मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरील 105 पाणी वापर संस्थांच्या निवडणुका बिनविरोध

jalgaon-digital
3 Min Read

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरील 145 लघुवितरिकास्तरीय पाणी वापर संस्थांपैकी 105 संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता तथा निवडणूक निर्णय अधिकारी सायली पाटील यांनी दिली.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत अहमदनगर मुळा पाटबंधारे विभागाने मुळा धरणाच्या उजव्या कालव्यावरील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये स्थापन झालेल्या 145 लघुवितरिकास्तरीय पाणी वापर संस्थांच्या निवडणुका जाहीर केला होता.

31 मे ते 2 जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणेची तर दि. 8 जून ही उमेदवारी अर्ज मागे घेणेची शेवटीची मुदत होती. यामुदतीत 145 पैकी 105 पाणी वापर संस्थांच्या निवडणूका बिनविरोध झालेल्या आहेत. तर उर्वरित 40 संस्थांच्या निवडणुकीत त्या त्या संबंधीत पाणी वापर संस्थाच्या सभासदांचा प्रतिसादच मिळालेला नसल्याने एक ही उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नाही.त्यामुळे त्या 40 संस्थाच्या निवडणुकी प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यांवर एकूण 279 पाणी वापर संस्था आहेत. त्यांपैकी पहिल्या टप्यात 145 संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आला होता. मुळा पाटबंधारे विभागाच्या राहुरी, घोडेगाव, नेवासा, चिलेखनवाडी व अमरापूर अशा पाच उपविभागांच्या कार्यक्षेत्रातील ही निवडणूक होती.

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकर्‍यांकडून व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 33 (1) (ग) नुसार पाणी वापर संस्थांच्या सभासदांकडे पाणीपट्टीची थकबाकी असेल, तर असे सभासद पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे संचालक म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतील, तसेच ज्या पाणी वापर संस्थांकडे पाणीपट्टी थकीत असेल त्या संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळातील सदस्यही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतील, ही प्रमुख अट निवडणूक बिनविरोध होण्यास, उमेदवारी अर्ज प्राप्त न होण्यास तसेच प्राप्त उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्यास कारणीभूत झाली आहे.

आता दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या उर्वरित संस्थांच्या निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज प्राप्त झाले नाहीत अशा 28, तर अर्ज दाखलच झाले नाहीत किंवा उमेदवारी अर्ज अवैध ठरले अशा 12 अशा एकूण 40 संस्थांच्या निवडणुका दुसर्‍या टप्प्यावेळी पुन्हा जाहीर केल्या जातील असे पाटील यांनी स्पष्ट केले.

उपविभागनिहाय बिनविरोध झालेल्या संस्थांची संख्या

घोडेगाव उपविभागातील सर्व 20 संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. राहुरी उपविभागातील 15 पैकी 2 बिनविरोध झाल्या, 13 ठिकाणच्या निवडणुकांसाठी प्रतिसाद मिळाला नाही किंवा प्राप्त उमेदवारी अर्ज अवैध ठरले. नेवासा उपविभागातील 30 पैकी 22 संस्थांच्या निवडणूक झाल्या, 8 ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. चिलेखनवाडीमधील 40 पैकी 30 बिनविरोध झाल्या, 10 ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. अमरापूरमध्ये 40 पैकी 31 बिनविरोध झाल्या, उर्वरित 9 ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *