नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0

वायगाव येथेे शेतकर्‍याची आत्महत्या

0

नाशिक । दि. 16 प्रतिनिधी
बागलाण तालुक्यातील वायगाव येथेे बुधवारी राहत्या घरात गळफास घेऊन शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना घडली. केशव जिभाऊ सोनवणे (45) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, केशव सोनवणे यांच्या मुलाच्या नावे गट नंबर 350 मध्ये क्षेत्र आहे.

दरम्यान, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. चालू वर्षातील ही 90 वी शेतकरी आत्महत्येची घटना आहे. मालेगाव व दिंडोरी तालुक्यात सर्वाधिक 15 आत्महत्या झाल्या आहेत. बागलाण तालुक्यातील 14 आत्महत्या आहेत.

नाशिकचा लाचखोर पोलीस निरिक्षक पुणे येथे जाळ्यात

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी
फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉरंट न बजावण्यासाठी तसेच खटल्यात मदत करण्यासाठी 2 लाखाची लाच घेतल्या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारास पुणे येथील न्यायालयात हजर केले असता 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़.

पोलीस निरीक्षक राजेश सदाशिव शिरसाठ (वय 48, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण) आणि पोलीस हवालदार संजीव खंडेराव आहेर (वय 48) अशी त्यांची नावे आहेत.

पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (द़ि15) मित्र मंडळ चौकातील एका हॉटेलात सापळा रचून दोन लाख रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात न्यायालयाने प्राक्लेमेशनची (जाहीरनामा) नोटीस काढली आहे. त्याचे वॉरंट बजावण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरसाट व हवालदार आहिरे हे गुरुवारी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर वारंट बजावायचे नसेल तसेच खटल्यात मदत करतो, यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी स्वारगेटजवळील मित्र मंडळ चौकाजवळ सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून 2 लाख रुपये घेताना पोलीस हवालदार संजीव आहेर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक शिरसाट हे दुसरीकडे थांबले होते. त्यांनी आहेर यांना पैसे घेण्यासाठी पाठविले होते. त्यांचे त्याबाबत तक्रारदाराशी झालेले संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या संभाषणानूसार लाच घेण्यामध्ये त्यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यामुळे रात्री उशिरा दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक प्रतिभा शेंडगे व उप अधिक्षक दत्तात्रय भापकर यांनी ही कारवाई केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उप अधिक्षक प्रतिभा शेंडगे करीत आहेत.

तर अधिकारी निलंबीत
जिल्हा ग्रामिण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर पुणे येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाची झालेली कारवाई तसेच त्र्यंबकेश्वर येथे कर्मचार्‍यांंचे व्हायरल झालेले दोन्ही व्हिडिओ या सर्वाची दखल पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी घेतली आहे. या सर्वांची चौकशी केली जाईल तसेच कडक कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक दराडे यांनी दिले आहेत.

 

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधवरवड्यातच टँकरची संख्या वाढली

0
(संग्रहित छायाचित्र )

नाशिकरोड । दुष्काळ वणव्यात होरपळणार्‍या उत्तर महाराष्ट्रात यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या पंधवरवड्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची संख्या वाढली आहे. विभागात नाशिकसह धुळे, जळगाव व अहमदनगर या चार जिल्ह्यांतील 261 गावे व 1005 वाड्यांवर शासकीय व खाजगी अशा एकून 279 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.

यंदाच्या दुष्काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना व त्याची अंमलबजावणी सुरू असली तरी आगामी 6-7 महिने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असून टँकर्सची वाढती संख्या दुष्काळाचे मळभ अधोरेखीत करणारी आहे. याशिवाय टँकरवर अवलंबून असणार्‍या तालुक्यांत तर परिस्थिती अगदीच भयावह होणार असल्याचे दिसून येते.

नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांतील 1 लाख 70 हजार 660, धुळे जिल्ह्यातील 3 तालुक्यांतील 23 हजार 187, जळगाव जिल्ह्यातील 4 तालुक्यांतील 48 हजार 452 तर अहमदनगर जिल्ह्यातील 9 तालुक्यांतील 3 लाख 42 हजार 922 इतक्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी गाव व वाड्यांवर एकूण 279 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

विभागातील टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा तपशील

जिल्हा            गावे          वाड्या    शासकीय      खाजगी
टँकर         टँकर
नाशिक         75           269       17            58
धुळे            09           00         07           00
जळगाव       35            00          5            14
अहमदनगर  142          736       19          159
एकूण        261          1005      48          231

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासकीय स्तरावर पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, शेततळे, जलपुनर्भरण आदी उपाययोजना राबविल्या जात आहेत. परंतु सद्यस्थितीत विभागातील मोठे, मध्यम व लघु धरणात एकूण 2991.19 दलघमी म्हणजेच 68.96 टक्के पाणीसाठा शिल्लक असून त्यात नाशिक जिल्ह्यात एकूण 1412.80 दलघमी (65.77%), अहमदनगर-एकूण 692.73 दलघमी (54.16%), धुळे-एकूण 285.76 दलघमी (59.38%), नंदुरबार-एकूण 137.38 दलघमी (70.70%), जळगाव-एकूण 683.71 दलघमी (46.75%) अशी परिस्थिती दि. 15 नोव्हेंबरची आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव हट्टीपाडा येथील घराच्या आगीत धान्य जळून खाक

0

त्र्यंबकेश्वर विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील देवगावं हट्टीपाडा येथील शेतकरी भावडू वारे यांच्या घरास अचानक लागलेल्या आगीने हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे .गुरुवारी दुपारी ही घटना घडली आहे. घरातील सर्व शेतात गेल्याने जीवित हानी टळली आहे. घरातील धान्य मात्र जळून खाक झाले आहे.

श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी याबाबतची माहिती त्र्यंबकेश्वर तहसीलदार पवार साहेब यांना दिली. या आगीत घरातील महत्वाचे कागदपत्रे जळाले आहेत आणि बैल देखील जखमी झाले आहेत. साधारणतः ४० ते ४५ पोते धान्य तसेच वाहनाचे कागद पत्र, ३ ते ४ पोते तांदुळ आणि काही रोकड पैसे यासह घरातील संसार उपयोगी संपूर्ण साहीत्य जळून खाक झाल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. शुक्रवारी तलाठी मंडलाधिकारी आदींनी पंचनामा केला आहे मात्र तपशील समजलेला नाही.

भगवान मधे श्रमजीवी संघटना

शासानाने वास्तवदर्शी पंचनामा करून या कुटुंबाला मदत करावी. शासनाचे निकषा प्रमाणे मिळणारी मदत तुटपुंजी आहे. यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. तालुका दुष्काळ ग्रस्त असतांना उपग्रह पाहणीचे निकष बसत नाहीत म्हणून शेतकरी मदतीपासून वंचित राहतो आहे.आता या आगीच्या घटनेने दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१८ रोजी असणाऱ्या मेगाब्लॉक मुळे ‘या’ पाच गाड्या रद्द

0

मनमाड (प्रतिनिधी) : कल्याण येथे हाजी मलंग पुलाचे (पत्री पुल) काम करण्यासाठी मध्य रेल्वे तर्फे रविवार १८ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉक मुळे पाच गाड्या रद्द करण्यात येणार असून त्यात पंचवटी एक्सप्रेस,राज्यरणी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस व पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. मेगाब्लॉकमुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहे तर उत्तर भारतातून मुंबई कडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावतील अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच दसरा ते दिवाळी पर्यंत सणासुदीच्या काळात तब्बल १५ दिवस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आता पुन्हा या गाड्या रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

कल्याणच्या हाजी मलंग पुलाचे (पत्रीपूल) काम करण्यासाठी रविवारी सकाळी ९:३० ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत सहा तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मनमाड-मुंबई राज्यरणी एक्सप्रेस, मनमाड- मुंबई पंचवटी एक्सप्रेस, मनमाड-लोकमान्य टर्मिनल गोदावरी एक्सप्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस व मुंबई भुसावळ पॅसेंजर या पाच गाड्या रद्द करण्यात येणार आहे. मेगाब्लॉक मुळे काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार असून उत्तर भारतातून मुंबई कडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिराने धावतील असेही रेल्वे सूत्रांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी दसरा ते दिवाळी दरम्यान एन सणासुदीच्या काळात इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ काम करण्यासाठी तब्बल १५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यावेळी देखील काही महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अपडाऊन करणारे चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले होते. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी पॅसेंजर ही एकमेव गाडी असताना ती वारंवार रद्द करण्यात येत असल्याने आमचे अतोनात हाल होतात, याचा रेल्वे प्रशासन विचार करणार आहे की नाही अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामीण भागातील प्रवाशांनी व्यक्त केल्या.

येत्या रविवार पासून चांदवडला ‘सीपीएल-२’ चा थरार

0

चांदवड (हर्षल गांगुर्डे) : मागील वर्षी झालेल्या मोहल्ला शांतता कमिटी कौमी एकता मित्र मंडळ तथा तालुका क्रिकेट असो.यांच्या माध्यमातून चांदवड प्रीमिअर लीग च्या यशस्वी आयोजनानंतर ह्या वर्षीही चांदवडकरांना या लीगचा थरार बघण्यास व अनुभवण्यास मिळणार आहे.

येत्या रविवार पासून या क्रिकेट थराराला सुरवात होणार आहे. तालुका क्रीडा संकुलात या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. संपूर्ण चांदवड तालुक्यातून या लीग साठी निवडचाचणी घेण्यात येऊन त्यातून सुमारे 180 सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडून ते सोडतीद्वारे 12 संघमालकांना विभागून देण्यात आले. ह्या स्पर्धेसाठी विविध संघातील खेळाडूंना क्रीडा गणवेशासह सर्व किट पुरविण्यात आले आहे.

ह्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील गुणी खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यांना याद्वारे मोठे क्रीडा व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस सुमारे 71 हजार रुपये, द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये, तृतीय बक्षीस 31 हजार रुपये व चतुर्थ बक्षीस 21 हजार रुपये ठेवण्यात आले आहे . स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, बेस्ट कॅच, उत्कृष्ट खेळाडू असे अनेक पुरस्कार ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी चांदवडकरांची उत्कंठा शिगेला पोहचली असून संपूर्ण चांदवड शहरात क्रिकेटमय वातावरण तयार झाले आहे. ह्या प्रीमिअर लीग साठी चांदवड तालुक्याचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे यांचे मोठे योगदान असून त्यांच्या संकल्पनेतून ह्या स्पर्धेला सुरवात झाली. त्याच बरोबर तालुका क्रिकेट असो चे अध्यक्ष डॉ उमेश काळे, चांदवड पोलीस स्टेशनचे पी आय संजयजी पाटील व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत एकता क्रिकेटचे संतोष बडोदे, प्रा. सचिन निकम , स्वप्नील जाधव, मोरेदादा,सादिक शेख, मझर खान, विशाल ललवाणी, अभिजित पवार ,रजत शर्मा, कन्हैय्या बडोदे सचिन राऊत, उमेश जाधव, सुहास कापडणी यांच्यासह सर्व खेळाडू व आयोजन समिती यांचेही सहकार्य लाभले असून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चांदवडकर व आयोजन समिती परिश्रम घेत आहे.

शेतकऱ्यांनी तृणधान्य उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा- जिल्हाधिकारी

0

नाशिक, दि.16 :  बदलत्या जीवनशैलीनुसार तृणधान्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असून ते आरोग्यासाठी सकस आणि पौष्टीक आहे. आरोग्याच्या पौष्टीकतेसाठी त्याचे महत्व लक्षात घेता शेतकऱ्यांनी तृणधान्य पीक उत्पादन वाढविण्यासाठी त्याकडे दृर्लक्ष न करता उत्पादन कसे वाढविता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.

कृषि विज्ञान केंद्र, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे कृषि विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य दिनाच्या चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा कृषि अधिक्षक संजीव पडवळ, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

श्री. राधाकृष्णन म्हणाले, नाशिकच्या वातावरणात उत्तम प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेता येते. तृणधान्याच्या शेतीस प्रोत्साहन उत्पादनाकडे लक्ष दिल्यास त्यात वाढ शक्य आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तृणधान्य पिकांबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. द्राक्ष, कांदा, डाळींब उत्पादनाबरोबर नागली, ज्वारी सारख्या तृणधान्य पिकांचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच पौष्टीक तृणधान्य दिवस ही एक दिवसाची चळवळ न राहता याबाबत कायमस्वरुपी जागृती होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

श्री. देवरे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची माहिती दिली. ते म्हणाले, तृणधान्य हे कमी पाण्यात आणि वातावरणाचा ताण सहन करुन हि पिके चांगल्या प्रकारे येत असतात. ज्वारी, बाजरी आणि रागी या पिकांमध्ये नाशिक जिल्हा उत्पादनात अग्रेसर आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तृणधान्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यादृष्टीने माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पूर्वी कृषी विभागाच्या वतीने जनजागृती साठी मोटार सायकल रॅली काढण्यात आली यावेळी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भुजबळांनी इशारा दिल्यानंतर पालखेड डाव्या कालव्यातून सोमवारी पाणी सोडणार

0
file photo

विखरणी : आवर्तन न सोडल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील इशारा दिला होता. त्यांनी इशारा देताच यंत्रणा हलली असून सोमवार १९ पासून पालखेड कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पालखेड पाटबंधारे विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

पत्रकात म्हंटले आहे की पालखेड धरण समूहातील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन सोमवार पासून सोडण्यात येत आहे याची लाभक्षेत्रातील शेतकरी बिगर सिंचन संस्था यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या आवर्तना दरम्यान अनाधिकृत पाणी उपसा करणे, डोंगळ्याद्वारे पाणी उपसा करणे, तसेच कर्मचारी अधिकारी यांच्या कामकाजात अडथळे निर्माण करणे सरकारी कामात अडथळा आणणे,सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे आदी कृत्य केल्यास पाटबंधारे अधिनियमानव्ये गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही विभागाच्या पत्रकात देण्यात आला आहे.

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. कांदा हे नगदी पिक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित होते यासाठी छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरवले होते.

दरम्यान येवला, निफाड तालुक्यासह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. दि. १५ नोव्हेंबरपासून आवर्तन द्यावे अशी भुजबळांची मागणी होती. मात्र कालवा सल्लागार समितीची बैठकच न घेतल्यामुळे आवर्तनाबाबत संभ्रम निर्माण होवून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झालेले होते.

त्यामुळे पालखेड डाव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडण्यात यावे यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे नाशिकचे जिल्हाधिकारी यांची भेट घेणार होते. येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला होता त्यामुळे यंत्रणेने तात्काळ निर्णय घेतला.

नगर टाइम्स ई-पेपर : शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

0

Social Media

26,868FansLike
5,154FollowersFollow
1,351SubscribersSubscribe
error: Content is protected !!