राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर धडक कारवाई

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या विंचूर चौफुलीवर व शहरातील मुख्य प्रवेश असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण येवला नगरपालिकेच्या कारवाईत काढण्यात आले.

मागील महिन्यात याच चौफुली परिसरात एका अनियंत्रित कंटेनर चालकांनी अनेक वाहने उध्वस्त करीत एकाचा जीव घेतला होता. गुरुवारी सकाळी विंचूर चौफुलीच्या आसपास थेट राज्य महामार्गावर ठाण मांडून बसलेली विक्रेते, हॉटेल व इतर टपर्‍या, भाजी विक्रेते यांचे सामान जप्त करीत त्यांनी उभारलेले तात्पुरते शेड उध्वस्त करण्यात आले.

मालवाहू वाहने हटवावी

विंचूर चौफुलीवर कोपरगाव रस्त्यावर नगरपालिका नूतन व्यापारी संकुला समोर रस्त्याच्या दोन्ही बाजूने मालवाहू वाहने उभी केलेली असतात, ती वाहने इतरत्र हलवल्यास चौफुली पूर्ण मोकळा श्वास घेईल. त्या साठी ही वाहने इतरत्र हलवावी, अशी मागणीही केली जात आहे.

भाजीपाला विक्रेत्यांसाठी नगरपालिकेने बाजार तळाजवळ भले मोठे शेड उभारलेले आहे मात्र तेथे व्यवसाय होत नाही असे कारण सांगत भाजीपाला विक्री येते रस्त्यावर बसत होते. तसेच फळ विक्रेते सुद्धा राज्य महामार्गावर स्थान मांडून बसले होते. यामुळे रस्त्यावरून चालणे सर्वसामान्यांना जिकिरीचे बनले होते . याच परिस्थितीमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. येवला नगर परिषदेने धडक कारवाई करून हे अतिक्रमण आज जरी उठवले असले तरी पुन्हा अतिक्रमण वाढले जाते त्यामुळे आता हा परिसर किती दिवस मोकळा श्वास घेतो याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी नगरपरिषदेने ओटे व शेड बांधलेले आहे या ठिकाणी त्यांना जागा दिले आहेत तिथे त्यांनी भाजीपाला विक्री करावी, इतर व्यावसायिकांना शनी पटांगणामध्ये जागा दिली आहे तेथे त्यांनी व्यवसाय करावा, जनतेने सुद्धा रस्त्यावरील विक्रेत्याकडून भाजीपाला न घेता भाजी बाजारासाठी बांधलेल्या शेडमध्ये ओट्यावर असलेल्या विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *