Video : मनोरुग्णाचा झाडाच्या शेंड्यावर मुक्काम; उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक /पिंपळगाव 

मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ रात्रीपासून एक व्यक्ती वडाच्या झाडावर जाऊन बसला आहे. सकाळी ही घटना स्थानिक पोलीस, अग्निशमन विभागास समजल्यानंतर सकाळपासून याठिकाणी या व्यक्तीला उतरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

घटनास्थळी क्रेन दाखल झाल्या असून अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या व्यक्तीला उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

या व्यक्तीच्या जवळ गेले असता मनोरुग्ण असल्यामुळे तो झाडावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, म्हणून रेस्क्यू ऑपरेशनला मर्यादा आल्या असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी सुनील मोरे यांनी देशदूत डिजिटलशी बोलताना सांगितले.

पिंपळगाव टोल नाक्यापासून गावात प्रवेश करताना डाव्या बाजूला भले मोठे वडाचे झाड आहे. त्या झाडावर हा मनोरुग्ण जाऊन बसला आहे.

या व्यक्तीचे बापू माणिक देवरे असे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे वडील माणिक देवरे यांनी सांगितले. या व्यक्तीला बघण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. सकाळी त्याने खिशातील पैसेदेखील खाली फेकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस यंत्रणा,  जेसीबी, क्रेन आदि साहित्यासह पोहोचले असून दोन तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे.

 

‘केवळ महिलाच नाही तर पुरुषही #MeToo चे बळी’

0

मुंबई : #MeToo अंतर्गंत नाना पाटेकर, विकास बहल, आलोक नाथ, साजिद खान, चेतन भगत, पियुष मिश्रा आणि आता ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. याविषयी श्रेयाने एका मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे. श्रेया म्हणाली कि, #MeToo या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे ही मोहीम चांगलीच आहे.

परंतु अत्याचार हे केवळ महिलांवरच होत नाहीत तर ते पुरुषांवरदेखील होतात. त्यामुळे महिलाच नाही पुरुषही #MeToo चे बळी आहेत. मात्र त्याकडे फारसे कोणी पाहात नाही. खरतर आता #MeToo या मोहिमेचा उद्देश बाजूला पडला आहे. ही मोहीम नक्की कशासाठी आहे हे लोकांना समजत नाही. या मोहीमेच्या माध्यमातून पुरुषदेखील त्यांच्या अन्यायाला वाचा फोडू शकतात, असे श्रेया म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, सध्या बॉलिवूडमधील प्रकरणं समोर येत आहेत. परंतु लैंगिक अत्याचार केवळ याच क्षेत्रात होत नाहीये. अत्याचार हे प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असतात. मात्र आपण त्याच वेळी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. अनेक जण यावियषी व्यक्त होत आहेत. काही जण खरंच त्यांच्या अन्यायाचं कथन करत आहेत. परंतु काही जण टीआरपीसाठीदेखील करत असतील. पण खरं कोण आणि खोटं कोण हे मी सांगू शकत नाही.

महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या

0

परभणी : एका महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होत असल्यामुळे त्या जाचाला कंटाळून एका युवकाने परभणीत आत्महत्या केली. परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या सचिन मिटकरी याने रविवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपविले.

परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून आत्महत्येला महिलेला जबाबदार धरले आहे. या महिलेने माझे आयुष्य बरबाद केले आहे. तिने माझ्याकडे सतत शरीरसुखाची मागणी केलीय. ते करण्यासाठी सतत माझ्यावर दबाव टाकला. तिचे अजून दोन-तीन मुलांसोबत अनैतिक संबंध आहेत.

माझ्या आत्महत्येला तिच जबाबदार असून, तिने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी महिलेने पाच दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

Bigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट

0

मुंबई : बिग बॉस सीजन-१२च्‍या दुसर्‍या इविक्शनमध्‍ये अभिनेत्री नेहा पेंडसे बिग बॉसचं घर सोडलं आहे. नेहा घरातून बाहेर पडणारी पहिली सेलेब सिंगल कंटेस्टेंट आहे. रविवारला वीकेंड का वार एपिसोडमध्‍ये सलमानने नेहाच्‍या एविक्शनची घोषणा केली आहे. सध्‍या भजन सम्राट अनूप जलोटा आणि श्रीसंत सीक्रेट रूममध्‍ये आहेत. दुसरीकडे, बिग बॉसच्‍या आदेशानंतर सर्व जोड्‍या वेगळ्‍या झाल्‍या आहेत, त्‍यामुळे घरचे आता सिंगल गेम खेळणार आहेत.

