शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

0

नगरमधील अत्याचार घटनेविरोधात अधिवेशनात आवाज उठविणार

0
शिवसेना नेत्या आ. नीलम गोर्‍हे यांनी गुरुवारी नगरमध्ये अत्याचार झालेल्या बालिकेची रुगणालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, सुरेश तिवारी, नगरसेवक संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, आशा निंबाळकर आदी उपस्थित होते.

आमदार नीलम गोर्‍हे : पीडित मुलीची भेट घेऊन उपचारांची माहिती घेतली

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी सरकारने ठोस कार्यक्रम आखणे आवश्यक आहे. नगरमधील अत्याचाराच्या घटनेविरोधात येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आश्‍वासन शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिले. नगर शहरात बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती. शिवसेनेच्या उपनेत्या आमदार गोर्‍हे यांनी अत्याचारात बळी पडलेल्या पीडित मुलीची रुग्णालयांमध्ये जाऊन विचारपूस केली. तसेच शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेतली.

यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आ. गोर्‍हे यांनी संबंधित डॉक्टरांकडून त्या मुलीची विचारपूस केली. डॉक्टरांनी सध्याच्या उपचाराबद्दलची माहिती दिली. त्यानंतर शिवालयात बोलताना आमदार गोर्‍हे म्हणाल्या, अत्याचार होऊच नयेत यासाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत एक महिन्याच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करून आरोपीला तीन महिन्यांत शिक्षा व्हावी. मनोधैर्य योजनेतून आधी औषधोपचारासाठी पैसे देणे आवश्यक आहे. नगरमधील पीडितेला शिवसेना अभ्यासासाठी पुस्तके देणार आहे. अपहरणाचे उघड समर्थन करणार्‍या आमदाराला मुख्यमंत्र्यांनी बाजूला सारावे. पंकजा मुंडे केवळ गोड बोलतात. मात्र, अंमलबजावणी करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या छिंदमला भाजप पोसत असल्याचा आरोप गोर्‍हे यांनी यावेळी केला.

 

आदेशानंतरही श्रीगोंदा पीआयकडून वाळूतस्करी हल्ला प्रकरणी हस्तक्षेप सुरूच!

0

महसूल कर्मचार्‍यांचा भावना तीव्र : वाळू तस्कारांन मोक्का लावण्याची स्वयंसेवी संस्थांची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील वाळू तस्करी, वाळू चोरी आणि प्रांताधिकारी यांच्यावर झालेला हल्ला याप्रकरणाचा तपास काढण्याचे आदेश दिल्यानंतरही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचा वाळू तस्कारी प्रकरणातील हस्तक्षेप थांबलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावर महसूल कर्मचारी आज पुढील भूमिका ठरविणार आहे. दरम्यान, महसूल अधिकार्‍यांवर जीवघेणे हल्ले करणार्‍या वाळू तस्करांना मोक्का लावण्याची मागणी ‘मेरे देश मे, मेरा अपना घर आंदोलन’, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती थांबविण्यास अकार्यक्षम ठरत असलेल्या भाजप-शिवसेना सत्ताधार्‍यांचा रविवार30 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मारकात निषेध केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली.

उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर नुकताच वाळू तस्करांनी हल्ला केला. महसूल अधिकार्‍यांवर अनेक हल्ले झाले असून, कायद्याचा धाक नसल्याने वाळू तस्करांचे धाडस वाढत आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे जिल्ह्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यावरच हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांच्या जीव किती सुरक्षित असल्याचा प्रश्‍न निर्माण होत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यासह राज्यात लँड माफिया व वाळू तस्करांना पेव फुटले आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी कायद्याच्या भीतीची आवश्यकता असून, अशा लॅण्ड माफिया व वाळू तस्करांवर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना दोघांच्या भांडणात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढून सरकार कुचकामी ठरले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या मागणीसाठी कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, प्रांताधिकारी हल्ला आणि वाळू चोरी व वाळू तस्करी बाबतच्या गुन्ह्याचा तपास काढून घेतल्यानंतरही श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक पोवार यांनी याप्रकरणी पुन्हा भाष्य करत लुडबूड करण्याचे काहीच कारण नाही, अशी सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांची भावना आहे. आज राज्यातील महसूल कर्मचारी वादग्रस्त पोलीस निरीक्षक पोवार यांच्या बेताल वक्तव्याचा राज्यभर निषेध करणार आहेत.

महाराष्ट्रातील राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, तसेच महसूल अधिकारी कर्मचारी संघटना याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यलयाचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्राधान्य – विलास बोडके

0
जळगाव । शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून माहिती कार्यालय काम करत असते. तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातुन शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे मत जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी व्यक्त केले.

औद्योगिक वसाहितीतील दै.देशदूतच्या मुख्य कार्यालयातील गणरायाची विलास बोडके यांच्याहस्ते आरती करण्यात आली. आरतीनंतर त्यांनी देशदूत परिवाराशी दिलखुलापणे संवाद साधला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले जाते. शासकीय योजना किंवा शासकीय निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती कार्यालय दुवा आहे. तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे बदल स्विकारणे अपेक्षित आहे.

सोशल मिडीयाचाही प्रभाव मोठया प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे ट्विटर, इन्स्टाग्राम, एसएमएस, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातुन योजना जनतेपर्यंत पोहचविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणाले. शासनस्तरावरुन महामित्र योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रमदेखील सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन युवक-युवती सहभागी आहेत. युवा माहिती दूत या उपक्रमाचा स्वतंत्र अ‍ॅप्स् आहे. या अ‍ॅप्स्मध्ये शासनाच्या 40 योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गाव पातळीवर या योजनेसाठी महाविद्यालयीन तरुण ‘युवा माहिती दूत’ म्हणून काम करीत असल्याचेही विलास बोडके यांनी सांगितले.

गणेशोत्सवात एकत्र आल्यामुळे निर्माण होतेय आपुलकी
नाशिक येथे असतांना आमच्या आझाद मित्र मंडळाच्यावतीने कॉलनीत गणेशोत्सव साजरा करत होतो. सकाळ-संध्याकाळ श्रींची आरती पाच-पाच कुटूंबियांच्यावतीने केली जायची. त्यामुळे कॉलनीतील सर्व एकत्र येत असत. एकत्र आल्यामुळे प्रत्येकांची ओळख व्हायची आणि या ओळखीतुन आपुलकी निर्माण होत होती. पाच कुटूंबियांच्याहस्ते आरती करण्याचा उपक्रम जवळपास 11 वर्षे राबविला असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी सांगितली. गणेशोत्सव लोकोत्सव व्हायला पाहिजे. असेही ते म्हणाले.

ज्ञानदिप सोहळ्यात 21 वेळा अथर्वशीर्ष पठण

0

जळगाव । अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आज आयोजीत ज्ञानदिप सोहळ्यात सामुहीकरित्या 21 वेळा अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.

शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजीत या सोहळ्यास शंखनाद आणि ओंकारध्वनीने सुरवात झाली. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्रंबकेश्वर येथील प.पू. चंद्रकांतदादा मोरे यांच्या उपस्थितीत सामुहीकरित्या 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.

या सोहळ्याला कुलगुरू पी.पी.पाटील, आ. राजूमामा भोळे, पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, महापौर सीमा भोळे, भैया चौधरी, मनोज पाटील, श्रीकांत खटोड, महेश महाराज त्रिपाठी उपस्थित होते. सुत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले. यशस्वीतेसाठी बी.एम.पाटील, विजय निकम, मधुकर पवार,

पी.एस.पवार, भाऊसाहेब शिंपी, डॉ. विनोद शहा, संजय कासार, संभाजी पाटील, अतुल कासार, विजय महाजन, प्रविण सपकाळे, उमेश आवारे, सुरज सरोदे, प्रदीप महाजन, विवेक सोनवणे, वसंत पाटील, सुभाष चौधरी, नारायण पाटील, धनंजय परदेशी व सेवेकर्‍यांनी परीश्रम घेतले.

