Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘सरसेनापती’ साकारताना...

‘सरसेनापती’ साकारताना…

परिसंवाद-‘दिग्गज’साकारताना

प्रवीण तरडे, प्रख्यात लेखक-दिग्दर्शक-अभिनेते

- Advertisement -

तरुणपणापासून अभिनयाची आवड असली आणि विविध एकांकिकांमधून मी कामही केलं असलं तरी त्यापेक्षा लेखन-दिग्दर्शनाकडे माझा ओढा जास्त आहे. पण ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटासाठी लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही आघाड्या मी सांभाळल्या. मराठी चित्रटसृष्टीतील हा सर्वांत महागडा चित्रपट बनवताना खूप आव्हानं होती. सरसेनापतींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी दीड वर्षे प्रचंड व्यायाम केला. घोडेस्वारी, तलवारबाजी शिकलो. याखेरीज प्रत्यक्ष कलाकृतीच्या सादरीकरणामध्ये कुठंही कुणाची मनं दुखावली जाणार नाहीत यासाठीची सर्व व्यवधानं पदोपदी पाळली. रसिक प्रेक्षकांंनी आणि अनेक दिग्गजांनी दिलेल्या प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळं या सर्व कष्टाचं चीज झालं.

मी मूळचा लेखक-दिग्दर्शक आहे. अभिनय ही माझी आवडती गोष्ट असून मी अभिनयासाठीही खूप पारितोषिकं घेतली आहे. सर्वोत्कृष्ट खलनायकाबरोबरच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणूनही मी पारितोषिक घेतलं आहे. आतापर्यंत मी साडेचार हजार पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. संवाद कौशल्य हे सामाजिक आणि भौगोलिक आयुष्य कसं आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे माझ्या चित्रपटातील संवाद मला उस्फूर्तपणे सुचतात. माझ्या चित्रपटात मी शेती आणि शेतकर्‍यांचे प्रश्न तळमळीने मांडत आलो आहे. ‘मुळशी पटॅर्न’ हे त्याचं ठळक उदाहरण. सलमान खानने केलेल्या हिंदी चित्रपटासह ‘मुळशी पॅटर्न’चा भारतातील सोळा भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. आई वडिलांच्या पुण्याईमुळे शेतकरी, वारकर्‍यांचे विषय मी प्रभावीपणे मांडू शकलो, कारण मी ते जीवन जगतो आहे. मी सर्वप्रथम शेतकरी आहे.

‘मुळशी पॅटर्न’, बरोबरच ‘देऊळ बंद’, ‘धर्मवीर’, ‘मुक्काम पोस्ट ठाणे’ यांसारख्या माझ्या चित्रपटांना मराठी रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी प्रेक्षकांच्या अपेक्षाही वाढल्या. त्याची पूर्तता करण्याच्या उद्देशाने 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट घेऊन मी प्रेक्षकांपुढे आलो. विशेष म्हणजे मराठी मातीतल्या या चित्रपटालाही प्रेक्षकांचं उदंड प्रेम लाभलं.

अर्थातच या चित्रपटासाठीची तयारी खूप आधी सुरू झाली होती. या चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी आमचे सरसेनापती हंबीरराव जगाला कळावेत यासाठी जीवाचं रान केलं. अक्षरशः सगळं पणाला लावून महाराष्ट्रातला सर्वांत महागडा चित्रपट म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली. निर्मात्यांनी चित्रपटासाठीचे बजेट मंजूर केल्यानंतर आमची जबाबदारी वाढते. कारण त्यातून साकारणार्‍या कलाकृतीची परिणामकारकता तितकीच सशक्त, सक्षम असली पाहिजे आणि मुख्य म्हणजे रसिक प्रेक्षकांना ती कलाकृती आवडली पाहिजे, हे आव्हान दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून आमच्यावर असतं. यासाठी अ‍ॅनिमेशन्स, भव्य आर्टिस्टची गर्दी, एकाहून एक सरस अभिनेते आणि ऐतिहासिक पेहराव यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही. योग्य पद्धतीने ती आम्ही पडद्यावर आणल्यामुळं टीझर, गाण्यांपासूनच या चित्रपटाची प्रशंसा होऊ लागली. रविना टंडनसारख्या बॉलीवूड अभिनेत्रीनेही त्याचे कौतुक केले.

