थानिक बाजारपेठेतही मासे मिळत नसल्याने आदिवासी कुटुंब दारिद्य्राचे जीणे जगत आहेत.

पावसाळ्यात जुलै महिन्यात मत्स्यबीज सोडले जाते. शासनाने जलाशयात त्वरित मत्स्यबीज सोडावे, आदिवासींना दुष्काळात आर्थिक सहाय्य करावे, बंद पडलेली श्रीम्हसोबा महाराज मच्छिमार सोसायटी सुरू करावी, आदिवासींना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मच्छिमार सोसायटीचे अध्यक्ष व उपसरपंच नवनाथ पवार, अर्जुन जाधव, द्वारकानाथ वाघ, नवनाथ वाघ, पंढरीनाथ माळी, अण्णासाहेब बर्डे, भीमा बर्डे, गोरक्षनाथ पवार, हरिश्‍चंद्र पवार, बाळासाहेब बर्डे, भास्कर जाधव, लक्ष्मण जाधव, बाळासाहेब पवार, कैलास पवार, दादा जाधव, द्वारकानाथ जाधव, अशोक बर्डे, काशिनाथ शिंदे, सुरेश पवार, रमेश पवार, एकनाथ पवार, अर्जुन साळुंके, प्रभाकर जाधव, दत्तात्रय जाधव, एकनाथ शिंदे, संजय बर्डे, सुनील बर्डे, भीमाशंकर वाघ, राजेंद्र पवार, अशोक बर्डे, नंदू माळी, काळू जाधव, नारायण जाधव, द्वारकानाथ शिंदे, दत्तात्रय पवार, सोन्याबापू पवार, भागवत शिंदे, लहू बर्डे, भगवान बर्डे, मच्छिंद्र पवार, एकनाथ जाधव, आप्पासाहेब माळी, विठ्ठल शिंदे, वसंत पवार, बाळासाहेब वाघ आदींसह अन्य आदिवासी बांधवांनी केली आहे.

शासनाने आदिवासींना रोजगार उपलब्धीसाठी मुसळवाडी तलावालगत सुमारे दहा एकर जागेत मत्स्य उद्योग विकास महामंडळाअंतर्गत व मत्स्यबीज केंद्र, अहमदनगर यांच्या मार्फत मत्स्यबीज व्यवसाय केंद्र, मुसळवाडी या नावाने मोठी इमारत, मत्स्यबीजसाठी मोठ्या आकाराच्या सिमेंटच्या 9 टाक्या, कूपनलिका घेऊन कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यात काही कालावधीतच मत्स्यबीज सोडण्यात आले. त्यानंतर आजतागायत मत्स्यबीज न सोडल्याने हे व्यवसाय केंद्र बंद पडून शेवटची घटका मोजत आहे. संबंधित अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली असता मत्स्यउद्योग विकास महामंडळ, मुंबी अंतर्गत अभिनव मच्छिमार सोसायटीला 15 वर्षांचा करार झाला असून त्यात पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप 10 वर्ष राहिली आहेत. मत्स्यबीज सोडण्याचा हा त्यांचा विषय असल्याचे सांगितले.

Social Media

26,921FansLike
5,154FollowersFollow
1,363SubscribersSubscribe
error: Content is protected !!