Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामोबाईल टॉवरवर चढून युवकांचे आंदोलन

मोबाईल टॉवरवर चढून युवकांचे आंदोलन

शिरवाडे वाकद । प्रतिनिधी

ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून केलेल्या विकासकामांचे अंदाजपत्रक उपलब्ध करून देत नसल्याच्या निषेधार्थ आज (दि. २६) मरळगोई खुर्द (ता.निफाड) येथील युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन पुकारले. युवकांनी केलेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र होते. भ्रष्टाचार प्रकरणावर चौकशी समिती नेमून महिनाभरात अहवाल सादर केला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

- Advertisement -

निफाड पूर्व भागातील मरळगोई खुर्द येथील ग्रामपंचायतमध्ये सण २००४ ते २०२३ पर्यंत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रसाद फापाळे यांनी केला होता. या कालावधीत झालेल्या विकासकामांचे अंदाजपत्रक मिळावे यासाठी त्यांनी वेळोवेळी ग्रामसभेत मागणी देखील केली होती. तसेच माहिती अधिकारा अंतर्गत माहिती देण्याचे आदेश होऊन देखील आजतागायत माहिती उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या प्रसाद फापाळे यांच्यासह चौदा युवकांनी (दि. १७) रोजी उपमुख्यकार्यकरी अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती. तरी देखील कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने आज (दि. २६) सकाळी आठ वाजता प्रसाद फापाळे यांच्यासह चौदा युवक भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ मोबाईल टॉवरवर चढले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या ठिकाणाहून सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने या आंदोलनाची माहिती जिल्हाभरात पसरली. भ्रष्टाचाराची चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम असल्याने सायंकाळ पर्यंत तोडगा निघू शकलेला नव्हता. विधान परिषद आमदार नरेंद्र दराडे यांनी सायंकाळी आंदोलनस्थळास भेट दिली. आंदोलनकर्त्यांची भूमिका समजावून घेऊन याबाबत प्रशासनाशी त्यांनी चर्चा केली.

यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांनुसार चौकशी समिती नेमून त्यांचा अहवाल महिनाभराच्या आत सादर केला जाणार असल्याचे पत्र निफाड गट विकास अधिकारी महेश पाटील यांनी उपलब्ध करून दिले. त्यामूळे चौकशी अहवाल सादर होई पर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय युवकांनी घेतल्यावर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. विक्रम आव्हाड, केदारनाथ फापाळे, ज्ञानेश्वर बनसोडे, कुणाल आव्हाड, राकेश फापाळे, महेश फापाळे, राजेंद्र बंद्रे, सुनील दरेकर, योगेश फापाळे, भगवान फापाळे, सोमनाथ गोहाड, चेतन फापाळे, प्रतीक फापाळे, अनिल फापाळे आदी उपोषणकर्ते यावेळी उपस्थित होते.

पोलीस प्रशासनावर ताण

जिल्हाभर कांदाप्रश्न पेटलेला असतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस बंदोबस्तात कांदा लिलाव, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे दौरे आज (दि. २६) असल्याने पोलिस प्रशासन बंदोबस्तात गुंतलेले होते. त्यात मरळगोई येथील युवकांच्या आंदोलनाची भर पडल्याने पोलीस यंत्रणेवर ताण निर्माण झाल्याचे दिसले. अपुऱ्या पोलीस बळाशी सामना करणाऱ्या यंत्रणेचे लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. राहुल वाघ यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने मंत्र्यांचे दौरे आणि आंदोलनकर्ते यांना हाताळल्याची परिसरात चर्चा सुरू होती.

” मरळगोई येथील सात ते आठ कोटी रुपयांचा निधी गडप केल्याचा अंदाज आहे. अनेक विकासकामे कागदावर झालेली आहेत. त्यांचा संपूर्ण निधी संगनमताने हडप केला आहे. यात ग्रामपंचायतसह प्रशासनातील मोठे अधिकारी सामील असल्याने कागदपत्रे उपलब्ध करू दिली जात नाहीत. चौकशी समिती अहवाल काय असेल याकडे लक्ष लागले आहे. प्रसंगी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची देखील तयारी केली आहे.

प्रसाद फापाळे (आंदोलनकर्ते – मरळगोई)

- Advertisment -

ताज्या बातम्या