शहर-खेड्यांचे अंतर तंत्रज्ञानामुळेच कमी होईल

jalgaon-digital
2 Min Read

शहादा

भारतात लोहखनिज उत्तम दर्जाचे असतांनाही त्याची निर्याती पेक्षा आयात अधिक आहे. याचा अर्थ तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत आपण कमी पडत आहोत. जगाच्या तोडीचे व स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचे तंत्रज्ञान निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्याला पेलावे लागणार आहे. यातून शहर आणि खेडी यातील दरी कमी होईल,  असे प्रतिपादन अणूशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा युवक महोत्सवाचे उदघाटन शहादा येथील महाविद्यालयात झाले. यावेळी डॉ. काकोडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहूलीकर होते. यावेळी संस्थेच्या मानद सचिव कमलाताई पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.काकोडकर आपल्या भाषणात म्हणाले की, कले सोबत जीवनात पुढे जायचे असले तर तरुणाई शिवाय अशक्य आहे. या युवारंग मधून सादर होणार्‍या कलारंगासोबत निर्मिती आणि ज्ञानरंगाची जोड द्या. जगात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसर्‍या क्रमांकावर असला तरी भारताचे दरडोई घरगुती उत्पादन कमी आहे. तो वाढविण्याची प्रतिज्ञा तरुणांनी करावी, असा अशावाद त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पाचा उल्लेख करतांना नवीन तंत्रज्ञानाची ग्रामीण भागात ओळख करुन देणे हा सिलेजचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा केंद्रीय युवक महोत्सव विद्यापीठाने सुरु केला असल्याचे नमूद केले.

यावेळी गौरव पाटील व प्रिती काकुडदे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली. प्रारंभी युवारंग, विद्यापीठ आणि महाविद्यालयचे ध्वजाचे आरोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.  सुत्रसंचलक डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. समन्वयक व उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल यांनी आभार मानले. मंचावर संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, हैदरभाई नुराणी , प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे, युवारंग कार्याध्यक्ष दीपक पाटील, व्य.प.सदस्य प्रा.नितिन बारी, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य लता मोरे, प्रा.पी.पी.छाजेड, प्राचार्य आर.एस.पाटील, सिलेजचे समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे, अधिसभा सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, दिनेश खरात, दिनेश नाईक,अमोल सोनवणे, पोलीस उपअधिक्षक पुंडलीक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *