Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याढोल ताशांच्या गजरात आज बाप्पाला निरोप

ढोल ताशांच्या गजरात आज बाप्पाला निरोप

नाशिक | प्रतिनिधी

गेल्या दहा दिवसापासुन मोठ्या उत्साहात व शांततेत सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा आज मिरवणुकीने समारोप होणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधीकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांनी नाशिक शहर व जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुक तयारीचा आढावा घेतला. गुरुवारी सकाळी १२ वाजता आयुक्त करंजकर, तसेच शहराील लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्व विभागीय कार्यालय, नाशिक मनपाच्या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

मनपाचे सर्व अधिकारी, सेवक यांनी सकाळी १०.३० पर्यंत चौक मंडई येथील वाकडी बारव, फाळके रोड येथे मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा कर्मचारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

शहरातील विसर्जन मिरवणूक कामकाजाची देखरेख, नियंत्रण आणि पर्यवेक्षण कार्यवाहीसाठी सहा अधिकाऱ्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीसाठी २२ मंडळांनी सहभाग घेतला आहे.

नाशिक मनपाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने शहरातील नदीपात्राचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता पालिकेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच विसर्जन करता येणार आहे. एकूण ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निवड करण्यात आली आहे.

मनपा सेवक, स्वयंसेवक गणेश विसर्जन स्थळांवर गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनासाठी सज्ज राहणार आहेत. मंडळांनी मिरवणुकीतील ढोल-ताशांचे पथक आणि साहसी खेळ, लेझीम पथके तयार केली आहेत. गुलालवाडी व्यायामशाळेचे लेझीम पथक यंदा ही सज्ज झाले आहेे.

अनेक मंडळांची विद्युत रोषणाई असून, त्यांनी रथ सजविेले आहे. मिरवणूक मार्गावरील वीजतारा भूमिगत करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या वतीने मिरवणूक मार्गावर खड्ड्यांच्या डागडुजीसह अन्य सुविधा देण्याची तयारी केली आहे. मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण तात्पुरत्या स्वरूपात बाजूला करण्यात आले आहे.

रामकुंडाकडे जाणार्‍या सर्व मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने जागोजागी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन व्हावे, यासाठी रासायनिक पावडरचे वितरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाच्या वतीने विसर्जनस्थळी जीवरक्षक दल तैनात ठेवले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या