Friday, April 26, 2024
Homeनगरमालदीवचे विमान हुकल्याने तो संशयित दहशतवादी पोहोचला शिर्डीत !

मालदीवचे विमान हुकल्याने तो संशयित दहशतवादी पोहोचला शिर्डीत !

शिर्डी | शहर प्रतिनिधी| Shirdi

अमृतसर येथे पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीला स्फोटके लावून उडवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयीत दहशतवाद्यास नाशिक एटीएस, शिर्डी पोलीस व पंजाब एटीएसने संयुक्त कारवाईत अटक केली. या संशयीत दशतवाद्यास पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात अल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.

- Advertisement -

रजिंदरकुमार उर्फ रामकुमार बेदी (रा. हरीके पट्टन, तहसीलपट्टी रोड, जि. तारणतरण) याच्यावर पंजाबमधील अमृतसर येथील रणजीत एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये स्फोटक कायदा 1908च्या कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याने साथीदार हरपाल सिंग, फत्यदीप सिंग यांच्या मदतीने पंजाब पोलिसात नेमणुकीस असलेले उपनिरीक्षक दिलबाग सिंग यांच्या चारचाकी गाडीखाली स्फोटके लावून उडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तो पसार होता.

संशयीत रजिंदरकुमार विमानाने मालदीवला पसार होण्याच्या बेतात होता. मात्र त्याच्याकडे करोना चाचणी रिपोर्ट नसल्याने विमानाचे तिकीट कन्फर्म झाले नाही. म्हणून तो दिल्ली येथून मंगला एक्सप्रेसने नांदेड येथे जाण्यासाठी निघाला. ही रेल्वेगाडी नांदेडला न जाता मनमाडपर्यंत असल्याने तो मनमाड रेल्वे स्टेशन येथे उतरला. मनमाड स्टेशन येथे त्यानेे एका लॉजवर एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर तो दुसर्‍या दिवशी शिर्डी येथे दर्शन घेण्यासाठी आला व शिर्डी येथील एका हॉटेलवर थांबला होता.

याबाबत माहिती मिळाल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिर्डी पोलीस तसेच नाशिक एटीएस यांच्याशी समन्वय करून आरोपीस ताब्यात घेण्याबाबत आदेश पारित केले होते. शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच एटीएस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या सदर माहितीचे विश्लेषण करून या संशयीत दहशतवाद्यास ताब्यात घेण्याबाबत कारवाईची आखणी केली. शिर्डी येथील हॉटेलमधील रजिस्टर चेक केले असता आरोपी रूम नंबर 312 मध्ये राहत असल्याचे समजले. त्या ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेण्यात आले.

संशयीत आरोपी हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आला असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर यापूर्वी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. याबाबत अमृतसर येथील रणजीत एवेन्यू पोलीस स्टेशनशी संपर्क करून आरोपीस ताब्यात घेतल्याबाबत कळवण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी एसीपी नागरा तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना कळविले. त्यानंतर पंजाबचे पोलीस अधिकारी समशेर सिंग, जलनजीत सिंग, जर्मनजीत सिंग अमृतसर पोलीस आयुक्तालय व गँगस्टरविरोधी पथक शिर्डी पोलीस स्टेशनला पोहचल्यानंतर आरोपीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, नाशिक दहशतवाद विरोधी पथकाच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार व सहायक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी, शिर्डी पोलीस स्टेशनचे पो.कॉ. नितीन शेलार, पो. कॉ. नितीन सानप, पोलीस कॉन्स्टेबल अजय अंधारे व दहशतवाद विरोधी पथकाचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल संजय हराळे, रवींद्र महाले यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या