Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशSushma Swaraj death anniversary : वकील ते केंद्रीय मंत्री... सुषमा स्वराज...

Sushma Swaraj death anniversary : वकील ते केंद्रीय मंत्री… सुषमा स्वराज यांची ‘फोटोबायोग्राफी’

आपल्या अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांची आज पुण्यतिथी. महिलांच्या आयडॉल असणाऱ्या स्वराज यांचा विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा असा आहे. स्वराज यांनी आपल्या चार दशकाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मान-सन्मान पटकावतानाच अनेक विक्रमही नोंदविले आहेत.

१४ फेब्रुवारी १९५३ रोजी हरियाणातील अंबाला इथं सुषमा स्वराज यांचा जन्म झाला. १९७० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुषमा यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. अंबाला कँटोनमेंटमधल्या सनातन धर्म कॉलेजातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

- Advertisement -

कॉलेजच्या दिवसात सुषमा यांना सलग तीन वर्षे सर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून गौरवण्यात आलं. हरियाणा सरकारच्या भाषा विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट हिंदी वक्ता’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सुषमा स्वराज यांचा विवाह स्वराज कौशल यांच्या सोबत झाला. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पंजाबच्या चंदीगड विद्यापीठाच्या लॉ विभागात सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल वकीलीचे शिक्षण घेत होते. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि १३ जुलै १९७५ ला त्यांचा विवाह झाला.

सुषमा स्वराज यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून केली. त्यानंतर त्यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र सुरुवातीपासून त्यांना राजकारणाची आवड होती. त्यांची राजकीय कारकीर्द १९७० मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत चांगले संबंध होते. त्यामुळे १९७५ पासून त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या कायदेशीर पथकाचं काम करायलाही सुरुवात केली.

आणीबाणीनंतर सुषमा स्वराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पावधीतच त्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्या म्हणून पुढे आल्या. १९७७ साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. १९७९ मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ २७ वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

सुषमा स्वराज १९९० मध्ये राष्ट्रीय पातळीवर राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांना पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य बनवले होते. त्यानंतर १९९६ मध्ये सुषमा या दक्षिण दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसाच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांना माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिले. ऑक्टोबर १९९८ मध्ये त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्या.

सुषमा स्वराज यांच्यासाठी १९९९ हे वर्ष फार महत्त्वपूर्ण होते. १९९९ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमधील बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपला सोनिया गांधीविरोधात कोणताही उमेदवार मिळत नव्हता. म्हणून त्यांनी सुषमा यांना बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. या निवडणुकीत विजय मिळावा म्हणून सुषमा स्वराज अवघ्या ३० दिवसात कन्नड भाषा शिकल्या होत्या आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी कन्नड भाषा वापरली होती.

२०१४ ते २०१९ या काळात त्यांनी भाजपच्या परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. त्या ७ वेळा खासदार आणि ३ वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. सुषमा स्वराज या प्रभावी वक्त्या आणि उत्कृष्ट खासदार होत्या. त्यांना सर्वपक्षीयांकडून मान-सन्मान मिळाला. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारतीय अडकले असतील, तर त्यांना सुषमा तातडीने मदत करत असत. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी (६ ऑगस्ट) निधन झालं.

- Advertisment -

ताज्या बातम्या