सामाजिक भान कधी रूजणार?

jalgaon-digital
6 Min Read

डॉ.साधना कुलकर्णी

आज तांत्रिक प्रगती आणि आर्थिक सुबत्तेमुळे माणूस सुखी झाला आहे, पण नागरिक म्हणून आत्मकेंद्रित आणि निष्क्रिय बनला आहे. चंगळवादी वृत्तीचा जबरदस्त पगडा असल्यामुळे मानवी मेंदूच्या सारासार विवेकाची क्षमता कमी होत आहे. पारतंत्र्यकाळात अनेक महान नेत्यांनी एक विचारधारा रुजवली, जागरुक केले. पण आजचे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.

१५ ऑगस्ट आणि 26 जानेवारीला दरवर्षी मला एकच प्रश्न पडतो की या दिवशी सार्वजनिक सुट्टी का असते? याचे उत्तरही मला अनेकांनी दिले की हे राष्ट्रीय सण आहेत म्हणून. पण राष्ट्रीय सणाला आपण काय करतो? यावर्षी तर 15 ऑगस्टला मंगळवार. 16 ऑगस्टला पारसी न्यू इयरची सुट्टी. 12 ला दुसरा शनिवार तर 13 ला रविवार, म्हणजे सोमवारी 14 ऑगस्टला एक सुट्टी टाकली की आपोआपच पाच सुट्ट्या पदरात पडणार. या योगाची पर्वणी साधून सगळी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून जाणार आणि काहीजण झेंडावंदन करणार. त्यासाठी आठवडाभरापासून कोणता ड्रेस, कोणती साडी, कोणती थीम यावर चर्चा घडणार. वेळप्रसंगी नवी खरेदीही होणार. झेंडावंदनानंतर फोटो आणि रिल्स काढण्याचा अत्यावश्यक कार्यक्रम होणार आणि मग आपापल्या घरी जाऊन आराम करणार, नाहीतर मज्जा करणार. देशाच्या स्वातंत्र्यदिनी एक राष्ट्रगीत म्हणण्याशिवाय दुसरे काय करतो आम्ही? नाही म्हणायला काही उपक्रम राबवलेही जातात पण ते कमीच.

दीडशे वर्षांच्या गुलामगिरीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या तन-मन-धनाची आहुती देऊन लढणार्‍यांसाठी 15 ऑगस्टला आम्ही जोडून सुट्टी आली तर ‘एन्जॉय’ करतो, हे खटकते. कशाला हवी ही सुट्टी? सकाळी झेंडावंदन करून नेहमीसारखे कामाला लागायचे. म्हणजे निदान राष्ट्रीय सणाचा धिंगाणा तरी होणार नाही. नुकतेच झालेले चांद्रयानाचे अंतराळातील प्रक्षेपण, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पटकावलेली पदके, भारतीय चित्रपटाचे ऑस्करमध्ये झालेले नामांकन, सर्जिकल स्ट्राईक.. या आणि यांसारख्या अनेक प्रसंगात आपली देशभक्ती उफाळून येत असते. अर्थात ती यायलाच हवी, पण ही देशभक्ती प्रासंगिक असते आणि केवळ भावनेच्या स्तरावर असते. देशभक्ती ही केवळ भावना नाही तर एक विचारधारा आहे आणि त्यानुसार केले जाणारे आचरण आहे. या देशभक्तीच्या भावना, विचार, कृतीचे एकत्रित रसायन ज्यांच्या नसांमधून नेहमी वाहत असते, तो खरा देशभक्त.

आज अनेक मंडळी, अनेक संस्था देशासाठी नि:स्वार्थी वृत्तीने अथक कार्य करताहेत. त्यांच्यामुळे देशाची मान उंचावली आहे. आज आपला देश 76 वर्षांचा झाला आहे. आमच्या साठीच्या पिढीने एकोणिसाव्या शतकातली वर्षानुवर्षे न बदलणारी आणि कष्टाळू जीवनशैली अनुभवली. आज आम्ही विसाव्या शतकातली तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत बदलणारी, वेगवान आणि सुखसोयींनी युक्त जीवनपद्धती अनुभवत आहोत. वयाच्या या टप्प्यावर, किंबहुना कोणत्याही वयात मी देशासाठी काय केले किंवा काय करू शकतो, हा प्रश्न प्रत्येकाने निदान राष्ट्रीय सणाच्या दिवशी तरी स्वतःला विचारायला हवा.

‘आम्ही नियमित मतदान करतो. नोकरी-व्यवसाय करतो. सामाजिक कायदे पाळतो. नियमित कर भरतो. कुटुंब व्यवस्था अबाधित राखतो. आपल्या धर्म-संस्कृतीचे पालन करतो. सामान्य नागरिक देशासाठी आणखी वेगळे काय करणार?’ असेच उत्तर बहुतांशी दिले जाण्याची शक्यता आहे.

आणि देशातील अराजकता, अव्यवस्था, हिंसाचारादी बाबींसाठी सरकारला दोषी ठरवतो. पण डोळे उघडून बघितले तर सामान्य नागरिकही खूप काही करू शकतो. ताजे उदाहरण घ्यायचे तर समान नागरी कायदा. 2016 मध्ये हा कायदा लागू करण्यासाठी आयोगाने जनमताची मागणी केली होती. त्यावेळी जनतेकडून 75378 सूचना आल्या. त्याआधारे विधी आयोगाने 185 पानांचा अहवाल सादर करून समान नागरी कायदा लागू करू नये, हा निकाल दिला होता. हे सामान्य नागरिकाच्या शक्तीचे उदाहरण आहे. आताही परत या कायद्यावर विचार मंथन सुरू झाले आहे. ‘गिव्ह इट अप’ ही मोदी सरकारने आवाहन करून राबवलेली योजना. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर विकत घेतल्यावर ग्राहकाच्या खात्यात सरकारकडून सबसिडी जमा होत असते. आर्थिकदृष्ट्या संपन्न गटाने ही सबसिडी न स्वीकारता सरकारला परत केली तर समाजातील गरीब वर्गाला त्याचा फायदा होतो ही ‘गिव्ह इट अप’ कॅम्पेनमागील संकल्पना आहे. 23 एप्रिल 2023 पर्यंत सबसिडी नाकारणार्‍यांची संख्या जवळजवळ 1.13 कोटी झाली आहे. तथापि संपन्न गटाचा विचार करता ही संख्या नगण्य आहे.

भारतीय संविधानात भारतीयांचे मूलभूत हक्क आणि अधिकारांची नोंद आहे हे आपल्याला माहीत आहेच, पण 3 जानेवारी 1977 पासून ‘कलम 51-क’ द्वारे ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ विशद करणारा भाग संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे 3 जानेवारी हा नागरिकांचा मूलभूत कर्तव्यदिन म्हणून पाळण्यात येतो. किती नागरिकांना याबद्दल माहिती आहे? उदाहरणादाखल ‘ड’ हे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणारे महत्त्वाचे कर्तव्य आहे. पण मग नुकत्याच मणिपूरमध्ये किंवा अन्यत्र घडलेल्या घटना काय सुचवतात? ‘ज’ हे कर्तव्य म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे. यासंदर्भात विचार करताना मध्य प्रदेशमधील सिहोर या गावी लाखो भाविकांनी गर्दी केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि काही भाविक मृत्युमुखी पडले. ही घटना काय दर्शवते?

‘जनहित याचिका’ दाखल करण्याचे धाडस किती नागरिक दाखवतात? राजस्थानमधील एका खेड्यामध्ये भंवरीदेवी या महिलेने एका वर्षाच्या मुलीच्या विवाहाला विरोध केला तेव्हा स्थानिक लोकांकडून धमक्या आल्या आणि तिच्या घरावर बहिष्कार टाकण्यात आला. 22 सप्टेंबर 1992 रोजी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यासंदर्भात भंवरीदेवीच्या वतीने नयना कपूर या वकील महिलेने सुप्रीम कोर्टात राजस्थान सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे भंवरीदेवीला न्याय मिळालाच पण या निकालामुळे स्त्रियांच्या हक्कांविषयी उच्च न्यायालयीन स्तरावरदेखील सुधारणा झाली. स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराबद्दल या जनहित याचिकेचा निकाल हा एक मैलाचा दगड ठरला आहे.

आज आपण सामान्य नागरिक ‘कळते पण वळत नाही’ या स्थितीमध्ये आहोत. अवतीभोवतीची परिस्थिती आणि राजकारण यामुळे सगळ्यांमध्येच अस्वस्थता आहे. पण संवेदनशील आणि बुद्धिमान वर्गाने आपल्या मनाच्या खिडक्या बंद करून स्वतःच्या कोषात जगणे सुरू केले आहे, हे फार गंभीर आहे. या अस्वस्थतेतून बाहेर पडण्यासाठी हा सामान्य नागरिक दृकश्राव्य माध्यमाच्या आहारी गेला आहे. अन्नावाचून तडफडणारे लोक, रस्त्यावर घडलेला अपघात, डोळ्यांसमोर होणारी महिलेची विटंबना… याकडे दुर्लक्ष करून तो आभासी आनंदात रमला आहे.आजच्या जगातल्या सामान्य समाजाचे हे यथार्थ वर्णन आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *