Friday, April 26, 2024
Homeनगरटाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्याचे निकृष्ठ काम बंद पाडले

टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्याचे निकृष्ठ काम बंद पाडले

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रभाग क्र. 4 व 5 मधून बेलपिंपळगावकडे जाणार्‍या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने बंद पाडण्यात आले. सदरचे काम दर्जेदार करण्यात येऊन ते थोरात-बोडखे वस्तीपर्यंत करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

- Advertisement -

टाकळीभान-बेलपिंपळगाव रस्त्याची कित्येक दिवसांपासून वाताहत झाली आहे. येथील प्रभाग क्र. 4 व 5 मधून जाणारा हा महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता थोरात-बोडखे वस्तीपर्यंत अंत्यत खराब झालेला आहे. कित्येक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आ. लहु कानडे यांच्या निधीतून दोन कि. मी. कामास मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली असली तरी या कामासाठी वापरले जाणारी खडी अत्यंत निकृष्ठ व दर्जाहीन वापरली आहे. आ. कानडे यांनी रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी रस्ता दर्जेदार होण्यासाठी ग्रामस्थांनी कामावर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले होते. मात्र रस्त्याचे काम करणारा ठेकेदार अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य या कामासाठी वापरत असल्याने ग्रामस्थांनी उपसरपंच कान्हा खंडागळे यांच्याकडे निकृष्ठ कामाची तक्रार केली. त्यानंतर खंडागळे यांनी प्रत्यक्ष पहाणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी पाहणी केल्यानंतरच काम सुरू करावे, असे सांगत काम बंद पाडले.

या रस्त्याला मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने थोरात- बोडखे वस्तीपर्यंत रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत ते काम लक्ष्मीवाडीपर्यंतच होणार असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. थोरात-बोडखे वस्तीपर्यंत या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी तुकाराम बोडखे, अनिल बोडखे, उमेश त्रिभुवन, अजित थोरात, बंडू वेताळ, सुनील बोडखे, अशोक वेताळ, बाळासाहेब शेळके, द्वारकानाथ बोडखे, सुभाष येवले, राजेंद्र बोडखे, जालिंदर वेताळ, किरण बोडखे, रमेश येवले, सुनील त्रिभुवन, नानासाहेब रणनवरे, बंडू बोडखे आदींनी केली आहे.

टाकळीभान-बेलपिंपळगाव प्रभाग क्र. 4 व 5 मधून जाणार्‍या रस्त्याचे काम पाहणी दरम्यान निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले. या कामासाठी दर्जेदार खडी वापरणे गरजेचे आहे. मात्र याठिकाणी विहिरीवरील डबर आणून काम सुरू होते. अशाप्रकारे निकृष्ठ दर्जाचे काम कदापी होऊ दिले जाणार नाही. त्यामुळे सद्यस्थितीत ते बंद करण्यास सांगितले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी आल्यावर दर्जेदार काम करण्याच्या बोलीवरच कामास सुरूवात केली जाणार आहे.

– कान्हा खंडागळे, उपसरपंच, टाकळीभान.

- Advertisment -

ताज्या बातम्या