शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

0

निरीक्षकांसमोरच नेते, कार्यकर्त्यांकडून उणीदुणी : जामखेड तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा तिढा कायम

0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ जामखेड येथे आढावा बैठकीत बोलताना.
जामखेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी आलेल्या पक्ष निरीक्षकांसमोरच नेते आणि कार्यकर्त्यांनी एक मेकांची उणीदुणी काढत पुन्हा एकदा गटबाजीचे प्रदर्शन घडवले. यामुळे काही काळ शासकीय विश्रामगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जामखेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षपद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे.
या पदासाठी अनेक मातब्बर नेते इच्छुक आहेत. पण एका नावावर एकमत होत नसल्याने तालुकाध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी जामखेड दौरा करत नेते व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आढावा बैठक दिवसभर चालली. आढावा बैठकीत तालुक्यातील नेत्यांनी गटबाजीचे प्रदर्शन घडवत मासाळ यांच्यासमोर लॉबिंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
दरम्यान तालुका अध्यक्षपदाचा तिढा जटिल बनल्याने कोअर कमिटीचे भूत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मानगुटीवर बसवण्याची खेळी खेळत मासाळ यांनी इच्छुकांना पुन्हा एकदा गॅसवर ठेवले. पक्षाच्या आढावा बैठकीत ठोस निर्णय न घेता फक्त कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा फार्स केला गेला असल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात लक्ष घालत मतदारसंघाच्या राजकीय बांधणीसाठी सावध पावले टाकण्याची रणनीती आखली आहे. आता कोणी कितीही उड्या मारू द्या अजितदादा योग्य वेळी तालुकाध्यक्षपदाची निवड करतील अशी माहिती समोर येत आहे. तालुकाध्यक्ष मीच होणार असे ठणकावून सांगणार्‍या नेत्यांना गॅसवर ठेवून राष्ट्रवादी बेरजेच्या राजकारणात यशस्वी होईल का? याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तालुकास्तरीय कोअर कमिटी स्थापन –
दरम्यान पक्षाचे निरीक्षक किशोर मासाळ यांनी आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर पक्षासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, सुरेश भोसले, प्रा. संजय वराट, भगवान गिते, उमर कुरेशी यांचा समावेश आहे. ही कमिटी यापुढे पक्ष प्रवेश, वरिष्ठ नेत्यांशी संपर्क, तालुका पातळीवरील निर्णय, निवडणूक निर्णय, पदाधिकारी नियुक्ती आदी बाबतीत निर्णय घेईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.

तालुकाध्यक्षपदाचा तिढा महिनाभरात सोडविणार – किशोर मासाळ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा तिढा जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन महिनाभरात सोडविण्यात येईल. दरम्यान जामखेड तालुक्यातील पदाधिकार्‍यात जे अंतर्गत वाद आहेत ते मिटवण्यासाठी अजित पवार यांनी मला जामखेडला पाठविले होते. आढावा बैठकीचा वस्तुनिष्ठ अहवाल अजितदादांना सादर करून पुढील दिशा ठरवली जाईल, असे पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी सांगितले.

अजित पवारांकडून हिरवा कंदील कधी?
तालुकाध्यक्ष निवडीचा तिढा सुटण्यासाठी अजित पवारांकडून हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळे जामखेड राष्ट्रवादीत राजकीय अस्वस्थतेचे अन गटबाजीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. दरम्यान दिवसा राष्ट्रवादीबरोबर व रात्री भाजपच्या दावणीला जाणार्‍या त्या नेत्यांचे काय होणार? असाही सवाल आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगू लागला आहे.

पुणतांबा, नाऊर बंधार्‍यांवर ठिय्या : सामूहिक जलसमाधीचा शेतकर्‍यांचा इशारा

0
बंधार्‍यातील पाणी सोडण्यात येणार असल्याने शेती उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत हे पाणी सोडू नये यासाठी शेतकर्‍यांनी नाऊर बंधार्‍यावर असा ठिय्या मांडला होता.

पुणतांबा, नाऊर (वार्ताहर) – बंधार्‍यांतील पाणी मराठवाड्यासाठी पुन्हा सोडण्यात येत असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष धुमसत आहे. हे पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी काल पुणतांबा आणि नाऊर बंधार्‍यांवर शेतकर्‍यांनी ठिय्या मांडला होता. पाणी सोडण्याचा कोणी प्रयत्न केल्यास आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ असा इशारा नाऊर, मातुलठाण येथील शेतकर्‍यांनी दिला. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पोलिसांपुढे पेच उभा राहिला आहे. यावर अधिकारी कसा तोडगा काढतात, यावरच पुढे सर्वकाही अवलंबून आहे. 

