Saturday, April 27, 2024
Homeनगरवन्यप्राण्यांपासून शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी त्रस्त

वन्यप्राण्यांपासून शेती पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी त्रस्त

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता परिसरात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्यप्राण्यांनी गहू, कांंदा, कपाशी, घास, मका, फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यात एकरुखे, नपावाडी, रामपुरवाडी, पिंपळवाडी, जळगाव, पुणतांबा या बरोबरच राहाता शहराच्या पूर्व भागात हे वन्यप्राणी गहू, कांदा, कपाशी, मका, घास, डाळिंब, आंबा, पेरू, चिकू, सीताफळ व इतर सर्वच शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. काळवीट व रानडुकरे त्यांच्या डोक्याच्या साहय्याने शेतात लावलेली छोटी फळबाग यांची मोडतोड करत आहेत. हरीण, काळवीट, रानडुकरे यांचा मोठा समूह रात्रीच्यावेळी एकत्र येऊन शेतीमाल फस्त करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. वन विभागाने तात्काळ शेतकर्‍यांना या वन्यप्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

वन्य प्राण्यांबरोबरच शंखी गोगलगायीपासून शेती पिकाची मोठी हानी होत आहे. शेतीमाल पिकांवर या शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिकांवर औषध फवारणी करूनही त्यांचा प्रादूर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वत्र बाजारपेठ बंद असल्याने शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात आपला शेतीमालाची विक्री करावी लागली.

यावर्षी चांगल्याप्रकारे पाऊस होईल व शेतीपासून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकर्‍यांना अपेक्षा होती. परंतु या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच यावर्षी ढगाळ हवामानामुळे शेतीमालाला पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला. करोना तिसर्‍या लाटेने पुन्हा डोके वर काढल्याने केंद्र व राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केल्याने फळांची व शेतीमालाची विक्री होण्यासाठी शेतकर्‍यांना पुन्हा लॉकडाऊनचे सावट निर्माण होते काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या तीन वर्षापासून करोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारी शेतीमालाची नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. वन विभागाने तात्काळ वन्यप्राण्यांपासून शेतीमालाची होणार्‍या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.

हरीण, रानडुक्कर, काळवीट हे वन्यप्राण कांदा, गहू, कपाशी, मका, भाजीपाला व फळबाग यांची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. वन विभागाला याबाबत अनेकदा कल्पना देऊनही अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या होणार्‍या नुकसानाचा तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्यासाठी वन विभागाने उपाय योजना करणे गरजेचे आहे.

– भगवान टिळेकर, माजी संचालक गणेश कारखाना

- Advertisment -

ताज्या बातम्या