आमदारांनी स्टंटबाजी न करता विकासाला प्राधान्य द्यावे!

0
जळगाव । शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी कोणतेही स्टंबबाजी न करता त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे. तसेच विरोधी पक्ष नेत्यांना दालन न दिल्यास आम्ही मनपाच्या वाहनतळामध्ये देखील आमची बसण्याची तयारी असल्याचा इशारा मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना कार्यालयात महापालिकेचे विरोधपक्षनेते सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना सुनील महाजन म्हणाले की, महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांना आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत शिवसेनेकडून चांगल्या कामांसाठी नेहमी पाठींबा राहणार आहे. त्यांनी विकास कामांसोबतच गाळेप्रश्न व हुडको कर्जाची परतफेडीचा प्रश्न मार्गी लावावा. विकासाच्या विरोधात काम केल्यास शिवसेना आपल्या विरोधी पक्षाची भूमिका चोख पाडेल असा इशाराही सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे व शिवसेना पदाधिकारी निलेश पाटील आदी उपस्थित होते.

… तर त्यांनी कुठलाही गाजावाजा केला नाही
पत्रकार परिषदेत बोलतांना सुनिल महाजन म्हणाले की, आ. राजूमामा भोळे यांनी मनपा कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत महापौर व उपमहापौर मनपाची वाहने वापरणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र या आधी सत्तेत असताना शिवसेनेचे महापौर रमेशदादा जैन, प्रदिप रायसोनी, किशोर पाटील यांनी देखील मनपाची वाहने वापरले नाहीत. मात्र, त्यांनी कुठलाही गाजावाजा केला नसून रमेश जैन यांनी तर मनपाचे मानधन देखील स्विकारले नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

अनधिकृत मजले भाड्याने कसे देणार?
आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी देवून सतरामजलीचे वरचे 9 मजले हे अनधिकृत असल्याचे सांगितले होते. मग आता 9 अनधिकृत मजले भाड्याने कसे देणार? असा प्रश्न सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सतरा मजलीचा रेडीरेकनरचे दर सर्वात जास्त आहेत. त्यामुळे कोण महागड्या मजल्यावर कार्यालये भाड्याने घेतील असाही प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. आमदारांनी जळगावकरांची दिशाभूल न करता विकासावर द्यावा असा सल्ला सुनिल महाजन यांनी आमदार भोळे यांना दिला.

तमाशा करायला भाग पाडू नका
आमदार भोळे यांनी महापौर, उपमहापौरांचे दालन खालच्या मजल्यावर आणले आहे. त्यांनी इतरांना सुचना देवू नये. विरोधी पक्षनेत्यांना दालन न दिल्यास आमची वाहनतळात देखील बसण्याची तयारी असून असा तमाशा करायला आम्हाला भाग पाडू नका असे सुनिल महाजन यांनी सांगितले.

नंदिनीबाई विद्यालयात पर्यवेक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण

0
जळगाव । शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात विद्यार्थ्यांनीचे पेन व पैसे चोरल्याच्या संशयावरून विद्यार्थींनी पर्यवेक्षकाकडे तक्रार केल्यानंतर पर्यवेक्षकाने विद्यार्थींनीला मारहाण केल्याची घटना आज घडली. याबाबत विद्यार्थीनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थीनेचे पालक तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिसात दाखल झाले होते. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत पर्यवेक्षकाकडून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरु होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदिनीबाई विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थींनीने वर्गातील विद्यार्थींनीचे पेन व पेैसे चोरल्याच्या संशयावरून वर्गातील विद्यार्थींनीने पर्यवेक्षक महाजन यांच्याकडे त्या विद्यार्थींनीची तक्रार केली. त्यानंतर पर्यवेक्षकांनी तिला पेन चोरीच्या संशयावरून पाठीत मारले.

त्यानंतर विद्यार्थींनीने याबाबत फोन करून आई-वडीलांना माहीती दिली. विद्यार्थींनीचे आई व वडील शाळेत आल्यानंतर त्यांनी पर्यवेक्षक यांना विचारणा केली. त्यांनी कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगत विद्यार्थींनीच्या पालकांशी बोलण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर विद्यार्थींनीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलिसात येवून पर्यवेक्षकांविरुध्द तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून पोलिस निरीक्षकांनी पर्यवेक्षक महाजन यांना पोलिस स्टेशनला बोलविले. त्यानंतर दोन्ही बाजु पोलिस निरीक्षकांनी ऐकून घेतल्या. याबाबत दुपारी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.

विद्यार्थींनीबाबत पेन, पैसे चोरीच्या नेहमी तक्रारी येत होत्या. आज विद्यार्थींनीनी पुन्हा तक्रार केल्याने तिला शिस्त लागावी म्हणून मारले असल्याचे पर्यवेक्षक महाजन यांनी सांगितली.

कुठल्याही विद्यार्थींनीचे पेन व पैसे चोरलेले नसतांना मुली चोर,चोर चिडवत होत्या. त्यातच पर्यवेक्षक महाजन सरांनी सर्व विद्यार्थीनीसमोर मला मारहाण केल्याचे विद्यार्थींनीने सांगितले.

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रंथालय संघाचे धरणे

0
जळगाव । शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा ग्रंथालय संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रंथालय कर्मचार्‍यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन परिरक्षण अनुदान रचनेनुसार मिळते, त्यात महागाईच्या निर्देशांकानुसार वाढविणे अपेक्षित आहे. तसेच ग्रंथालयांना लागणारे ग्रंथ, नियतकालिके, लेखन, सामुग्री, विज,

दुरध्वनी, इमारत भाडे यात वाढ झाली आहे. शासनाने राज्यातील 12 हजार 148 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील 21 हजार 611 कर्मचारी यांच्या मागण्या गेल्या चार वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत. तरी सर्व वर्गाच्या व दर्जाच्या सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचे तास शासकीय नियमानुसार करण्यात यावे, जिल्हा ग्रंथालय व राज्य ग्रंथालय परिषदेची पुनर्रचना करावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा ग्रंथालय संघातर्फे युवराज वाणी, संजय पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी धरणे आंदोलन केले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आरोपीच्या पुतळ्याचे दहन

0
तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्यावतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना विचार मंचचे सोमा शिंदे, राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्निल चव्हाण, नीलेश थोरात, शीतल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा आदी.
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नगर शहरात घडलेल्या या अमानवीय घटनेने नगरकरांची मान शरमेने खाली गेली आहे. अत्याचार करणार्‍यांवर कायद्याचा धाक नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा झाल्यास अशा घटना घडणार नाहीत.

तसेच तपोवन रोड येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अटक असून, इतर सहआरोपी अद्याप फरार आहेत. पीडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींवर कठोर शासन होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांना देण्यात आले. यावेळी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, शहराध्यक्ष राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्निल चव्हाण, नीलेश थोरात, शीतल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा, सचिन अकोलकर, बाबू चव्हाण, विशाल भालेराव, देविदास चव्हाण, अ‍ॅड. महेश काळे, अ‍ॅड. मंगेश सोले, तेजस पटेकर, दादा जंगम, ओम दोन्ता, संदीप गुड्डा, दिनेश जरे, सुनील शिंदे, आकाश कोदे आदी उपस्थित होते.

 

श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेरबंद

0
श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सुनील दिलीप पठारे याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार पो.हे.कॉ. बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोना.विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, संदीप दरंदले, रोहित मिसाळ, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, रवीकिरण सोनटक्के, मेघराज कोल्हे, सुमेघां वाघमारे उपस्थित होते.

बाहेरच्या नेत्यांकडून आपले प्रश्‍न सुटणार नाही

0
प्रगतीनगर येथील स्वागत मंगल कार्यालयात आयोजित लोकसेवा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी आ. भानुदास मुरकुटे.

माजी आ. भानुदास मुरकुटे : संघटीतपणे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकसेवा विकास आघाडीची स्थापना

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आपल्या भागाचे प्रश्न बाहेरच्या नेत्यांकडून सुटणार नाहीत. यापुढे आपल्या भागाचे प्रश्न संघटीत होऊन आपल्या हिंमतीवर सोडवावे लागतील. यादृष्टीने लोकसेवा विकास आघाडीची स्थापना केली आहे. यापुढील काळात या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येतील, अशी घोषणा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केली. प्रगतीनगर येथील स्वागत मंगल कार्यालयात लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री.मुरकुटे बोलत होते.

यावेळी श्री.मुरकुटे म्हणाले, आजवर अनेकांना पदे दिली. त्यातील काही बेईमान निघाले. सत्ता व पदे मिळाली की लोक उलटतात हा अनुभव गेल्या काही वर्षांत आला. त्यामुळे कोणावर विसंबून न राहाता यापुढे वाटचाल करावी लागणार आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात श्रीरामपूर तालुक्यासह राहुरी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. ‘अशोक’चे कार्यक्षेत्रही तीन तालुक्यांचे आहे. या भागाचे प्रश्न लोकसेवा विकास आघाडी पक्षामार्ङ्गत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. आजकाल भूछत्रासारखे नवे पुढारी उदयास येतात. हे नवे पुढारी बाहेरच्या नेत्यांना बोलावून त्यांना हारतुरे घालतात. बाहेरून येणार्‍या नेत्यांकडून आपल्या भागाचे प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागतील. त्यासाठी पक्षाच्या माध्यमातून संघटन बळकट करू. आज गोदावरी, प्रवरा तसेच मुळा नदीच्या लाभक्षेत्रात शेती व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे यापूर्वी मुळा, प्रवरा व गोदावरी नद्यांवरील धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले. अजूनही या कायद्याची टांगती तलवार कायम आहे. निळवंडे धरणाचे कालवे झाल्यावर पुन्हा पाण्याचे संकट उद्भवणार आहे. भूजल अधिनियम कायद्यातील तरतुदीही जाचक व शेतकर्‍यांसाठी मारक आहेत. अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपणास संघटीत होऊन प्रयत्न करावे लागतील. असे प्रयत्न लोकसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार श्री.मुरकुटे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी प्रतापराव पटारे, विश्वास वाघमारे, केशव विटनोर, अ‍ॅड्.भणगे, काशिनाथ गोराणे, मच्छिंद्र पारखे, दिगंबर नांदे, भीमराज देवकर, जालिंदर कुर्‍हे, बाळासाहेब कुलकर्णी, अभिषेक खंडागळे, दशरथ पिसे, नाना पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यास अशोक कारखान्याचे चेअरमन दिगंबर शिंदे, व्हा.चेअरमन बापूराव त्रिभुवन, माजी चेअरमन रावसाहेब थोरात, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, ज्ञानदेव साळुंके, बाबासाहेब काळे, लाल पटेल, भाऊसाहेब उंडे, दत्तात्रय नाईक, सोपानराव गायकवाड, मारुती पटारे, रामदास उंडे, पंढरीनाथ पटारे, सिद्धार्थ मुरकुटे, श्रीमती काशिबाई डावखर, सौ.मंजुश्री मुरकुटे, नगरसेविका सौ. शीतल गवारे, माजी सभापती सौ.सुनीता गायकवाड, आबासाहेब थोरात, सौ. शालिनी कोलते, सौ. मंदाकिनी मांढरे, सरपंच सौ.विद्या लांडे, दत्तात्रय आहेर, भाऊसाहेब हळनोर, आप्पासाहेब वेल्हाळे, पोपटराव जाधव, कचरदास ललवाणी, देवानंद अग्रवाल, नबुतात्या लवांडे, सोपानराव जगधने, बाळासाहेब नाईक, गोकुळ काळे, श्रीधर कोलते, गोरक्षनाथ गवारे, भागवतराव पटारे, गुलाबभाई शेख, अण्णासाहेब चौधरी, नुराभाई सय्यद, रमेश वारुळे, व्ही.डी.शिंदे, विनोद मोरे, संजय करपे, राजेंद्र लोंढे, ज्ञानदेव पवार, नानासाहेब जाधव, काशिनाथ जाधव, विशाल लोंढे, अच्युतराव बनकर, अण्णासाहेब बनकर, माणिकराव शिंदे, अ‍ॅड. पांडुरंग गोराणे, अ‍ॅड. डी.आर.पटारे, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, रामदास पटारे, अशोक बँकेचे संचालक निवृत्ती थोरात आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘पुढे काय करायचे ते करू’
भविष्यात निष्ठावान आणि तरुणांना संधी दिली जाईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका आपल्या पक्षाच्या मार्ङ्गत लढविण्यात येतील, शहरातही लक्ष घातले जाईल. आपली ताकद उभी करून पुढे आपल्याला काय करायचेे ते करू, असे स्पष्ट करून पुढील राजकीय भूमिकेचे संकेत मुरकुटे यांनी यावेळी दिले.

‘अभी तो मै जवॉ हूं !’
आपण वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे. आता राजकारण पुरे असे वाटते. पण आजच्या मेळाव्याची उपस्थिती आणि युवकांचा उत्साह पाहून मला ‘अभी तो मै जवॉ हूंॅ’ याप्रमाणे भावना निर्माण झाल्याची टिप्पणी श्री. मुरकुटे यांनी केली.

मतदार जागृतीसाठी गणेशोत्सवाचा आधार

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा निवडणूक विभागाची निवडणूक आणि मतदार यादीबाबत जनजागृती जोरात सुरू असून यासाठी गणेशोत्सवाचाही आधार घेण्यात आला आहे. गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणार्‍या गणेशभक्तांना सहज दिसतील, अशा पद्धतीने जनजागृती करणारे पोस्टर लावण्यात येत आहेत. याशिवाय मतदारयादी, मतदान, निवडणूक, याबाबत जनजागृती करण्याचे देखावे करण्याचे आवाहन देखील मंडळांना करण्यात आले. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि मतदारयादी अद्यायावत करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेमधून व उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन संकल्पना राबवल्या जात आहेत.

एसटी बसस्थानके, एटीएम केंद्रे, महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्रे, सरकारी कार्यालये तसेच सर्व कॉलेज येथेही निवडणूक विभागाची मतदारयादी, लोकशाही, निवडणूक याबाबत प्रचार व प्रसार मोहीम जोरात सुरू आहेत. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे या उत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांकडून सादर करण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी येणार्‍या गणेश भक्तांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गणेशोत्सव काळात ज्या भागामध्ये गर्दी होते, तेथे मतदान जागृतीचे फलक लावणे, मतदान जागृतीवर विविध मंडळांच्या वतीने देखाव्यांचे सादरीकरण करणे, असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा निवडणूक शाखेच्या या मोहिमेला गणेश मंडळांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. चौपाटी कारंजा व पटवर्धन चौक येथे मतदारांची जागृती करण्यासाठी देखावेसुद्धा साकारण्यात आले असून लवकरच हे देखावे गणेशभक्तांसाठी खुले करण्यात येणार आहेत.

नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण उत्सवापैकी मानला जातो. या काळात लोकशाही, निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी जागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यंदा मतदार जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेश मंडळांचा आधार घेतला जात असून यास नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
– अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

गणेशवाडी, देडगावात बिबट्याचा धुमाकूळ

0
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे बिबट्याने एकाच रात्री मारलेल्या तीन शेळ्या.

शेळ्या मारून टाकल्या; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गणेशवाडी (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे बिबट्याने सलग दोन दिवसांत सहा शेळ्या मारून टाकल्या असून परिसरात तीन ते चार बिबटे असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी होत आहे. गणेशवाडी येथील गट नं. 66/6 मधील दत्तात्रय दरंदले यांच्या तीन शेळ्या बिबट्याने मंगळवारी एकाच रात्री मारल्या. त्या आधी एक दिवस गट .नं. 19 मधील सुधीर मारुती लोहकरे यांच्या तीन शेळ्या फडशा बिबट्याने मारल्या.

बिबट्यांमुळे परिसरातील शेतकर्‍यांनी जनावरांच्या संरक्षणासाठी कुंपण (कम्पाउंड) उभारले. त्यालादेखील बिबटे दाद देत नसल्याचे मंगळवारच्या घटनेतून सिद्ध झाले. कुंपणावरून झेप घेत आतील शेळ्यांचा फडशा पाडत आहेत. काही तरुणांना तर गावालगत सकाळच्या वेळेस बिबट्यासह दोन बछडे जाताना दिसल्याचे सांगितले. या बिबट्याच्या दहशतीने आता मात्र शेतकरी धास्तावले आहेत. मजूर देखील कामावर येईनासे झाले आहेत. त्यातच पावसाचे वातावरण असल्याने रात्र रात्र वीज गायब असते. त्यामुळे बिबट्याचे जास्तच फावते. आतातर चक्क गावालगतच बिबट्याने दर्शन दिल्याने संपूर्ण गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बालाजी देडगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन शेतकर्‍यांच्या शेळ्यांचा फडशा पाडला आहे. याबाबत माहिती अशी की गावापासून काही अंतरावर बाबासाहेब कदम हे वस्ती करून राहतात. दोन दिवसांपूर्वी पहाटे त्यांना शेडमधून शेळ्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी बाहेर येऊन बघितले असता त्यांच्या घरासमोर असणार्‍या शेडमधून बिबट्याने शेळी बाहेर ओढल्याचे त्यांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करत शेजार्‍यांना आवाज दिला. परंतु तोपर्यंत त्यांच्या समोरच बिबट्याने त्या शेळीला मारून टाकले. त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. यानंतर या घटनेची माहिती कदम यांनी वनखात्याला फोनद्वारे दिली. यापूर्वीही उजनी कोकरे या शेतकर्‍याच्या शेळीचाही बिबट्याने फडशा पाडला होता. या परिसरात अनेकांना बिबट्याने दर्शन दिल्याने वस्तीवर राहणार्‍या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती समजताच वन विभागाचे श्री. मोरे व मते यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. परिसरात अशा घटना वारंवार होत असल्याने या परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेली शेळी.

 

नेवासा पोलिसांनी पकडले कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या 6 गोवंश जनावरांचे वाहन

0
नेवासा पोलिसांनी 6 गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेवून जात असलेले पकडलेले वाहन.
नेवासा (प्रतिनिधी)- अशोक लेलण्ड कंपनीच्या वाहनातून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 6 गोवंश जनावरांची काल नेवासा पोलिसांनी सुटका केली. नेवाशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गोधेगाव ते सिद्धेश्‍वर मंदिर रोड मार्गे औरंगाबादकडे अशोक लेलण्ड कंपनीचे वाहन (एमएच 20 डीई 7041) मधून बेकायदा गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी वाहून घेऊन जात आहेत.

यावरून शरद गोर्डे यांनी व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गौतम वावळे, हेडकॉन्स्टेबल श्री. साळवे, पोलीस नाईक यादव, नागरगोजे, कॉन्स्टेबल गलधर, भरत घुगे, भागवत शिंदे, चालक कॉन्स्टेबल कुर्‍हाडे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गोधेगाव-सिद्धेश्‍वर मंदिर रोडवर डावखर यांच्या वस्तीजवळ सापळा रचून कत्तलीसाठी नेली जात असलेली गोवंश जातीची सहा जनावरे, अशोक लेलंड कंपनीच्या छोट्या पिकअप्स एकूण 2 लाख 79 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी समीर अब्दुल कुरेशी (वय 24) रा. सिलेखाना जि. औरंगाबाद याला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे करत आहेत.

 

अकोलेत श्रींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

0

सांस्कृतिक कार्यक्रमांनी जिंकली अकोलेकरांची मने

अकोले (प्रतिनिधी) – अकोलेत सातव्या दिवशी ‘श्रींचे उत्साही व भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. यावेळी शाळा व मंडळे यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी अकोलेकरांची मने जिंकली. या मिरवणुकीवर हिंद सेवा मंडळ संचलित शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण ठरले. अकोले येथील बस स्थानक परिसरातील मैत्रेय प्रतिष्ठान व हिंदूराज मंडळाने आपली विसर्जन मिरवणूक काढून शिस्तीचे दर्शन घडवले. विविध पारंपरीक मैदानी खेळांचे दर्शन या मंडळांनी घडविले. या मिरवणुकीने सातव्या दिवशी जर मंडळांनी विसर्जन केले तर अनंत चतुर्दशीला होणारे तणावाचे प्रसंग टळतील हे नक्की.

याबरोबरच विद्यार्थी मित्रमंडळ, आयटीआय कॉलेज यांनीही काल विसर्जन मिरवणूक करून आदर्श पायंडा पाडला. तर कोतूळ येथे विद्यार्थी मित्र मंडळाने ‘श्री’ विसर्जन केले. काल सकाळी हिंद सेवा मंडळ संचलित बालक मंदीर, ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा, मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या.अंतराने सुरू राहिलेल्या मिरवणुका सकाळी 8 वाजता सुरू झाल्या. त्यात ज्ञानवर्धीनी व बालक मंदिरची चार तास मिरवणूक चालली. तर मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची मिरवणूक तब्बल पाच तास चालली. दुपारी ही मिरवणूक अडीच वाजेपर्यंत चालली.

बालक मंदिराची रिबीन कवायत, मोरया मोरया व चिक मोत्याची माळ हे कार्यक्रम बघ्यांच्या पसंतीला उतरले. या मिरवणुकीला प्रतीभा वाघमारे, सुरेखा कुलकर्णी, सुनंदा गायकवाड, प्रांजल शालिग्राम व वैशाली पाटेकर यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेने कार्यक्रम सादर केले. त्यात देवी श्रीगणेशा व लेझीम हे कार्यक्रम बहारदार झाले.प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब नवले, दिलशाद सय्यद, सोनाली मालवणकर, बाळासाहेब मांडे, योगेश नवले, आशा लगड, वसीम शेख, राजेश गुरुकुलेे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.

ज्युनिअर कॉलेज विभागाने सादर केलेले स्रीभ्रूणहत्येचे पथनाट्य सर्व प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. या विभागाने सादर केलेले काठी-लाठी व दांडपट्टा अतिशय जोरकस राहिला. तर माध्यमिक विभागाने मुलींची वेशभूषा राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारी होती. या विभागाच्या मुलामुलींनी सादर केलेले लेझीम, दांडिया, झांज, आदिवासी नृत्य हे सर्वांच्या नजरा खिळवणारे ठरले. प्राचार्य संतोष कचरे, उपप्राचार्य विनीत भालेराव, प्रा. दीपक जोंधळे व इतरांनी या सर्वाना मार्गदर्शन केले. तर चारही मिरवणूक मार्ग महात्मा फुले चौक, अकोले बसस्थानक परिसर, नगरपंचायत व अगस्ती सिनेमागृह असा राहिला. प्रवरा नदी पात्राकाठी या मिरवणुका पोहचल्यावर तेथे ‘श्रीं’ ची आरती झाल्यावर मोठ्या जड अंत:करणाने ‘श्री’ ला साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. अकोले नगरपंचायतीच्यावतीने नगराध्यक्षा संगीताताई शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व अन्य नगरसेवकांनी मंडळाचे व संस्थांचे पदाधिकारी यांचे स्वागत केले.

अकोले पोलीस ठाण्याच्या श्री गणेशालाही काल सातव्या दिवशी भावपूर्ण व उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. प्रारंभी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या हस्ते आरती करण्यात आली. श्रींच्या या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांच्यावतीने शिस्तीचे पालन करत पारंपारिक वाद्य ठेवले होते. स्वतः पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक विकास काळे, उपसभापती मारुती मेंगाळ यांनी या पारंपारिक वाद्यावर सादर केलेल्या उडत्या चालीवरील गाण्यांवर ठेका धरला. कॅशीओवर ‘मला आमदार झाल्यासारखे वाटतंय’ … या सह अन्य सध्या गाजत असलेल्या गाण्यांवर पोलीस निरीक्षक वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी आनंदोत्सव साजरा करत नृत्य केले. त्यांच्यासह अन्य पोलीस, महिला कर्मचारी, नागरिक, कार्यकर्ते यांनीही मिरवणुकीत एकच जल्लोष करत नृत्य केले. अकोलेकरांनी पोलीस ठाण्याच्या श्रींची यंदा अशाप्रकारे वेगळी मिरवणूक अनुभवली.

Social Media

26,076FansLike
5,154FollowersFollow
1,127SubscribersSubscribe
error: Content is protected !!