सोमवार, १९ मार्च २०१८

0

उड्डाण पुलाखालील भाजी बाजार विक्रेत्यांचा बंद

0
नाशिकरोड | प्रतिनिधी- बिटको चौकातील उड्डाणपुलाखालील भाजीबाजार महापालिकेने हटवून गरीब शेतकरी, भाजीविक्रेत्यांचे संसार उद्ध्वस्त करू नये, या मागणीसाठी काल भाजीविक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. बाजार हटवू नये यासाठी आ. बाळासाहेब सानप यांना निवेदन देण्यात आले.

सदर भाजी बाजारात सुमारे पाचशे भाजीविक्रेते, फळ विक्रेते, व्यावसायिक गेल्या आठ-दहा वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. पूर्वी हा बाजार टिळकपथ येथे भरत होता. त्यानंतर दुर्गा उद्यान व राजेंद्र कॉम्प्लेक्स समोरील रस्ता येथे भरू लागला. परंतु वाहतुकीला अडथळा येऊ लागल्याने हा बाजारा आता उड्डाणपूलाखाली स्थिरावला आहे. बिटको परिसरातील नागरिक, जयराम हास्पिटल, गोसावीवाडी, शिवाजी पुतळा, जेलरोड परिसरातील नागरिक भाजी घेण्यास येतात.

सिन्नर ते घोटीपासूनचे शेतकरी येथे माल विक्रीसाठी येतात. या सर्वांचा उदरनिर्वाह या भाजीबाजारावर चालतो. महापालिकेला दररोज दहा रुपयाची कर देत असूनही महापालिका आम्हाला हटवून अन्याय करत असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आमच्यापासून कोणाला त्रास नाही. सर्वांची उलट सोयच होते. असे असताना आम्हाला हटविल्यास रोजीरोटी बंद होईल, संसार उध्वस्त होतील. नोकर्‍या मिळत नसल्याने भीक मागण्याची वेळ येईल. त्यामुळे बाजार हटवू नये, असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर कुणाल जगताप, विनोद मोरे, संतोष वाघमारे, संतोष साडे, शिवा काकडे, सीताबाई कातकाडे, रंजना बोरनारे, जायदा शेख, शशी पगारे, दीपक गोतीसे, संदीप निकाळे, समीर पठाण, शेख दस्तगीर बाबा आदींच्या सह्या आहेत.

सायगाव उपकेंद्र दीड वर्षांपासून बंद

0
येवला | प्रतिनिधी- येवला तालुक्यातील पूर्व भागातील सतत दुष्काळी असलेल्या सायगाव येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या दीड वर्षापासून कर्मचारी नियुक्त न केल्याने कर्मचारी अभावी हे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे.

संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आरोग्याचे तीन तेरा वाजले आहे. या आरोग्य केंद्राची आरोग्य बिघडले आहे.

या आरोग्य केंद्रात संबंधित विभागाने कर्मचार्‍यांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी गणपत खैरनार, अनिल देशमुख, गोरख उशीर, अंबादास उशीर यांनी केली आहे.

कर्जमाफी होईपर्यंत व्याजआकारणीला बंदी

0
विखरणी | राजेंद्र शेलार- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरले आहेत, त्या शेतकरी वर्गाकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेपर्यंतच्या दरम्यानच्या कालावधीचे व्याज आकारणी करत होत्या. त्या सहकारी व जिल्हा बँकांना अशी व्याज आकारणी करण्यास बंदी घालणारा आदेश शासनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. या बाबतचे वृत्त दै. ‘देशदूत’ने यापूर्वीच प्रसिध्द करुन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली होती.

या शासन निर्णयात पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू असून पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी किंवा एकरकमी परतफेड योजनेचा लाभ देण्यात येत आहे. १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या दरम्यान पीककर्ज, मध्यम मुदत कर्ज यांचा यात समावेश असून व्याजासह दीड लाख रुपयांच्या आत कर्जमाफीस पात्र धरण्यात आली आहे. तर दीड लाखा पुढील थकबाकी असलेल्या शेतकर्‍यासाठी एक वेळ समझोता योजना लागू करण्यात आली आहे.

३० जून २०१६ ते ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या व्याजाची भरपाई शासन देणार आहे. परंतु लाभार्थी शेतकर्‍यांना लाभ देण्यास विविध कारणामुळे काही कालावधी जाणार असल्याने १ ऑगस्ट २०१७ पासून थकीत रकमेवर व्याज आकारणी होत असल्याने कर्जदार शेतकरी वर्गाला कर्जमाफी मिळूनही संबंधित शेतकर्‍याचा सातबारा कोरा होऊ शकत नाही. हे विचारात घेऊन १ ऑगस्ट २०१७ ते लाभ मिळेपर्यंत या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यात येऊ नये, असे निर्देश सर्व संबंधितांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७९अ खाली देणे आवश्यक झाले आहे. म्हणून या योजनेंतर्गत कर्जमाफी व एकवेळ समझोता योजनेत पात्र असणार्‍या शेतकर्‍यांना पिक कर्ज, मध्यम मुदत कर्ज या कर्जखात्यावर सहकारी किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी व्याजाची आकारणी करू नये, असे आदेश या शासन निर्णयात देण्यात आले असून या आदेशाच्या प्रती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थासह सर्व जिल्हा बँकांना पाठवण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे.

असे असले तरी विविध सेवा सहकारी सोसायट्यांनी या व्याजाची वसुली न केल्यास या संस्थांना होणारा तोटा मोठा असल्याने या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या डबघाईला येऊन बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेने या व्याजाची वसुली सोसायट्याकडून केली असल्यामुळे शेतकर्‍यांचा कणा असलेल्या या संस्थाचे भवितव्य काय? असा प्रश्‍न या निमिताने उपस्थित होणार आहे. शासनाने व्याज वसूल करू नये असे आदेशात म्हंटले असले तरी या व्याजाचा भुर्दंड सोसायचा कुणी? या बद्दल या शासन निर्णयात काहीही उल्लेख नसल्याने या सेवा सहकारी संस्थामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडून यापूर्वीच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी व्याजाची वसुली केली आहे, त्या शेतकर्‍यांना शासन किंवा या विविध कार्यकारी सोसायट्या या व्याजाची भरपाई देणार का? असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.

भरपाई शासनानेच करावी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीतून मार्ग काढत आहे. १ ऑगस्ट २०१७ ते लाभ मिळेपर्यंत या रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यात येऊ नये, असे शासन निर्देश आहेत. मात्र, हे व्याज शेतकरी संस्था भरण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे या व्याजाची भरपाई शासनानेच करावी. असे झाले तरच शेतकरी सहकारी संस्था तग धरु शकतील.

– अंबादास बनकर, माजी अध्यक्ष नाशिक जिल्हा बँक

वीजतारा तुटून आग; गहू खाक

0
दळवट येथील वीज वितरण कंपनीच्या वीजपुरवठा करणार्‍या वीज तार तुटल्याने विश्‍वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे. (छाया-किशोर पगार, कळवण)
कळवण | प्रतिनिधी- दळवट येथील वीज वितरण कंपनीच्या वीजपुरवठा करणार्‍या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून काल दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्‍वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाल्याने ५० हजाराचे नुकसान झाले आहे. भर दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान शेतात जीर्ण झालेली विद्युत तार पडल्यामुळे काढणीसाठी आलेल्या गव्हाने पेट घेतल्याने एक एकर गहू जळून खाक झाल्याचे सरपंच रमेश पवार यांनी सांगितले.

आजूबाजूच्या शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी धाव घेऊन गव्हाला लागलेली आग विझवल्यामुळे शेतालगत असलेल्या दहा ते बारा एकरातील उभ्या असलेल्या गव्हाचे संभाव्य नुकसान टळले. वीज वितरण कंपनीने व शासकीय यंत्रणेने अकस्मात घडलेल्या घटनेचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देऊन पीडित शेतकर्‍याला दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. कळवण तालुक्यात ग्रामीण व आदिवासी भागात वीज वितरण कंपनीने वीज पुरवठ्यासाठी विजेचे जाळे विणले आहे. वीजपुरवठा करणार्‍या विजेच्या तारा आता जीर्ण झाल्याने तारा तुटत असल्याने दळवट ग्रामपंचायतने वीज वितरण कंपनीकडे वेळोवेळी निवेदन देऊन वीज तारा बदलण्याची मागणी केली होती. मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग घडल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

कळवण तालुक्यात कालबाह्य झाल्या तारा

ग्रामीण व आदिवासी भागात वीजेचे जाळे गेले चार दशकांपूर्वी विणले आहे. वीज पुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या आहेत. त्या तारांची क्षमता आता संपल्याने जीर्ण झालेल्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनीने पाऊले उचलावीत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. कळवण तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागात अतिरिक्त दाब असलेल्या ठिकाणी नव्याने रोहित्र बसविणे, कालबाह्य झालेल्या तारा, विजेचे खांब बदलणे आदी कामे करणे गरजेचे आहे. जीर्ण विद्युत तारांमुळे वीज वितरण समस्या निर्माण झाल्या आहेत. विजेची कामे ठप्प झाल्याने सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या असल्याने शासनाने उपाययोजना करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. १९७२-७३ च्या कालखंडात ग्रामीण व आदिवासी भागात शेतीसाठी वीज आली.

विजेवर चालणारे पंप बाजारात उपलब्ध झाल्याने काम सोपे झाले, कमी वेळात जास्त पाणी शेतीला देता येऊ लागले. त्यावेळी शेतातून ठरावीक उंचीवरून तारा ओढल्या गेल्या. आज ४० वर्षाचा कालावधी लोटला गेला तरी वीज वितरण कंपनीने तारा बदलल्या नाही, तारा त्याच असल्याने क्षमता कमी झाली आहे. पर्यायाने तराना झोल पडला आहे, त्यामुळे तारा खाली आल्याने तारांचा स्पर्श एकमेकांना होतो, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन वीजेचे लोळ पडुन आग लागते. अनेक ठिकाणी डीपीमध्ये फ्यूज आणि तारा नसल्याने तेथे शेतकरी स्वत:च्या हाताने तारांचे फ्यूज टाकत असल्याने शॉर्टसर्किट होते.

त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत. ग्रामीण व आदिवासी भागात वीज वितरण कंपनीचे वीज तारांचे पसरलेले जाळे हे आता जीव घेणे ठरत आहे. लोंबकळणार्‍या तारांमुळे दरवर्षी शेतातील पिकांचे नुकसान होत आहे आणि आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणार्‍या शेतकर्‍यांना आता वीज वितरण कंपनी देखील मोठे संकट ठरत आहे. महावितरण कंपनीने कळवण तालुक्यातील वीजेच्या समस्याचे सर्वेक्षण करुन जीर्ण तारा, खांब बदलावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे.

समस्यांचे लवकरच निराकरण

ग्रामीण व आदिवासी भागातील वीजपुरवठा करणार्‍या विजेच्या जीर्ण तारासह वीज वितरणच्या समस्याबाबत सर्वेक्षण करुन १० ते १५ दिवसांत त्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. जीर्ण तारा बदलण्यासह निर्माण झालेल्या समस्यांबाबत अंदाजपत्रक तयार करुन वरिष्ठ कार्यालयात मंजुरीस पाठविण्यात येईल आणि त्या समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल.

-ऋषीकेश खैरनार, उपकार्यकारी अभियंता महावितरण, कळवण

वीजपुरवठा मिळण्यास अडचण

कळवण तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागात अतिरिक्त विद्युत दाब असलेल्या ठिकाणी नव्याने रोहित्र बसविणे, कालबाह्य झालेल्या तारा व विजेचे खांब बदलणे आदी कामे करणे गरजेचे आहे. वीज वितरण समस्या निर्माण झाल्या आहेत. वीजेची कामे ठप्प झाल्याने सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.

– नितीन पवार- जिल्हा परिषद सदस्य

नाशिक l गीता माळी : जीवन व्हावे सुरेल गाणे

0
माझे शिक्षण ओझरखेड, दिंडोरी व नाशिकमध्ये झाले. आमच्या घरी आध्यात्मिक वातावरण होते. अभंग नामसर्ंकीतन यासाठी टाळ-मृदुंगाच्या वातावरणात घर अक्षरश: भक्तीरसात न्हावून निघत. बालपणी मी कधी गायनाला सुरुवात केली ते मलाही कळाले नाही. सानेगुरुजी आंतरशालेय स्पर्धेत ‘घट डोईवर घट कमळ’ हे गीत पहिल्यांदा गायले आणि त्या गाण्याला प्रथम पारितोषिक मिळाले. येथून माझी बालगायिका म्हणून ओळख झाली. घरची परिस्थिती बेताची होती. परंतु, माझी गाण्याची आवड मला स्वस्थ बसू देत नसे. त्याकाळी मी पावसापाण्याची पर्वा न करता ८ ते १० किलोमीटर पायी संगीत क्लाससाठी जात असे. माझे गुरुजी शरद घोडके यांनी मला संगीत ज्ञान दिले.

एमएमआरके महाविद्यालयात मी शास्त्रीय गायन विषय घेऊन बीए पूर्ण केले. दरम्यान, आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सवात माझ्या विद्यापीठाला मी सलग तीन वर्षे गोल्ड मेडल मिळवून दिले. त्यानंतर एका आंतरराष्ट्रीय संस्थेची स्कॉलरशिप मिळाली. मुंबईला मी एमए पूर्ण केले. नादब्रह्म ग्रुपमध्ये मी पहिल्यांदा व्यावसायिक रुपात गाणे गायिले. कौटुंबिक कार्यक्रम, विवाह यांच्यासाठी ऑकेस्ट्रामध्ये मी गाणी गात होते. फुलले रे क्षण माझे हे माझे पहिले गाणे होते.

दरम्यान, माझा विवाह झाला. माहेरी मला चित्रपटातील किंवा इतर गाणी गाण्याची परवानगी नसे. त्यामुळे केवळ भक्तिगीत, भजने मी गात होते. मात्र, विवाहानंतर सिनेमाची गाणी गाण्यासाठी माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिले. मुलाला त्यांच्याकडे सोपवून मी गाऊ लागले. काही काळच मी छोट्या ऑकेस्ट्रामधून गायले. पण नंतर माझ्या आतला आवाज ते करण्यास नकार देऊ लागला. हे आपले उद्दिष्ट नाही तू नवे काहीतरी करायला पाहिजे, असा अंतर्नाद मला ऐकू येऊ लागला. २०१३ साली पहिल्यांदा मी ‘सदाबहार आशा’ हा माझा स्वत:चा असा मोठा थिएटर शो केला. माझे हे पहिले धाडसे पाऊल होते. रसिकांना माझी कला दाखवणे मोठे आव्हानात्मक काम होते, कारण मी अगदी नवोदित कलाकार होते. येथून माझ्या कलेला विस्तीर्ण क्षितीज मिळू लागले आणि मी नावारुपाला आले. या कार्यक्रमात मी आशाताईंची अनवट चालीपासून ते रंगिलापर्यंतची गाणी गायली. नवी, जुनी तब्बल ४० गाणी गायली. पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला होता. या कार्यक्रमाने माझ्या गाण्यात आणि पंखात चांगलेच बळ, आत्मविश्‍वास दिला. त्यानंतर अनमोल लता हा लतादिदींवरचा कार्यक्रमही प्रचंड लोकप्रिय झाला.

२०१५ साली भारतीय कला आणि संस्कती प्राचीन वारश्यांचे संवर्धन करणार्‍या मुक्तबोध संस्थेतर्फे मला अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये भारतीय बेसिक शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान तिथे माझे भक्ती संगीताचे कार्यक्रम झाले. भारतीयांव्यतिरिक्त विदेशी रसिकांनी माझ्या गाण्याचे तिथे खूप कौतुक झाले. आम्हाला या गाण्याचा अर्थ कळाला नाही, परंतु ते ऐकल्यावर आध्यातिक शांतीचा अनुभव मिळाल्याची त्यांची पावती मला खूप सुखावून गेली. ऑस्ट्रेलियातील माझा अनुभवही खूपच रोमांचकारी होता. शरद पोंक्षे यांच्याकडून मला सिडनी येथे जाण्याची संधी मिळाली. सावरकरांची गाणी तिथे झालीच पाहिजे, यासाठी मी तिथल्या महाराष्ट्र मंडळाला संपर्क केला. माझा बायोडाटा पाहून त्यांनी मला तिथे बोलवले.

तिथे मी सावरकारांची गाणी गाणार होेते. मला ऑस्टे्रलियन वकिलातीतून विजा येणार होता. परंतु माझ्यासोबत जे लोक जाणार होते त्यांचा विसा नाकारण्यात आला. तिकीटही कॅन्सल झाले, परंतु मला विसा मिळाला. मी एक दिवस आधी तिथे गेले. माझ्या सोबतच्या कलाकरांना येण्यास उशिरा झाला. त्यावेळी सहज रियाज करावा, आवाज चेक करावा म्हणून मागे उभा मंगेश हे गीत सुरू केले. हे गाणे मी सहज गायले. त्यानंतर टाळ्यांचा प्रचंड गरज मला ऐकू आला. सर्व कलाकारांना उशीर होणार म्हणून मला तिथल्या रसिकांनी गाण्यासाठी आर्जव केले. मुख्य कलाकार येईपर्यंत मी मराठी गीते गायली. त्यावेळी एक आजोबा उठले आणि म्हणाले ‘आता गीतरामायणातील रचना गा..’ माझ्यासाठी हे खूप मोठे आव्हान होेते. पण रसिकांची फर्माईश म्हणून मी ते पूर्ण केले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. त्या एका कार्यक्रमाने मला ऑस्ट्रेलियात ५ नवे कार्यक्रम मिळाले.

पं. अविराज तायडे, शंकराव वैरागकर, शरद घोडके, धनंजय धुमाळ या कलेत पुढे नेणार्‍या गुरुंसह माझे आध्यात्मिक गुरू स्वामी चिद्विलासानंद यांनी यांच्यामुळे मी कलेच्या हा प्रवास पाहत आहे. कीर्ती, प्रसिद्धी, पैसा यासोबत कलाकारांना एक भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असायला हवे असे मी मानते. माझे आध्यात्मिक गुरू गणेशपुरीचे स्वामी चिद्विलासानंद यांच्यामुळे माझे स्त्रोत्र, ऋचा वाणी अति बहरली. अशोक पत्की यांनी माझ्या आवाजातील गणपती अथर्वशीर्ष रात्री रेकॉर्ड करुन पाठवले. ते ऐकून मला फोन करत खूप मधूर आवाज आहे. तुझे हे स्त्रोत्र अप्रतिम आहे. यानंतर माझे संस्कृत श्‍लोकावरील जे कुठले प्रोजक्ट असतील ते फक्त तुलाच देणार आहे, असे सांगितले. नंदू होेनप यांनी हे स्त्रोत्र ऐकूण मला यासाठी किती तास लागले, याची विचारणा केली. मी तत्काळ उत्तर दिले, अर्धा तासात मी ‘वनटेक’ रेकॉर्ड केले. दिग्गजांच्या अशा प्रतिक्रिया येतात तेव्हा कामाचा हुरुप वाढतो.

आगामी काळात माझा हू बाई शेरणी नावाचा गुजराती अल्बम येत आहे. कलाकार म्हणून जडणघडण होत असताना मी सदैव डाऊन टू अर्थ राहते. कारण रसिकांमुळे कलाकार घडत जातो. त्यामुळे त्यांचे कान तृप्त करण्यासाठी जे काही करावे लागते ते आमचे कर्तव्य आहे. देशप्रेम हा माझा कधीही समोर न आलेला एक पैलू आहे. वाघाबॉर्डरला मी जेव्हा पहिल्यांदा भेट दिली तेव्हा तेथील सरहद्दीवर बंदोबस्त ठेवणारे जवान पाहून मी सुरक्षा कवच भेदून जवानांना भेटले आणि मला खूप रडू आले. पोलिसांनीही मला आडवले नाही. माझे देशप्रेम माझ्या गाण्याच्या प्रेमाइतकेच, श्‍वासाइतकेच सत्य आहे. ते कधीही कमी होणार नाही.

