Friday, April 26, 2024
Homeनगरलक्ष्मी बनवणारे हात राहणार ‘लक्ष्मी’ विनाच

लक्ष्मी बनवणारे हात राहणार ‘लक्ष्मी’ विनाच

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

दिवाळीसणात केरसुणी अर्थात झाडूची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला झाडूची खरेदी करून लक्ष्मीपूजनाला त्याची पूजा केली जाते. मात्र, ग्रामीण भागातील पारंपरिक केरसुण्यांचा व्यवसाय अलीकडच्या काळात मंदावला आहे. आधुनिक प्रकारच्या केरसुण्या बाजारात दिसू लागल्याने हा व्यावसायिक अडचणीत आला आहे. त्यामुळे केरसुणी बनवणारे हात मात्र लक्ष्मीविनाच राहण्याची चिंता आहे.

- Advertisement -

प्रामुख्याने मागासवर्गीय समाजाचे लोक हे लक्ष्मीपूजनासाठी लागणारे झाडू, केरसुणी बनवण्याचे काम पारंपरिक पद्धतीने करतात. कर्जत तालुक्यातील राशीन, मिरजगाव, नांदगाव आदी भागातील लोक केरसुणी बनवण्याचा व्यवसाय करतात. केरसुणी बनवण्यासाठी शिंदीच्या झाडांच्या झावळ्यांचा वापर केला जातो. अलीकडच्या काळात ही झाडे कमी झाली आहेत. त्यामुळे हा माल आता बाहेरून विकत आणावा लागत आहे.

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आता प्लॅस्टिकपासून तयार केलेले वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक झाडू आले असल्यामुळे हा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला आहे. दिवाळी सणाबरोबरच लग्नसराईच्या काळात केरसुणीला चांगली मागणी असते. बाजारातील झाडूंच्या तुलनेत ही केरसुणी अधिक टिकाऊ असते. ती बांधण्यासाठी विशिष्ट दोरखंडाचा वापर केला जातो. या व्यावसायिकांकडून केरसुणीबरोबरच दावे, वेसण, कासरे बनवणे हे उद्योग देखील केले जातात. मात्र अलीकडे आधुनिक साधनांनी या व्यवसायावर अतिक्रमण केले असल्याने हा व्यवसाय फक्त सणांपुरताच मर्यादित झाला असल्याची खंत या व्यवसायिकांमध्ये आहे.

केरसुणी तयार करण्यासाठी आवश्यक माल येथे सहज उपलब्ध होत नाही. माल कर्नाटकहून आणावा लागतो. केरसुणी तयार करून आठवडे बाजारात विक्री केली जाते. ग्राहक हे फुलझाडू, प्लास्टिक झाडू 125 ते 150 रुपयांना विकत घेतात. मात्र, पुजनासाठी लागणारा झाडू 50 रुपयांना मागतात. मोठ्या कष्टातून तयार केलेला पारंपरिक झाडूचा योग्य मोबदला मिळत नाही. 300 ते 400 रुपये एवढा रोज मिळतो.

– विजय शिंदे, नांदगाव, ता. कर्जत

- Advertisment -

ताज्या बातम्या