Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाबाधितांवर उपचार होतात कोठे?

करोनाबाधितांवर उपचार होतात कोठे?

नाशिक ।प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न होत आहेत. तर 20 हजार रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभाग करत आहे. मात्र पॉझिटिव्ह आलेले रुग्ण कोठे दाखल आहेत याबाबत मात्र होम क्वॉरंटाईन असे समर्पक उत्तर दिले जात आहे. 90 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण होम क्वॉरंटाईन असून ते खरेच होम क्वॉरंटाईन आहेत का? हे पाहण्यास कोणतीही यंत्रणा नाही. परिणामी हे सर्व बाजार, दुकाने, तसेच शहरभर फिरून सुपर स्प्रेडर ठरत आहेत. मग करोना नियंत्रणात आणण्यासाठी आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी असेच भयानक चित्र असल्याचे वास्तव आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात सिव्हिल, डॉ. पवार मेडिकल महाविद्यालय, सह्याद्री हॉस्पिटल, जाकीर हुसेन रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय अशी कोविड रुग्णालये आहेत. तर इतर 82 रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. बिटको रुग्णालय व समाजकल्याण कार्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये 950 खाटांची सुविधा आहे. अशा एकुण 3 हजार 827 रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे.

मात्र सध्या शहरातील उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 11 हजार 290 आहे. प्रत्यक्ष रूग्णालयात दाखल रूग्णांची संख्या पाहता उर्वरीत 90 ते 95 टक्के करोना पॉझिटिव्ह रूग्णांना घरीच गोळ्या देऊन होम क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात येत आहे. ज्यांची घरी दोन बीएचके, तसेच प्रशस्त बंगले आहेत. अशा ठिकाणी होम क्वॉरंटाईन होणे सोयीस्कर आहे. परंतु ज्या झोपडपट्ट्यांमध्ये दहा बाय दहाच्या झोपडीत अख्खे कुटुंब बळेच झोपू शकते अशा ठिकाणीही रूग्णांना होम क्वॉरंटाईन होण्याचे अजब सल्ले देण्यात आल्याचे वास्तव आहे.

वन बीएचके, सिडकोची घरे, पत्र्याच्या खोल्या, बहूतांश झोपडपट्टया या ठिकाणीही रूग्णांना होम क्वॉरंटाईन करण्याचे सल्ले देण्यात आले आहेत. हे रूग्ण घरी थांबत नसून सर्रास बाजार, दुकाने, मैदाने, गार्डन शहरातील रस्त्यांवर इतस्थ फिरत आहेत. पोलिसांनी सुरू केलेल्या मास्क कारवाई दरम्यान तपासणी केली असता बाजारपेठेत फिरणारे 13 जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे केवळ तपासलेल्यापैंकी काही होते असे हजारोच्या संख्येने सुपर स्प्रेडर शहरात फिरत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रुग्णालयात दाखल करण्यास नकार

करोनाच्या तपासण्या जाकीर हुसेन रुग्णालय तसेच थेट खासगी प्रयोगशाळांमध्ये नागरिक करत आहेत. पॉझिटिव्हचा आकडा येथूनच यंत्रणांकडे जातो. मात्र पॉझिटिव्ह आलेला रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्यास त्यांना सर्व जागा भरल्या असल्याचे कारण देऊन त्याची घरची तसेच इतर पार्श्वभूमी न पाहता त्यास गोळ्यांची चिठ्ठी देऊन मेडिकलमधून गोळ्या घेण्यास सांगितले जात आहे. तसेच होम क्वॉरंटाईन होऊन आराम करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या