Saturday, April 27, 2024
Homeनगरतृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत ‘नो एंट्री’

तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत ‘नो एंट्री’

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी भारतीय पेहराव परिधान करूनच यावे अशा विनंतीचे फलक मंदिर परिसर लावण्यात आल्यानंतर

- Advertisement -

यावर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी यास तिव्र विरोध दर्शवून सदरचे फलक काढून टाकणार असल्याचा इशारा दिल्यानंतर शिर्डीतील शिवसेना तसेच ब्राह्मण महासंघाच्यावतीने देसाई यांना प्रतिउत्तर म्हणून शिर्डीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

दरम्यान कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी गोविंद शिंदे यांच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार श्रीमती देसाई यांना शिर्डी नगरपंचायत हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली असून या आदेशाची नोटीस पोलीस कर्मचारी यांनी बजावली आहे. शहरात पन्नास अतिरिक्त महिला पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.

साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी देश-विदेशातून अनेक पुरुष तसेच महिला भाविक तोकडे कपडे परिधान करून येतात याविषयी वेळोवेळी काही तक्रारीही करण्यात आल्या असून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंदिर परिसरात सर्व साई भक्तांना विनंती करून आवाहन केले आहे की साईबाबांच्या पवित्र ठिकाणी दर्शनासाठी येताना भारतीय संस्कृतीनुसार पूर्ण पेहराव परिधान करून यावे.

या साई संस्थानच्या आवाहनाचे जगभरातील साईभक्तांनी स्वागत केले असून शिर्डी ग्रामस्थांनी देखील यास दुजोरा दिला आहे. दरम्यान याबाबत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हा प्रकार संविधान विरोधी असल्याचे सांगत सदरचे फलक काढून टाकावे, अन्यथा दि.10 रोजी दुपारी 1 वाजता शिर्डीत येऊन हा फलक हटवण्यात येईल, असा इशारा दिल्याने वाद निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी साईबाबा संस्थानवर असेल असा पत्रव्यवहार करत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला आहे.

त्याअनुषंगाने सि.आर.पि.सी.1973 नुसार 144 ( 2) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी यांना असल्याने त्यांनी प्राप्त अधिकारानुसार तृप्ती देसाई यांना नगरपंचायत हद्दीत प्रवेश करण्यास दि.8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास आय.पि.सी.188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहतील या आदेशाची नोटीस शिर्डी पोलीस कर्मचार्‍यांंमार्फत देसाई यांना बजावण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सातव यांनी सांगितले. शहरात चार पोलीस अधिकारी, दोन महिला पोलीस अधिकारी तसेच 25 महिला 25 पुरुष कर्मचारी यांचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आजपासून तीन दिवस ठेवण्यात आला आहे.

लोकशाहीमध्ये सर्वांना संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. एखाद्या फलकावर भाविकांवर जर अन्याय होणार असेल तर त्यासंदर्भात आम्ही शांततेत आवाज उठवत असून अशा पद्धतीने दोन दिवसांत नोटीस बजावून शिर्डीत बंदी घालणे म्हणजे आमच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. ही एकतर्फी कारवाई केली असून मला जशी नोटीस दिली, तशी साई संस्थानला देखील नोटीस दिली पाहिजे. मात्र आम्ही आमचा आवाज दाबू देणार नसून आम्ही साईबाबांचे भक्त असून शांततेच्या मार्गाने त्याठिकाणी येणार आहे. आमच्यामुळे कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही परंतु संस्थान व ग्रामस्थांनी बोर्ड न हटवल्यास त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे आमची अडवणूक करू नये .

– तृप्ती देसाई- अध्यक्ष भुमाता ब्रिगेड

- Advertisment -

ताज्या बातम्या