एक आठवण सांगते. लक्ष्मीकांत प्यारेलाल नाईट नावाचा माझा शो होता. ज्या दिवशी माझा शो होता, त्याच दिवशी खूप थकव्याने माझा आवाज गेला. ते थिमबेस सॉंग्ज होते. तिकीट विक्री झालेली असल्याने मला कार्यक्रम थांबवता येणार नव्हता. त्यावेळी मी स्टेरॉईडस्चे इंजेक्शनस् घेऊन गायले. एकदा धुळ्यात शो साठी जाताना अपघात झाल्यावर मोडलेल्या हाताला प्लास्टर घालावे लागले. ते घालून मी संपूर्ण कार्यक्रम पार पाडला.

गायन हा माझा श्‍वास आहे. या प्रवासात माझ्या पतीच्या सहकार्याशिवाय मला या क्षेत्रात कारकीर्द करता आली नसती. त्यांच्यासोबत माझे संगीतातले सर्व गुरू, आध्यात्मिक गुरू आणि ज्या रसिकांंनी मला नावारुपाला आणले त्या रसिकांचे माझ्या कलाकार होण्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांची कलेची तहान तृप्त करण्यासाठी मी बांधिल आहे. जीवन ही नदी आहे आणि कला ही त्यावरील रम्य पूल आहे, असे वि.स. खांडेकर यांनी म्हटले आहे. कलाकारांनी स्वत: कलेतून आनंद शोधताना इतरांच्या जीवनाचे सुरेल गाणे व्हावे, यासाठी कटिबद्ध असावे.

संगीतामार्फत जागतिक शांती आणि मानवतेच्या कार्यासाठी सिल्व्हर ऐज युट्यूपिअन नावाची संस्था कार्य करते. त्यामध्ये मी मानधन न घेता काम करणार आहे. त्यातून मिळणारा निधी मानवता, शांतीच्या कामी लागणार आहे. आजही वृद्धाश्रम, आदिवासी पाड्यावरील आश्रमशाळा, दिव्यांगांची वसतिगृहे येथे चॅरिटी शो करत असते.

स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग जर स्त्रीला करता आला नाही तर तो एक गुन्हा आहे, असे ओशो रजनिश यांनी म्हटले आहे. ते मी पूर्णत: मानते. स्त्रीने इच्छा शक्तीने स्वत:चे अस्तित्व निर्माण करत स्वत: सोबतच समाजाला मोठे करावे. कलाकारांनी स्वत: कलेतून आनंद शोधताना इतरांच्या जीवनाचे सुरेल गाणे व्हावे, यासाठी कटिबद्ध असावे.

(शब्दांकन : नील कुलकर्णी)

व्यवसाय शिक्षण ही काळाची गरज – सिद्धार्थ नेतकर

0
जळगाव । सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळत नाही. विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत असतांनाच त्यांच्या अभ्यासक्रमात व्यवसाय शिक्षण या विषयाचा समावेश करणे ही काळची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हापरिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी केले.

लेंड अ हॅण्ड इंडिया, प्रकाश चौबे व डॉन बॉस्को टेक यांच्यावतीने रामलालजी चौबे मुलींच्या विद्यालयात जिल्हास्तरीय कौशल्य विकास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान पुढे बोलतांना श्री. नेतकर म्हणाले की, व्यवसाय शिक्षणामुळे विद्यार्थी हे स्वावलंबी होत असतात.

भविष्याता विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेतांनाच त्यांना व्यवसाय अभ्याक्रमाला प्राधान्य दिले पाहिजे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर प्रदर्शनात जिल्ह्यातील दहा शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मल्टीस्किल, हेल्थकेअर, ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस आणि ऑटोमोबाईल्स या चार व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी तयार केलेेले मॉडेल्स याठिकाणी ठेवण्यात आले होते.

या मॉडेल्स बघण्यासाठी शहरातील शाळांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर मान्यवरांनी विद्यालयात तयार करण्यात आलेल्या ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेसच्या अद्यावत लॅबला भेट दिली. यानंतर वैभव चौधरी, नंदिनी सोनवणे, नंदिनी पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आयआयएसडीचे गोविंद पालवे, इंड्स कंपनीचे प्रविण पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेंड अ‍ॅण्ड हॅण्ड इंडियाचे विक्रम शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विवेक अळवणी यांनी केले. तर आभार जिल्हा समन्वयक विक्रम शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयाचे श्री. ढाके, सुनिता भोळे, साधना शिंदे, मनिषा पाटील, भारती चव्हाण, मनिष पाटील, दिपमाला लहासे, वेंकट खानपटे, अशा भोईटे यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे! – डॉ.उदय कुळकर्णी

0
जळगाव । विद्यार्थ्यानी आयुष्यातील विविध स्तरांवर यशश्वी टप्पे गाठून समाजाच्या आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी केले. मू. जे.महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे वर्षभरातील विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातून सुवर्णपदक विजेता सुहास वसावे यालाही याप्रसंगी गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते. यावेळी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.एन.तायडे, वाणिज्य शाखेचे समन्वयिका डॉ.कल्पना नंदनवार, विभागप्रमुख डॉ.महेश बडवे, डॉ.शोभा नेमाडे,डॉ.एन.एस.बोरसे, प्रा.डी.आर.वसावे उपस्थित होते.

डॉ.बडवे यांनी वर्षभरातील उपक्रम आणि स्पर्धांची माहिती प्रास्ताविकात दिली. डॉ.तायडे म्हणाले की, स्पर्धांमधून प्रेरणा घेवून स्वविकासासाठी प्रयत्न करावे. डॉ.ललित तायडे, प्रा.अमोल बावस्कर, प्रा.फकीर कोचूरे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन शुभांगी सोनवणे हिने तर आभार सायली पालीवाल यांनी मानले.

सत्कारार्थी विद्यार्थ्यांत निबंध स्पर्धेत (बीए प्रथम वर्ष)- प्रथम पूनम प्रदीप ठाकरे, द्वितीय प्रजापत सोनू कजोडमल, तृतीय नारसिंग हाना तडवी, (बीए गट) प्रथम गोपाल इंदल तंवर, द्वितीय भाग्यश्री संदीप पवार, तृतीय उषा प्रेमसिंग पावरा, (पदव्युत्तर एम.ए.गट) प्रथम शुभांगी संजय सोनवणे, द्वितीय अमर सुनील जोहरे, तृतीय चरणसिंग शांताराम राजपूत, (पदव्युत्तर बीकॉम गट) प्रथम पवनकुमार विष्णू पाटील, द्वितीय पूजा नांदेडकर, दिपाली बाविस्कर, (पदव्युत्तर एम.कॉम गट) प्रथम सचिन आहुजा यांचा समावेश आहे. तर भित्तीपत्रक स्पर्धेत (बीए प्रथम वर्ष) प्रथम राधिका सोनवणे, द्वितीय रुपाली सोनवणे, (बीए गट) प्रथम गोपाल तंवर, द्वितीय अशोक पावरा, तृतीय संदीप चव्हाण, (पदव्युत्तर गट) प्रथम प्रकाश राठोड, द्वितीय मयुरी पाटील, पीपीटी स्पर्धेत (बीए प्रथम वर्ष) प्रथम राधिका सोनवणे, (बीए तृतीय वर्ष) प्रथम भाग्यश्री देवरे, द्वितीय गोपाल तंवर, (पदव्युत्तर गट) प्रथम वैभव बोरनारे, द्वितीय तेजस्विनी व अश्विनी नाना बारी, तृतीय शुभांगी संजय सोनवणे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

Social Media

23,277FansLike
4,903FollowersFollow
455SubscribersSubscribe
error: Content is protected !!