Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'वंदे मातरम्’ अभियानाचा आज शुभारंभ

‘वंदे मातरम्’ अभियानाचा आज शुभारंभ

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi Jayanti )यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” ( Vande Mataram Campaign)या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे आज रविवारी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी प्रसिद्ध केले आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्”नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘जनगणमन‘ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्‘ हे राष्ट्रीय गाणे हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी, कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद तसेच समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

“वंदे मातरम्” हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. “वंदे मातरम्”बाबत प्रचार-प्रसार आणि जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास वतसेच त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. लघु चित्रपटाच्या माध्यमातून “वंदे मातरम्”बाबत जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित, विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम आणि आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत तसेच सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता “वंदे मातरम्” असे अभिवादन करावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या