Saturday, April 27, 2024
Homeशब्दगंधवेलकम 2022

वेलकम 2022

करोनाकाळात तंत्रज्ञानस्नेही असण्याची गरज ठळकपणे समोर आली. यापुढील काळात तंत्रज्ञानाचे अनेक नवे आविष्कार आपल्या जीवनाचा भाग बनणार आहेत. अंगावर परिधान करता येणारे तंत्रज्ञान, इंटरनेटचे महाजाल प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवेल. 2021 ने लोकांची आचार-विचारधारा बदलली. उद्याच्या जगाचा तोच मोठा आधार आहे. तेव्हा 2022 रुपी एका तंत्रज्ञानस्नेही वर्षात सगळ्यांचे स्वागत करायला हरकत नाही.

उदय निरगुडकर

सरत्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना ठळकपणे समोर येणार्‍या अनेक घटना, व्यक्ती दिसतात. नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू, नताशा दलाल, शहनाज गिल अशी या वर्षात देदीप्यमान ठरलेली काही नावे तर आर्यन खान, राज कुंद्रा, काही राजकारणी ही वादग्रस्त नावे. वर्षाच्या मध्यावर पसरलेली कोविडची जीवघेणी दुसरी साथ आणि स्वत:च्या बर्थ सर्टिफिकेटपेक्षा महत्त्वाचे असणारे व्हॅक्सिन सर्टिफिकेटही भाव खाऊन गेले. जानेवारीपासून सुरू झालेली लसीकरणाची जगातली सर्वात मोठी मोहीम आणि भारतात विक्रमी वेळेत तयार झालेली करोनावरची लसही चर्चेचा एक महत्त्वाचा बिंदू. एक ना अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. या झाल्या भारतातल्या महत्त्वाच्या नोंदी.

- Advertisement -

जागतिक पटलावरच्या काही ठळक नोंदीही लक्षात घ्यायला हव्यात. ट्रम्प महाशयांनी तालिबानबरोबर डील करून 1 मे 2021 पर्यंत अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातून परततील, अशी योजना आखली होती. बायडन यांच्या अमेरिकन फौजा दोन आठवडे आधीच परतल्या आणि पत्त्याचा बंगला कोसळावा असा प्रथम अफगाण फौजा आणि नंतर करझाईचा अफगाण कोसळला. वीस वर्षांमध्ये दरवर्षी 300 मिलियन डॉलर्स खर्च करूनही एक देश उभा केल्याचे समाधानही अमेरिकेच्या पदरी पडले नाही. उलट चार हजार अमेरिकन सैनिक आणि दोन लाख अफगाण नागरिक मृत्युमुखी पाडले. हे पातक वेगळचे.

जगभरात पर्यावरणाच्या बदलांनी हाहाकार माजवला. बेल्जियम आणि पश्चिम जर्मनीमध्ये प्रथमच महापूर आले. ग्रीसच्या जंगलांना प्रचंड मोठी आग लागली. भारत आणि नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजवला. त्यानंतर झालेल्या सीओपी 26 पर्यावरण परिषदेतून मिथेन उत्सर्जन कमी करण्याच्या निर्धाराव्यतिरिक्त फारसे काही पदरी पडले नाही. करोनाच्या कठीण काळातही जपानने टोकियो ऑलिम्पिक शिस्तबद्ध पद्धतीने भरवले. त्यातल्या अ‍ॅथलेटिक्समधल्या आणि महिला हॉकीमधली भारताची कामगिरी सुखावणारी होती.

जर्मनीमध्ये एंजला मर्केल यांचे युग अखेर संपुष्टात येतेय. युरोपच्या नव्हे तर संपूर्ण जगाच्या राजकारणावर छाप पाडणारी मार्गारेट थॅचर यांच्यानंतरची ही महिला राष्ट्रप्रमुख. चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीला 100 वर्षे पूर्ण झाली आणि एक सशक्त अर्थव्यवस्था म्हणून या दशकात चीन नुसताच स्थिरावला नाही तर अधिक आक्रमक बनला. चीनमधले जीवनमान आणि पायाभूत सोयी-सुविधांमध्ये गेल्या दशकात विलक्षण गतीने वाढ झाली. जागतिक स्तरावरील आपले स्थान आणि अनेक देशांपुढे उभे केलेले आव्हान चीनने सिद्ध केले. ‘ऑकस’ची निर्मिती आणि गरज हा त्याचाच परिपाक.

हे वर्ष सरत असताना युरोपमधले काही देश आणि अमेरिकेत करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. आधी ब्लॅक फंगस, मग डेल्टा आणि आता ओमायक्रॉन. याचा विपरीत परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होतच आहे. पण करोना आणि त्यावरील लसीकरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या लस मैत्रीच्या उपक्रमाची नोंद सुवर्णाक्षरात होईल.

जगभरातल्या अनेक देशांमध्ये लोकशाही मूल्य आणि परंपरा धोक्यात आल्या. ब्राझीलमध्ये अध्यक्ष बोल्सनरो यांनी देशाच्या निवडणूक पद्धतीवरच हल्ला चढवला. म्यानमार, बाली, गयाना, सुदान इथे बंड करून प्रस्थापित सरकारे उलथवली गेली. चीनची हाँगकाँगवरील पकड अधिक पोलादी झाली आणि क्युबाने सरकारविरोधी आंदोलन चिरडून टाकले. रशियामध्ये विरोधी पक्षनेते अ‍ॅलेक्सी नॅव्हलॉन यांना सरकारने तुरुंगात टाकले तर भारतात शेतकरी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि संसदेत मंजूर झालेल्या कृषी सुधार कायद्यांना स्थगिती द्यावी लागली.

या दशकाच्या सुरुवातीला ‘बॉटम ऑफ द पिरॅमिड’ मध्ये जगणारी प्रचंड जनसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होती आणि म्हणूनच छोटा रिचार्ज, छोटा पॅक अशा गोष्टी मार्केटमध्ये आल्या. परंतु आज दहा-बारा वर्षांनंतर ते चित्र बदललेय. 2030 पर्यंत 70 ते 75 टक्के भारतीय मध्यमवर्ग या कॅटेगरीत जातील अशी पावले टाकली जाताहेत. त्याचा परिणाम म्हणूनच भारतातली अंतर्गत बाजारपेठ दिवसेंदिवस मजबूत होत असून तोच आमच्या विकासाचा कणा बनतोय. यापुढील उद्योग व्यवसाय हे स्टेईंग कनेक्टेड, लुकिंग हेल्दी या नव्या प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये जोमाने वाढणार यात शंकाच नाही. सरत्या वर्षात ठळकपणे जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे देशांतर्गत दळणवळण व्यवस्था वेगाने सुधारतेय. खेडोपाडी इंटरनेटचा प्रसार झालाय. त्यामुळे ग्रामीण भागातली जीवनशैली आणि शहरातली जीवनशैली यात पुढील काही वर्षांत फारसा फरक उरणार नाही. 40 टक्के खरेदी आणि विक्री ही डिजिटल माध्यमातून होणार, असा कल मागील वर्षात स्पष्ट झाला. महत्त्वाकांक्षी भारताच्या पायाभरणीचे काम निश्चितच जोमाने सुरू आहे. जीवनपद्धतीमधले नवीन नॉर्मल आणि हायब्रीड वर्किंग मॉडेल (वर्क फ्रॉम होम संस्कृती) भारतीय उद्योगांनी स्वीकारली आहे.

कोविडच्या उतरणीच्या काळात जगभरातल्या देशांनी आपापल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केलेले दिसतात. त्याचा परिणामदेखील आता जाणवतोय. बहुतांश ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सुधारतेय. भारतातले चित्र पुढील आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत निश्चित सुधारेल, असेच अर्थव्यवस्थेचे अंदाज सांगताहेत. मुख्य डोकेदुखी ही वाढत्या वित्तीय तुटीची आहे. ही येत्या काही काळात सात टक्क्यांवर पोहोचेल. म्हणजेच ती एकूण 15 लाख कोटी इतकी मोठी तूट असेल. अर्थात, हेच चित्र विकसित होत जाणार्‍या जगातल्या अनेक देशांमध्ये दिसत आहे. भारतातली आणखी एक आशादायक बाब म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स याच्या वसुलीत झालेली प्रचंड वाढ. (83 टक्के). हे झाले प्रत्यक्ष कराचे. अप्रत्यक्ष कर म्हणजे जीएसटी, कस्टम, एक्साईज याचे कलेक्शन 48 टक्क्यांनी वाढले. हे खूपच आशादायक आहे. मागील वर्षी आक्रसलेला जीडीपी यावर्षी साडेतेरा ते चौदा टक्क्यांच्या आसपास जाईल. आणखी एक डोकेदुखी म्हणजे निर्गुंतणुकीला अद्याप अपेक्षित यश मिळत नाही. सध्या कर वसुलीतून मिळणार्‍या पैशांमुळे इथली घट भरून निघतीय, हीच काय ती दिलासाजनक बाब.

हे झाले यावर्षीचे. परंतु करोनाकाळात सर्वात ठळकपणे काय समोर आले असेल तर ते म्हणजे तंत्रज्ञानस्नेही असण्याची गरज. अगदी सामान्य माणसाचे सामान्य जीवनदेखील आता त्याच्याशी एकरूप झाले आहे. यापुढील काळात तंत्रज्ञानाचे अनेक नवे आविष्कार आमच्या जीवनाचा भाग बनणार आहेत. अंगावर परिधान करता येणारे तंत्रज्ञान पुढल्या दशकात आमच्या जीवनाचा भाग असेल. इंटरनेटचे महाजाल प्रत्येक क्षेत्रात अविभाज्य असेल. वायरविना वीज घरी पोहोचवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असेल. क्रिप्टोकरन्सीही अर्थव्यवस्थांचा महत्त्वाचा भाग बनली असेल. चालकाविना गाड्या अस्तित्वात आलेल्या असतील. पण त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद, त्याचे परवाने या गोष्टी कालबाह्य होतील. थ्रीडी प्रिंटिंग सहज उपलब्ध होईल. आजच असे प्रिंटर्स 700-800 डॉलर्सला मिळताहेत. त्यातून अनेक उपकरणे, घराचे भाग, गाड्यांचे स्पेअर पार्टस् सहज प्रिंट होऊन वापरात येत आहेत. या पुढच्या काळात टप्पा असेल तो मनुष्य अवयवनिर्मितीचा. व्हर्च्युअल रियॅलिटीच्या आविष्कारामुळे आभासी आणि सत्य जगादरम्यानच्या सीमारेषा पुसट होतील. डेटा अ‍ॅनेलिटिक्स तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट नुसती ट्रॅक करणार नाहीत तर तुमच्या आवडी-निवडीच्या गरजा बदलून टाकेल. या शतकाच्या सुरुवातीला मानवी गुणसूत्रांचे सिक्वेन्सिंग करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. तेव्हा त्याची किंमत जवळपास तीन बिलियन डॉलर्स इतकी प्रचंड होती. आज तीच पाच हजार डॉलर्स इतकी खाली आली आहे. यापुढच्या काळात जेनोमिक्स आणि सुपर ह्युमन यांचा प्रभाव आमच्या जीवनावर पडलेला असेल. ‘मेटाव्हर्स’ हे एक संपूर्ण नवीन जग या पुढील दशकात अस्तित्वाला येणार.

2021 ने जीवनासाठी महत्त्वाचे काय? या प्रश्नावर आरोग्यपूर्ण धडा दिला. आपल्यासाठी काय योग्य याचे शिक्षण नकळत झाले. लोकांची आचार-विचारधारा बदलली. उद्याच्या जगाचा तोच मोठा आधार आहे. तेव्हा 2022 रुपी एका तंत्रज्ञानस्नेही वर्षात सगळ्यांचे स्वागत करायला हरकत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या