विळद : एकाच मतदाराला वेगवेगळे अनुक्रमांक

jalgaon-digital
3 Min Read

मृतांची नावे यादीत : निवडणूक विभागाचा घोळातघोळ

धनंजय शिंदे

अहमदनगर – नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 29 मार्चला मतदान होणार आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीत एकाच मतदाराला वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आले आहेत. यासह मृत मतदारांची नावे देखील निवडणूक विभागाने प्रसिध्द केलेल्या अंतिम यादीत छापण्यात आली आहेत. निवडणूक विभागाच्या घोळाचा फटका निवडणुक लढवणार्‍या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी विळद गावाची सदोष मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती होणे आवश्यक ठरणार आहे.

दरम्यान, थेट जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द करून महाविकास आघाडी सरकारनेे सदस्यांतून सरपंच निवडीला अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्कामोर्तब केले. तर राज्य निवडणुक आयोगाने एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 24 फेब्रुवारीला जाहीर केला आहे. यात नगर तालुक्यातील विळद व पिंपरी घुमट या गावांचा समावेश असून 29 मार्चला येथे मतदान होत आहे. विळद येथील 11 तर पिंपरी घुमट येथील 7 जागांबरोबरच सरपंचपदासाठी देखील मतदान होणार आहे. 6 मार्चपासून उमेदवारी अर्ज स्विकारायला सुरुवात झाली असून 16 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 18 मार्च आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत विळद ग्रामपंचायतींच्या प्रभाग क्रमांक चारच्या अंतिम मतदार यादीत पुरुष मतदार 335, स्त्री मतदार 328 असे एकूण 663 मतदारांची नावे आहेत.  यातील 7 मतदारांना वेगवेगळे अनुक्रमांक देण्यात आले असून त्यापैकी एका मतदाराला तीन अनुक्रमांक देण्यात आले आहेत. थेट जनतेतून सरपंचांची निवड होत असल्याने मतदारांच्या एका-एका मताला किंमत असून अशा प्रकारे मतदार यादीत घोळ असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे. यामुळे निवडणूक विभागाने चुकीची मतदार यादी दुरूस्त करावी, अशी मागणी होत आहे.

चुका दुरुस्त करण्याची मागणी

मृत मतदाराच्या जागी दुसरा उभा करुन मतदान होण्याची, तसेच विवाह झालेल्या मुलींचे नाव यादीतून न वगळल्याने ‘माहेर व सासर’ अशा दोन्ही गावात संबंधित महिलांची नाव मतदारयादीत असण्याची शक्यता आहे. असा प्रकार विळदच्या मतदार यादीतही झाला असण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक चारसह सर्वच प्रभागांची मतदार यादी निवडणूक आयोगाने अद्ययावत करावी तसेच मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यात यावीत अशी मागणी गावातील मतदारांनी ‘सार्वमत’शी बोलताना केली.

यांना आहे वेगवेगळे अनुक्रमांक
सुमित विजय अडसुरे (80, 180), संदीप गोरक्षनाथ बाचकर (182, 191, 192), रोहिणी अमोल तांबे (190, 197), प्रगती एकनाथ बाचकर (193, 194), अक्षय गोविंद बाचकर(195, 196), सुनील ताराचंद पवार (660, 662), योगेश भाऊसाहेब जगताप (659, 661)

हे आहेत मृत मतदार
जयवंत शंकर बाचकर (217), भाऊसाहेब आप्पाजी शिंदे (257), राजेंद्र शंकर जगताप (505), रामदास केशव तांबे(363), रावसाहेब गणपत पगारे (480), सचिन पोपट पगारे (483), पोपट गणपत पगारे (481), शिवराम आप्पाजी शिंदे (503), नामदेव भगवंत जगताप (543)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *