शालेय शिक्षण विभागातर्फे दूध भुकटीची निविदा

0

दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना दूध भुकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दूध भुकटीचे वाटप केले जाणार आहे. शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याने येत्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या हातात दूध भुकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या शालेय पोषण आहारात दूध भुकटीचा समावेश करण्यात आला. सध्या खिचडी तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. दिवसेंदिवस शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडे शालाबाह्य कामे वाढत आहेत.त्यात आता विद्यार्थ्यांना दूध भुकटीचे वाटप करण्याचे काम शाळांना करावे लागणार आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे चार दिवसांपूर्वी दूध भुकटीची निविदा काढण्यात आली असून येत्या 8 ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.मात्र,केवळ महाराष्ट्रात निर्माण केल्या जाणार्‍या दूध भुकटीचाच समावेश शालेय पोषण आहारात करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना एका महिन्याला एक 200 ग्रॅम वजनाचे दूध भुकटीचे पाकिट दिले जाणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून 3 दिवस त्याचा समावेश करणे अपेक्षित आहे.येत्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या दूध भुकटी उत्पादक किंवा वितरकाला प्रत्येक शाळेत दूध भुकटीची पाकिटे द्यावी लागतील. नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 461 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

 

प्रांताधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍या दोन महिलांसह तिघांना अटक

0

तीन आरोपी अद्यापही मोकाट

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रांताधिकारी गोविंद दाणेज, मंडलाधिकारी विलास आजबे व चालक नामदेव तांदळे यांच्यावरील करण्यात आलेला हल्ल्याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी तिघाजणांना अटक केली आहे. बनपिंप्री येथील वाळूतस्करीतील सहभागी महिला सुनीता दिलीप पठारे, शकुंतला दिलीप पठारे (बनपिंप्री) या दोन महिलांना श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. सुनील दिलीप पठारे या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अन्य तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारात चवरसांगवी परिसरात सीनाधरण पात्रात यांत्रिक बोटीने अवैध वाळूउपसा होत असल्याची माहिती प्रांताधिकारी गोविंद दाणेज़ यांना मिळाली. त्यानुसार प्रांताधिकारी तेथे गेले असता, त्यांना काही आढळून आले नाही.

यामुळे ते परत निघाले असता बनपिंप्री गावानजीक वाळू वाहतूक करणारे एक वाहन त्यांना दिसले. या वाळूतस्करांवर कारवाईसाठी प्रांताधिकारी गोविंद दाणेज़ गेले असता त्यांना वाळूतस्करांनी येऊन प्रांताधिकारी दाणेज़ यांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून त्यांच्यावर हल्ला केला तसेच गाडीच्या काचा फोडून वाहनचालकालाही जबर मारहाण केली. याबाबत श्रीगोंदा पोलिसांनी परिसराचा आढावा घेतला होता. दरम्यान महसूल पथकावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर अधिकार्‍यांनी 24 तास शसस्त्र पोलीस दलाची मागणी केली आहे. जो पर्यंत पर्याप्त पोलीस संरक्षण उपलब्ध होत नाही. तोपर्यंत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करणार नाही, असा पवित्रा जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय अधिकार्‍यांनी घेतला आहे. यासंबंधात एक पत्र जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले आहे.

बुधवारी श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा लावून सुनीता पठारे व शकुंतला पठारे या दोन महिलांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सुनील पठारे यास अटक केली. अद्याप तीन आरोपी फरार आहेत.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे कालवश

0
श्रीगोंदा, लिंपणगाव (प्रतिनिधी)- राज्य साखर संघाचे अध्यक्ष, श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार, सहकार महर्षी शिवाजीराव (बापू)नागवडे यांचे दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती हॉस्पिटल येथे निधन ़झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने साखर उद्योगातील संयमी नेतृत्व आणि एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. माजी आमदार व सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे यांनी तालुक्यात पाहिला सहकारी तत्वावर कारखाना सुरू केला.

ढोकराई च्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा राहिल्याने या भागातील शेतकरी वर्गाने केलेली प्रगती आजही पहायला मिळत आहे. शिक्षण, रोजगार उपलब्ध झाला. उसाचे मळे या परिसरात दिसायला लागली. तत्कालीन परिस्थितीत खाजगी साखर कारखानदारांची साखर धंद्यांतील मक्तेदारी संपून पाहिला सहकारी साखर कारखाना या भागात उभा राहिल्याने तालुक्याचा भीमा आणि घोड नदीच्या आणि नंतरच्या घोड धरणाच्या कालवयाच्या परिसरात ऊस उभा राहिला. नव्वद च्या दशकात कुकडी कालवाच्या लाभक्षेत्रात ऊस पहायला मिळाला तो केवळ नागवडे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेल्या कारखान्यामुळे. या बरोबर इतर समृध्दी या परिसरात आली. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, स्व. विलासराव देशमुख, वसंतदादा पाटील, शंकरराव कोल्हे, शरद पवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.

बापूंचा राजकीय प्रवास प्रेरणादायी राहिला. संयमी नेतृत्व, दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता, राजकारणातील आदर्शं नेता असणारे शिवाजीराव नारायणराव नागवडे यांचे उपचारादरम्यान त्यांचे मुंबई येथे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिवाजीराव नागवडे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. 1970 साली त्यांनी ढोकराईच्या माळरानावर नगर दक्षिणमधील पहिला सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमढ रोवली. 1978 आणि 1995 साली श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदिप शिक्षण संस्था व तुळजाभवानी शिक्षण संस्था सुरु केल्या. या शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील गावागावांत शिक्षणाचे जाळे उभे केले. ते राज्य साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष होते.

आज वांगदरीत अंत्यसंस्कार
सहकारमहर्षि शिवाजीराव नागवडे यांचे पार्थिव आज गुरुवारी सकाळी 6 ते 9 या वेळेत नागवडे साखर कारखाना येथील कार्यस्थळावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळगावी वांगदरी येथे पार्थिव नेले जाणार आहे. दुपारी 12.30 वाजता घोडनदीतिरी अंत्यसंस्कार होणार आहेत.

अनुभवी मार्गदर्शक हरपला!
ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि सहकार चळवळीतील एक अनुभवी मार्गदर्शक हरपला आहे. नागवडे यांच्या निधनाचे वृत्त काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. शिवाजीराव नागवडे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय वाटचालीत लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. साखर संघाचे अध्यक्ष या नात्याने सहकारी साखर कारखान्यांसंदर्भात ते परखडपणे भूमिका मांडणारे नेते होते. कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष आणि पाठपुरावा केला. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी विचारांवर आधारीत भूमिका मांडणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले
सहकारातील ज्येष्ठ मार्गदर्शक व राज्य सहकारी साखर संघाचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी समाजाच्या विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. दक्षिण नगर जिल्ह्यात श्रीगोंदा या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून कुकडीच्या पाण्यासाठी सातत्याने मोठा संघर्ष केला. सलग दोन वेळेस विधानसभेत प्रतिनिधीत्व करताना तालुक्यासह जिल्ह्याच्या सहकार, शिक्षण ,कृषी क्षेत्रातही मोठे योगदान दिले. काँग्रेसचे निष्ठावंत पाईक असलेल्या बापूंनी जिल्ह्यात कायमच आपल्याला मोठी साथ दिली. पुरोगामी विचार व तत्त्वनिष्ठा असणार्‍या बापूंचा साखर उद्योगाबाबत मोठा अभ्यास असल्याने राज्य सहकारी साखर संघात त्यांनी अनेक धोरणात्मक निर्णय राबवले. त्यांच्या निधनाने सहकारातील तत्वनिष्ठ व अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले.
-आ. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, माजी महसूलमंत्री

 

पोलीस बंदोबस्तात व्यस्त…चोर्‍या, घरफोड्यांनी नागरिक त्रस्त !

0
जयेश शिरसाळे – 9405057794
शहरासह जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात तर चोरट्यांनी दररोज चोर्‍यांचा सपाटाच लावला आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरातील एकही मोठी घरफोडी उघडकीस आलेली नाही. दररोज चोरी, घरफोड्याकरून चोरटे पोलिसांना आव्हानच देत आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस अधिक्षकांनी पदभार स्विकारल्यापासून चोरट्याचा धुमाकुळ सुरुच आहे. सध्या सण, उत्सव सुरु असल्याने पोलिस बंदोबस्तात व्यस्त आहे. त्यामुळे वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी, उघडकीस आणण्यासाठी पोलिस यंत्रणा अपयशी ठरत आहे.

मागील महिन्यात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिंगरोडरील आनंदमंगल सोसायटीतील बंद घर फोडून चोरट्यांनी जवळपास 8 लाख रुपयांचा ऐवज लांबवून नेल्याची मोठी घटना घडली होती. या चोरीच्या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. परंतू चोरट्यांपर्यंत पोलिस अद्याप पोहचू शकलेले नाही. शहरात नुकतीच एका डॉक्टरांच्या घरी महिलेचे हात-पाय बांधून जबरी लुटीची घटना घडली. यातील संशयितांना अटक करण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. परंतू दररोज उघडकीस येणार्‍या चोरी,

घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्यास पोलिस हतबल ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक सट्टा, जुगाराच्या लहान-मोठया कारवाईत व्यस्त आहे. त्यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी फक्त स्थानिक गुन्हे शाखेवर आहे.

पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथक नावालाच असल्याने यात फेरबदल करण्याची गरज आहे. तत्कालीन पोलिस अधिक्षक कराळे यांनी चोरी, घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘आरएफआयडी’ ही नाईट पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित केली होती.

त्यामुळे काहीप्रमाणात चोरीच्या घटना नियंत्रणात आल्या होत्या. परंतू आता ही यंत्रणा फोल ठरत आहे. त्यामुळे चोरी, घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.

पीक विमा मुदतीत न दिल्यास 12 टक्के व्याज

0

विमा कंपन्यांसाठी नवीन नियम ऑक्टोबरपासून लागू

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत मोठे बदल केले आहेत. मुदतीच्या आत शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना 12 टक्के व्याजासह रक्कम द्यायची आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.
मुदतीच्या आत शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत, तर शेतकर्‍यांना विम्याच्या रक्कमेवर 12 टक्के व्याज देणं विमा कंपन्यांसाठी बंधनकारक असेल. नवीन नियम एक ऑक्टोबरपासून लागू होतील.

सध्या विम्याचे पैसे मिळण्यास दोन-दोन वर्ष लागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. विम्याच्या रकमेत राज्य सरकारलाही वाटा द्यावा लागतो. राज्य सरकारही आपली रक्कम देण्यास उशीर करत होतं. त्यामुळे तीन महिन्याच्या मुदतीत रक्कम न देणार्‍या राज्य सरकारनेही 12 टक्के व्याज देणं बंधनकारक असेल. नव्या बदलात हंगामी फळबाग योजनेचाही प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला आहे. रानडुकरांसारख्या जंगली प्राण्यांनी पिकांचं नुकसान केलं, तर त्याची नुकसान भरपाईही विमा योजनेत लागू झाली आहे.

 

आमदारांनी स्टंटबाजी न करता विकासाला प्राधान्य द्यावे!

0
जळगाव । शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी कोणतेही स्टंबबाजी न करता त्यांनी शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे. तसेच विरोधी पक्ष नेत्यांना दालन न दिल्यास आम्ही मनपाच्या वाहनतळामध्ये देखील आमची बसण्याची तयारी असल्याचा इशारा मनपा विरोधीपक्षनेते सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेना कार्यालयात महापालिकेचे विरोधपक्षनेते सुनिल महाजन यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना सुनील महाजन म्हणाले की, महापौर सीमा भोळे व उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांना आपल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत शिवसेनेकडून चांगल्या कामांसाठी नेहमी पाठींबा राहणार आहे. त्यांनी विकास कामांसोबतच गाळेप्रश्न व हुडको कर्जाची परतफेडीचा प्रश्न मार्गी लावावा. विकासाच्या विरोधात काम केल्यास शिवसेना आपल्या विरोधी पक्षाची भूमिका चोख पाडेल असा इशाराही सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे व शिवसेना पदाधिकारी निलेश पाटील आदी उपस्थित होते.

