थोरात कारखान्याच्यावतीने 500 बेडचे नवीन करोना केअर सेंटर सुरू

jalgaon-digital
3 Min Read

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

राज्यात आलेली करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात राज्य पातळीवर अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत

असून जिल्ह्यातील व तालुक्यातील करोना पूर्णपणे रोखण्यासाठी त्यांनी प्रशासनाला सातत्याने सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी शासनाचा लॉकडाऊन अत्यंत कडक रीतीने पाळणे गरजेचे असून त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखणार आहे. मात्र सध्याची रुग्ण वाढ व त्यावरील उपाय योजनांमध्ये महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे नवीन 500 बेडचे करोना केअर सेंटर सुरू होणार आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज च्या अमृत कलामंच येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी काल संगमनेर शहर व तालुक्यातील प्रशासकीय व आरोग्य अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, डॉ. हर्षल तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, डीवायएसपी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, बीडीओ सुरेश शिंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजकुमार जर्‍हाड, वैद्यकीय अधिकारी संदिप कचोरीया, तालुका वैद्यकिय अधिकारी सुरेश घोलप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्याधिकारी अनिल शिंदे, महेश वाव्हळ व आदि उपस्थित होते.

या बैठकीत नामदार थोरात यांनी कारखान्याला नवीन कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नगर रोड वरील विघ्नहर्ता पॅलेस याठिकाणी कारखान्याच्यावतीने पुरुषांसाठी स्वतंत्र 300 बेड व महिलांसाठी स्वतंत्र 200 बेडचे असे एकूण 500 बेडचे कोव्हिड केअर सेंटर सुरू होत आहे.

ना. थोरात यांनी ही करोना रुग्ण वाढ रोखण्यासाठी सातत्याने प्रशासनाला मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयांमध्ये तालुकास्तरावरील राज्यातील पहिले आरटीपीसीआर मशिन दिले असून पाच बायपप मशीनही कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नव्याने 40 ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले.

तालुक्यातील आपत्तीच्या वेळी अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांनी सातत्याने मदतीची भूमिका घेतली असून मागील वर्षी करोना संकटात विविध ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरू केले होते. याचबरोबर मोफत अन्नछत्रही सुरू केले होते. सध्याचा वाढता करोनाचा प्रादुर्भाव पाहता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखानयास नामदार बाळासाहेब थोरात यांनी 500 बेडचे करोना केअर सेंटर तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

यानुसार अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी तातडीने नगर रोडवरील विघ्नहर्ता पॅलेस याठिकाणी कोव्हिड केअर सेंटर साठी अद्ययावत सुविधा देण्याच्या कामास सुरुवात केली आहे. हे कोव्हिड केअर सेंटर तातडीने सुरू होणार असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची सोय होणार आहे. सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरणास प्राधान्य दिले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *