Wednesday, April 24, 2024
Homeनंदुरबारखाकी वर्दीतील कर्तव्यकठोर पोलीस देवदूतासारखे येतात अन् साजरा होतो माणसुसकीचा दसरा

खाकी वर्दीतील कर्तव्यकठोर पोलीस देवदूतासारखे येतात अन् साजरा होतो माणसुसकीचा दसरा

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

शहादा (Shahada) येथे गेल्या आठवडयात झालेल्या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले होते. तर १५ मजूर गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे यंदाचा दसरा त्यांचा अंधकारमय झाला होता. अशाच खाकी वर्दीतील कर्तव्यकठोर वाटणारे पोलीस (police) देवदूतासारखे येतात आणि अपघातग्रस्त (accident) आदिवासी मजुरांवरील दुःखाचे आगळयावेगळया पद्धतीने सीमोल्लंघन करुन जातात. आणि साजरा होतो माणुसकीचा दसरा….

- Advertisement -

मागील आठवड्यात शहादा येथे एका खाजगी बसने ऊसतोडणी मजूर घेऊन सांगलीकडे जाणार्‍या आयशरला समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४ महिला व २ पुरुष असे ६ मजूर जागीच ठार झाले तर १५ मजूर गंभीर जखमी झाले.

ऊसतोडणीचा सिझन सुरु झाला की, दसर्‍याच्या तोंडावर पोटाची खळगी भरण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून आदिवासी ऊसतोडणी मजूर ट्रकने साखर कारखान्यांच्या पट्ट्यात स्थलांतरीत होतात.चार पाच महिने गुरासारखे ऊसतोडणीसाठी राबायचे.

दसरा, दिवाळी, मकर संक्रांत हे सण ऊसाच्या शेतातच साजरे करायचे आणि मिळालेली मजुरी घेऊन गुढीपाडव्याला गावाला परतायचे. पुढचे वर्षभर पुढच्या सिझनची वाट बघत त्या मजुरीवर गुजराण करायची. अंगावर अंगभर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, शिक्षणाची तर लांबची गोष्ट, अशी या मजूरांची व्यथा असते.

या भीषण अपघातात कर्तेपुरुष आणि महिला गमावलेल्या पाडळदा आणि अलखेड या गावावर शोककळा पसरली. अशात जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह गावात येतात. थेट झोपडीसमोर बसकन मारतात.

अपघातात कुणी आई तर कुणी बाप गमावलेला असतो. डझनभर लोक कायमचे जायबंदी झालेले. त्यांच्या मजुरीवर अवलंबून असलेली अनाथ झालेली लहान मुले तर गांगरून गेलेली. झोपडीतले दारिद्र्य, दुःख, दैना पाहून सारेच हेलावून जातात.

यंदा इथे दसरा साजरा होणार नसतो. या आदिवासी लोकांची भाषा कुणाला समजत नाही. समजते ते फक्त त्यांच्या डोळ्यातले दुःख. पोलीस अधीक्षकांचे फर्मान सुटते. शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर हे या सार्‍यांच्या घरात २ महिन्याचा किराणा पोहोच करतात.

पुन्हा फर्मान सुटते या सार्‍या मयत व जखमी लोकांच्या घरी एफ.आर.आय ची प्रत, पीएम रिपोर्ट, मृत्यू दाखला, पंचनामा आदी कागदपत्रांची फाईल घरपोच होते. सरकारी मदत आणि विमा रक्कम मिळण्यासाठी जलद हालचाल सुरु होते.

उचल म्हणून घेतलेले पैसे ठेकेदाराने परत घेऊ नये यासाठी त्याला सूचना दिली जाते. बसमालकाला बोलावून पोलीसी भाषेत समजावून सांगितल्याने तोही या लोकांना आर्थिक मदत करतो. अपघातग्रस्तांचे दुःख हलके केल्याने एरव्ही कडक वाटणारे पोलीस आदिवासी पाड्यावर देवदूत भासतात.

नंदूरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी हे सुद्धा मुख्यमंत्री फंडातून तातडीने मदत मिळण्यासाठी पुढाकार घेतात. नंदुरबार पोलीसांनी मात्र अपघातग्रस्त आदिवासी मजुरांच्या दुःखाचे असे आगळे वेगळे सीमोल्लंघन करुन माणुसकीचा दसरा साजरा केल्याने त्यांचे कौतूक होत आहे.

आदिवासींनीही त्यांच्या भाषेत पोलीसांचे आभार मानले आहेत.दोघांनाही एकमेकांची भाषा समजली नसली तरी परस्परांच्या भावना मात्र नक्कीच कळाल्या असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या