… तर त्यांनी कुठलाही गाजावाजा केला नाही
पत्रकार परिषदेत बोलतांना सुनिल महाजन म्हणाले की, आ. राजूमामा भोळे यांनी मनपा कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत महापौर व उपमहापौर मनपाची वाहने वापरणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र या आधी सत्तेत असताना शिवसेनेचे महापौर रमेशदादा जैन, प्रदिप रायसोनी, किशोर पाटील यांनी देखील मनपाची वाहने वापरले नाहीत. मात्र, त्यांनी कुठलाही गाजावाजा केला नसून रमेश जैन यांनी तर मनपाचे मानधन देखील स्विकारले नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

अनधिकृत मजले भाड्याने कसे देणार?
आ. राजूमामा भोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी देवून सतरामजलीचे वरचे 9 मजले हे अनधिकृत असल्याचे सांगितले होते. मग आता 9 अनधिकृत मजले भाड्याने कसे देणार? असा प्रश्न सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. सतरा मजलीचा रेडीरेकनरचे दर सर्वात जास्त आहेत. त्यामुळे कोण महागड्या मजल्यावर कार्यालये भाड्याने घेतील असाही प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. आमदारांनी जळगावकरांची दिशाभूल न करता विकासावर द्यावा असा सल्ला सुनिल महाजन यांनी आमदार भोळे यांना दिला.

तमाशा करायला भाग पाडू नका
आमदार भोळे यांनी महापौर, उपमहापौरांचे दालन खालच्या मजल्यावर आणले आहे. त्यांनी इतरांना सुचना देवू नये. विरोधी पक्षनेत्यांना दालन न दिल्यास आमची वाहनतळात देखील बसण्याची तयारी असून असा तमाशा करायला आम्हाला भाग पाडू नका असे सुनिल महाजन यांनी सांगितले.

नंदिनीबाई विद्यालयात पर्यवेक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण

0
जळगाव । शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात विद्यार्थ्यांनीचे पेन व पैसे चोरल्याच्या संशयावरून विद्यार्थींनी पर्यवेक्षकाकडे तक्रार केल्यानंतर पर्यवेक्षकाने विद्यार्थींनीला मारहाण केल्याची घटना आज घडली. याबाबत विद्यार्थीनीने पालकांकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थीनेचे पालक तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिसात दाखल झाले होते. दरम्यान दुपारी उशिरापर्यंत पर्यवेक्षकाकडून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरु होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदिनीबाई विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणार्‍या एका विद्यार्थींनीने वर्गातील विद्यार्थींनीचे पेन व पेैसे चोरल्याच्या संशयावरून वर्गातील विद्यार्थींनीने पर्यवेक्षक महाजन यांच्याकडे त्या विद्यार्थींनीची तक्रार केली. त्यानंतर पर्यवेक्षकांनी तिला पेन चोरीच्या संशयावरून पाठीत मारले.

त्यानंतर विद्यार्थींनीने याबाबत फोन करून आई-वडीलांना माहीती दिली. विद्यार्थींनीचे आई व वडील शाळेत आल्यानंतर त्यांनी पर्यवेक्षक यांना विचारणा केली. त्यांनी कार्यक्रमात व्यस्त असल्याचे सांगत विद्यार्थींनीच्या पालकांशी बोलण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर विद्यार्थींनीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलिसात येवून पर्यवेक्षकांविरुध्द तक्रार केली. या तक्रारीची दखल घेवून पोलिस निरीक्षकांनी पर्यवेक्षक महाजन यांना पोलिस स्टेशनला बोलविले. त्यानंतर दोन्ही बाजु पोलिस निरीक्षकांनी ऐकून घेतल्या. याबाबत दुपारी उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.

