‘MPSC’ सदस्यांच्या जागा रिक्त; अध्यक्ष आणि एक सदस्य नियुक्त

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग अर्थात ‘एमपीएससी’चा कारभार केवळ अध्यक्ष व एका सदस्याच्या नियुक्तीवर सुरू आहे. उर्वरित चार सदस्य निवडीसाठी सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रक्रिया सुरू झाली, पण त्यास अद्याप गती मिळालेली नसल्याचे समजते.

सदस्य नसल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला असून, अंतिम निकाल रखडले आहेत. ‘एमपीएससी’ ही स्वायत्त संस्था असली तरी अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती सरकारच्या माध्यमातून होते. सध्या सतीश गवई हे अध्यक्ष आहेत, तर दयानंद मेश्राम हे एकमेव सदस्य आहेत. चार सदस्यांच्या जागा रिक्त आहेत.

करोनामुळे एकीकडे गेल्या वर्षीच्या परीक्षा लांबल्या आहेत, त्यांना आणखी उशीर होणार होता, पण विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. तसेच यापूर्वी पीएसआय, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा यांच्या परीक्षा २०१८-१९ मध्ये झाल्या आहेत. पण यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या अद्याप मुलाखती पार पडलेल्या नाहीत.

भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारीरिक चाचणीच्या वेळेस अध्यक्ष व सदस्य यांच्यापैकी एक प्रतिनिधी तेथे उपस्थित असणे अनिवार्य आहे. तसेच नवीन पद भरतीचे नियोजन, वेळापत्रक यामध्ये ही सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते.

सध्या अध्यक्ष व सदस्य हे दोघेच असल्याने त्या कामावर मर्यादा येत आहे. एमपीएसीसीचे चार सदस्य निवड करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागातर्फे आॅगस्ट २०२० मध्ये अर्ज मागविले होते, त्यानंतर अद्याप त्याबाबत पुढे काय कार्यवाही झाली नसल्याचे समजते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *