Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखकेवळ बंदीच्या आदेशाने प्लास्टिकचा वापर थांबेल का?

केवळ बंदीच्या आदेशाने प्लास्टिकचा वापर थांबेल का?

प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यामुळे होणारे प्रदुषण हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. त्या चर्चेत प्लास्टिकचे फायदे आणि तोटे उच्चरवात मांडले जातात. या मुद्यावर आंतरराष्ट्रीय परिषदा होतात. त्या परिषदांमध्ये वेगवेगळे ठराव केले जातात. भारतातही कमी जाडीच्या प्लास्टिकच्या वापरावर अनेकदा बंदी घातली गेली.

इतके सायास करुनही प्लास्टिकचा वापर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. तो इतका की आता माणसाच्या रक्तात आणि फुफ्फुसातही प्लास्टिकच्या अत्यंत सुक्ष्म कणांनी (मायक्रो) प्रवेश करायला सुरुवात केली आहे, असा निष्कर्ष नेदरलँडच्या संशोधकांनी नोंदवला आहे. या संशोधकांनी मानवी रक्ताच्या बावीस नमुन्यांचा अभ्यास केला. त्यापैकी 17 नमुन्यांमध्ये प्लास्टिकचे कण आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिण्याच्या बाटल्यांसाठी वापरल्या जाणार्या प्लास्टिकचे हे कण असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शास्त्रज्ञांच्या दुसर्या एका पथकाला जिवंत माणसाच्या फुफ्फुसात अडकलेले प्लास्टिकचे अती सुक्ष्म कण सापडल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. असे कण हवेत सगळीकडे पसरत आहेत असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

हे दोन्ही निष्कर्ष गंभीर आहेत. या निष्कर्षांचा सखोल अभ्यास व्हायला हवा. शरीरात गेलेल्या अती सुक्ष्म कणांचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम संभवतो? शरीराच्या कार्यप्रक्रियेत त्यामुळे काही अडथळा निर्माण होऊ शकेल का? या मुद्यांचाही अभ्यास शास्त्रज्ञांना करावा लागेल. नुसते निष्कर्ष जाहीर करुन थांबून कसे चालेल? त्यावरचे उपाय शोधायचे कामही त्यांनाच हाती घ्यावे लागेल. भारतापुरता विचार करायचा तर आधी या प्लास्टिकने प्राण्यांच्या शरीरात प्रवेश केला. जनावरांच्या मृत्यूमुळे तो शोध लागला. भटकी जनावरे अन्नाच्या शोधात फिरतात. कुठेही चरतात. चरता चरता त्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने शेकडो जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना जागोजागी घडल्या आहेत.

जनावरांना काहीही कळत नसल्याने ते काहीही खातात, त्यात प्लास्टिकचाही समावेश असतो असा मुद्दा त्यात्या वेळी मांडला जातो. पण जाणुनबुजून प्लास्टिक कोण खाणार? माणसांच्याही पोटात ते नकळतच जात असणार. आणि तेच गंभीर आहे. प्लास्टिकच्या वस्तू हाताळायला सोप्या आणि टिकाऊ असतात. त्यांची किंमतही सामान्यांना परवडणारी असते. त्यामुळेच त्यांचा वापर वाढला आहे आणि दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे.

माणसांना प्लास्टिकच्या वापराची सवय झाली आहे. करोनामुळे सध्या आर्थिक अस्थिरता आहे. उदरनिर्वाहासाठी जमेल त्या मार्गाने पैसा कमावणे हाच बहुतेकांचा प्राधान्यक्रम बनला आहे. उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करुन उत्पादन स्वस्त बनवले की त्याच्या विक्रीची शक्यता वाढते अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे का? गावोगावी भरणार्या यात्रा-जत्रांमध्ये मिळणार्या शेकडो वस्तू याचे उदाहरण आहे. अगदी आंघोळी साठी वापरला जाणारा प्लास्टिकचा मग्गासुद्धा पाच आणि दहा रुपयाला मिळू शकतो.

पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचा व्यवसायही त्याला अपवाद नाही. तो जगभरातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. प्लास्टिक वापराच्या सवयीमुळेच त्याच्या बंदीचा अनेकदा फज्जा उडाला आहे. म्हणुनच प्लास्टिक वस्तूंच्या वापराची सवय सर्वप्रथम माणसाच्या मनातून हद्दपार करावी लागेल असे मत या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते मांडतात. त्यामुळे या ना त्या कारणाने प्लास्टिकचे अती सुक्ष्म कण माणसाच्या पोटात जाऊ लागले असतील तर त्यात आश्चर्य नाही. यावर अधिक अभ्यासाची निकड उपरोक्त दोन निष्कर्षांमुळे लक्षात यावी. तेव्हा, बंदीच्या पलीकडे जाऊनही प्लास्टिकच्या अतीवापरावर नियंत्रण कसे आणता येईल याचा विचार शास्त्रज्ञ आणि संशोधकांना करावा लागेल.

बंदीची आवश्यकता कोणीच नाकारु शकणार नाही. नव्या संशोधनाने बंदीच्या मागणीला जोर येईल हेही स्वाभाविक आहे. तथापि अशी कुठलीही बंदी शंभर टक्के प्रत्यक्षात कशी आणता येईल याचा अधिक गांभीर्याने विचार व्हायला हवा. तसा तो होईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या