शब्दगंध- रविवार, 18 नोव्हेंबर 2018

0

लोकसभा निवडणुकीसाठी हवे 25 हजारी मनुष्यबळ

0

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

अहमदनगर (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक यंत्रणेने आवश्यक माहिती आणि निवडणुकीत संबंधित विभागावर सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज राहावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातून 25 हजार मनुष्यबळाची गरज भासणार असून सर्व शासकीय विभागांनी ते उपलब्ध करून द्यावेत असे आदेश द्विवेदी यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अरुण आनंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे व संदीप आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून एकूण 3 हजार 722 मतदान केंद्रे आहेत. निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कामकाजासाठी आणि व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार असून किमान 25 हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची गरज आहे. मनुष्यबळ व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, निवडणूक प्रशिक्षण, निवडणूक खर्च देखरेख व्यवस्थापन, संपर्क आराखडा व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, संगणकीकरणस, माध्यम व्यवस्थापन, मतदार मदत व तक्रार निवारण कक्ष, मतदार जनजागृती अशा विविध बाबींचे तपशीलवार नियोजन करण्यात येत आहे.

त्यासाठी विविध वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामकाज करण्याकरिता विविध विभागांकडील अधिकारी-कर्मचारी वर्ग घेण्यात येणार असून त्यासाठी संबंधित विभागांकडून अधिकारी-कर्मचार्‍यांची माहिती मागविण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) आनंदकर यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी तयारी कशा प्रकारे करण्यात येत आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे उपस्थितांना सांगितले. तसेच निवडणूक कामकाज सोपवण्यात आले असेल तर ते गांभीर्याने पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोणत्याही यंत्रणेने मनुष्यबळाची निवडणूक कामकाजासाठी मागणी केल्यास तात्काळ पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. निवडणूक कामकाज प्रक्रिया पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न असून सर्व विभागांना त्यांच्या अधिकृत ई-मेलवर वेळोवेळी माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

दहातोंडेंनी मुख्यमंत्र्यांना कसे गाठले ?

0

नेवासा तालुक्यातील प्रश्‍न : स्थानिक राजकारणावर परिणामाची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – शनिशिंगणापूर येथे नुकत्याच झालेल्या शेतकरी-वारकरी संमेलनाने राजकारण ढवळून काढले आहे. नेवासा तालुक्याच्या राजकारणातून जवळपास बाहेर फेकल्या गेलेल्या संभाजी दहातोंडेंवर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्‍वास आणि त्यामुळे काहींच्या पोटात उठलेला भीतीचा गोळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलतील अशी शक्यता व्यक्त होत असून ‘फिल्डिंगबाज’ दहातोंडेंनी मुख्यमंत्र्यांना कसे गाठले, या प्रश्‍नाने अनेकांवर टोपीखालील डोके खाजवण्याची वेळ आणली आहे.

गुरुवारी शनिशिंगणापूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी-वारकरी मेळावा झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाने या मेळाव्याचे आयोजन केले होते. 1 डिसेंबरला आरक्षणाबाबत जल्लोष साजरा करा, असा संदेश राज्यातील मराठा बांधवांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्याची निवड केली. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन या मातब्बर मंत्र्यांनी तब्बल चार तास या मेळाव्यासाठी दिले. त्यामुळे सरकार पातळीवर या मेळाव्याचे महत्त्व अधोरेखीत झाले. मात्र आता हे घडून कसे आले, या प्रश्‍नाने उचल खाल्ली आहे.

वारकरी सांप्रदायातील महत्त्वाचे नाव आणि पंढरपूरच्या चारोधाम ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी दोन वर्षापासून राज्यातील शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी वारकरी-शेतकरी समन्वयाची चळवळ सुरू केली आहे. या चळवळीला या मेळाव्याने बळ दिले आहे. मात्र शनिशिंगणापूरचा हाच मेळावा आता राजकीय अंगाने विकसीत होण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री येणार का, निधी कोण देणार असे प्रश्‍न उपस्थित झाले होते. मात्र मुख्यमंत्री केवळ उपस्थितच राहीले नाहीत, तर सर्व ताकद त्यांच्याकडूनच लावण्यात आल्याचे समोर आल्याने या मेळाव्याचे संदर्भ बदलले आहेत.
मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. ते वगळता अन्य कोणताही राजकीय संदर्भ या मेळाव्याला नव्हता. दहातोंडे राजकारणातून जवळपास बाद झाल्याचे म्हटले जात होते. कधीकाळी ते राष्ट्रवादीतील अनेकांचे खास होते. ‘त्या’ खास नेत्यांचे औचित्य संपल्यावर दहातोंडेंच्या राजकारणालाही उतरती कळा लागली. मात्र या मेळाव्याने त्यांनाही चर्चेत आणले आहे.

दहातोंडे मुख्यमंत्र्यांच्या जवळ कसे गेले आणि याचे राजकीय परिणाम काय असतील, असा प्रश्‍न समोर आला आहे. काहींच्या मतानुसार दहातोंडेंनी मुख्यमंत्र्यांना गाठलेे. तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी यंत्रणा कामाला लावून दहातोंडेंची निवड केली, असाही एक मतप्रवाह आहे. शनिशिंगणापूरच्या मेळाव्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची संपूर्ण काळजी मुख्यमंत्र्यांच्या टिमकडून घेण्यात आल्याची चर्चा आहे. राज्यातील शेतकरी आणि विशेषत्वाने मराठा समाज दूरावत असल्याने त्यांना जवळ करण्यासाठी एखादी समाजिक चळवळ राबविण्याचे धोरण आखण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना गुजरातेतील एका मातब्बर मराठा नेत्याने दिला होता. हा नेता म्हणजे सुरतचे खासदार सी.आर.पाटील असल्याचे म्हटले जात आहे. गुजरातच्या व्यापारी वर्तुळात ‘सीआर’ नावाने परिचित असलेले खा.पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या खास वर्तुळातील आहेत.

मोदींच्या चर्चित सुटचा लिलाव करणारे नेते म्हणजे हेच सीआर! ते मुळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचे रहिवासी. काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शालक सुभाष देसले यांचे व्याही. त्यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनीही गंभीरपणे घेतला. मात्र यासाठी व्यासपीठ आणि कार्यकर्त्याची गरज होती. तनपुरे महाराजांची चळवळ आणि मराठा महासंघ यासाठी उपयुक्त ठरेल, याकडे लक्ष वेधण्याचे कामही त्यांनीच केले असे म्हणतात. याच ‘सीआर’ यांचे कार्यकर्ते म्हणवून घेण्यास संभाजी दहातोंडे यांना आवडते. यावरून पडद्याआड काय झाले असेल, हे समजून घेणे सोपे होते. त्यांच्या शनीदर्शनाची व्यवस्था करण्याचे काम गेली अनेक वर्षे दहातोंडे सांभाळत असल्याची माहिती आहे. आपला हाच कार्यकर्ता त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या खास गोटात पोहचवला आणि मुख्यमंत्र्यांनी आपली यंत्रणा कामाला लावून त्याची उलटतपासणी करून घेतली, असे म्हटले जाते.

या घडामोडींमुळे अचानक दहातोंडे चर्चेत आले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या महत्त्वाने अनेकांना धक्का दिला आहे. याचे परिणाम नेवासे तालुक्यातील राजकारणावर तर होणार नाहीत, अशी चर्चा फुटली आहे. दहातोंडे राजकारणातील जागा मजबुत करण्यासाठी याचा वापर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सढळ हस्ते निधी दिला तशी राजकीय ताकदही देतील का, असा प्रश्‍न समोर आला आहे. यासाठी काहींनी कार्यक्रमानंतरच्या एका घटनेकडे लक्ष वेधले आहे. हेलिपॅडकडे जाताना मुख्यमंत्र्यांच्या गाडीत मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि राम शिंदे बसले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दहातोंडे यांना बोलावून गाडीत जागा दिली. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्याच्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका नेत्याला त्यांनी मागच्या गाडीत पाठवले. रवानगी झालेला हा नेता कोण, याचाही शोध राजकीय चर्चेतून घेतला जात आहे. ज्यांनी हे दृश्य पाहिले, त्यांना योग्य ते संकेत मिळाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, प्रवासात मेळाव्यासाठी कोणी, किती शेतकर्‍यांना आणले, याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते.

निवडणुकीला अद्याप अवकाश
आपण सध्या राज्याच्या सामाजिक प्रश्‍नांवर काम करीत आहोत. शेतकरी-वारकरी मेळावा हा त्याचाच भाग आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यात आणखी मेळावे होणार आहेत. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी जागृती करण्यासाठी या चळवळीचा उपयोग होईल, असा मुख्यमंत्र्यांनाही विश्‍वास आहे. त्यामुळे कोणी मदत केली, कशा पद्धतीने केली हा मुद्दा गौण आहे. याचा राजकीय अर्थही कोणी काढू नये. निवडणूका अद्याप लांब आहेत. त्यामुळे राजकीय वाटचालीवर आताच बोलणे संयुक्तीक नाही, असे संभाजी दहातोंडे यांनी सांगीतले. 

सांडपाण्याच्या वापरातून वीजनिर्मिती!

0
भुसावळ । राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यात विजेची मागणी नियमित आहेच, विज निर्मिती थांबवू शकत नाही. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणात जे पाणी आहे त्यावर दिपनगरसाठी कमी आरक्षण आहे.

त्यामुळे विज निर्मितीसाठी लागणारे पाणी उपलब्ध करण्यासाठी शहराच्या सांडपाण्यावर प्रक्रियाकरून ते विज निर्मितीसाठी वापर करण्याचा तसेच रेल्वेच्या सांडपाण्याच्या शुध्दीकरण प्रकल्पातील पाणी घेण्याचा विचार सुरू आहे. पुढील काळात मोठी स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळे ज्याची विज किंमत कमी असेल तेथुनच विज विकत घेता येईल. यासाठी प्रकल्पात सोलर प्रोजेक्ट उभा करून विज निर्मितीची किंमत कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती दीपनगर प्रकल्पाचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी दिली.

ते दि.17 रोजी दीपनगर प्रकल्पात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दिपनगर येथील यंत्रणा सर्वात चांगली असुन या ठिकाणी कामगार स्वत:ला झोकुन काम करतात. त्यामुळे हा प्रोजेक्ट आजपर्यंत सर्वात चांगल प्रोजेक्ट म्हणुन पुढे आहे. या ठिकाणी विज निर्मितीला दररोज 4 रॅक कोळसा लागतो.

मात्र सध्या 3 रॅक उपलब्ध होत आहे. त्यामुळे याठिकाणी निर्माण होणार्‍या विजेची किंमत जास्त आहे. भविष्यात विज किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न आहे. सुरुवातीला प्रकल्पातील समस्या दुर करण्यावर भर देणार आहे. याचबरोबर यावर्षी दिपनगरसाठी पाणी आरक्षण कमी आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी एक प्रकल्प हाती घेत आहे की, जळगाव शहराचे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरात आणणार आहे.

याच बरोबर भविष्यात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या 100 एकर मध्ये सोलर प्रोजेक्ट लावणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विजनिर्मितीचे किंमत कमी होणार आहे. कोळश्यावर विज निर्मितीसाठी 2.90 पैसे किंमत पडते. मात्र सोलरवरील विजनिर्मिती साठी 2.72 पैसे किंमतीत पडणार आहे. त्यामुळे विजेची किंमत कमी होणार आहे.

दक्षिणेच्या उमेदवारीस सक्षम

0

काँग्रेसकडे डॉ. सुजय विखेंची अधिकृत मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी आपण इच्छुक असून त्यासाठी सक्षमही आहोत, अशी अधिकृत भूमिका प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पक्षाकडे मांडली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटप आणि अदलाबदलीचा घोळ मिटलेला नसल्याने दक्षिणेच्या जागेवरील राजकीय सस्पेंस कायम आहे. आजपर्यंत त्यांचे समर्थक कार्यकर्ते त्यांच्या उमेदवारीची मागणी करत होते. आता स्वत: डॉ. विखे यांनीच पक्षाकडे दावा दाखल केला आहे.

मुंबईत राज्यातील सर्व 48 मतदारसंघाचा आढावा आणि ईच्छुकांशी चर्चेचे सोपस्कार काँग्रेसने तीन दिवसात पार पडले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांनी मतदारसंघनिहाय चाचपणी केली. दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ.सुजय विखे पाटील यांनी अधिकृत दावा दाखल केला. यावेळी काँग्रेसच्या समितीसमोर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आपण ईच्छुक असून सक्षम उमेदवारही असल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यान, यासोबत पक्षाकडे उमेदवारी मागणीची अधिकृत प्रक्रीया त्यांनी पार पाडली. त्यांच्याशिवाय अन्य कोणीही या खुल्या मतदासंघातून उमेदवारीची मागणी केली नाही.

ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र राज्यातील काही मतदारसंघ अदलाबदलावर दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत. औरंगाबाद, पुणे मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा आहे तर अहमदनगर मतदारसंघासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र याबाबत एकमेकांवर दबावाचे राजकारण सुरू असल्याने निर्णय लांबणीवर पडला आहे. हा घोळ उमेदवारी दाखल करण्यापर्यंत लांबणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेवारांनी आपली तयारी सुरू केली आहे. दक्षिण मतदारसंघात डॉ.सुजय विखे पाटील यांनी जानेवारी 2018 पासून नियोजनपूर्वक काम सुरू केले आहे. उमेदवारीच्या अंतिम टप्प्यातील कामे त्यांनी सुरू केली आहेत. त्याच प्रक्रीयेचा भाग म्हणून त्यांनी पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली. हा सोपस्कार असला तरी चित्र स्पष्ट करण्यासाठी ते महत्त्वाचे मानले जात आहे.

आता नगरही!
दरम्यान, अहमदनगर महापालिका निवडणुकीची भुमिका काँग्रेसकडून एकदाची स्पष्ट झाली आहे. आधी या निवडणुकीसाठी युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे समन्वयक असतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता महापालिका निवडणुकीची जबाबदारीही डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या बैठकीआधीच डॉ.विखे यांनी नगरमध्ये राष्ट्रवादीशी आघाडीबाबत चर्चा आणि जागावाटपाचा फॉम्यूला निश्‍चित केला, हे विशेष. विखे-थोरात गटाच्या समन्वयाने हा निर्णय झाल्याचे म्हटले जाते.

फराळ आणि निरोप आधीच !
मध्यंतरी विखे परिवाराकडून ‘दिवाळी फराळ’ वाटप झाले. तब्बल 30 हजार सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना याद्वारे संपर्क आणि निरोप पोहोचविण्याचे काम करण्यात आले. फराळ तयार करण्यासाठी खास ‘नागपुरी’ हलवायाची निवड करण्यात आली होती. त्यालाही पहिल्यांदाच एवढी मोठी खासगी आर्डर मिळाली. दरम्यान, फराळ वाटपातून आचारसंहितेमुळे नगर शहर वगळण्यात आले होते, अशी माहिती आहे. खास विखे शैलीत निरोप पोहोचविण्याचे काम या ‘फराळपेटी’तून करण्यात आले. विशेष म्हणजे फराळपेटीवर केवळ डॉ. सुजय विखे यांचा फोटो होता, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

पाणी योजनांची वीज तोडल्यास कारवाई!

0
जळगाव । जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या योजनांची वीज कपात करु नये, असे आदेश खा. ए. टी. नाना पाटील यांनी आज दिशा समितीच्या सभेत दिले. दरम्यान कनेक्शन कट केल्यास तुमचे देखिल कनेक्शन कट करण्याचा ईशारा सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिला.

जिल्हा नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खा.ए.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखिल उपस्थित होते. ‘महावितरणकडुन दुष्काळाच्या सवलती धाब्यावर’ या मथळ्याखाली दै. देशदूतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे महावितरण प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले.

तसेच या वृत्ताची आज दिशा समितीच्या सभेत दखल घेण्यात आली. यावेळी बोलतांना खा. ए.टी. पाटील म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. त्या तालुक्यांतील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या योजनांची थकबाकी अभावी वीज कपात करु नये. अशा सुचना दिलेल्या असूनही जिल्ह्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनांची वीज कपात केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. ही बाब लक्षात घेता नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी अडचण येणार नाही.

याची दक्षता संबंधित विभागाने घेण्याचे निर्देश खा. पाटील यांनी दिले. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरीकांना मुबलक वीज मिळण्यासाठी जिल्ह्यात सहा वीज उपकेंद्रांचे काम सुरु आहे. सहा ठिकाणच्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्याचे काम सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी बैठकीत सांगितले. जिल्हा खनिज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले असून यामार्फत जिल्ह्यात 2 कोटी 34 लाख 32 हजार रुपयांच्या 58 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली आहे.

या बैठकीत शामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय योजना, अन्नपूर्ण योजनांसह केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या सुरुवातील केंद्रीय मंत्री अनंतकुमार, माजी खासदार वाय. जी. महाजन, विश्वनाथ खडसे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक सुनील गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांनी मानले.

दांडी बहाद्दरांना नोटीस
दिशा समितीच्या सभेला दांडी मारणार्‍या दांडी बहाद्दरांची यादी तयार करुन त्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

प्राथमिक शिक्षकांची पदे वाढणार!

0

अतिरिक्त शिक्षक समावून न घेतल्यास संबंधित शाळेतील पद होणार रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने खासगी शाळेत अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेतल्यास संबंधित संस्थांमधील पदे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संच मान्यतेचा कच्चा मसूदा तयार झाला असून पुढील आठवड्यात संच मान्यता अंतिम होणार आहे. यात विद्यार्थ्यांचा पट वाढल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे वाढणार आहेत.

गेल्या वर्षीपासून राज्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार अनेक अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त असलेल्या जागांवर समायोजन केले. मात्र, राज्यातील अनेक संस्थांनी त्या शिक्षकांना रुजू करून घेतले नाही. याबाबत शिक्षणाधिकार्‍यांनी अनेकवेळा संबंधित संस्थांना पदे रद्द करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शिक्षणाधिकार्‍यांच्या इशार्‍याला संस्थांनी केराची टोपली दाखविली. मात्र, आता दस्तुरखुद्द अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी आदेश दिल्यामुळे हजारो पदे रद्द होणार आहेत.

एवढेच नाही तर ऑनलाइन समायोजनामध्ये अनेक ठिकाणी शिक्षक स्वतःहून रुजू झाले नाहीत. त्या शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. ज्या संस्था अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेणार नाहीत, त्या संस्थांचे वेतनेतर अनुदानही बंद करण्याच्या आदेशामुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. यंदा होणार्‍या संचमान्यतेमध्ये काही ठिकाणी जादा पदे मंजूर झाली आहेत. त्या पदावरही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 2017-18 या वर्षाचे समायोजन ऑनलाइन पद्धतीने न करता समुपदेशनाने व सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात यावे. हे करताना पारदर्शकता राहील, याचीही दक्षता घ्यायची आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही शिक्षक शिल्लक राहात असतील तर त्यांच्याकडून विकल्प घ्यावेत. जे शिक्षक विकल्प देणार नाहीत किंवा समायोजन झालेल्या ठिकाणी रुजू होणार नसतील तर त्यांचेही वेतन थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

नगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची संच मान्यतेचा अंतिम मसूदा तयार झाला आहे. हा मसूदा शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. शिक्षण विभाग तालुकानिहाय कार्यरत शिक्षकांची आकडेवारी जळवून संच मान्यता अंतिम करणार आहेत. दरम्यान, यंदा नगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पट संख्या वाढल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पदे वाढणार आहेत. यामुळे आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना बदली होवून येता येणार आहे.

शासनाच्या सुचनेनूसार आधी जिल्हा परिषद आणि त्यानंतर खासगी शाळेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा कॅम्प लावून संच मान्यता करण्यात येणार आहे. जि.प. प्राथमिक शिक्षकांची संच मान्यता अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात पूर्ण होण्याची आशा आहे.
-रमाकांत काटमोरे, शिक्षणाधिकारी(प्रा.), जिल्हा परिषद

 

मॅक्सीमोची नीलगायीला धडक

0
जळगाव । रस्त्यावरुन पळत असलेल्या नील गायीला मॅक्सीमो गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये मॅक्सीमो गाडी तीन वेळा पलटी होत अपघात झाला. या अपघातात मॅक्सीमो गाडीतील गणेश सुभाष सोनार वय-32 रा. जोशीपेठ हा तरुण मयत झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जोशी पेठेतील गणेश सुभाष सोनार हा तरुण शहरातील हॉटेल महाराजा येथे मॅनेजर म्हणून कामाला होते. गणेश सोनार हे जितेंद्र सुरेश सपकाळे (वय-32 अजिंठा हौसिंग सोसायटी), दिपक उत्तम सोनार (वय-30 रा. हरीविठ्ठल नगर) यांच्यासोबत (एमएच 46 झेड 2470) क्रमांकाच्या मॅक्सीमो गाडीने सायंकाळच्या सुमारास कुसूंबा येथे कामानिमीत्त जात होते. रस्त्याने जात असतांना गाडीच्या समोर अचानक नील आल्याने मॅक्सीमोने नील गाईला धडक दिली.

दरम्यान मॅक्सीमो गाडीने तीन वेळा पलटी झाली. याचवेळी मागून येणार्‍या एमएच 02 सीएच 3047 ही कार पलटी झालेल्या मॅक्सीमोवर जोरदार आदळली. या अपघातात मॅक्सीमोमध्ये क्लीनरच्या साईडला बसलेले गणेश सोनार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यांसोबत असलेले जितेंद्र व दिपक यांना हे दोघ गंभीर जखमी झाले. गणेश सोनार यांच्या पश्चात पत्नी, 12 वर्षाचा मुलगा व 7 वर्षाची मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

अपघातील जखमींना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल
नील गाय समोर आल्यामुळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्यांना नागरिकांनी तात्काळ मागून येत असलेल्या मालवाहतुक गाडीतून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जिल्हा रुग्णालयात कुटूंबीयांचा आक्रोश
गणेश सोनार यांचा अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांसह मित्र मंडळींना माहिती पडताच त्यांनी तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश हा मनहेलावून टाकणारा होता. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्र मंडळींनी प्रचंड गर्दी केली होती.

दुष्काळाची पेरणीला झळ

0
file photo

अवघ्या एक लाख 37 हजार हेक्टरवर पेरणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – यंदा पावसाने हात दाखविल्याने आतापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आतापासून जनतेवर पाण्याचे संकट ओढवले आहे. परिणामी अवघ्या एक लाख 37 हजार हेक्टरवर रब्बी हंगामासाठी पेरण्या झालेल्या आहेत. यात 39 हजार 459 हेक्टरवर नव्याने झालेल्या ऊस लागवडीचा समावेश आहे.

रब्बी हंगामाचा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. परतीच्या पावसावर जिल्ह्यातील शेतीचे चित्र अवलंबून असले तरी सुरुवातीच्या पावसात जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा आणि भंडारदरा धरण भरले की जिल्ह्यातील उत्तर भागाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागतो. यंदा मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले नसले तरी समाधानकारक पाणी साठा होता. पण जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने धरणातील शेतीच्या आवर्तनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी सरासरी 6 लाख 67 हजार क्षेत्र आहे. परतीचा पाऊस चांगला झाल्यास हे क्षेत्र साडे सात ते आठ लाख हेक्टरपर्यंत यापूर्वी वाढत असे. पण यंदा परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत अवघ्या 1 लाख 37 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. जिल्ह्यात साधारणपणे सव्वा लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झालेली असून पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे या ज्वारीची वैरण तयार होणार आहे.

पावसामुळे यंदा लाल कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले असून आतापर्यंत अवघ्या 12 हजार 589 हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. अनेक ठिकाणी विहीरी आटल्याने कांदा पिक अडचणी आले आहे. अनेक शेतकर्‍यांनी जादा दराने कांदा रोप विकत घेवून कांदा पिकाची लागवड केली होती. त्यांच्यावर आता हात चोळण्याची वेळ आली आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामातील दुसरे पिक असणार्‍या गव्हाची स्थिती यंदा बिकट राहणार आहे. यंदा जिल्ह्यात गव्हाची पेरणी जेमतेम राहणार आहे. आतापर्यंत अवघ्या 1 हजार 253 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे. कमी पाणी लागणार्‍या हरभरा पिकाची स्थिती वाईट असून आतापर्यंत 8 हजार 304 हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. ऊस बागायतदारांचा जिल्हा असणार्‍या नगर जिल्ह्यात यंदा ऊस लागवडअडचणीत आहे. ऊसाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 21 हजार हेक्टर असतांना जिल्ह्यात अवघा 39 हजार 459 हेक्टरवर नव्याने ऊसाची लागवड झालेली आहे. याचा परिणाम पुढील गाळपावर होणार आहे.

अशी आहे पेरणी (हेक्टरमध्ये)
ज्वारी 1 लाख 25 हजार (27 टक्के), गहू 1 हजार 253 (3 टक्के), मका 1 हजार 519 (6 टक्के), हरभर 8 हजार 305 (7 टक्के), करडई 10 (1 टक्के), तीळ शुन्य, जवस शून्य, सूर्यफूल 6 (7 टक्के), ऊस 39 हजार 459 (33 टक्के) यांचा समावेश आहे.

 

 

पैसे नसल्याचा केवळ कांगावा : मनपाच्या तिजोरीत दीडशे कोटी!

0
जळगाव । हुडकोच्या कर्जापोटी कर्जबाजारी झालेली महानगरपालिका पैसे नसल्याचा कांगावा करीत आहे. मात्र विविध योजनांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतुन प्रशासनाच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल दिडशे कोटी रक्कम जमा असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

पैसे असतांनाही जळगाव शहरातील विकासकामे का थांबविली गेलीत? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. कर्जापोटी दरमहा चार कोटी दरमहा अदा केले जात आहे. तसेच गाळ्यांमधुन मिळणारे उत्पन्नदेखील गेल्या सहा महिन्यांपासुन थकीत आहे. त्यामुळे महानगरपालिकेची आर्थिक कोंडी झाल्याची ओरड केली जात आहे. दरम्यान उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी महापालिकेच्या विविध बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. तसेच कुठल्या-कुठल्या योजनांची रक्कम आहे, याबाबत आयुक्तांना पत्र देवून माहिती मागविली.

अर्थ विभागातर्फे उपमहापौरांना माहिती दिल्यानंतर मनपाच्या वेगवेगळ्या खात्यात तब्बल दिडशे कोटी रक्कम जमा असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार, खासदार निधी पडुन महानगरपालिकेच्या मिळणार्‍या वित्त आयोगातील निधीसह आमदार, खासदारांच्या निधींचादेखील विनियोग केला गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. आमदार, खासदारांच्या निधीतुनदेखील विकासकामे केली गेली नसल्याचे उघडकीस आले आहे. चौदाव्या वित्त आयोगातून मनपाला आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, विद्युत, घरपट्टी विभागासाठी मिळालेल्या निधी पैकी, 38 कोटी 85 लाख 61 हजार 269 रुपयांचा निधी मनपाकडे शिल्लक आहे.

निधी असतांनाही शहराचा विकास खुंटला
मुलभुत सोई सुविधांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधुन मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झालेला आहे. परंतू निद्रीस्त असलेल्या प्रशासनाने विकासकामांवर खर्च केलेला नाही. मनपाच्या तिजोरीत जवळपास दिडशे कोटी रुपये असतांनाही विकासकामे काम थांबविली गेलीत? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Social Media

26,897FansLike
5,154FollowersFollow
1,355SubscribersSubscribe
error: Content is protected !!