जळगाव जिल्ह्यातील 40 ग्रामसेवक दप्तर घेऊन फरार

0
जळगाव । जिल्ह्यातील तब्बल 40 ग्रामसेवक दप्तर घेऊन फरार असल्याची धक्कादायक माहिती आ. संजय सावकारे, आ. उन्मेष पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिशा समितीच्या सभेत निदर्शनास आणून दिली. दरम्यान हा प्रकार अत्यंत गंभीर असुन संपुर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांना दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीची सभा आज खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा ना. उज्वला पाटील, आ. स्मिता वाघ, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. चंदूलाल पटेल, आ. हरीभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर आदी उपस्थित होते.

ग्रामसेवक नसल्याचे योजना रखडल्या
जिल्ह्यात 50 टक्के ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ज्यांना नियुक्ती दिली जाते ते नियुक्त होत नाही. जवळपास 40 ग्रामसेवक दप्तर घेऊनच फरार असल्याने शासकीय योजना रखडल्या आहेत. अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे सरकार बदनाम होत असल्याची खंत आमदारांनी सभेत बोलुन दाखविली.

समांतर रस्त्याच्या विषयावरून काथ्थ्याकुट
जळगावकरांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या समांतर रस्त्याच्या प्रश्नावर दिशा समितीच्या सभेत चांगलाच काथ्थ्याकुट झाला. 144 कोटी रूपयांचा डिपीआर मंजूर असुन यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही आदेश नसल्याची माहिती नहिच्या अधिकार्‍यांनी दिली. या सभेत देखिल समांतर रस्त्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही.

शिवाजीनगर पुलाचे काम जानेवारीत सुरू होणार
दिशा समितीचे अध्यक्ष खा. ए.टी.पाटील यांनी रेल्वेच्या अधिकार्‍यांना शिवाजी नगर उड्डाण पुल, पिंप्राळा आणि आसोदा उड्डाण पुलाविषयी जाब विचारला. शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यापुर्वी पर्यायी रस्त्यासाठी लेंडी नाल्याची उंची वाढविण्याचे काम सुरू असुन जानेवारीपर्यंत शिवाजीनगर उड्डाणपुलाचे प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच पिंप्राळा आणि आसोदा हे दोन्ही उड्डाणपुल आता एमआरआयडीसीकडे वर्ग झाल्याने रेल्वे प्रशासनाला आता यात काम करता येणार नसल्याचे सांगुन वेळ मारून नेली.

24 तास विमानसेवेसाठी प्रयत्न
जळगाव, कोल्हापुर, मुंबई, येथुन एकाचवेळी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात ही सेवा कोलमडली. एयर डेक्कन या कंपनीची आर्थिक परीस्थीती खराब झाल्यानेच ही सेवा कोलमडल्याचे खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी सभेत सांगितले. त्यामुळे नव्याने ही सेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांशी चर्चा झाली असल्याचे ते म्हणाले. तसेच केंद्र सरकारच्या आदेशानुसार जळगाव येथुन 24 तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असुन त्यासाठी नशिराबाद येथील जुना रस्ता बंद करून झाडांची उंची कमी करण्याचे काम महिनाभरात सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

31 मार्चपर्यंत काम पुर्ण होणार
विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी विकास चंद्रा यांनी दि. 31 मार्चपर्यंत 24 तास विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती सभेत दिली.

दिवेकरांची झाडाझडती
जिल्ह्यात ग्रामसेवकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी सदस्यांसह आ. उन्मेष पाटील, आ. संजय सावकारे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. हरीभाऊ जावळे यांनी खा. ए.टी.पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यावर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आमदारांसह खासदारांनी तीव्र संताप व्यक्त करीत संपुर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिवेकरांना दिले.

अधिकार्‍यांच्या दांड्या
खा. ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यापुर्वी दोन वेळा दिशा समितीची सभा झाली. नेहमीप्रमाणे आज झालेल्या सभेला देखिल बहुतांश अधिकार्‍यांनी दांडी मारली. लोकप्रतिनीधींना किंमत नसल्याचे चित्र दांडी बहाद्दर अधिकार्‍यांच्या माध्यमातुन दिसून आले. अधिकार्‍यांच्या या दांड्यावरून खा.ए.टी.पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनीधींनी तीव्र संताप व्यक्त केला.

साईडपट्ट्यांचा 15 कोटीचा प्रस्ताव रवाना
शिवसेनेचे आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सभेत महामार्गाला लागून असलेल्या साईडपट्ट्यांच्या कामाबाबत विचारणा केली. त्यावर सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार साईडपट्ट्यांच्या कामासाठी 15 कोटी रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कार्यादेश दिले जाणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

अखेर पोलीस बंदोबस्तात नाऊर बंधार्‍यातून पाणी सोडले!

0

आ. कांबळे व सभापती पटारे यांच्या मध्यस्थीने अखेर आंदोलन मागे

नाऊर/मातुलठाण (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील कोल्हारपूर पध्दतीच्या बंधार्‍यावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या संयमी समन्वयी भूमिका तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवर चर्चा करून आ. भाऊसाहेब कांबळे व सभापती दीपक पटारे यांनी शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात घडवून आणलेल्या मध्यस्थीनंतर काल दुपारी 4 वाजता बंधार्‍यातून पाणी सोडण्यात आले. येथील बंधार्‍यातील पाणी कुठल्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती.

त्यामुळे प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार असा शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेत बंधार्‍यावर ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ अशी भूमिका घेतल्याने पाटबंधारे अधिकार्‍यांनी पाणी सोडण्याचा शासनाचा आदेश असल्यामुळे पाणी सोडावे लागणार, असे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. अखेर आ. भाऊसाहेब कांबळे व सभापती दीपक पटारे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी शेतकरी व पाटबंधारे अधिकारी यांच्याशी समन्वय करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

आ. भाऊसाहेब कांबळे म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसांपासून शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहे. याची कल्पना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व पाटबंधारेचे अधिकारी एस. टी. गायधने यांना आहे. अधिकारी व शेतकर्‍यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने या विषयावर चर्चा करून मार्ग निघाला आहे. या विषयावर आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने आहे. याप्रश्नी काल आम्ही मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी काळात या बंधार्‍यांना राखीव पाणी मिळावे म्हणून प्रयत्नात रहावे लागेल, असेही आ. कांबळे म्हणाले.

सभापती दीपक पटारे म्हणाले, आमच्या हक्काचे पाणी कधी मिळणार? जसे जायकवाडीला पाणी सोडले जाते तसेच या बंधार्‍यांना हक्काचे पाणी मिळायला पाहिजे. बंधार्‍यात थोडेफार पाणी आहे हे पिण्यासाठी व जनावरांसाठी लागणार आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकार्‍यांनी वरिष्ठांना कळविले पाहिजे. तर पाणी प्रश्‍नावर भविष्यकाळात शेतकर्‍यांनी संघटित राहण्याची गरज आहे. पाण्याच्या विषयावर आमदार कांबळे व मी सातत्याने ना. विखे पाटील यांच्याशी तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केल्यामुळे आज तोडगा काढण्यात यश आले आहे. यापुढील काळात देखील शेतकर्‍यांबरोबर खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पटारे यांनी दिले.

बंधार्‍याला पोलीस छावणीचे स्वरूप
याप्रसंगी बंधारा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे रजेवर असताना देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः दिवसभर ठाण मांडून होते. त्यांच्या समवेत तहसीलदार सुभाष दळवी होते. वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरचे पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, तालुकाचे प्रभारी पी.आय. गोविंद ओमासे यांच्यासह 6 पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाची 1 तुकडी, लेडीज आर.सी.बी. (दंगल नियत्रंण) दलाची 1 तुकडी, सुमारे 6 पोलीस कर्मचार्‍यांचा ताफा बंधारा परिसरात होता. तसेच वैजापूरकडील भागातून देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

2005 च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून आमच्या भागातील बंधार्‍यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी नगर जिल्हातील शिर्डी मतदारसंघातील सात आमदार व एक खासदार तसेच नदीकाठच्या वीस ते पंचवीस राजकारण विरहित समिती करून सुप्रिम कोर्टात जावे लागणार आहे. जसे शहरांसाठी पिण्याचे पाणी राखीव केले जाते तसेच नदीवरील बंधार्‍यांनाही हे रिजर्वेशन दिले पाहिजे. यासाठी आपण सर्व मिळून लढा उभा करू. कारण या वर्षानंतर पाऊस कमी झाला तर प्रत्येक वर्षी पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. मी स्वःत खासदार म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून येथे आलो आहे आगामी काळात मी तुमच्या पाठीशी आहे.
खासदार सदाशिव लोखंडे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

0
जळगाव । शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना शिवसेना महानगरच्या वतीने महानगरपालिकेसमोर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. तसेच गरजूंना कांबळ वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जळगाव विधानसभा संपर्कप्रमुख समाधान पाटील, महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, गटनेता अनंत जोशी, यांसह शिवसेनेचे नगरसेवक माजी महापौर नितीन लढ्ढा, प्रशांत नाईक,

विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे तसेच शिवसैनिकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात 51 गरजू नागरिकांना कांबळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासेना उपशहर प्रमुख पियुष गांधी, महेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

जळगावात श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शहरात उद्या रथोत्सव

0
जळगाव । जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपर लाभलेले श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे प्रभू श्रीराम रथोत्सव कार्तिक प्रबोधिनी एकादशीला दि. 19 रोजी साजरा होणार आहे. हा रथोत्सवाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून रथाच्या स्वागतासाठी भाविक देखील सज्ज झाले आहे. त्यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीराम रथोत्सवाला गेल्या 146 वर्षांची थोर पंरपरा लाभलेली आहे. दरम्यान रथोत्सवाच्या दिवशी पहाटे 4 वाजता काकड आरती, प्रभु श्रीरामांच्या उत्सवमूर्तीचा महाअभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर मंदिराचे गादीपती हभप मंगेश महाराज यांच्या हस्ते रथाचे विधिवत पुजन करून ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात व प्रभु श्रीरामांच्या निनादात श्रीराम रथोत्सवाला दुपारी 12 वाजता प्रारंभ होणार असून रात्री 12 वाजता रथोत्सवाची सांगता होणार आहे.

याप्रसंगी जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन, आ.एकनाथराव खडसे, माजी आ.सुरेशदादा जैन, खा. ए.टी. पाटील, आ.स्मिता वाघ, आ.राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, सभापती जितेंद्र मराठे, भागवत भंगाळे, भालचंद्र चौधरी, अ‍ॅड. सुशिल अत्रे, श्रीकांत खटोड, वामनराव खडके, डॉ.उल्हास पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एन.चव्हाण, डॉ.अर्जुन भंगाळे, डॉ.सी.बी.चौधरी, राजेश यावलकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहिल.

मुस्लीम बांधवांतर्फे होणार रथाचे स्वागत
ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोवाच्या समितीकडून भिलपुरा चौकातील लालशाहबाबा यांच्या समाधी स्थळावर चादर चढविण्यात येते. तर त्या ठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

महापौरांनी केली रथाच्या मार्गाची पाहणी
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे सोमवारी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी रथाला बाहेर काढुन स्वच्छ पाण्याने धुण्यात आले. तसेच रंग-रंगोटीलादेखील सुरुवात करण्यात आली असुन नवीन मोगरी करण्याचे कामदेखील सुरु आहे. दरम्यान सकाळी महापौर सीमा भोळे, नगरसेवक डॉ.विश्वनाथ खडके, सुनिल खडके यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी रथाच्या मार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर महापौरांनी ज्या-ज्या रस्त्यांवर खड्डे असतील ते खड्डे त्वरीत बुजविण्यासाठी अधिकर्‍यांना सूचना केली आहे.

‘उमेदवारी दाखल करण्यास मुदत वाढ द्या’

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल करण्यात येत आहेत. मात्र, अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्याने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करताना अडचणीला समोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारी दाखल करण्यास एक दिवसाची मुदत वाढ द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी केली आहे. राज्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्तांना याबाबत राठोड यांनी पत्र पाठविले आहे. यात दि.16 आणि 17 रोजी सर्व्हर डाऊन असल्याने उमदेवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता आलेला नाही. अन्य दिवशी सर्व्हर डाऊनच्या काराणामुळे निवडणुकीत उमेदवारांना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागत आहे. यामुळे उमदेवारांची गैरसोय टाळण्यासाठी निवडणुक आयोगाने उमदेवारी दाखल करण्यास एक दिवसाची वाढ द्यावी, अशी राठोड यांची मागणी आहे.

इच्छुकांमुळे भाजपा बेजार

0

इच्छुकांच्या दबावामुळे यादी रखडली; रात्री उशिरापर्यंत खलबते

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन गटांतील वाद कसे तरी शमवून एक दिलाने कामाला लागलेल्या भाजपपुढे आता उमेदवारी वाटप करतानाची डोकेदुखी उभी राहिली आहे. विद्यमान नगरसेविकेच्या पतींनीही रिंगणात उतरण्याची तयारी केल्याने भाजपसमोर पेच उभा राहिला आहे. भाजपने मुलाखती घेताना जोरदार वातावरण तयार केले. कधी नव्हे एवढी, इतर पक्षांच्या तुलनेत भव्य गर्दी जमवत मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली. सर्व पक्षांच्या मुलाखती एका दिवसात उरकल्या असताना भाजपच्या मुलाखतीला एक दिवस वाढवून द्यावा लागला. त्यावेळी झालेली गर्दी पाहून उमेदवारी वाटप करताना बरीच कसरत करावी लागणार, याचा अंदाज भाजप नेत्यांना आला होता.

मुलाखतीनंतर प्रत्येक दिवस रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या बैठका सुरू आहेत. उमेदवारी निश्‍चित करताना निवडणुकीसाठी नियुक्त केलेली समितीचे सदस्य, प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर, निवडणुकीवर खास लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेले रघुनाथ कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत या बैठका होत आहेत. कार्यकर्त्यांचा कोंडाळ कमी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत या मुलाखती चालतात. असे असूनही आतापर्यंत 15 उमेदवार असलेली एकच यादी भाजप निश्‍चित करू शकला. दुसरी यादी तयार करून ती पक्षाकडे पाठविण्यात आल्याचे समजते. मात्र गोंधळ होऊ नये म्हणून सर्व उमेदवार एकाचवेळी जाहीर करण्याचा विचार पक्षात आहे. जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत बंडखोरीची लागण झाल्याने पक्ष सावध झाला आहे. सावेडी उपनगर मंडलाचे अध्यक्ष बाळासाहेब गांकवाड यांनीच बंडखोरीची भाषा केल्याने त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवाय इतर जाहीर झालेल्या उमेदवारांच्या प्रभागांतही अनेक अड़चणी आहेत. समोरचे उमेदवार पाहून काहींनी अचानक महिला आरक्षणाच्या जागेवर उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच विद्यमान नगरसेविका असतानाही आणि पक्षाने त्याच उमेदवार असल्याचे गृहित धरलेले असताना अचानक त्यांचे पती स्वतःसाठी उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही झाले आहेत.

 

बंद पडलेले रस्त्याचे काम पूर्ववत सुरू

0
श्रीरामपूर-बेलापूर ते राहुरी ङ्गॅक्टरी रस्ता डगडुजीचे सुरू असलेले काम.

‘सार्वमत’च्या वृत्ताची दखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर-बेलापूर ते राहुरी ङ्गॅक्टरी या अतिवर्दळीच्या रस्त्याच्या डागडुजीचे बंद पडलेले काम पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथा यांनी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त दैनिक सार्वमतमध्ये प्रसिध्द होताच श्रीरामपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम हाती घेतले आहे.

श्रीरामपूर-बेलापूर ते राहुरी ङ्गॅक्टरी हा रस्ता नगर-मनमाड या राष्ट्रीय मार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मध्यंतरी कोल्हार येथील प्रवरा नदी पुलाची समस्या निर्माण झाल्याने नगर-मनमाड रस्त्यावरची वाहतूक बेलापूर मार्गे वळविण्यात आली. त्यामुळे अवजड वाहने या रस्त्यावरून गेल्याने रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली होती. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले पण काही अंतराचे काम पूर्ण झाल्यावर काम बंद करण्यात आल्याने वाहनचालक तसेच प्रवाशांमध्ये नाराजी होती.त्यामुळे या रस्त्याचे डागडुजीचे काम पूर्ववत सुरू करण्याबाबत ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची दखल घेत तातडीने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

जिल्हा प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुनील मुथा, सादिक शेख, साहेबराव गायकवाड, गियासुद्दीन सय्यद, सुधाकर तनपुरे, जिना शेख, रंगा काळे, राजू शेख आदींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याप्रमाणेच आता राहुरी विभागाच्या हद्दीतील नर्सरी ते राहुरी ङ्गॅक्टरी दरम्यानच्या रस्त्याची डागडुजीही त्वरित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

आघाडीच्या चर्चेत जागांचा खोडा

0

काही जागांवर आग्रह धरल्याने जागा वाटपाचा तिढा सुटेना

अहमदनगर (प्रतिनिधी) – आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत दुसर्‍या एका युवा नेत्याने काही जागांवर आग्रह धरल्याने आघाडीवरील शिक्कामोर्तब रखडले आहे. त्यामुळे काँग्रेसने विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचे समजते.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीची बोलणी सुरू होण्यास विलंबाने मुहूर्त लागला. काँग्रेसमधील थोरात गट आणि शहरातील राष्ट्रवादीचे नेते यांच्यात सख्य नसल्याने बोलणी करायची कोणी, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. काँग्रेसने सुरुवातीला महापालिका निवडणुकीचे समन्वयाचे काम प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे दिले होते. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळत ऩसल्याने बोलणी खुंटली होती.

बोलणी सुकर होऊन आघाडी व्हावी, यासाठी मुंबई येथे झालेल्या बैठकीत बोलणीचे अधिकार युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत जागा वाटपाबाबत चर्चाही सुरू केली होती. विखे पाटील यांचे शहरातील समर्थक आमदार जगताप यांचेही समर्थक असल्याने ही बोलणी सुरळीत पार पडून जागा वाटप व उमेदवार निश्‍चित होतील, असा अंदाज होता. मात्र त्यातही अनेक अडथळे येऊ लागले आहेत.

राष्ट्रवादीने प्रभाग 11 आणि 12 प्रतिष्ठेचे केले आहेत. मात्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या प्रभागातही जागांची मागणी केली आहे. विखे पाटील-जगताप यांच्या बोलणीत काँग्रेसकडून आलेल्या यादीवर चर्चा होते. तांबे यांनी सांगितलेल्या जागा काँग्रेसची भूमिका मानली जाते. त्यामुळेच चर्चेत अडथळा ठरत असल्याचे सांगितले जाते. प्रभाग 11 मध्ये मागील निवडणुकीत काँग्रेसच्या महिला उमेदवार सुवार्ता वाघमारे या क्रमांक दोनवर होत्या. त्यामुळे यावेळी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखील असलेली जागा मिळावी, असा तांबे यांचा आग्रह असल्याचे समजते. तसेच माळीवाडा परिसराचा समावेश असलेला प्रभाग 12 मध्येही जागेची मागणी लावून धरण्यात आलेली आहे. या दोन्ही प्रभागातील सर्व उमेदवार राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचे केले असल्याने त्यांची या प्रभागात जागा सोडण्याची तयारी नाही.

आघाडी व जागा वाटप जाहीर होण्यास मुहूर्त लागत नसल्याने दोन्ही काँग्रेसमधील इच्छुक अस्वस्थ आहेत. राष्ट्रवादीच्या मुलाखती होऊन दोन दिवस उलटले तरीही पक्षाकडून ठोस असा निरोप नसल्याने सर्वच इच्छुक हवालदिल झाले आहेत. काँग्रेसमध्येही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी पक्ष आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवले आहेत. काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवण्याचे निरोप आज देण्यात आले असल्याचे समजते. काँग्रेसचे विद्यमान महापालिकेत 11 नगरसेवक होते. त्यातील संजय लोंढे आणि मुदस्सर शेख हे पक्षात नाहीत.

शहराचा प्रमुख पदाधिकारीच दूर
महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची बोलणी होत असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना चर्चेपासून दूर ठेवण्यात आले आहे. पक्षाची सद्यस्थिती, आवश्यक जागा, निवडून येतील अशा जागा असा सविस्तर अहवाल त्यांनी प्रदेश काँग्रेसला सादर केलेला आहे. मात्र त्यांचा अहवाल बाजूला ठेवला असला तरी त्या अहवालात नमूद केलेल्यांपैकी काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसमधील एक गट प्रयत्नशील आहे.

Social Media

26,893FansLike
5,154FollowersFollow
1,354SubscribersSubscribe
error: Content is protected !!