Wednesday, April 24, 2024
Homeनगरवीरगाव सोसायटीवर भाजपाचे वर्चस्व

वीरगाव सोसायटीवर भाजपाचे वर्चस्व

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या वीरगाव विकास सोसायटी निवडणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला.

- Advertisement -

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, बाळासाहेब मुळे, भाऊसाहेब वाकचौरे, नानासाहेब थोरात, सोमनाथ कुमकर यांचा शेतकरी ग्रामविकास पॅनल तर भाजप जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामनाथ बापू वाकचौरे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाबासाहेब वाकचौरे, शिवसेना आढळा विभागप्रमुख बाळासाहेब कुमकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास चव्हाण यांच्या महाविकास आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये लढत होऊन रावसाहेब वाकचौरे यांनी 9 विरुद्ध 4 च्या फरकाने एकहाती सत्ता काबीज केली.

शेतकरी ग्रामविकास पॅनलचे सर्वसाधारण मतदारसंघातील 8 पैकी 7 जागांवर उमेदवार निवडून आले. तर महिला राखीवमध्ये 1 व इतर मागासवर्गीयमध्ये 1 उमेदवार निवडून आले तर विरोधी शेतकरी विकास पॅनलचे सर्वसाधारणमधून 1, महिला राखीवमधून 1, भटक्या विमुक्तमधून 1 तर अनुसूचित जाती जमातीमधून 1 असे 4 उमेदवार निवडून आले.

रावसाहेब वाकचौरे यांच्या शेतकरी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार- अस्वले किसन शिवाजी, चिटणीस रोहिदास भास्कर, देशमुख रेवण विनायक, कुमकर लहानू सहादू, कुमकर अण्णासाहेब आबा, थोरात जयवंत सीताराम, वाकचौरे संपत अमृता, वाकचौरे सुनील नामदेव, वाकचौरे उर्मिला तात्यासाहेब हे निवडून आले. तर जालिंदर वाकचौरे यांच्यासह आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे थोरात अंकुश रामनाथ, नजान लक्ष्मण, अस्वले ज्योती संदीप, डोळस अरुण सगाजी हे उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे सोसायटीत भाजपाचाच विजय झाला आहे. रावसाहेब वाकचौरे यांचे 9 तर आघाडीतील जालिंदर वाकचौरे यांच्या कोट्यातील 3 व आरपीआयचा 1 असे बलाबल असल्याने भाजपाचाचं विजय म्हणावा लागेल.

सहकारातील निवडणुकीत गावपातळीवर पक्ष नसला तरी रावसाहेब वाकचौरे यांनी बॅनर व मतपत्रिकेवर भाजप नेत्यांचे फोटो टाकून माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत असल्याचे सांगितले होते. त्यांनी हा भाजप पक्षाचाच विजय असल्याचे सांगितले. गावातील भाजपसह सर्व राजकीय पक्ष एकत्र येत महविकास आघाडी करत मला एकटे पाडण्याचा प्रयत्न सर्वांनी केला. मात्र सर्व गाव व नागरिक आपल्या पाठीशी ठाम उभे आहेत, असे रावसाहेब वाकचौरे यांनी विजयानंतर सांगितले. हा विजय गावच्या सर्व जनतेचा असून आम्ही हुकूमशाही पद्धतीने वागत असतो तर जनतेने कधीच स्वीकारले नसते, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या