धुळ्यात अवकाळी पाऊस, काही भागात गारपीट

धुळ्यात अवकाळी पाऊस, काही भागात गारपीट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरासह तालुक्यातील सायने, नंदाणे, सोनगीरसह काही भागात आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. तर साक्री तालुक्यातील काही भागात वादळीवार्‍यासह गारपीटही झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पथके नेमुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हवामान विभागाने शहरासह जिल्ह्यात दि. 20 ते 22 मार्च दरम्यान वादळी वार्‍यासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यानुसार आज दुपारी वातावरणात अचानक बदल झाला.

साडेतीन ते चार वाजेनंतर ढगांनी गर्दी केली. तर साडेचार वाजेदरम्यान वारेही वेगाने वाहु लागले आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली.

सुमारे अर्धातास पाऊस झाला. धुळे तालुक्यातील सायने, नंदाणे सोनगीरलाही जोरदार पाऊस झाला. तर साक्री तालुक्यातील बल्हाणे, धोंगडे, मालनगाव, बोडकीखडी, दहिवेल येथे काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी तुरळक गारपीट व पाऊस झाला.

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानीचे पंचमाने करण्यासाठी पथके नेमुन प्राथमिक अहवाल तातडीने व अंतिम अहवाल दोन दिवसात सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com