विवस्त्र मारहाणीच्या व्हिडिओचा तपास अंतिम टप्प्यात

jalgaon-digital
3 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) – अत्याचारातील पीडितेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या गुन्ह्याचा तपास आता तांत्रिक पातळीवर वेगाने सुरूच असतानाच या गुन्ह्यात जोपर्यंत सबळ पुरावे मिळत नाही, तोपर्यंत आरोपींना अटक न करण्याची ताठर भूमिका शहर पोलिसांनी घेतली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी ही भूमिका व्यक्त केली.

दरम्यान, विवस्त्र मारहाण केलेल्या व्हिडिओचा तपास सायबर सेल पोलिसांकडून अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यामागील सत्य काय हे लवकरच उजेडात येईल, असे तपासी अधिकारी सांगत आहे. अत्याचारातील पीडितेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या नगर शहरातील घटनेने संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. मुंबईत विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.

विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधार्‍यांना चांगलेच टार्गेट केले. या प्रकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहमदनगर शहर पोलिसांना थेट मुंबईत बोलावून घेतले. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस निरीक्षक एच. पी. मुलाणी यांनी या गुन्ह्यामागील वस्तूस्थिती मुंबई येथील विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. या गुन्ह्यात जोपर्यंत सबळ पुरावे मिळत नाही, तोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, अशी भूमिका शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी अजित पवार यांच्यासमोर बोलून दाखवली.

हे करताना त्यांनी घटनेशी निगडीत असलेल्या इतर सात घटनांचा अहवाल दिला. अजित पवार यांनी देखील शहर पोलिसांच्या भूमिका समजावून घेत, खंबीरपणे पोलिसांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली. गुन्हा आणि त्यामागील सत्य उघडकीस आणा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे स्पष्ट सांगितले. अजित पवार यांनी शहर पोलिसांच्या या अहवालावर विरोधकांना गुन्ह्याचे सत्य काय आहे, जाणून घेण्यासाठी विरोधकांना अध्यक्षांच्या दालनात या, खरे काय आहे, हे सांगतो, असे प्रति आव्हान दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर या गुन्ह्याच्या चौकशीसाठी महिला पोलीस अधीक्षकांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा केली. दरम्यान नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी बुधवारी सकाळीच नगर गाठून घटनेबाबत माहिती जाणून घेतली. तपासाबाबत पोलिसांना योग्य त्या सुचना केल्या आहेत.

दरम्यान, घटनेच्या दुसर्‍या दिवशी शहर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवान हालचाली चालूच ठेवल्या. पीडितेच्या छळाचा ताब्यात घेतलेल्या व्हिडिओची सायबर सेलला उकल करण्यात सायंकाळी काही अंशी यश आले. व्हिडिओ बाबत आदिक खात्री करण्यासाठी अहमदनगर सायबर सेलने आता मुंबई सायबर सेलची मदत घेतली आहे. मुंबई सायबर सेलकडे हा व्हिडिओ देखील पाठविण्यात आला आहे. त्यांचा निष्कर्ष रात्रीपर्यंत अहमदनगर शहर पोलिसांना प्राप्त होईल, असे सूत्रांची माहिती आहे. पोलिसांच्या या वेगवान हालचाली पाहता, या गुन्ह्याचे सत्य लवकरच उजेडात येण्याची शक्यता आहे.
शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच जणांकडे कालही चौकशी सुरू होती. या पाच जणांकडे वेगवेगळ्या पद्धतीने शहर पोलिसांची चौकशी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस देखील या गुन्ह्याची उकल करण्यात मेहनत घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल दिवसभर शहरात विविध ठिकाणी गोपनीय पद्धतीने माहिती घेतली. काही ठिकाणच्या स्थळांना जावून पाहणी केली. व्हिडिओतील ठिकाणांची शहानिशा केली. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *