ई पेपर- मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

0

शेती महामंडळाचा जमीन टेंडर रद्द करण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा तूर्तास आदेश नाही

0

कोर्टाकडून महामंडळाला एकलहरेतील खंडकर्‍यांच्या जमीन वाटपाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; पुढील सुनावणी 22 तारखेला

टिळकनगर (वार्ताहर) – खंडकरी शेतकर्‍यांना आपल्या हक्काच्या जमिनीपासून वंचित ठेवून, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडून श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर मळ्यातील 1201 एकर क्षेत्रात संयुक्त शेती पध्दतीने पिके योजना राबविण्याबाबत शेती महामंडळाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली होती. या टेंडर मध्ये तालुक्यातील एकलहरे गावाच्या जमिनीचा समावेश करण्यात आला असल्याने, गावांतील 419 एकर 19 गुंठे जमीन खंडकरी शेतकर्‍यांना आजपर्यंत मूळ गावी मिळाली नसल्याने एकलहरेतील जमीन टेंडर पध्दत रद्द व्हावी म्हणून नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

काल या विषयी सुनावणी झाली. यावेळी शेती महामंडळाने न्यायालयास सांगितले की, आम्ही एकलहरे गावातील खंडकरी शेतकर्‍यांना जमिनी देण्यास तयार आहोत, जी टेंडर पध्दतीने जमीन काढली आहे, त्याव्यतिरिक्तही क्षेत्र शेती महामंडळ कडे शिल्लक आहे. त्यांवर न्यायालयाने शेती महामंडळाला सांगितले की, एकलहरेतील खंडकर्‍यांना जमीन वाटप कोठे व कधी करणार याबाबत 22 तारखेला प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश दिले, त्यास शेती महामंडळाने होकार दिल्याचे समजते. तसेच शासनाने सुद्धा 5 जानेवारी 2018 च्या शासन आदेशानुसार शेती महामंडळने एकलहरेकरांना जमीन देण्यात काही हरकत नसल्याचे स्पष्टपणे न्यायालयात सांगितले. तसेच जी 1201 एकर जमीन टेंडरे पध्दतीने काढण्यात आली होती त्यापैकी एकलहरेतील जमीन टेंडर रद्द करण्याबाबत न्यायालयात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेती महामंडळाला एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

वस्तुस्थिती पाहता शेती महामंडळाने टेंडर पध्दतीने जी जमीन कसण्यास काढली आहे, ती कसण्यास योग्य असून जी शिल्लक जमीन आहे त्यास शेती महामंडळ एकलहरेतील खंडकर्‍यांना मूळ गावात की, टिळकनगर मळ्यातील उर्वरित असलेल्या इतर गावांतील जमीन देण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर कसे करते हे आता येणार्‍या 22 तारखेलाच कळेल. राज्य शेती महामंडळाने टिळकनगर मळ्यातील जी 1201 एकर जमीन टेंडर पध्दतीने काढली आहे. त्यापैकी एकलहरे गावांतील 457 एकर जमिनीचा समावेश असून, त्या खालोखाल खंडाळा, उक्कलगाव, रांजणखोल, ऐनतपूर, वळदगाव येथील सुद्धा जमिनी ह्या टेंडर पध्दतीने कसण्यास देण्यात येणार आहेत.

 

साईबाबा संस्थान विश्वस्तांची आज बैठक

0

अध्यक्षांना भेटण्यासाठी शिष्टमंडळांना पोलिसांची आचारसंहिता

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या आज होणार्‍या बैठकी दरम्यान संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना निवेदन देण्यासाठी जाणार्‍या विविध पक्षांच्या शिष्टमंडळांना शिर्डी पोलिसांनी आचारसंहिता आखून दिली आहे. मागील बैठकी दरम्यान ग्रामस्थ आणि संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या दरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्याअनुषंगाने शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे यांनी संबंधित शिष्टमंडळांना पोलीस ठाण्यात बोलावून आचारसंहितेबद्दल सूचना दिल्या.

तसेच आज मंगळवारी होणार्‍या बैठकीस राजकीय तसेच शिष्टमंडळाच्या प्रत्येकी दोघे या प्रमाणे निवेदन देण्यासाठी साई अतिथीगृह येथे सोडले जाणार असल्याचे सांगितले. या दरम्यान कायदा सुव्यस्था तसेच शांततेचा भंग केल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिर्डीतील मागील बैठकी दरम्यान वादग्रस्त ठरलेल्या 17 ग्रामस्थांनी डॉ. हावरे यांना जमिनी खरेदी प्रस्ताव प्रकरणी जाब विचारण्यासाठी जाण्यास परवानगी मिळावी यासाठी पोलीस उपअधीक्षक शिवथरे यांची भेट घेतली. मात्र यावेळी पोलिसांनी आचारसंहितेचे पालन करत अध्यक्षांच्या परवानगीने भेटीस सोडणार असल्याचे संबंधितांनी सांगितले, तर त्याचबरोबर 17 ग्रामस्थांनी देखील याचे पालन करणार असल्याचे आश्वासन दिले.

पंधरा दिवसांपूर्वी निवेदन देण्याच्या प्रकरणावरून साईनगरीत मोठा गदारोळ झाला होता. काही ठराविक ग्रामस्थांनाच संस्थानचे अध्यक्ष यांच्या भेटीसाठी सोडल्याचा आरोप करत वातावरण तणावग्रस्त झाले होते तर आता उद्या देखील असा वाद उफाळू नये यासाठी पोलीस यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत असून कायद्याचे उल्लघन आणि शांतता भंग करणार्‍यांवर कारवाईसाठी सज्ज असल्याचे विश्वसनीय पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

साईबाबा विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना जमिन खरेदी प्रस्ताव प्रकरणी जाब विचारण्यासाठी जातांना पोलीस उपअधिक्षक शिवथरेंनी आचारसंहिता घालून दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवथरे यांच्या निर्णयाचे स्वागत करून आम्ही पालन करणार आहोत.ज्या प्रामाणे पोलीस सांगतील तेवढे व्यक्ती आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत. पोलीस आणि कायद्याचा आम्ही सन्मान करतो. मात्र हे करत असतांना सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या आचारसहितेचे पालन करावे हीच माफक अपेक्षा आहे.
– विजय कोते, अध्यक्ष साईनिर्माण ग्रुप

अकोलेतील कालव्यांची कामे सुरू करण्याच्या हालचाली

0

डाव्या व उजव्या बाजूच्या शेतकर्‍यांना नोटिसा

अकोले (प्रतिनिधी)- निळवंडे धरणाची अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे सुरू करण्यासंदर्भात जलसंपदा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित शेतकर्‍यांना जलसंपदा विभागाच्यावतीने नुकत्याच नोटिसा याबाबत बजावण्यात आल्या असल्याची माहिती निळवंडे प्रकल्प कालवे विभागाचे उपकार्यकारी अभियंता जनार्दन सहाणे यांनी सार्वमतशी बोलताना दिली.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत नुकतीच मुंबई येथे अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यामध्ये ना. शिवतारे यांनी अधिकारी पातळीवरून कालव्यांची कामे सुरू करण्याच्यादृष्टीने कोणत्या हालचाली केल्यात अशी विचारणा केली होती. त्यानुसार निळवंडे धरणापासून उजव्या व डाव्या बाजूकडील 12 किलोमीटरपर्यंतच्या शेतकर्‍यांना नोेटिसा देण्यात आल्या आहेत. आपण कालव्यासाठी क्षेत्र संपादीत केले आहे. कालव्यांची कामे सुरू करावयाची असल्याने शेतात नवीन पेरणी करू नये किंवा संपादीत क्षेत्रात काही मालमत्ता असेल तर ती काढून घ्यावी अशा आशयाच्या नोटिसा जलसंपदा विभागाच्यावतीने संबंधीत शेतकर्‍यांना देण्यात आल्या आहेत. 1987 ला जमिन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. कागदोपत्री या जमिनी शासनाच्या ताब्यात असल्या तरी प्रत्यक्षात शेतकरी जमिन कसत होते. आता जलसंपदा विभागाने या शेतकर्‍यांना नोटीसा दिल्याने खळबळ उडाली आहे.

निळवंडेच्या कालव्यांच्या कामाची निविदा पूर्ण झाली असून तालुक्यातील रेडे, सुगाव, कुंभेफळ, कळस तसेच परखतपूर, मनोहरपूर, कळस येथे कामे सुरु असल्याचे श्री. सहाणे यांनी सांगितले. दरम्यान निळवंडेचे कालवे भूमिगत पध्दतीने करायची अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची मागणी असतांना दुसरीकडे मात्र कालव्यांची कामे सुरु करण्याच्या दृष्टीने नोटीसा बजावण्यात आल्राने आगामी काळात तालुक्यात या प्रश्‍नावरुन संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे.

निळवंडेच्या डाव्या बाजूच्या निंब्रळ, म्हाळादेवी, बहिरवाडी, मेहंदूरी, टाकळी, ढोक्री येथील सुमारे 100 तर उजव्या बाजूच्या रुंभोडी, इंदोरी, औरंगपूर, धुमाळवाडी व अकोलेपर्यंतच्या सुमारे 12 किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांतील 60 ते 70 शेतकर्‍यांना या नोटिसा दिल्या गेल्या आहेत.

संगमनेर तालुक्याला तडाखा; राहाता, नेवाशाला दिलासा

0

डाळिंब, द्राक्ष बागांना फटका, कापूस भिजला, ऊस व अन्य पिकांना जीवदान

अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यात जवळेकडलग, आश्‍वी व अन्य भाग, राहाता तालुक्यातील राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, कोल्हार, तिसगाव या पट्ट्यात वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. नेवाशात करजगाव, निंभारी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राहुरीतील मांजरी परिसरात मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग परिसरात गारपीट झाल्याने डाळिंब,व द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसन झाले आहे. तर अन्यत्र डाळिंब, पेरू बागांना जीवदान मिळाले आहे. तर काही ठिकाणी बोंडं भिजल्याने कापसाला फटका बसण्याची शक्यता आहे.

शिर्डी, लोणी, बाभळेश्‍वर, कोल्हार परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता शहर, शिर्डीसह परिसरात आणि तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला.या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना तसेच डाळिंब, पेरू बागांना जीवदान मिळाले आहे. द्राक्ष बागांना काही ठिकाणी फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राहाता शहर, शिर्डीतील सायंकाळी नूर बदलला. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुरूवातीला रिमझीम सुरू झाली. त्यानंतर पावसाने जोर पकडला होता. त्यामुळे सखल भाग आणि शेतांमध्ये पाणी साचले होते.

बाभळेश्‍वर वार्ताहराने कळविले की, राहाता तालुक्यातील लोणी, बाभळेश्‍वर, कोल्हार, तिसगाव या पट्ट्यात काल दुपारनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अर्धा तास तर काही ठिकाणी दोन तास पाऊस सुरू होता. या पावसामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला आहे. काल दिवसभर उकाड्यानंतर दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बाभळेश्‍वर येथे वादळी वार्‍यासह जवळपास 1 तास मुसळधार पाऊस झाला.

लोणी येथे मध्यम स्वरुपाचा सुमारे अर्धा तास पाऊस झाला. कोल्हार, तिसगाव परिसरातही सुमारे दिड-दोन तास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे बळीराजा मात्र काही प्रमाणात सुखावला आहे. या पावसामुळे शेतात कांदा लागवड करण्याचे काम सुरु आहे. मात्र कालच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे हाल झाले. जवळपास 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर शेतकर्‍यांना कालच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. जिरायत शेतकर्‍यांसाठी हा पाऊस वरदान ठरला असून यामुळे पशुपालकांसाठी काही प्रमाणात का होईना चारा उपलब्ध होणार आहे. ऊस तोड मजुरांचे चांगलेच हाल झाले. जायकवाडी धरणात भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडले आहे. त्यामुळे निराश झालेल्या शेतकर्‍याला थोडासा दिलासा मिळाला आहे.