‘विकेंड का वार’मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. ‘कालकोठरी’ची शिक्षा गांभिर्यानं न घेतल्यानं नेहा, करणवीर बोहरा आणि श्रीसंतला नॉमीनेट करण्यात आलं होतं. श्रीसंतची रवानगी सिक्रेट रुममध्ये करण्यात आली आहे. सुरूवातीपासून स्वत:ला कोणत्याही वादात न ओढता सेफ गेम नेहानं खेळला. मात्र रविवारी ती ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाद झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील नेहाची एक्झिट ही अर्थातच तिच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धक्का मानला जातो.

कवी रावसाहेब जाधव यांच्या कथेला प्रथम पारितोषिक

0
चांदवड | चांदवड येथील कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘तिचं परगती पत्रक’ या कथेला सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या फेसाटी कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे व जेष्ठ लेखिका-पत्रकार अपर्णा वेलणकर यांच्या हस्ते आणि अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, सां.कार्यसचिव प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, सदस्य संगीता बाफना आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सावानाच्या मु. श. औरंगाबादकर सभागृहात संपन्न झाला.

कवी जाधव यांचा ढेकूळ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून यापूर्वी त्या पुस्तकास अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

कथालेखनातील ह्या यशाबद्दल कुसुमाग्रज साहित्यिक मंच नाशिक, साहित्यकणा फौंडेशन नाशिक तसेच अक्षरवाङ्मय प्रकाशनचे प्रकाशक बाळासाहेब घोंगडे, कादवाशिवारचे प्रकाशक विजयकुमार मीठे,

कवी प्रकाश होळकर, संदीप देशपांडे, रवींद्र मालुंजकर, जनार्दन देवरे, रवींद्र देवरे, सागर जाधव जोपूळकर, कवयित्री सुशीला संकलेचा आदींनी खास अभिनंदन केले.

पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकचे ग्रामदैवत कालिकेच्या चरणी लीन

0
नाशिक (प्रतिनिधी) | नवरात्रोत्सवानिमित्त अतिप्राचीन ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवीच्या यात्रेनिमित्त राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंदिरात महाअभिषेक करुन देवीची आरती केली.

यावेळी महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवत राज्याला भरभराटी येऊ दे, असे साकडे त्यांनी घातले.  पालकमंत्री गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

रात्री उशिरा श्री कालिकादेवी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी श्रीदेवीचे मानाचे वस्त्र देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर मंदिराच्या पुरोहितांकडून मंत्रपुष्पांजली करत कालिका देवीचा महाअभिषेक केला.

आगामी काळात लवकरच राज्यशासनाकडुन भक्त निवासाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन यावेळी महाजन यांनी दिले. कालिका देवी मंदिर संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या भक्त निवासात धुळे, जळगाव, भुसावळ यासंह उत्तर महाराष्ट्र आणि कसमादे भागातील नाशिकला उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना वास्तव्यासाठी होणार आहे.

अशाच प्रकारची सुविधा इतरही धर्मादाय संस्थानी राबवावी असे आवाहन यावेळी महाजन यांनी केले. याप्रसंगी यात्रेनिमित्त कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांसोबत महाजन यांनी संवादही साधला.

सचिव डॉ प्रताप कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, आबा पवार, किशोर कोठावळे, दत्ता पाटील, राम पाटील योगेश, कोठावळे, शाम पाटील, संतोष कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, भरत पाटील, दिपक तळाजीया, अजिंक्य कोठावळे, आदींसह कालिका देवी मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि सदस्य उपस्थित होते.

वैष्णोदेवीच्या भाविकांना 5 लाखांचा अपघाती विमा

0

श्रीनगर : माता वैष्णोदेवीच्या भाविकांना आता पाच लाखांच्या अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे. माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याआधी 3 लाखापर्यंत विनामूल्य अपघाती विमा 5 वर्षे व त्यापुढील वयोगटातील भाविकांना देण्यात येत होता. त्यात आता वाढ होऊन तो पाच लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. भाविकांसाठी मंदिर परिसरात सुविधा वाढविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मंडळाने तीर्थस्थळाला भेट देणाऱया भाविकांना दुर्घटना विमासह जखमी भाविकांवर मोफत उपचार करविण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेच्या नोंदणीनंतर यात्रा सुरू करताच भाविकांना दुर्घटना विमा कवच प्राप्त होणार आहे. विम्याचा हप्ता मंदिर मंडळाकडून भरला जाणार असल्याचे प्रवक्त्याने बैठकीनंतर बोलताना सांगितले. बैठकीत श्री माता वैष्णोदेवी नारायण रुग्णालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. मंडळाने जखमी भाविकांच्या उपचारासाठी वैद्यकीय सहकार्य धोरण संमत केले आहे.

ऑनलाईन मद्यविक्री नाही : ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

0
नागपूर ।  वृत्तसंस्था :  ‘सध्या ऑनलाइन खरेदीचा जमाना आहे. काही ग्राहकांनी मद्यविक्री ही देखील ऑनलाईन मंजूर करावी, असे प्रस्ताव शासनाला दिले आहे. यासंदर्भात अनेक अर्ज शासनाकडे प्रलंबित आहेत. पण कायद्यानुसार ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी देणे शक्य नसून तो एक गुन्हा आहे. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनाचा कोणताही विचार नाही’, असे स्पष्ट मत उत्पादन शुल्क मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री ही नियमानुसार केवळ शासनाने मंजूर केलेल्या दुकानातूनच करण्यात येते. यात कोणताही बदल करण्याचा शासनाचा मानस नाही.

मद्यविक्री ऑनलाईन करण्यात येत असल्याबद्दलचे विविध प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त हे खोडसाळ आहे. ऑनलाइन किंवा अन्य मद्यविक्रीला प्रोत्साहीत करणे हेदेखील कायद्याला धरुन नाही. त्यामुळे ऑनलाईन मद्यविक्रीचा शासनातर्फे कोणताही विचार नाही, असेही ना.बावनकुळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात आता ऑनलाईन मद्यविक्री केली जाईल आणि दारु घरपोच दिली जाईल, असे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्याचे वृत्त प्रसारमाध्यामांमध्ये प्रसारित झाले होते. मात्र हे वृत्त खोडसाळ असल्याचे म्हणत ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारचा तसा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

..अन 30 फुटावरून विमानातील महिला क्रु मेंबर खाली पडली

0
मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडीयाच्या विमानाने उड्डाण घेत 30 फुटापर्यंत उंची गाठताच विमानातील महिला क्रु मेंबर विमानातून खाली पडली.

एअर इंडियाचे एआय-८६४ हे विमान मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. ३० फुटांपर्यंत उड्डान केल्यानंतर हर्षा लोबो (वय ५३) ही महिला खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पायलटची सहायक महिला ही दरवाजा बंद करत असताना खाली पडल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेविषयी एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

राष्ट्रवादीचे आजपासून राज्यात आंदोलन

0

मुंबई – राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, वीज भारनियमन, पेट्रोल-डिझेलचे दिवसागणिक वाढणारे भाव आणि महागाईची झळ याविरोधात राष्ट्रवादी पक्ष मैदानात उतरला आहे. आजपासून १५ ते २० ऑक्टोबरला म्हणजे आठवडाभर राज्यभर निषेध मोर्चे काढण्यात येणार आहेत. शिवाय या मोर्चाने सरकारला जाग आली नाही, तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

प्रमुख शहरांचा अपवाद वगळता राज्यात अनियमित वीजपुरवठा असून, जनता महागाईने होरपळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली नाही. सध्या राज्यात अडीच लाख पदे रिक्‍त आहेत.  सरकारी नोकर्‍यांचे कंत्राटीकरण सुरू आहे. बेरोजगारांचा प्रश्‍न जटिल झाला असताना, सरकार त्यावर काहीही उपाय काढत नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असताना, सरकार अद्यापही गंभीर नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आवाज उठवला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Social Media

26,313FansLike
5,154FollowersFollow
1,226SubscribersSubscribe
error: Content is protected !!