 भंडारदर्‍यातून पाणी सोडणे बंद करावे –
मराठवाड्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडणे पूर्णपणे बंद करण्यात यावे अशी मागणी लाभक्षेत्रातून होत आहे. 11039 दलघफू क्षमतेचे हे धरण यावर्षीही तुडुंब भरले होते. पण निळवंडेतून पाणी जोरदार निघावे यासाठी हे धरण ओव्हरफ्लो करण्यात आले. त्यानंतर आवर्तन आणि मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी खर्च झाले आहे. आता धरणात केवळ 4780 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. अजून साडेसात महिन्यांचा कालावधी जायचा आहे. आता जर असेच पाणी सुटत राहिले तर भविष्यात मोठा प्रश्‍न उभा राहण्याची शक्यता असल्याने हे पाणी बंद करण्यात यावे अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. 

ब्राह्मणीत धुमश्‍चक्री ; राहुरी फॅक्टरी, बारागाव नांदूर येथेही हाणामारी

0
उंबरे (वार्ताहर) – गेल्या 10 वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीच्या वाटपावरून राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील शेख आणि पठाण या दोन कुटुंबांत कडाक्याचे वाद झाले. त्यानंतर पठाण कुटुंबाने बाहेरून 15 ते 20 तरुणांच्या टोळक्याला बोलाविले.
या टोळक्याने शेख कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावेळी काही ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेची खबर कळताच राहुरीचे पोलीसही तातडीने घटनास्थळी आल्याने तंग झालेले वातावरण निवळले. ही घटना काल शुक्रवारी (दि. 16) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी सुमारे 15 हून अधिक दुचाकींची मोडतोड करण्यात आली आहे. ब्राह्मणी येथील शेख व पठाण यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या वाटपावरून वाद आहेत.

यात पठाण यांनी आपल्या हिश्श्याची जमीन कनगरे, पठारे, गायकवाड व अन्य काही लोकांना साठे खरेदीखत करून दिली आहे. मात्र, ही जमीन आजतागायत शेख कुटुंबियांच्याच ताब्यात असल्याने त्याच कारणावरून काल सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेख व पठाण यांच्यात वाद झाले. त्यानंतर पठाण यांनी आपली साठेखत करून दिलेल्या जमीनधारकांना ब्राम्हणीत बोलावून घेतले.

यावेळी 15 ते 20 तरूणांनी ब्राम्हणीत येऊन शेख कुटुंबियांना बेदम मारहाण केली. यात शेख कुटुंबियातील चार ते पाचजण जखमी झाले असून बाहेरून आलेल्या तरूणांनाही मारहाण झाल्याने त्यातील काही तरूण जखमी झाले आहेत. या मारहाणीत तलवार, लाकडी दांडके, यासह लोखंडी हत्याराचा वापर करण्यात आला. त्यामुळे ब्राम्हणी गावात वातावरण तंग झाले होते.

मात्र, यावेळी बाहेरून येऊन हे तरूण गावातील कुटुंबियांना मारहाण करीत असल्याचे पाहताच ग्रामस्थ धावून गेल्याने तरूणांनी तेथून पलायन केले. दरम्यान, त्या तरूणांच्या दुचाकीची मोडतोड करण्यात आली असून ही वाहने राहुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.

दरम्यान, इस्माईल रफिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इरस्माई! व त्याचा चुलत भाऊ आलिम यांना काही आरोपींनी शिवीगाळ दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यानंतर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने पुन्हा शिवीगाळ करुन तलवार,

लोखंडी पात्याचे धारधार हत्यार, लोखंडी पाईपला चेन साँकेट असलेले हत्यारे व लाकडी दांडे घेऊन दुकानात घुसुन यातील फिर्यादी व साक्षीदार याचे दुकानातील 3500/- रु. चिल्लर, फिर्यादीची मामी शम्मा शेख हिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तसेच नजमा शेख यांच्या गळ्यातील पानपोत बळजबरीने काढुन, मारहाण करुन दुकानातील बांगड्या व इतर सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसचे जिवे मारण्याची धमकी दिली.

यावरून पोलिसांनी – जाकिर आलम पठाण, शायद हसन पठाण, आलम हसन पठाण, हसन कोंढाजी पठाण,चाँद अब्दुल पठाण, दादा चाँद पठाण, अब्दुलगणी पठाण, नुरा अब्दुलगणी पठाण, रवींद्र बाबासाहेब कणगरे, राजु मच्छिंद्र गायकवाड, तुकाराम भिमराज पटारे, निलेश साहेबराव झावरे, रामदास ऊर्फ लाव्या धनवटे,पूर्ण नाव माहित नाही, श्रीकांत विजय नालकर, सोमनाथ भिमराज भागवत (आरोपी करजगाव, ब्राम्हणी, उंबरे, देवळाली, राहुरी फॅक्टरी, सोनई येथील आहेत. ) यांच्या विरोधात राहुरी पोस्टे गुन्हा रजि. नं. ख 826/2018 भा.दं.वि. कलम 143, 147, 148, 149, 327, 324, 326, 323, 504, 506, 427, 452 आर्मअँक्ट 4/25 मुं पो अँक्ट 1951कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘दंगलवार’
ब्राम्हणीबरोबरच बारागाव नांदूर येथे सय्यद आणि इनामदार गटात जोरदार हाणामारी झाली. यातील अल्लाबक्ष सय्यद यांनी फिर्याद दिली असून इनामदार गटाच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसच राहुरी फॅक्टरी येथेही दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेतही काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे कालचा शुक्रवार हा राहुरी तालुक्याच्या दृष्टीने ‘दंगलवार’ ठरला आहे.

महिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा

0
शिर्डी (प्रतिनिधी) – साई दर्शनाला मंदिरात आलेल्या एका प्रतिष्ठित महिलेस मंदिर प्रमुखाने धक्काबुक्की करून व असभ्य वर्तन करत मंदिराबाहेर हाकलून लावले. महिलेच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरात घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, राहाता येथील एक महिला, तिचे नातेवाईक व मैत्रीणीसोबत साई मंदिरात दर्शनाला गेली होती. दर्शन घेण्यासाठी

ती गाभार्‍यात उभी असताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप तेथे आले व म्हणाले, यांना इथे कशाला थांबवता, यांना बाहेर हाकलून द्या. तुम्ही थर्ड क्लास आहात, तुमची मंदिरात यायची लायकी नाही, असे म्हणत असभ्य वर्तन करून मंदिर गाभार्‍याबाहेर काढले. परत आत आला तर मार खाल, अशी धमकीही दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 354, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंदिरात साईभक्तांना हीन वागणूक – मंदिरात दर्शनाला आलेल्या सर्वसामान्य भक्तांना कर्मचार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, तर धनिक व वशिल्याच्या व्हीआयपींना थेट समाधीजवळ जागा मिळते. हे प्रकार नेहमीच घडत असतात. यापूर्वीही मंदिरातील धक्काबुक्कीवरून मंदिर प्रमुखाविरुध्द शिर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.

 

‘नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद’ स्थापना करणार

0
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज देताना सर्वपक्षिय कार्यकर्ते.

श्रीरामपुरातील सर्वपक्षीय बैठकीत निर्णय ; न्यायालयीन लढ्याचीही तयारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –  सन 2012-2018 या सात वर्षांमध्ये 4 वेळेला जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोर्‍यातील शेती शाश्‍वत राहिलेली नाही. अशा पार्श्‍वभूमीवर भविष्यकालीन वाटचाल कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी श्रीरामपूर येथे माजी आ. दौलतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषदेची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली.

जायकवाडीच्या मूळ प्रकल्प अहवालानुसार जायकवाडीसाठी फक्त 69.71 टीएमसी पाणी उपलब्ध होते, परंतु आंध्रप्रदेश-महाराष्ट्र पाणी तंट्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी आरक्षीत करण्यासाठी पैठण धरणाची क्षमता वाढवलेली आहे. अशा विविध मागण्या एकमुखाने मांडण्यासाठी नाशिक-नगर जिल्ह्यांतील सर्व घटकांची एक संघटना असली पाहिजे असा सूर अनेकांनी आपल्या भाषणामधे मांडला.

त्यानुसार भविष्यात यासाठी मोठा लढा उभारण्यासाठी एकत्रित लढा देण्यासाठी नगर-नाशिक उर्ध्व गोदावरी खोरे पाणी परिषद स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या संस्थेची घटना, कर्तव्य व मागण्या ठरवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. जायकवाडीसाठी पाणी नेताना दि. 23 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेल्या कार्यालयीन आदेशामधे महाराष्ट्र जलसंपदा विभागाने दि. 12 सप्टेबर 2018 च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेतला नाही. त्यामुळे शासन निर्णयाचा अनादर केला तसेच 2007-08 च्या जायकवाडी धरणाचे पाणी लेखापरीक्षण अहवालानुसार बाष्पीभवन व्यय 312 दलघमी होता.

जायकवाडीच्या जलाशयामधून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी होते. त्या चोरीला गेलेल्या पाण्याची आकडेवारी दडविण्यासाठीच कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी दि. 12 सप्टेबर 2018 चा शासन निर्णय दडवून ठेवला. या निर्णयानुसार राज्य शासनाने संबंधित प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन केलेले आहे. त्याचा संदर्भ 23 ऑक्टोबर 2018 रोजी पाणी सोडण्याचे आदेशात घेतला नाही. म्हणून न्यायालय, न्यायाधिकरण व महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. यावेळी माजी आ. दौलतराव पवार, उत्तमराव भुसारे, सुरेश ताके, राजेंद्र बावके, राजेंद्र पाऊलबुध्दे, रावसाहेब गाढवे, राजेंद्र कार्ले, शिवाजीराव जवरे, जितेंद्र भोसले, उत्तमराव पवार,राजेंद्र लांडगे, अशोक बागुल, रामचंद्र पटारे, विलास कदम, अ‍ॅड. नारायण तांबे, भाऊसाहेब त्रिंबक तनपुरे, दिलीप गलांडे, भरत आसने, बाबासाहेब गलांडे, संदीप गवारे, दत्तात्रय लिप्टे, सुदाम पटारे, गंगाधर देसाई, शांताराम तुवर, शिवाजी शेजुळ, रामकृष्ण चौधरी, गोविंद वाबळे आदी शेतकरी उपस्थित होते.

गोदावरी बंधार्‍यांतील पाणी पोलीस बंदोबस्तात सोडले

0

सोनेवाडी (वार्ताहर) – गोदावरी नदीपात्रातील बंधार्‍यात अडविलेले पाणी शेतकर्‍यांच्या विरोधानंतरही पोलीस बंदोबस्तात जायकवाडीला सोडण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील डाऊच, हिंगणी, सडे, शिंगवे आदी बंधार्‍यांच्या फळ्या काढण्यासाठी शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत पाणी सोडून दिले. यावेळी शेकडो शेतकरी बंधार्‍याजवळ जमले होते. विरोध करूनही पाणी सोडल्यानंतर शेतकर्‍यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला.

दारणा धरण समुहातून जायकवाडीला2.64 टीएमसी पाणीसोडण्यात आले होते. परंतु गोदावरी नदीवर असलेल्या बंधार्‍यांमध्ये शेतकर्‍यांनी पाणी अडविले असल्याची ओरड मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर गोदावरी महामंडळाने हे अडविलेले पाणी सोडून देण्याचे आदेश नाशिक जलसंपदा विभागाला दिले होते. या निर्णयाला गोदाकाठच्या शेतकर्‍यांनी प्रचंड विरोध केला. पोलीस प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करून कायदा सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

यामुळे शेतकर्‍यांनी बंधार्‍याकडे पाठ फिरवत गावात एकत्र जमून शासनाचा निषेध नोंदविला. डाऊच खुर्द व हिंगणी बंधार्‍यांतून 63. 42 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपासूनच पाणी सोडण्याच्या कारवाईला सुरुवात झाली होती.

डाऊच खुर्द बंधार्‍यावर जेसीपी मशीन जाण्याची व्यवस्था नसल्याने पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्वतः बंधार्‍यावरील असलेल्या नऊ-दहा गेट वरील फळ्या काढल्या. डाऊच खुर्द परिसरातील ग्रामस्थांनी गावातील साई मंदिरात सरकारच्या नावाने निषेध सभा घेऊन सरकारचा निषेध केला.हिंगणी बंधार्‍यात जायकवाडीला पाणी सोडण्यापूर्वी 3.84 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते तसेच डाऊच खुर्द बंधार्‍यात काही प्रमाणात पाणी शिल्लक होते. त्यामुळे सर्वच पाणी जायकवाडीला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी के.डी. पाटील यांनी सांगितले. हिंगणी बंधार्‍यातील पूर्वीचे 3.680 दशलक्ष घनफूट पाणी राखून ठेवून बाकीचे पाणी सोडून देण्यात आले.

हिंगणी बंधार्‍यात पूर्वीचे पाणी शिल्लक होते आणि ते पाणी पुन्हा जायकवाडीकडे सोडू नये म्हणून अनेक ठिकाणी आम्ही निवेदने दिली परंतु निवेदनाचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही व हे पाणी सोडलेले आहे. त्यामुळे परिसरात पाणी प्रश्न बिकट होणार आहे. याला सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार आहे.
– सरपंच जिजाबाई पवार

डाऊच बंधार्‍यावर हजारो लोकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अवलंबून आहे. हक्काचे पाणी गुरा-ढोरांना पिण्यासाठी राहणार नाही. इंग्रज सरकार प्रमाणे हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. पाणी सोडल्यानंतर होणार्‍या पाणीटंचाईला हे सरकार जबाबदार असणार आहे. येणार्‍या निवडणुकीवर आम्ही पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहिष्कार टाकणार आहोत.
– सरपंच संजय गुरसळ

Social Media

26,869FansLike
5,154FollowersFollow
1,351SubscribersSubscribe
error: Content is protected !!