‘सार्वमत- नगर टाइम्स’ च्या बाप्पांना निरोप

0
अहमदनगर – दै. सार्वमत-नगर टाइम्सच्या नगर कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या श्रींना गुरुवारी मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. यानिमित्त नगर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, संजय झिंजे, दिलदारसिंग बीर, मनपा सभागृहनेते गणेश कवडे, काँग्रेसचे धनंजय जाधव, शिवसेनेचे अप्पा नळकांडे यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत श्रींना पुष्पहार अर्पण केला. यावेळी दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, व्यवस्थापक महेश गिते, दै. नगर टाइम्सचे कार्यकारी संपादक संदीप रोडे, व्यवस्थापक रवींद्र देशपांडे आणि सार्वमत-नगर टाइम्स परिवारातील सदस्य उपस्थित होते.

अहमदनगर- दैनिक सार्वमतच्या अहमदनगर (एमआयडीसी) येथील मुख्य कार्यालयात नगर जिल्हा वृत्तपत्र संघटनेच्यावतीने‘श्री’ची आरती करताना ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कचरू काळे. समवेत संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी, कार्यकारी अध्यक्ष शिवाजी काळदाते, उपाध्यक्ष संजय गोरे, कोषाध्यक्ष प्रमोद पंतम, विक्रेते संतोष कर्डिले, अरूण भंडागे, पुरुषोत्तम बेत्ती आणि सार्वमत परिवार.

मधुमेहावरील उपचार पद्धतीची सिलीकॉन इंडियाने घेतली दखल

0
जळगाव । मधूमेहामुळे मानवी शरीरातील खराब होणार्‍या अवयवांना वाचविण्यासाठी अथर्व आयुर्वेदीक क्लिनिकचे डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांनी विकसीत केलेल्या अनोख्या उपचार पध्दतीची दखल आयटी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत मासिक सिलीकॉन इंडीयाने घेतली असून पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली असल्याची माहिती डॉ. दंडगव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मधूमेह हा आजार सर्वसाधारण झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम भयंकर असून मानवाचे सरासरी आयुष्य कमी होत चालले आहे. मधूमेह झालेल्या रूग्णांची रक्त तपासणी करून त्यांना गोळ्या किंवा इन्शूलीनसारखी औषधी देवून फक्त नियंत्रित केले जाते, मात्र विविध अवयवांवर दुष्पपरिणाम होतात. ते दुरूस्त होवू शकत नाही.

त्यामुळे प्रत्येक अवयवाच्या उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टरांकडे जाणे वेळ पैसे आणि श्रमाचे दृष्टीने परवडणारे नसते यासाठी विशेष आयुर्वेदीक उपचार पध्दती गेल्या नऊ वर्षापासून सुरू केली असल्याचे डॉ.दंडगव्हाळ यांनी सांगितले. तसेच सिलीकॉन इंडीया या मासिकाने मधुमेह या विषयावर विशेषांक प्रसिद्ध केला.

यात भारतातील 500 डॉक्टरांचे सर्वेक्षण करून रूग्ण, रूग्णसंख्या, उपचार पध्दती, आर्थिक झळ त्याचे सकारात्मक परिणाम आदिंची माहिती गोळा करत त्यातून फक्त 20 डॉक्टरांची निवड करण्यात आली. यात महाराष्ट्रातील सर्वाधीक 5 डॉक्टरांचा समावेश असून जळगांव येथील एकमेव डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांचा समावेश आहे.

मधूमेहावर अनोख्या उपचार पध्दतीची सखोल पाच पानांच्या लेखासोबतच प्रथम पानावर डॉ दंडगव्हाळ यांना प्रसिद्धी दिल्यामूळे जळगांवचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. हि बाब खान्देश वासियांना भुषणावह ठरली असल्याचे निमाचे अध्यक्ष डॉ. सतीष चौधरी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस डॉ.विकास चौधरी, डॉ. सतीष शिंदाडकर, डॉ. त्रिपाठी उपस्थित होते.

Social Media

26,081FansLike
5,154FollowersFollow
1,130SubscribersSubscribe
error: Content is protected !!