विद्यार्थींनीबाबत पेन, पैसे चोरीच्या नेहमी तक्रारी येत होत्या. आज विद्यार्थींनीनी पुन्हा तक्रार केल्याने तिला शिस्त लागावी म्हणून मारले असल्याचे पर्यवेक्षक महाजन यांनी सांगितली.

कुठल्याही विद्यार्थींनीचे पेन व पैसे चोरलेले नसतांना मुली चोर,चोर चिडवत होत्या. त्यातच पर्यवेक्षक महाजन सरांनी सर्व विद्यार्थीनीसमोर मला मारहाण केल्याचे विद्यार्थींनीने सांगितले.

प्रलंबित मागण्यांसाठी ग्रंथालय संघाचे धरणे

0
जळगाव । शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हा ग्रंथालय संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्हा ग्रंथालय संघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रंथालय कर्मचार्‍यांना किमान वेतनापेक्षाही कमी वेतन परिरक्षण अनुदान रचनेनुसार मिळते, त्यात महागाईच्या निर्देशांकानुसार वाढविणे अपेक्षित आहे. तसेच ग्रंथालयांना लागणारे ग्रंथ, नियतकालिके, लेखन, सामुग्री, विज,

दुरध्वनी, इमारत भाडे यात वाढ झाली आहे. शासनाने राज्यातील 12 हजार 148 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील 21 हजार 611 कर्मचारी यांच्या मागण्या गेल्या चार वर्षात पूर्ण झालेल्या नाहीत. तरी सर्व वर्गाच्या व दर्जाच्या सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचार्‍यांच्या कामाचे तास शासकीय नियमानुसार करण्यात यावे, जिल्हा ग्रंथालय व राज्य ग्रंथालय परिषदेची पुनर्रचना करावी, यासह प्रलंबित मागण्यांसाठी आज जिल्हा ग्रंथालय संघातर्फे युवराज वाणी, संजय पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी धरणे आंदोलन केले.

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आरोपीच्या पुतळ्याचे दहन

0
तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्यावतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना विचार मंचचे सोमा शिंदे, राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्निल चव्हाण, नीलेश थोरात, शीतल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा आदी.
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ लोकशाही विचार मंचच्या वतीने सावेडी येथील एकवीरा चौकात आरोपीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व आरोपीस फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली.महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नगर शहरात घडलेल्या या अमानवीय घटनेने नगरकरांची मान शरमेने खाली गेली आहे. अत्याचार करणार्‍यांवर कायद्याचा धाक नसल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा झाल्यास अशा घटना घडणार नाहीत.

तसेच तपोवन रोड येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील मुख्य आरोपी अटक असून, इतर सहआरोपी अद्याप फरार आहेत. पीडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींवर कठोर शासन होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. या मागणीचे निवेदन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संपत शिंदे यांना देण्यात आले. यावेळी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष सोमा शिंदे, शहराध्यक्ष राजू अनमल, नगरसेवक महेश तवले, संदीप यादव, आकाश खरपे, स्वप्निल चव्हाण, नीलेश थोरात, शीतल गुड्डा, शैला गायकवाड, सुजाता कोटा, सचिन अकोलकर, बाबू चव्हाण, विशाल भालेराव, देविदास चव्हाण, अ‍ॅड. महेश काळे, अ‍ॅड. मंगेश सोले, तेजस पटेकर, दादा जंगम, ओम दोन्ता, संदीप गुड्डा, दिनेश जरे, सुनील शिंदे, आकाश कोदे आदी उपस्थित होते.

 

श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेरबंद

0
श्रीगोंद्याचे प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्यावर हल्ला करणारा आरोपी सुनील दिलीप पठारे याला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार पो.हे.कॉ. बाळासाहेब मुळीक, भाऊसाहेब काळे, पोना.विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, संदीप दरंदले, रोहित मिसाळ, दत्ता गव्हाणे, विजय ठोंबरे, रवीकिरण सोनटक्के, मेघराज कोल्हे, सुमेघां वाघमारे उपस्थित होते.

Social Media

26,076FansLike
5,154FollowersFollow
1,127SubscribersSubscribe
error: Content is protected !!