जवळे कडलग परिसरातील गारपीटीत शेकडो डाळिंब व द्राक्ष बागांचे नुकसान

संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यात काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वार्‍यासह गारांचा पाऊस पडला. सुमारे एक तास चाललेल्या पावसाने तालुक्यातील राजापूर, जवळे कडलग, निमगाव भोजापूर या भागांतील द्राक्ष, डाळिंब या फळबागांना गारांनी झोडपले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळे कडलग गावात तासभर झालेल्या गारांच्या तडाख्याने सुमारे 600 ते एक हजार एकर डाळिंबाचे क्षेत्र तर 250 एकर द्राक्षांच्या बागांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. येथील रोहिदास भास्कर कवडे यांची 10 एकर तर संतोष रतन देशमुख यांच्या 2 एकर द्राक्ष बागेचे जवळपास 90 टक्के नुकसान झाले असून या बागांना 8 ते 10 एम. एम इतक्या आकाराची द्राक्षं उभी होती.

त्याचबरोबर विजय कडलग या शेतकर्‍याची 10 एकर डाळिंबाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या सर्व शेतकर्‍यांनी टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करून आजपर्यंत बागा मोठ्या कष्टाने सांभाळल्या होत्या. या फळबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांना एकरी जवळपास दीड लाख रुपये खर्च आला असल्याचे बोलले जात आहे. निसर्गाच्या अवकृपेने एकट्या जवळे कडलग गावाचे अंदाजे जवळपास 6 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तालुका कृषी अधिकार्‍यांनी या पावसाची नोंद घेऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. झालेल्या पावासाने शेतकर्‍यांचे चारा पिके देखील भुईसपाट झालेली बघायला मिळाली. राजापूर ते जवळे कडलग रस्त्यालगत असलेली अनेक झाडे पावसाच्या तडाख्याने तुटून पडलेली आहे. चिखली, मंगळापूर परिसरातही जोेरदार पाऊस झाला.

आश्‍वी वार्ताहराने कळविलेल्या माहितीनुसार संपुर्ण पावसाळयात दडी मारलेल्या पाऊसाने सोमवारी दुपारपासून आश्‍वी परिसरात समाधानकारक हजेरी लावली. पाऊस व पाण्याअभावी माना टाकु लागलेली पिके पुन्हा तरारल्याचे अश्‍वासक चित्र निर्माण झाले आहे. तर अनेक दिवसापासून पठार व डोगराळ भागातील विहीरी व बोअर यांची पाणी पातळी घटल्याने पिण्याचे पाणी व पाण्याअभावी जळणारी पिके यामुळे मोठा प्रश्‍न येथील शेतकर्‍यापुढे उभा ठाकला होता. परंतु, सोमवारी दुपारपासूनच सुरु झालेल्या संततधार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

या पावसामुळे पिकांना थोडेफार जीवदान नक्कीच मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण पावसाळयात पावसाने दडी मारल्याने जमीनीत उभ्या असलेल्या पिकानी माना टाकल्या होत्या, तर पठार भागातील विहीरी व बोअर यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. त्यामुळे पिके जगविणे शेतकर्‍यांना अवघड झाले होते. परिणामी ऊसासह इतर पिकाची वाढ खुंटली आहे. काल दिवसभर भिज पाऊस सुरू असल्याने जमिनीतील ओल खोलवर जाण्यास मदत झाली आहे. परंतू जोराचा पाऊस नसल्याने रस्त्याच्या कडेला सोडून इतरत्र कोठेही पाणी साठल्याचे दिसत नाही.

प्रवरा परिसरातील शेतकर्‍यांची भिस्त भंडारदरा धरणावर असून हे धरण भरले होते. मात्र जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे दुष्काळी चित्र निर्माण झाल्याने काळजीत असलेल्या बळीराजाच्या चेहर्‍यावर या पावसाने आंनद दिसत आहे. दरम्यान आश्‍वी परिसरातील उंबरी-बाळापूर, आश्‍वी खुर्द, आश्‍वी बुद्रुक, प्रतापपूर, ओझर, कनोली, चिचंपूर, खळी, पिप्रीं-लौकी अजमपूर, निमगावजाळी, जोर्वे, चणेगाव, कौठे-मलकापूर, अंभोरे, कोची, मांची, मालुंजे, पिपंरणे, हजारवाडी, पानोडी, शिबलापूर, औरंगपूर, रहिमपूर, मनोली आदि गावांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची रिपरिप सुरु असल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे. दरम्यान पिंप्री लौकी अजामपूर येथे सुमारे 20 मिनिटे पाऊस झाला. या पावसात मुंढे वस्तीजवळ असलेत्या तासाच्या ओढयाला मोठया प्रमाणात पाणी आले. मात्र तलावाचे अपुरे काम व काही शेतकर्‍याची विरोधी भुमिकेने आलेले पाणी वाहुन गेले. हे पाणी किमान महिनाभर पुरले असते.

 

तराळवाडी कचरा डेपो रद्द करणासाठी साखळी उपोषण

0
पारनेर नगरपंचायत समोर तराळवाडी येथील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना.
पारनेर (तालुका प्रतिनिधी) – नगरपंचायतीच्या हद्दीतील तराळवाडी येथे गट नंबर 660 मधील दोन हेक्टर जागेत नगरपंचायतकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा डेपो करण्यात येणार आहे. त्या कचरा डेपोला तराळवाडी परिसरातील नागरिकांनी विरोध केला असून त्यासाठी सोमवार 19 नोव्हेंबर रोजी 10 वाजल्यापासून साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, तराळवाडीतील सर्व नागरिकांनी 2 एप्रिल 2016 रोजी पत्राद्वारे कचरा डेपोसाठी विरोध दर्शविला होता. तसेच 2 मे 2016 रोजी नगरपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगरपंचायत हद्दीतील तराळवाडी दोन हेक्टर क्षेत्रात घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ठराव घेण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकार्‍यांकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमध्ये नगरसेविका नंदा देशमाने यांनी तराळवाडी येथील कचरा डेपोस विरोध केला होता. परंतु त्यानंतर जिल्हाधिकर्‍यांकडे नगरपंचायतीने या हद्दीत कचरा डेपो प्रकल्पास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. त्याला जनार्दन औटी व इतर ग्रामस्थांनी हरकती घेऊन विरोध केला. त्यानंतर पारनेरचे मंडलाधिकार्‍यांनी पंचनामा केला. त्या पंचनाम्यात पंचानी म्हटले आहे, कचरा डेपोची जागा व लोकवस्ती या दरम्यानचे अंतर 300 ते 400 मीटर आहे. त्यापासून पाण्याचा तलाव 200 ते 300 मीटरवर आहे. डेपोची जागा डोंगर माथ्यावर आहे. येथे वन्यप्राण्याचे वास्तव्य आहे. या प्राण्यांसाठी चार पाणवठे आहेत. या जागेत वृक्ष लागवड केलेली असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. तसेच प्रांताधिकारी व तलाठी यांनी 21 जुलै 2016 रोजी प्रत्यक्ष पाहणी अहवालात अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हा कचरा डेपो झाल्यास जलप्रदूषण व वायुप्रदूषण होणार आहे. यामुळे पशुपक्षी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने या जागेतील कचरा डेपोचा निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरपंचायतने ही जागा घनकचरा व्यवस्थापनासाठी अधिग्रहण प्रक्रिया नियमाप्रमाणे केली आहे. त्यास येथील नागरिकांचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी वसंत गणपत ठुबे, जनार्दन औटी, सुभाष मारुती औटी, यशवंत भगवंत औटी, नामदेव बाबुराव औटी, साहेबराव किसन देशमाने, रावसाहेब बबन शेरकर, दत्तात्रय नारायण औटी, देवीलाल राधाकिसन बनगे, विलास कोंडीभाऊ तराळ, कोंडीभाऊ महादू वीर, विजय भाऊसाहेब शेटे, अतुल शेटे, अर्जुन बढे, नंदू तराळ, अशोक गायकवाड, पोपट तराळ, मनोहर बढे, बाबा शेरकर, विनोद बढे, निवृती शेरकर, रवींद्र शेटे, सुधाकर तराळ, शिवाजी तराळ, दयानंद बढे, राजेंद्र तराळ, नंदू तराळ, शंकर औटी, त्रिंबक औटी, रोहित तराळ, अशोक विनायक गायकवाड तसेच महिला व पुरुष उपस्थित होते.

 

मुळाकाठ परिसरात अवकाळी पाऊस

0
नेवासा तालुक्यातील शिरेगाव-पानेगाव परिसरात दुपारी अचानक आलेल्या पावसाने कापूस व्यापार्‍यांचे असे हाल झाले.

कापूस व्यापार्‍यांची झाली धावपळ

करजगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पश्‍चिम भागातील मुळाकाठ परिसरातील शिरेगाव, पानेगाव परिसरात काल अर्धा तास चांगला पाऊस झाला. तर करजगाव, अंमळनेर, निंभारी परिसरात अल्प प्रमाणात पाऊस झाला. दुपारी अचानक आलेल्या पावसाने कापूस वेचणार्‍यांची व कापूस व्यापारी तसेच उसतोड कामगारांची चांगलीच धावपळ झाली. गेल्या आठवड्यापासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. उकाडा वाढल्याने पाऊस होण्याची शक्यता होती.सोमवारी दुपारी दीड-दोनच्या सुमारास वार्‍यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कापसाची अंतीम टप्प्यावर वेचणी सुरू असून बहुतेक शेतकर्‍यांचा कापूस भिजला आहे. तर गहू, हरभरा, पेरणीसाठी थांबावे लागणार आहे. सध्या परिसरात कांदा लागवड जोरात चालू असून कांदा लागवड करणार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

परिसरामध्ये कापूस खरेदी व्यापार्‍यांची अचानक आलेल्या पावसाने चांगलीच धावपळ झाली. बाहेर असलेला कापूस ओला झाला. तो गोळा करताना कामगारांची त्रेधा उडाली होती.
विटभट्टीवर वीट तयार करण्याचे काम चालू असल्यामुळे कच्या विटा भिजल्या.

 

शहीद जवान कपिल गुंड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
अजनुज येथे भीमा नदी तीरी शहीद कपिल गुंड यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित जनसमुदाय.
श्रीगोंदा, अजनुज (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथील कपिल नामदेव गुंड (वय-24 वर्षे) जम्मू काश्मीरमधील उडी सेक्टर, कालापहाड याठिकाणी लष्करी सेवेत कर्तव्यावर असताना, गुरूवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर काल सोमवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी अजनूज येथे भीमा नदीतिरी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कपिलचा मृतदेह विमानाने पुण्यात आणण्यात आला. त्यानंतर पुण्यातून लष्करी वाहनातून अजनूज येथे त्यांच्या घरी आणण्यात आला. फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून शोकाकूल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी‘भारत माता की जय’ ,‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावातील प्रत्येक चौकात व प्रत्येक घरासमोर ‘अमर रहे’, ‘वीर जवान तुझे सलाम’ चे बॅनर व रांगोळी काढण्यात आल्या होत्या. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून, अंतिम संस्कारासाठी भीमा नदीतिरी कपिलचे पार्थिव नेण्यात आले. भारतीय सेनेच्या जवानांच्या सलामी आणि ध्वज प्रदान विधिनंतर शहीद कपिल गुंड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपिलच्या मृतदेहावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.ज्या पेटीत कपिलचा मृतदेह आणण्यात आला , त्यावरील भारताचा राष्ट्रध्वज वडील नामदेव गुंड यांना मुलाच्या विरत्वाचे आणि सर्वोच्च बलिदानाचे प्रतीक म्हणून उपस्थित जवानाच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी राजेंद्र म्ह्स्के, रमेश गिरमकर, केशव मगर, बाळासाहेब गिरमकर, सुवर्णाताई पाचपुते, तहसीलदार महेंद्र माळी, प्रभारी पोलीस निरीक्षक करनोर, हरिदास शिर्के यांनी श्रद्धांजली वाहिली. सरपंच माळी, विजय गायकवाड यांच्यासह नागरिक, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कपिल गुंडचे वडील नामदेव गुंड यांनी पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला सलामी दिली. शहीद जवान कपिल गुंड यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुलं, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

खा. दिलीप गांधी : देशाच्या संरक्षणासाठी शहीद जवान कपिल शहीद झाले. त्यांचे वीरमरण स्मरणात राहील.
आ. राहुल जगताप : कपील यांचे वडील देश सेवा करत होते.त्यांच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आहे. देशासाठी बालिदान देणार्‍या वीर जवानाला देश विसरणार नाही.
माजी मंत्री बबनराव पाचपुते : कपिल गुंड हा उमेद असलेला तरुण होता. याच गावात यापूर्वीचा वीर जवान मिनीनाथ गिरमकर आणि कपिल हे दोन्ही जवान शहीद झाले .वीर जवानांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली.
राजेंद्र नागवडे : दु:खाचा आघात कुटुंबावर झाला.देशासाठी मुलगा शहीद झाला .देशासाठी शहीद होणे दुर्मीळ घटना आहे. या जवानांमुळे देश सुरक्षित आहे.

घनशाम शेलार : अजनूज गावात 17 वषार्र्ंपूर्वी मिनीनाथ गिरमकर आणि आज कपील गुंड या दोघांना विरमरण आले.देशासाठी बलिदान दिले.

देशाच्यासाठी बलिदानाचा आभिमान : नामदेव गुंड
मी देशाच्या सेवेसाठी लष्करात होतो. कपील हा देखील देशसेवेसाठी लष्करात भरती झाला. आता कपीलच्या वीरमरणाचे दःुख असले तरी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अभिमान आहे, असे शहीद जवान कपील यांचे वडील नामदेव गुंड यानी सांगितले.

निवडणूक कामासाठी कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही प्रशासनाने हाती घेतली असून, अनेक शिक्षक व शासकीय कर्मचार्‍यांना यासाठी नियुक्त केले जाणार आहे. निवडणुकीचे काम म्हटले की, त्यापासून दूर पळणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही मोठी असते. निवडणुकीच्या कामासाठी किमान दोन हजार कर्मचारी आणि अधिकारी आवश्यक आहेत. शहरातील विविध शाळा आणि शासकीय कार्यालयांकडून कर्मचार्‍यांची यादी मागविण्यात आलेली आहे. त्यातून कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी हे कर्मचारी लागणार आहेत.

कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी महापालिकेचे वित्त व लेखा अधिकारी यांच्याकडे आहे. आपली नियुक्ती होऊ नये म्हणून अनेकांनी हस्ते-परहस्ते निरोप पाठवून आपले नाव काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास अधिकार्‍यांनी जुमानले नाही. अनेक कर्मचार्‍यांनी आपण आजारी असल्याचे कारण पुढे केले. तसे वैद्यकीय तज्ज्ञांची प्रमाणपत्र देण्याचीही तयारी दर्शविली. या प्रकाराची जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनीच गंभीर दखल घेतली. निवडणूक होईपर्यंत कोणीही आजारी पडू नये, असा सल्लावजा इशारा त्यांना द्यावा लागला. शहरात 337 मतदान केंद्र असून, प्रत्येक ठिकाणी लागणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यांना लवकरच नियुक्त करण्यात येणार आहे.

नियुक्त कर्मचार्‍यांना तीन प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. शेवटचे प्रशिक्षण 8 डिसेंबरला देण्यात येणार असून, त्याच दिवशी मतदानाचे साहित्य देखील त्यांना वाटप करण्यात येणार आहे. 9 डिसेंबरला मतदान होणार असून, 10 डिसेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे.

 

नगरसेविका काळे यांची उमेदवारी कापली

0

भाजपच्या दुसर्‍या यादीत नव्याने पक्षात घेतलेल्यांनाही डावलले

अहमदनगर (प्रतिनिधी) – मागील महापालिकेत भाजपचे इनमीन नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि दत्ता कावरे पक्षाबाहेर आहेत. उरलेल्या सातपैकी मनीषा बारस्कर-काळे यांच्या उमेदवारीला कात्री लावण्यात आली. शिवाय नव्याने पक्षात घेतलेल्यांपैकी काहींना डावलले आहे. भाजपने आज 33 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही सावधपणा दाखवत कमीत कमी असंतोष होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. आतापर्यंत 48 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभाग एक, पाच, सहा, 13 आणि 15 मध्ये सर्व जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. प्रभाग सहामध्ये नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे यांची उमेदवारी कापण्यात आली. बारस्कर-काळे यांच्याऐवजी त्यांचे पती राजेंद्र काळे यांनी उमेदवारीची मागणी केली होती.

भाजप तेथे स्टँडिंग असल्याने महिला आरक्षित जागेतून उमेदवारी देण्यास भाजप तयार होता. मात्र राजेंद्र काळे यांनी स्वतःसाठी अखेरपर्यंत आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. यातून मार्ग न निघाल्याने पक्षाने तेथे दुसरा उमेदवार देऊऩ काळे यांची उमेदवारी कापली. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले छिंदम यांनी अपक्ष, कावरे शिवसेनेतर्फे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उरलेले महेश तवले, उषा नलवडे (प्रभाग दोन), बाबासाहेब वाकळे (प्रभाग सहा), मालन ढोणे (प्रभाग नऊ), नंदिनी साठे, सुवेंद्र गांधी (प्रभाग 11) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे आणखी 20 उमेदवार जाहीर होणे शिल्लक आहेत. प्रभाग चारमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कन्या ज्योती गाडे उमेदवार असल्याचे जवळपास निश्‍चित आहे. भाजपने या प्रभागात दोन उमेदवार जाहीर केले असले, तरी गाडे यांच्या विरोधात कोण हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. प्रभाग दोनमध्ये एक उमेदवार जाहीर केलेला नाही. प्रभाग तीनमध्ये दोन, सातमध्ये तीन, आठमध्ये दोन, 10 मध्ये तीन, 11 मध्ये तीन, 12 मध्ये तीन, 14 मध्ये तीन उमेदवार जाहीर केले आहेत. केडगाव परिसराचा समावेश असलेला प्रभाग 16 आणि 17 मध्ये अद्याप एकही उमेदवार भाजपने जाहीर केलेला नाही.

काळे बंडखोरीच्या तयारीत
नगरसेविका मनीषा बारस्कर-काळे यांना डावलण्यात आल्यामुळे त्या आता बंडखोरीच्या तयारीत आहेत. प्रभाग सहामधून अपक्ष किंवा शिवसेनेतर्फे त्या लढण्याची शक्यता आहे. भाजपने उमेदवारी कापताच शिवसेनेने त्यांच्याशी संपर्क वाढविला असल्याचे बोलले जाते. काळे यांचे पती राजेंद्र काळे यांनी त्यास दुजोरा दिला. निवडणूक लढविणार हे नक्की, असे त्यांनी सांगितले.

पक्षात घेतले अन डावलले
भाजपने उमेदवारीचा शब्द देऊन अनेकांना पक्षात घेतले होते. त्यात प्रामुख्याने प्रभाग 12 मधून दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांना उमेदवारी देण्यात आली. मत्र प्रभाग सहामधून राहुल वाकळे आणि प्रभाग 13 मध्ये तारा शिंदे यांना डावलले आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे नव्याने पक्षात आलेल्यांनी धसका घेतला आहे.

Social Media

26,923FansLike
5,154FollowersFollow
1,363SubscribersSubscribe
error: Content is protected !!