उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अनोखा उपक्रम

नविन नाशिक । प्रतिनिधी

उन्हाळ्यात शहरात देखील लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो अशातच पशु पक्षांना अन्न पाणी न मिळाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. पक्षांना उन्हात पाणी व अन्न मिळावे म्हणून नगरसेवक राकेश दोंदे यांनी प्रत्येक घरात एक असे सुमारे 2 हजार मातीचे पाण्याचे भांडे व धान्याची सोय करत पक्षांसाठी अनोखा उपक्रम राबविला.

पूर्वी नाशकात दाट जंगल होते. परंतु कालांतराने झाडे नष्ट होत सिमेंटचे जंगल उभे राहिले. आणि शहराची वाटचाल यंत्र भूमीकडे सुर झाली. मात्र यात निसर्गाचे चक्र बदलू लागल्याने त्याचा मोठा बदल करोनाने दाखवून दिला आहे. निसर्गाचे रक्षण करणारे पशु पक्षी जगले पाहिजे याच उद्देशाने आपण सर्वांनी स्वतःपासून सुरवात करायला हवी. झाडे कमी झाल्याने पाऊस कमी झाला, पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता भासू लागली.

निसर्गाचे चक्र बदलल्यास आगामी काळात मानवाला त्याचा मोठा फटका बसेल. निसर्ग संवर्धन ही काळाची गरज ओळखून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत जनजागृती करणे गरजेचे आहे. मुळ शेतकरी असलेले नगरसेवक राकेश दोंदे हे अंबड तसेच परिसरात मोठ्या ठिकाणी पाणपोई सोबत प्रत्येक घरात पाण्याचे एक मातीचे भांडे व धान्याची सोय करून देत आहेत.

परिसरातील व्यवसायिक, कुटुंब व ज्यांना हवे त्या सर्वांना ही सोय करून दिली आहे. एकाही पक्षाचा अन्न पाण्याविना जीव जाता नये यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. दररोज सकाळी परिसरात स्वतः नगरसेवक राकेश दोंदे व त्यांचे सहकारी घरोघरी जाऊन पक्षांसाठीचे भांडे व अन्न देतात. या अनोख्या पक्षीप्रेमाचे नागरिकांनी स्वागत केले असून त्यांच्या उपक्रमास हातभार लावला आहे.

निसर्गापुढे कोणीही मोठे नाही. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आधी पशु पक्षांसाठी आधी पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करावी मग आपला व्यवसाय असे आवाहन करीत सर्वांना मातीचे भांडे व अन्नाची सोय करून दिल्याने कंपनी कामगारांसह व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *