Thursday, April 25, 2024
Homeनगरदिल्लीतील शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी संगमनेरात कडकडीत बंद

दिल्लीतील शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी संगमनेरात कडकडीत बंद

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

केंद्रातील भाजपा सरकारने विना चर्चेने लागू केलेल्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांना विरोध करत हे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी तसेच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यात नागरिकांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात भारत बंदमध्ये संगमनेरात महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सर्व शेतकरी संघटना, पुरोगामी व मित्र पक्षांच्या वतीने आयोजित संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आज दिवसभर शहरातील सर्व बाजारपेठा, व्यापारी दुकाने, शेतमाल विक्री, वाहतूक बंद होती. ग्रामीण भागातही तळेगाव, साकूर, निमोण, वडगाव पान, धांदरफळ, जवळेकडलग अशा मोठ्या गावांसह सर्व गावांमधून छोटेमोठे व्यवहार बंद करण्यात आले होते.

संगमनेर तालुक्यात एकमुखी या बंदला पाठिंबा देण्यात आला असून सरकारने तातडीने हे काळे कायदे रद्द करावेत,अशी मागणी करण्यात आली. घुलेवाडी फाट्यावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोही केला होता. कालचा बंद हा संपूर्ण शहर व तालुक्यात कडकडीत पाळण्यात आला असून यामध्ये शहरातील सर्व व्यापारी सहभागी झाले होते.

ग्रामीण भागातील शेतकरी, विविध शैक्षणिक संस्था, अमृत उद्योग समूह, बाजार समिती या संस्थाही पूर्ण बंद होत्या. यामुळे या बंदमध्ये संपूर्ण तालुक्याने उत्स्फूर्त सहभाग घेत भारत बंदला सक्रीय पाठिंबा दिला.

यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. मात्र या शेतकर्‍यांच्या मागणीकडे केंद्र सरकार नकारात्मक दृष्टीने पाहत असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला जात आहे. संपूर्ण भारत एकवटला असून हे काळे कायदे तातडीने रद्द करावेत अन्यथा भारतामध्ये होणार्‍या जनउद्रेकास केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार राहणार आहे.

बाबा ओहोळ म्हणाले की, सर्व पुरोगामी पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला आहे हा बंद शेतकर्‍यांसाठी असून केंद्र सरकारने तातडीने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे तर आबासाहेब थोरात म्हणाले की पूर्ण भारत एक झाला तरीही केंद्र सरकार आपली आडमुठेपणाची भूमिका राबवत आहे हे अत्यंत निंदनीय आहे.

अमर कतारी म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कृषी व कामगार कायदे मागे घ्यावेत. यावेळी तालुक्यातील विविध संघटनांनी केंद्र सरकारचा निषेध करत या बंदमध्ये सक्रिय सहभाग दिला.

शेतकर्‍यांचा रास्ता रोको

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner – केंद्रातील भाजप सरकारने शेतकरी व कामगार यांच्या विरोधात केलेले कायदे मागे घ्यावे तसेच दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार संगमनेर शहरातून जाणार्‍या नाशिक-पुणे महामार्गावर घुलेवाडी फाटा येथे शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत म्हणाले, शेतकर्‍यांवर अन्याय करणारे विधेयक केंद्र सरकारने रद्द करावे, या मागणीसाठी लाखो शेतकरी पंजाब, हरियाणा, कर्नाटक मधून येवून दिल्ली येथे आंदोलन सुरु केले आहे. या शेतकर्‍यांना अडविले जात आहे. दिल्लीचे तापमान हे 10 अंशावर आहे, असे असतांना आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर थंड पाण्याचे फवारे मारण्यात आले. सरकारला शेतकर्‍यांची जाणीव राहिलेली नाही. हे शेतकर्‍यांविरोधी असलेले विधेयक रद्द झाल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक-पुणे महामार्गावर घुलेवाडी फाटा येथे झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणा केल्या. मागे घ्या, मागे घ्या, शेतकरी विधेयक मागे घ्या, केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा आंदोलन कर्त्यांनी दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सोशल मीडियावरही बंदची धूम

विविध समाज माध्यमांवर तरुणांनी व नागरिकांनी भारत बंदला पाठिंबा देत केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवला. फेसबुक व इतर सोशल माध्यमावर ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त पाठिंबा दिसून येत होता तर केंद्र सरकारवर टीका सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या