Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही

कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

या हंगामामध्ये भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा काही झाले तरी जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल पण पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षिय पाणी परिषदेमध्ये करण्यात आला.

- Advertisement -

या हंगामामध्ये भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये 50 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये जानेवारीपासून भिषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय पाणीपरिषदेचे श्रीरामपूर बाजार समितीच्या शेतकरी मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्धार करण्यात आला. या पाणी परिषदेला तिन्ही तालुक्यांचे लोकप्रतिनिधी गैरहजर होते. तसेच प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकरी वर्गही बोटावर मोजण्या इतक्या संख्येने उपस्थित होता. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके, परिषदेचे निमंत्रक जितेंद्र भोसले, तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडदे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, कॉ. आण्णासाहेब थोरात, अशोक थोरे, नागेश सावंत, अशोक बागुल, रविंद्र मोरे, सुभाष त्रिभुवन, कैलास बोर्डे, अभिजीत लिप्टे आदी उपस्थित होते.

यंदाच्या हंगामामध्ये भंडारदरा लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या परिषदेमध्ये यावर्षी जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करण्याचे ठरले. तसेच सर्वप्रकारे आंदोलन करून पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार वक्त्यांनी केला.

सन 2005 साली झालेला समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. समन्याय म्हणजे सर्वांना सारखे पाणी परंतु तसे न होता, जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो, असे मत भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे अध्यक्ष सुरेश ताके यांनी केले. तसेच त्यांनी यावेळी 7 प्रकारचे ठराव मांडले ते सर्वानुमते मान्य करण्यात आले.

या पाणी परिषदेमध्ये ओझरच्या खाली असलेल्या बंधारे, टेलटँक, मुठेवाडगाव पाझर तलाव, गावतळी तसेच पाझरतलाव आदी भरण्यासाठी भंडारदरा तसेच निळवंडे धरणातील पाणी आरक्षित करण्यात यावे, गोदावरी, प्रवरा व मुळा नद्यामध्ये असलेल्या बंधार्‍यांच्या मालिकांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे, समन्यायीला आमचा विरोध नाही परंतु मूळ प्रकल्प अहवालानुसार ते देण्यात यावे ,अशा अनेक मागण्या यावेळी वक्त्यांनी केल्या. आपल्याला जे पाणी मिळते त्याचे मोजमाप होणे आवश्यक आहे, असे मत माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कॉ. अण्णासाहेब थोरात, कैलास बोर्डे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, मिलिंदकुमार साळवे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, सभापती सुधीर नवले, सचिन बडदे, तिलक डुंगरवाल, अभिजीत लिप्टे, नागेश सावंत, अशोक बागुल, अशोक थोरे, माजी नगरसेवक अशोक कानडे, गोविंदराव वाबळे, सुभाष त्रिभुवन आदींनी मनोगत व्यक्त करून सुरेश ताके यांनी मांडलेल्या ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

प्रमुख नेत्यांनी फिरवली पाठ

श्रीरामपूर तालुक्यात कमी पाऊस पडल्याने जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध करण्यासाठी बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सर्वपक्षीय पाणी परिषदेला म्हणजे पाण्याच्या जीवनमरण प्रश्नावर प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले.

13 ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषण

कोणत्याही परिस्थितीमध्ये जायकवाडीला पाणी जाऊ न देण्याच्या मागणीसाठी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीच्या वतीने श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळा येथे दि. 13 ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सुरेश ताके यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या