ट्रम्प यांचा चीनला झटका ; हाँगकाँगचा व्यापार विशेष दर्जा काढला

jalgaon-digital
2 Min Read

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरूद्ध कठोर बंदी घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली असून चीनमधील शहर हाँगकाँगला व्यापारासाठी देण्यात आलेला विशेष दर्जाही काढून घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेतील एक आधारस्तंभ ही हाँगकाँगची ओळख पुसली जाणार आहे. तसेच चीनचे प्रवेशद्वार म्हणून असलेले हाँगकाँगचे महत्त्वही कमी होणार आहे. यापुढे अर्थ निर्यात व्यापार, आयात कर आणि प्रत्यर्पणाच्या बाबतीत हाँगकाँगला यापुढे अमेरिकेकडून झुकते माप दिले जाणार नाही.

कोरोनामुळे अमेरिका आणि चीनमधील वाढलेला तणाव अद्याप कायम आहे. अमेरिका चीनविरोधात आक्रमक झाली आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील दडपशाहीच्या कारवायांविरोधात आणि अत्याचारासाठी चीनवर आरोप केले होते. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

हाँगकाँगच्या लोकांविरुद्ध चीनने केलेल्या अत्याचाराविरोधात त्यांना जबाबदार धरण्यासाठी मी आज कायदा आणि आदेशावर स्वाक्षरी केली. हाँगकाँगमध्ये जे काही घडत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. अशा परिस्थितीत त्यांची स्वायत्तता संपवणे योग्य नाही. आम्ही चिनी तंत्रज्ञान आणि दूरसंचार प्रदात्यांचा सामना केला. सुरक्षेच्या कारणास्तव, अनेक देशांना आम्हाला हे पटवून द्यावे लागले की हुआवे धोकादायक आहे. आता युनायटेड किंगडमनेही त्यांच्यावर बंदी घातली आहे, असे ट्रम्प यावेळी म्हणाले.

हाँगकाँगमध्ये काय घडले हे आम्ही पाहिले आहे. मुक्त बाजारात स्पर्धा होऊ नये म्हणून त्याचे स्वातंत्र्य काढून घेण्यात आले. मला असे वाटते की बरेच लोक आता हाँगकाँग सोडत आहेत. आम्ही खूप चांगला स्पर्धक गमावला आहे. आम्ही त्यांच्यासाठी बरेच काही केले, असेही ते म्हणाले. आता हाँगकाँगला कोणताही विशेष दर्जा दिला जाणार नाही. हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवले जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला. परंतु त्याच्या मोबदल्यात विषाणू दिला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोवावे लागले, असेही ट्रम्प म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *