Thursday, April 25, 2024
Homeनाशिकरासाका बचाव कृती समितीचे साखळी उपोषण मागे

रासाका बचाव कृती समितीचे साखळी उपोषण मागे

निफाड। प्रतिनिधी Niphad

रासाकाप्रश्नी 26 वेळा मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केल्याने रासाकाची निविदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात रासाकाची निविदा प्रसिद्ध होऊन पुढील कार्यवाही चालू करता येईल असे आश्वासन आमदार दिलीप बनकर यांनी रासाका बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना दिल्याने रासाका बचाव कृती समिती पदाधिकार्‍यांनी शुक्रवार दि.4 रोजी दुपारी 3 वाजता आ. दिलीप बनकर, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते लिंबूपाणी घेत आपले उपोषण मागे घेतले आहे.

- Advertisement -

या गळीत हंगामात रासाका चालू व्हावा यासाठी रासाका बचाव समितीने मंगळवार दि.1 डिसेंबर पासून निफाड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले होते. काल या उपोषणाचा चौथा दिवस होता. शुक्रवारी सकाळी प्रांत डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, आ. दिलीप बनकर, स्वाभिमानीचे हंसराज वडघुले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, पं.स. मा. सभापती सुभाष कराड, युवा नेते सागर कुंदे, पो.नि. रंगराव सानप, निफाडचे मा. सरपंच बापु कुंदे, रासाका अवसायक राजेंद्र निकम यांनी रासाका बचाव कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

मात्र ठोस आश्वासन असल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा कृती समितीने घेतला. त्यानंतर जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, नगरसेवक अनिल कुंदे, संजय कुंदे, खंडू बोडके यांनीही रासाका बचाव कृती समिती पदाधिकार्‍यांची भेट घेऊन रासाकाप्रश्न कसा हाताळता येईल यावर चर्चा केली. त्यानंतर रासाका बचाव कृती समिती पदाधिकार्‍यांनी विचारविनिमय करत आ. दिलीप बनकरांची फोनवर चर्चा केली. त्यानंतर दुपारी 3 वाजता आ. दिलीप बनकर, जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. सदस्य सिद्धार्थ वनारसे, सागर कुंदे, दिलीप कापसे यांनी साखळी उपोषणस्थळी भेट दिली.

यावेळी आमदार बनकर म्हणाले की, निविदा प्रक्रियेसाठी 3 निविदा आवश्यक असून तशी तयारी आम्ही केली आहे. आमच्या व्यतिरिक्त ज्यांना कारखाना चालविण्यास घ्यावयाचा आहे त्यांना देखील पूर्ण सहकार्य केले जाईल. कारखाना चालू करणे सोपे आहे परंतू तो चालविणे अवघड आहे. ती सर्व तयारी मी केली आहे. रासाका निविदा निघावी यासाठी सहकार कायद्यात बदल केले. त्यासाठी 26 वेळा मंत्रालयात गेलो. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच रासाकाची निविदा निघेल असेही आ.बनकर म्हणाले.

याप्रसंगी रासाका बचाव कृती समितीचे नामदेव शिंदे, शिंगवे सरपंच धोंडीराम रायते, खडकमाळेगावचे विकास रायते, सुयोग गिते, धनंजय डुंबरे, हरिश झाल्टे, सचिन वाघ, पोपट मोरे, बाळासाहेब जाधव, नितिन ताकाटे, मनोज जाधव, अनिरुद्ध पवार, हेमंत सानप, हर्षल काळे, रवींद्र सानप, दीपक वडघुले, छोटू पानगव्हाणे, गोकूळ शिंदे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी व कामगार उपस्थित होते.

आश्वासनामुळे उपोषण मागे

रासाका चालू झाला पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे. आठ दिवसात रासाकाची निविदा निघणार असल्याचे आश्वासन आ. बनकर यांनी दिले आहे. त्यामुळे लिंबु पाणी घेऊन आम्ही उपोषण सोडत आहोत. मात्र आठ दिवसात रासाकाची निविदा निघाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

नामदेव शिंदे, धोंडीराम रायते (रासाका बचाव कृती समिती)

- Advertisment -

ताज्या बातम्या