Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामृतांच्या आकडेवारीने दिले गोंधळी कारभाराचे दर्शन

मृतांच्या आकडेवारीने दिले गोंधळी कारभाराचे दर्शन

नाशिक । प्रतिनिधी

करोनाच्या लाटेत नाशिक शहरात किती जणांचा मृत्यू झाला याबाबत शहरभर चर्चा सुरू आहे. हाच मुद्दा नुकत्याच झालेल्या महासभेतदेखील गाजला. नगरसेवकांनी प्रशासनाकडे याबाबतची माहिती मागितल्यावर प्रशासनाकडे माहिती उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आता या विषयाकडे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लक्ष घातले असून सर्व खातेप्रमुखांना माहिती गोळा करून सादर करण्याचे आदेश दिल्यामुळे या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

तसे पाहिले गेले तर महापालिका प्रशासनाकडे शहरातील बारीक-सारीक माहिती संकलित होऊन ठेवणे गरजेचे आहे. मात्र अनेक वेळा महापालिका प्रशासनाचा गोंधळी कारभार नाशिककरांना अनुभवायला मिळाला आहे. तर आता या आकड्यांवरून नवीन घोळ समोर आला आहे. महासभेत मनसेना नगरसेवक सलीम शेख यांच्यासह काही सदस्यांनी आकडेवारी मागत प्रशासनाने त्वरित याबाबतची माहिती द्यावी, अशी मागणी केली. तरी प्रशासनाकडून नेमका आकडा मिळाला नव्हता. शहरातील 17 स्मशानभूमींमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये दहन करण्यात आलेले मृतदेह आणि प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली मृतांची आकडेवारी यात

प्रचंड तफावत असल्याने करोनाबळींचा मूळ आकडा प्रशासनाकडून दडवला जात असल्याचा संशय बळावत असतानाच करोनामुळे महापालिकेतील किती कर्मचार्‍यांचा बळी गेला यासंदर्भातही नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्यास अधिकार्‍याकडून टाळाटाळ केली गेल्याने प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवर्‍यात सापडली होती. जानेवारी 2021 अखेर करोनाची पहिली लाट संपुष्टात आल्यानंतर फेब्रुवारीपासून दुसर्‍या लाटेला निमंत्रण मिळाले.

दुसर्‍या लाटेत शहरात दीड लाखांवर नवे बाधित आढळले तर करोनाबळींची संख्या हजाराच्या घरात पोहोचली. करोनाबळींचा हा आकडा चार महिन्यांतील असला तरी शहरातील 17 स्मशानभूमींमध्ये एक ते सोळा एप्रिलदरम्यान तब्बल 2390 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 16 दिवसांतच इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतांचा आकडा समोर आल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळू घसरली. ख्रिश्चन, मुस्लीम, गोसावी, लिंगायत तसेच विद्युत व गॅस दाहिनीवरच्या दहन करण्यात आलेल्या आकड्यांचा यात समावेश नाही. त्यामुळे बळींचा आकडा नेमका किती यावर आता खल सुरू झाला आहे.

एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या निर्देशांनंतरही प्रशासनाला ही माहिती महासभेत सादर करता आली नव्हती. आस्थापना विभागाकडे अशाप्रकारची माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देत प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे अंगुलीनिर्देश केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनीदेखील आपल्याकडे ही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत वैद्यकीय विभागाकडे बोट दाखवले. मात्र वैद्यकीय विभागालादेखील ही माहिती उपलब्ध करून देता आली नव्हती.

- Advertisment -

ताज्या बातम्या