‘रेमडिसिवीर’चा काळाबाजार करणार्‍या तरुणास अटक

jalgaon-digital
3 Min Read

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या तरुणास शहादा येथे अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून एक इंजेक्शन, मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.१६ एप्रिल २०२१ रोजी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना एक अज्ञात इसम हा हिरो होन्डा ग्लॅमर मोटारसायकल (क्र.एम.एच.३९ एल ३७१६) हिच्याने

शहादा शहरात शतायू हॉस्पीटलजवळ स्वतःच्या फायदयासाठी कोव्हीड -१९ या साथीच्या आजाराच्या औषधोपचाराकरिता वापरण्यात येणारे रेमडिसिवीर इंजेक्शनच्या बाटल्या (व्हायल) अधिक किमतीमध्ये विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, त्यांनी शहादा येथे पथकामार्फत स्वामी समर्थ मंदिरासमोर शतायु हॉस्पीटलसमोर रस्त्याच्या पलीकडे सापळा रचला. संबंधीत मोटारसायकलस्वार तेथे येताच त्याला पथकाने ताब्यात घेतले.

रतिलाल देवराम पवार (वय ३० वर्ष रा. सावखेडा ता.शहादा) असे त्याचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रेमडिसिवीर इंजेक्शन आढळून आले. सदर इंजेक्शन हे एका व्यक्तीला १२ हजार रुपये किमंतीमध्ये विकणार असल्याने त्याने सांगितले.

कुठल्या रुग्णाच्या नातेवाईकास विकणार होता तसेच इंजेक्शन कोठुन आणले याबाबत विचारपुस करता, त्याने काही माहिती दिली नाही. त्याच्या ताब्यातुन एक इंजेक्शन , १० हजार रुपये किमंतीचा मोबाईल व ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल, २०० रुपये रोख असा एकुण ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याच्याविरुद्ध शहादा पोलीसांत भादंवि कलम ४२०, परिशिष्ठ २६ औषध किमंत नियंत्रण आदेश २०१३ सह वाचन कलम ३(२)(सी) जीवनाश्वक वस्तुचे अधिनियम १९५५ चे उल्लंघन, दंडनियम कलम ७ (१)(र)(ळळ) ,औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ चे कलम १८ (सी) शिक्षा कलम २७ (बी) (ळळ) , १८ ए उल्लंघन कलम २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड – १९ च्या पेशंटला आवश्यक असणारे इंजेक्शन हे शासकीय किमतीपेक्षा जास्त दराने कोणी विकत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीसांना किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथे ०२५६४ -२१०१०० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केले आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस हवालदार दिपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पोलीस शिपाई पुरुषोत्तम सोनार, शोएब जब्बार शेख, राजेंद्र काटके, किरण मोरे, यशोदिप ओगले, सतिष घुले तसेच औषध निरीक्षक राकेश एडलावार यांच्या पथकाने केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *