Thursday, April 25, 2024
Homeनगरउंबरेतील रूग्णवाहिका लोकार्पणावरून पंचायत समितीत मानापमान नाट्य

उंबरेतील रूग्णवाहिका लोकार्पणावरून पंचायत समितीत मानापमान नाट्य

उंबरे |वार्ताहर|umbare

राहुरी तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातील एका उंबरे ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेची जिल्हा परिषद सदस्या सौ. शशिकलाताई पाटील, पंचायत समिती सदस्य उदयसिंह पाटील यांनी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. या लोकार्पण सोहळ्यावरून राहुरी पंचायत समितीत मानापमान नाट्य रंगले.

- Advertisement -

रुग्णवाहिकेचा रुग्णांसाठी व नागरिकांना त्याचा वापर व्हावा, या हेतूने रुग्णवाहिका लगेच उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आली. या लोकार्पण सोहळ्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राहुरी पंचायत समितीच्या काही तथाकथित पदाधिकार्‍यांनी राजकीय कलगीतुरा सुरू केला आहे. त्यांनी पंचायत समितीच्या काही अधिकार्‍यांना पंचायत समितीच्या कार्यालयात बोलावून लोकार्पण सोहळा कोणाला विचारून केला? त्यासाठी कोणाची परवानगी घेतली होती का? असे उलटसुलट प्रश्न विचारून संबंधित अधिकार्‍यांना हैराण केल्याने उंबरे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 14 व्या वित्त आयोगातून राहुरी तालुक्यातील उंबरे, देवळाली प्रवरा, बारागाव नांदूर, टाकळीमिया, मांजरी या ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 23 मे रोजी रुग्णवाहिका पंचायत समितीच्या ताब्यात दिल्या होत्या. सध्या करोनाची महामारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने या रुग्णवाहिकेची प्रत्येक आरोग्य केंद्रात तातडीची गरज होती. उंबरे येथे रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यामागे अधिकार्‍यांचा राजकीय हेतू नव्हता.

जिल्हा परिषदेच्या फंडातून या रुग्णवाहिका आल्यामुळे या जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. शशिकला पाटील यांच्याही गटांमध्ये एक रुग्णवाहिका गेल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य या नात्याने या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. असे उत्तर अधिकार्‍यांनी दिले. ती रुग्णवाहिका उंबरे आरोग्य केंद्रासाठी पाठविली होती. असे उत्तर दिल्यामुळे या तथाकथित पुढार्‍यांनी पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी केली.

या पाचही गावातील रुग्णवाहिका ताबडतोब पंचायत समितीमध्ये हजर करा, असा तोंडी आदेश दिल्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी रुग्णवाहिका पंचायत समितीमध्ये हजर केल्या व पंचायत समितीच्या आवारामध्ये लावण्यात आल्या. या रूग्णवाहिका पाच दिवसापासून पंचायत समितीमध्ये उभ्या असल्याने या तालुक्यामध्ये अनेक करोनाबाधित रुग्णांना नेण्यासाठी खासगी गाड्या येत नाही, असे असताना मात्र काही तथाकथित पुढारी आलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी पंचायत समितीमध्ये लावून घेतात. याबाबत नाराजी पसरली आहे.

प्रत्यक्षात जनतेचे आणि या करोना आजाराचं काही देणे घेणे नाही, अशी चर्चा राहुरी तालुक्यात चालू आहे. होतकरू आधिकार्‍यांना पंचायत समिती स्तरावर अशी वागणूक मिळत असेल तर ते निश्चितच या अधिकार्‍यांच्या मनाचे खच्चीकरण करणार असल्याचे पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वर्तुळात बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या