Friday, April 26, 2024
Homeनाशिकपरीक्षापुर्व तयारीसाठी महाकार्यशाळा; विद्यार्थ्यांसाठी बारा बलुतेदार मंडळाचा उपक्रम

परीक्षापुर्व तयारीसाठी महाकार्यशाळा; विद्यार्थ्यांसाठी बारा बलुतेदार मंडळाचा उपक्रम

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहर व तालुक्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी (students) तसेच अमृत महोत्सवी वर्षपुर्तीनिमित्त राज्यात 75 हजार पदांची भरती शासनातर्फे केली जाणार आहे. या नोकर भरतीत (Recruitment of employees) येथील विद्यार्थ्यांना संधी मिळावी. त्यांना गणित व बुध्दीमत्ता विषयांना चांगले मार्क मिळावेत.

- Advertisement -

तसेच परिक्षेला कसे सामोरे जायचे त्याची तयारी कशी करायची या संदर्भात सखोल मार्गदर्शनासाठी तज्ञ प्राध्यापकांची महाकार्यशाळा येत्या 16 ते 18 डिसेंबर दरम्यान बारा बलुतेदार मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहावर बारा बलुतेदार मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याना परिक्षेचे सखोल मार्गदर्शन होण्यासाठी 16 ते 18 डिसेंबर दरम्यान तीन दिवशीय महाकार्यशाळेचे आयोजन कॅम्पातील बालगंधर्व मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू बच्छाव यांनी विषद केला. मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पवार, समाधान ठोंबरे, सुरेश शेलार, प्रा. निवृत्ती कोते, दिलीप अहिरे, पिंटू अहिरे, संजय देवरे, रामचंद्र हिरे, निसार शेख, भुषण बच्छाव आदी पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा परिक्षांसाठी शहरात अभ्यासिका व तज्ञ प्रशिक्षक-मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना नाशिक (nashik), पुणे (pune), मुंबई (mumbai), औरंगाबाद (Aurangabad) येथे जावे लागते. मात्र भरमसाठ फी आकारली जात असल्याने अनेक गोरगरीब होतकरू विद्यार्थी जावू शकत नाही.

हुशार असून सुध्दा फक्त मार्गदर्शनाअभावी ते परिक्षेपासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन या कार्यशाळेव्दारे दिले जाणार असल्याचे स्पष्ट करीत बच्छाव पुढे म्हणाले. पोलीससह तलाठी, वनरक्षक, आरोग्य, शिक्षक, ग्रामसेवक आदी विविध विभागांच्या नोकरभरतीच्या वेळेस सुध्दा मार्गदर्शन नसल्याने येथील विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहत आहेत. पोलीस भरतीत विद्यार्थी क्रिडांगण व फिजीकल परिक्षा पास होतात. मात्र लेखी परिक्षेत कमी गुण मिळत असल्याने त्यांना आलेली संधी हुकत असल्याचे निदर्शनास आले आहे.

परिक्षेचा अभ्यास तसेच गणित व बुध्दीमत्ता या विषयाची तयारी कशी करायची, स्पर्धा परिक्षेस सामोरे जाण्याची पुर्व तयारी व कमी वेळेत जास्त अभ्यास व गुण अधिक कसे मिळतील या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील मराठी व्याकरण तज्ञ प्रा.डॉ. आशालता गुट्टे, जनरल नॉलेज तज्ञ प्रा. राजेश भराटे व गणित व बुध्दीमत्ता विषयाचे तज्ञ सचिन ढवळे या तिघा राज्यातील नामांकित तज्ञ या कार्यशाळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्गदर्शन करणार आहेत.

या तिघा तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षित झालेले विद्यार्थी आज राज्यात विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टीकोनातून मंडळाने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. या कार्यशाळेत जनरल नॉलेज, गणित, बुध्दीमत्ता, मराठी व्याकरण या संदर्भात माहिती देण्यासह कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन देखील हे तज्ञ प्राध्यापक करणार असून विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्न व अडचणी दूर करतील.

या कार्यशाळेत नोकर भरतीसाठी येणार्‍या संभाव्य प्रश्नांचे 50 अथवा 100 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली जाणार असून प्रथम पाच विद्यार्थ्यांना पारितोषीके दिले जातील. याबरोबर स्पर्धा परिक्षांबाबत देखील कार्यशाळेत या तज्ञ प्राध्यापकांतर्फे मार्गदर्शन केले जाणार असल्याने शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंडुकाका बच्छाव यांनी शेवटी बोलतांना केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या