इतकेच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत महागड्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या नायकालाही ‘हंबीरराव’च्या टीझरने भुरळ घातली आणि प्रत्यक्ष तिकिट खिडकीवर प्रेक्षकांचा प्रतिसादही भरभरून लाभला.

माझ्या चित्रपटांची सर्वांत मोठी ताकत असते ती कास्टिंगची निवड. मी पूर्वीपासून खूप एकांकिका स्पर्धा केल्या आहेत आणि अलीकडील काळात अनेक एकांकिका स्पर्धांना मी परीक्षक म्हणूनही जात असतो. त्यामुळं माझ्या चित्रपटातील प्रत्येक अभिनेता हा कोणत्या ना कोणत्या एकांकिका स्पर्धेतून आलेला, तिथं बक्षिस घेतलेला असावा याबाबत माझा कटाक्ष असतो. किंबहुना, एकांकिका स्पर्धा पाहताना मनाच्या एका कोपर्‍यात आणि मेंदूत माझ्या चित्रपटासाठीची पात्रं फिरत असतात. त्यामुळं व्यक्तिरेखांना न्याय दिला जातो.

‘हंबीरराव’बाबत सांगायचं तर ऐतिहासिक चित्रपट करायचं हे माझ्या मनात होतं; पण सरसेनापती हंबीरराव करायचं असं काही डोक्यात नव्हतं. पण संदीप मोहिते पाटील आणि अन्य निर्माते माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी हंबीररावांचं चरित्र मांडण्यास सांगितलं. त्याचबरोबर सरसेनापतींची भूमिका मीच करावी, अशीही त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. वास्तविक, सुरुवातीला या भूमिकेसाठी आम्ही अनेकांचा विचार केला होता. मात्र जनमानसाच्या मनात दैवताप्रमाणं आदराचं स्थान असणार्‍या व्यक्तिरेखा साकारताना त्यांना यथोचित न्याय मिळणं अत्यंत गरजेचं असतं. इथंत तर मला छत्रपतींचे सरसेनापती दाखवायचे होते, ज्यांनी फोड्यांच्या लढाईमध्ये जवळपास 200 गनिम कापले होते. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणारा कलाकारही तसा वाटला पाहिजे हे लक्षात घेऊन मी ही भूमिका स्वीकारली. त्यापूर्वी काही कलाकारांच्या टेस्ट घेतल्या; पण अभिनयात उत्तम असलेल्या कलाकाराला घोडेस्वारी यायची नाही, ज्याला घोडेस्वारी यायची तो अभिनयात सरस नव्हता, ज्याच्याकडे हे दोन्ही असायचं त्याची शरीरयष्टी बेताची असायची, त्याला साडे सात किलोच्या दोन तलवारी उचलता यायच्या नाहीत; अशा अनेक गमतीजमती पाहिल्या आणि अखेरीस मी निर्मात्यांच्या इच्छेनुसार स्वतःच सरसेनापती साकारण्याचं ठरवलं.

कोणतीही भूमिका वाट्याला आल्यानंतर आनंदाच्या बरोबरीनं आव्हानं समोर येतात. ही आव्हानं अनेक प्रकारची असतात. विशेषतः जेव्हा आपण बायोपिक साकारत असतो आणि त्यातील दिग्गज व्यक्तिमत्त्वाची भूमिका आपल्याला करायची असते तेव्हा तर हे आव्हान खूप मोठं असतं. यासाठी पहिला टप्पा असतो तो म्हणजे बाह्यरुपानं आपलं व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी त्या दिग्गजाशी मिळतीजुळती नव्हे हुबेहूब करणं. कारण ते प्रेक्षकांसमोर येणारं पहिलं इम्प्रेशन असतं. त्यादृष्टीनं सरसेनापतींच्या भूमिकेसाठी मी सव्वा वर्ष कसून व्यायाम करुन तब्येत कमावली. मुळातच मी कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू आहे. व्यायामाची सवय मला पूर्वीपासून होती. तशातच मी पूर्णतः निव्यर्सनी आहे. तरीही सरसेनापतींच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असणारं रांगडं, बलदंड, निधड्या छातीचं शरीर नव्हतं. ते कमावण्यासाठी खूप व्यायाम केला. मिस्टर इंडिया महेश पाटील आणि डाएटीशीयन श्रीपाद चव्हाण यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. जवळपास दीड वर्षे मी पोळी, भाकरी, भात असं काहीही खाल्लं नाही. फक्त उकडलेल्या भाज्या आणि उकडलेलं अन्न याच्या जीवावर मी ही शरीरयष्टी मिळवली. दीड वर्षं स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं. एकही दिवस व्यायामात खाडा पडू दिला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दीड वर्षांत दुसरं कोणतंंही काम घेतलं नाही. कारण दहा दगडांवर पाय ठेवून इतिहास घडवता येत नाही. इतिहास घडवण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा द्यावाच लागतो, त्यानुसार मी दिला. याजोडीला घोडेस्वारी शिकलो. तलवारबाजी शिकलो. या चित्रपटातील स्टंट मी स्वतः दिले आहेत. कारण यासाठी स्टंटमॅन निवडला असता तर त्याच्या मनात दोन्ही छत्रपतींबद्दलचे भाव मनात येणे आणि चेहर्‍यावर दिसणे हे दोन्ही शक्य झाले असते का असा विचार होता. त्यापेक्षा मीच हे स्टंट देण्याचे ठरवले.

या चित्रपटात माझी पत्नी स्नेहल तरडे हिने सरसेनापतींच्या पत्नीची भूमिका केली आहे. स्नेहल ही कसदार अभिनेत्री आहे. तिला अभिनयासाठी पारितोषिकं मिळालेली आहेत. यापूर्वी अण्णा भाऊ साठेंचं ‘स्मशानातलं सोनं’ आम्ही सादर केलं होतं. त्यामध्येही आणि ‘सरसेनापती हंबीरराव’मध्येही किती तरी प्रसंगांमध्ये माझ्याहून सरस तिचा अभिनय झाला आहे. गमतीचा भाग म्हणजे घरामध्ये माझं तिच्यापुढं काही चालत नसलं तरी चित्रीकरणाच्या सेटवर मात्र दिग्दर्शक-लेखक म्हणून ती मला आदर द्यायची आणि मीही तिच्या अभिनयकलेला अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न केला.

सरसेनापती हंबीररावांचं इतिहासातलं स्थान खूप मोठं आहे. पण अलीकडील काळात इतिहासातील घटना मांडताना अत्यंत सावध राहावं लागतं. प्रबळ बनलेल्या लोकभावनांचा विचार प्राधान्यानं करावा लागतो. विशेषतः, त्या कलाकृतीमुळे, त्यातील संवादांमुळे कुणी दुखावणार नाही ना याची पदोपदी काळजी घ्यावी लागते. कारण हल्ली सर्वांच्या भावना अतिशय तीक्ष्ण बनल्या आहेत. छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन संतप्त होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. पूर्वी समाजवादी आणि हिंदुत्ववादी वाद घालायला एकत्र यायचे. चहा पित वाद घालायचे. प्रधान सर, भाई वैद्य आणि त्यांचे मित्र सुधीर फडके हे याचे एक उदाहरण सांगता येईल. पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळं आपण जे मांडतो आहोत त्यानं कुणी दुखावलं जात नाहीये ना याचा विचार सदोदित करणं गरजेचं ठरलं आहे. इतहास हा जसा आहे तसा आपण मांडू शकत नाही. पण लोकांच्या मनात जे आहे ते लक्षात घेऊन कुणाच्या भावना न दुखावता जे मांडता येईल ते मांडण्याचा प्रयत्न करणं हे मोठं आव्हान होतं.

सरसेनापती हंबीरराव यांच्या जीवनावर आधारलेला चित्रपट बनवताना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यापेक्षा सरसेनापती हावी होणार नाहीत किंवा चुकूनही त्यांची उंची अधिक असल्याचं कुठंही जाणवणार नाही याची काळजी घेण्याचं मोठं आव्हान होतं; पण ते पेलण्यात आम्ही यशस्वी झालो. या चित्रपटाचं लेखनही मीच केलं आहे; परंतु मला एकाही क्षणी महाराजांपेक्षा सरसेनापतींना मोठा डायलॉग लिहिण्याचा मोह झाला नाही, हे मी प्रांजळपणाने सांगेन. तसेच चित्रपटात सर्वांत चांगली अ‍ॅक्शन छत्रपतींना दिली आहे. चित्रपटासाठीच्या एका पोस्टरमध्ये आर्टिस्टने छत्रपती संभाजीराजे मागे आहेत आणि हंबीरराव हे बलदंड पुढे आहेत असं रेखाटलं होतं; पण मी तिथंच ते रद्द करण्यास सांगितलं. असलं डिझाईन चुकूनही करू नका अशी ताकीद दिली. कारण कोणताही मावळा, सरदार मोठा होण्यामागे लार्जर दॅन लाईफ असे हिरो म्हणून साक्षात छत्रपती उभे होते. याचं भान आमच्या रक्तात असल्यामुळं चित्रपटातही ते आपोआप पाळलं गेलं.

जाता जाता या चित्रपटातील एक गमतीदार किस्सा मला यानिमित्तानं सांगावासा वाटतो. तो म्हणजे घोड्यांचा. आम्ही या चित्रपटासाठी जे घोडे वापरले त्यांचा दिवसाचा खर्च हा कलाकारांच्या मानधनापेक्षा अधिक होता. मुंबईवरुन हे घोडे एसी ट्रकमध्ये सेटवर यायचे. घोड्याचा सीन शूट करून झाला की पुन्हा तो एसी ट्रकमध्ये जायचे. अजय देवगणने ‘तानाजी’ चित्रपटासाठी जी घोडी वापरली होती तीच मी या चित्रपटासाठी वापरली. रोल साऊंड असं घोडीने ऐकलं की ती तयार होते आणि एक्शन म्हटलं की पळते. घोडीबरोबर असणारा माणूस तिच्या कानात जाऊन सगळ्या सूचना देतो. कट म्हटलं की ही घोडी लगेच थांबते. आपल्याकडे काही कलाकारांना कट म्हटलं की थांबायचं असतं हे अजूनही कळत नाही. पण घोडी मात्र कट शब्द ऐकताच थांबते. घोडीचं डाएट देखील वेगळं होतं. मोठ्या गोष्टी करायच्या म्हंटलं की खर्च होतोच. पण प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाकडं पाहिलं की खर्चाचं, आपण केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं आत्मिक समाधान लाभतं आणि ते पैशांहून कितीतरी पटींनी मोठं असतं.

आजवरच्या चित्रपटांमधून मी नेहमीच सामाजिक विषयांवर भाष्य करत आलो आहे. समाजापुढील कळीचा एखादा प्रश्न घेऊन चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन करत आलो आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बायोपिक किंवा ऐतिहासिक म्हटला जात असला तरी त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐन जिन्नस कर्जपद्धत मांडली आहे. ही पद्धत आपल्या पाठ्यपुस्तकातून मांडायला हवी होती. त्यामुळं कदाचित शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत झाली असती.

- Advertisment -

ताज्या बातम्या