Friday, April 26, 2024
Homeनाशिककुणी द्राक्ष घेत का द्राक्ष..? अवघा दहा रुपये किलोचा भाव...!

कुणी द्राक्ष घेत का द्राक्ष..? अवघा दहा रुपये किलोचा भाव…!

कसबे सुकेणे । Sukena

बेमोसमी पाऊस, सततचे ढगाळ हवामान आणि गेल्या आठ दिवसापासूनचे दाट धुके व पहाटेची थंडी, यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

परिसरात अनेक द्राक्षबागा विक्री योग्य आल्याने त्यास 130 रु. किलो प्रमाणे भाव मिळत असतांनाच या निर्यातक्षम द्राक्षबागांच्या मण्यांना तडे गेल्याने ते आता अवघे 10 रु. किलोने विक्री करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असून या विक्रीतून द्राक्षबागांवर झालेला खर्च देखील फिटणे अवघड झाले आहे.

कसबे सुकेणेसह परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी निर्यातक्षम द्राक्षपीक घेण्याला प्राधान्य देत आला आहे. परिसरात शरद सीडलेस, फ्लेम, नानासाहेब पर्पल, जम्बो आदी काळ्या रंगाच्या प्रकारातील द्राक्षबागांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी या द्राक्षबागांचे हंगामपूर्व उत्पादन घेतले.

साधारणत: काळी जातीचे द्राक्ष डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात काढणीसाठी येतात. त्यामुळे आजच्या परिस्थितीत अनेक द्राक्षबागा विक्रीयोग्य स्थितीत आल्या असतांनाच निसर्गाचा लहरीपणा व बेमोसमी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा सरासरी 130 रुपये किलोने विक्रीसाठी तयार होत्या.

त्या द्राक्षबागांच्या द्राक्षमण्यांना तडे गेल्यानंतर त्याच द्राक्षबागा आता वाईनरीसाठी केवळ 10 रुपये किलोने विक्री कराव्या लागत असल्याने यात शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे इतका मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना सहन करणे अवघड होऊन बसले असून आर्थिक गणित पूर्ण कोलमडले आहे.

कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील जवळपास दहा ते पंधरा शेतकर्‍यांना हा आर्थिक फटका बसला असून लाखो रुपयांचा माल कवडीमोल दरात विकण्याची वेळ या शेतकर्‍यांवर आली आहे. शासनाच्या प्रतिनिधींनी पंचनामे केले असले तरी शासकीय मदत किती मिळणार हाच खरा प्रश्न द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

13 लाखांचे नुकसान माझ्या एकट्याचेच पर्पल या द्राक्षबागेचे एक हेक्टर क्षेत्रावरील 110 क्विंटल द्राक्षमालाला तडे गेले असून हा द्राक्षबाग 130 रुपयाने एक्सपोर्ट विक्रीसाठी तयार झाला होता. मात्र आता तोच द्राक्ष माल केवळ 10 रुपये विक्री करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. त्यामुळे मला सरासरी 12 ते 13 लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

– सुरेश दयाळ, द्राक्ष उत्पादक शेतकरी (कसबे सुकेणे)

- Advertisment -

ताज्या बातम्या