राज्यात हनुमान चालिसा पठण करणे गुन्हा – मुनगंटीवार

jalgaon-digital
2 Min Read

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

या देशात वंदे मातरमला विरोध करणे, भारतमातेच्या तसेच देशाच्या पंतप्रधान यांंच्यासंदर्भात अपशब्द वापरणे याबाबत राजद्रोहाचा गुन्हा केला जात नाही. परंतु या राज्यात हनुमान चालिसा पठण करणे हा राजद्रोह आहे. यावरून कसे हिंदुत्ववादी बेगडी आहे हे या उदाहरणावरून लक्षात येते. स्व.बाळासाहेब ठाकरे असे म्हणाले होते की, ज्या दिवशी आम्ही काँगेससोबत जाऊ त्या दिवशी शिवसेनेचे दुकान मी बंद करेल. ते स्वप्न कदाचित त्यांना पूर्ण करायचे असेल ते यांच्या हातून पूर्ण व्हावे यासाठी मी शिर्डीच्या साईबाबांना प्रार्थना केली असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार यांनी साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, प्रदेश सदस्य किरण बोराडे, स्वानंद रासणे, नरेश सुराणा, सोमराज कावळे, बबलू वर्पे, गणेश शेळके, राजेंद्र बलसाने आदी उपस्थित होते.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले, सध्या महाराष्ट्रामध्ये सूडनाट्य, गुंडाराज सुरू आहे. अमृतमहोत्सवी वर्षात संविधानाचे रक्षण, सन्मान करण्याऐवजी लोकशाहीला बोट लागेल अशा प्रकारची कृती होत आहे. पण हे या राज्याचे एक वैशिष्ट्य आहे जो वाईट कृती करतो त्याला संविधानाच्या आधारावर हे सर्व भोगावे लागते.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सीआरपीसी 160 ची नोटीस दिली आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुद्दाम एका खोट्या केसमध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. परिणामी न्यायमुर्तीनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आ. नितेश राणे यांच्यावरही गुन्हे दाखल केले.

हनुमान चालीसा म्हणणार असाल तर या देशातील अपवित्र कार्य आहे. हा राजद्रोह आहे.पण भारत माता की जय न म्हणणारे मांडीवर बसले पाहिजे. यांच्याच मतावर आमचे सत्तेचे दुकान चालते. परिवारात पात्रता नसताना मोठ्या पदावर जाता येते म्हणून ज्यांना वाईट कृती करायची त्यांनी करावी, असा उपरोधिक टोला मारत न्यायपालिकेवर आमचा विश्वास असल्याचे सांगितले.

संजय राऊत यांचे विधान गंभीरपणे घेऊ नये कारण ते म्हणतात की डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर मोठा आहे. त्यांचा शिवसेनेवर राग असल्याचे दिसून येत असून सेना संपविण्यासाठी त्यांनी विडा उचलला असल्याचे सांगितले. काँग्रेस विसर्जित करा हे महात्मा गांधींंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहुल गांधी यांनी संकल्प निश्चित केला असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *