Thursday, April 25, 2024
Homeक्रीडापाकचा पराभव अन् नगरमध्ये फटाके...

पाकचा पराभव अन् नगरमध्ये फटाके…

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाक संघाकडून झालेल्या भारताच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेले क्रिकेटप्रेमी गुरुवारी मात्र भलतेच सुखावले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला अन् नगरमध्ये एकच जल्लोष उडाला. पराभवामुळे पाकिस्तानी संघ स्पर्धेतून बाद झाल्याने उत्साही वातावरणात अनेकांनी शहराच्या विविध भागात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

काल (गुरुवारी) झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाची लढत पाकिस्तानशी झाली. पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत गाठले. मॅथ्यू वेड (17 चेंडूंत नाबाद 41) आणि मार्कस स्टॉइनिस (31 चेंडूंत नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसर्‍यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाद झाल्याचा आनंद भारतीय क्रिकेटपटूंनी जल्लोषात साजरा केला. नगरमध्येही फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

सामन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (49) आणि मिचेल मार्श (28) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (5) आणि ग्लेन मॅक्सवेल (7) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी 81 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

त्याआधी, पाकिस्तानने 20 षटकांत 4 बाद 176 अशी धावसंख्या उभारली. मोहम्मद रिझवान (67) आणि कर्णधार बाबर आझम (39) या भरवशाच्या सलामीवीरांनी डावाची चांगली सुरुवात केली. त्यांनी 71 धावांची सलामी दिल्यावर आझमला अ‍ॅडम झॅम्पाने बाद केले. रिझवानने मात्र उत्कृष्ट फलंदाजी सुरू ठेवताना या स्पर्धेतील तिसरे अर्धशतक झळकावले. त्याला डावखुर्‍या फखर झमानची (नाबाद 55) तोलामोलाची साथ लाभली. आता अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची लढत न्यूझीलंडशी होणार आहे.

अंतिम सामन्यात ऑस्टे्रलियाला समर्थन

अंतिम सामना रविवारी (दि.. 14) होत आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेटप्रेमींचे समर्थन ऑस्ट्रेलियाला असेल, असेच अनेकांचे मत आहे. कारण भारताचा पराभव केलेल्या पाकिस्तानी संघाला ऑस्ट्रेलियाने धूळ चारली. तसेच विविध समीकरणानंतर भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी साखळी सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करणे गरजेचे होते. मात्र, त्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय झाला. त्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. साहजिकच अंतिम सामन्यात भारतीयांचे समर्थन ऑस्ट्रेलियाला असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या