Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यागणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

नाशिक । फारुक पठाण Nashik

नाशिक शहरासह सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपल्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकार्‍यांची धावपळ होताना दिसत आहे. दरम्यान, भद्रकालीच्या राजाचे रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, यंदाही अनेक मंडळांच्या पदाधिकार्‍यांमध्ये मुस्लीम तरुण असल्यामुळे नाशिकमध्ये गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे दर्शन होणार आहे. यापूर्वीदेखील अनेक घटनांवरून हिंदू-मुस्लीम एकतेची मिसाल समोर आली आहे.

- Advertisement -

एकीकडे देशात काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणार्‍या जुने नाशिक परिसरातील अनेक गणेश मंडळांमध्ये मुस्लीम तरुणांचा सहभाग आवर्जून असल्यामुळे अशा जातीय तेढ निर्माण करणार्‍यांना ही मोठी चपराक मानली जात आहे.

यापूर्वीदेखील विविध घटनांवरून हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन अवघ्या जगाला नाशिककरांनी घडवले आहे. मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणूक धूमधडाक्यात सुरू होती, तर मिरवणूक एका मशिदीच्या समोरून जात असताना तेथून नमाजसाठीचे आमंत्रण म्हणजे अजान सुरू झाली.

अजानचा आवाज मंडळाच्या पदाधिकार्‍यांना ऐकू आल्यावर त्यांनी त्वरित वाद्य काही वेळ बंद करण्याची सूचना केली. अजान काही मिनिटांत पूर्ण झाल्यावर पुन्हा वाद्य वाजण्यास सुरुवात झाली. मात्र या घटनेचे व्हिडिओ जगभर पसरले. त्याचप्रमाणे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीतदेखील मुस्लीम तरुणांच्या वतीने हिंदू साधू-महंतांचे दूध बाजार येथील शहीद अब्दुल हमीद चौकात जोरदार स्वागत करण्यात येऊन हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रमजान ईद असो की पैगंबर जयंती मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर तसेच मिरवणूक मार्गावर विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, राजकीय नेते शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात.

नाशिकमधील ही एकतेची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र सध्याचे देशाचे वातावरण पाहिले तर नाशिकच्या हिंदू-मुस्लीम बांधवांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे सांगावे लागेल. जुने नाशिकची राजधानी म्हणून प्रसिद्ध चौक मंडई येथील राममुक्ती मित्रमंडळाच्या गणेशोत्सव समिती 2022 चे अध्यक्ष तर अमजद पठाण होते, तर अशरफ बबलू शेख, अफजल पठाण, जलाल काजी हे तरुणदेखील उत्सवात अग्रेसर होते. त्याचप्रमाणे यंदाही कार्यकारिणीत मुस्लीम तरुण आहेत. त्याचप्रमाणे भद्रकालीचा राजा मंडळाच्या खजिनदारपदी आसिफ शेख हे तरुण मुस्लीम कार्यकर्ते यंदा काम पाहणार आहेत. त्याचप्रमाणे मंडळाच्या कार्यकारिणीत अनेक मुस्लीम तरुण आहेत. दरम्यान, भद्रकाली राजाचे मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून रंगरंगोटीचे काम सुरू आहे, अशी माहिती चेतन शेलार यांनी दिली.

भद्रकालीचा राजाची कार्यकारणी

अध्यक्ष – नीलेश शेलार

उपाध्यक्ष – निखिल ठाकरे

सरचिटणीस – राजेश पवार

खजिनदार – आसिफ शेख

सदस्य – अशोक कचरे, मोईन खान चेतन शेलार, गणेश शेलार, कुणाल शेलार, अतुल विसे, सागर विसे, सचिन बागुल, सचिन जाधव, मुज्जू शेख, सुनील दांडगव्हाळ, योगेश बकरे, किशोर कसलीवाल, किशोर साळवे, नाना निकम, सुनील गवळी, मार्गदर्शक – सुरेश शेलार, नंदू शेलार, हेमंत ठाकरे, चंद्रकांत शेलार, राजेंद्र शेलार, दीपक शेलार, शैलेश शेलार, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र बागुल, विजय दिघे, अशोक कचरे

- Advertisment -

ताज्या बातम्या